abujmad
abujmad 
सप्तरंग

निसर्गरम्य, दुर्गम आणि संवेदनशील अबुजमाड

अनिकेत आमटे संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा

भामरागड हा तालुका महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेला शेवटचा तालुका आहे. पुढे रस्ते नाहीत पण डोंगर दऱ्या, नद्या पार करून आपण छत्तीसगडला जाऊ शकतो. अबुजमाड हा भाग आहे. त्यातील काही भाग महाराष्ट्रात आणि काही भाग छत्तीसगडमध्ये आहे. अतिशय दुर्गम आणि संवेदनशील आहे. आदिवासी बांधवांची अनेक खेडी-गावे या अबुजमाडमध्ये आहेत. कुठलाही विकास या भागात पोहोचलेला नाही. अशाच भागात बिनागुंडा नावाचे गाव आहे. हे गाव भामरागड गावापासून साधारण 36 किलोमीटर लांब आहे. पावसाळ्यानंतर जानेवारीमध्ये डोंगरावरील कच्च्या रस्त्यावर माती टाकायचे काम त्या भागातील आदिवासी बांधव दरवर्षी करीत असतात. निदान जूनपर्यंत तो रस्ता सुरू राहतो. एकदा पावसाळा सुरू झाला की माती पूर्णपणे वाहून जाते आणि मोठे खड्डे रस्त्यावर पडतात व मोठ्या प्रमाणात चिखलसुद्धा होतो. भामरागडपासून लाहेरी हे गाव 18 किलोमीटर लांब आहे. त्यापुढे बिनागुंडा 18 किलोमीटर. सुरुवातीचा 18 किलोमीटरचा प्रवास सोपा आहे. भामरागड ते लाहेरीपर्यंत डांबरीकरण झालेला पण फुटलेला रस्ता आहे. लाहेरीच्या पुढे 18 किलोमीटर बिनागुंड्याला जाताना उंच डोंगर आहेत. जेमतेम गाडी जाईल असा कच्चा रस्ता. आजूबाजूला घनदाट जंगल. त्यात लाहेरी गावानंतर लगेच लाहेरी नदी लागते. त्यावर पूल नाही. पाणी कमी झाले की नदीपलीकडे असलेले गुंडेनूर-बंगाडी गावातील आदिवासी बांधव बांबूंच्या ताटव्यांचा पूल करतात. उन्हाळ्यात पाणी कमी होते तेव्हा नदीच्या पात्रातून जीप जाऊ शकते.

बिनागुंडा हे गाव साधारण 40 घरांचे आहे. येथील लोकसंख्या 300 च्या आसपास आहे. अबुजमाड परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना बडा माडिया म्हणतात. बिनागुंडापासून 7-8 किलोमीटरवर 7-8 छोटे आदिवासी पाडे आहेत. तिथे चालत जाणेच शक्‍य आहे. धड शिक्षण नाही. आरोग्य सुविधा नाही. रोजगार नाही. अशा भागात अनेकदा उपजीविका ही जंगलातील कंदमुळे, फळे आणि शिकार यावरच करावी लागते. शेतीसाठी सपाट जमीन नाही. डोंगराच्या उतारावरील जंगल कापून तेथे कोसरी/नाचणीसारखे पीक घेतले जाते. भरपूर पाऊस असून पाण्याचा फारसा उपयोग करता येत नाही. शासनाने सोलरचे दिवे त्या भागात दिले आहेत. पण, ते बिघडले की मग तसेच पडून राहतात. एक रेशन दुकान सुरू केले आहे. त्यात फक्त उन्हाळ्यात धान्यसाठा करून ठेवल्या जातो.

इतर वेळी वाहन जाऊ शकत नाही. दोनदा राज्यसभेच्या मेंबर राहिलेल्या नागपूरच्या स्व. निर्मला देशपांडे यांची एक विनोबा आश्रमशाळासुद्धा गावात आहे. तिथे शाळा चालविणे अतिशय अवघड आहे. बाहेरच्या जगाशी बिलकुलच संपर्क नसल्याने पूर्वी गावात एखादे वाहन आले की आदिवासी बांधव झोपडीतून न्याहाळाचे. बाहेर बागडत असलेली लहान मुलं वाहनाच्या आवाजाने घाबरायची, रडायचीसुद्धा आणि धावत जंगलात अथवा झोपडीत जाऊन लपून बघायची. आता ती भीती नाही. आपल्याला माडिया भाषा अवगत असली की आपलेपणा जाणवतो. प्रमाण कमी असले तरी काही विद्यार्थी आता बाहेर शिक्षणासाठी गेले आहेत. रोजगाराच्या शोधात काही कुटुंबे डोंगरावरून खाली वास्तव्यास आली आहेत. जंगलावर अवलंबिलेले पोट असल्याने दिवस दिवस आदिवासी बांधव कंदमुळे गोळा करण्यात व्यस्त असतात. या भागात अस्वलांच्या मनुष्यावरील हल्ल्यांचे प्रमाण बरेच आहे. सर्पदंश आहे. मलेरिया भरपूर आहे. औषधोपचाराअभावी अवेळी मृत्यू अनेकदा ओढवतो.
बिनागुंड्यापासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर डोंगरदऱ्यातून वाहत येणारा एक निसर्गरम्य धबधबा आहे. कोणी त्याला इंदस धबधबा म्हणत तर कोणी त्याला राजीरप्पा. अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाणी असलेला हा धबधबा 12 महिने सतत पडत असतो. साधारण 20 ते 30 फुटांवरून हा धबधबा खाली वेगाने कोसळतो. चारही बाजूने डोंगरांनी वेढलेल्या या धबधब्याचे अनेकांना आकर्षण असते. जानेवारी ते मे च्या दरम्यान जीपच्या साहाय्याने मोजके पर्यटक धबधबा बघायला जात असतात. निसर्ग सौंदर्याने हा परिसर बहरलेला आहे. पर्यटनाच्या उद्देशाने येणारे अनेक पर्यटक भामरागडला भेट देत असतात. पर्यटक वाढल्यापासून आणि सामाजिक भान कमी असल्याने जाताना अनेक पर्यटक प्लॅस्टिक व इतर कचरा नदीमध्ये अथवा किनाऱ्यावर तसेच फेकून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

पूर्वी अतिशय स्वच्छ असलेले नदीचे पाणी निसंकोचपणे प्यायला भीती वाटत नव्हती. पण, आता काहीतरी रोग होईल अशी भावना निर्माण होत आहे. पण, काही गावांना नदीचे पाणी पिण्याशिवाय उन्हाळ्यात पर्याय नसतो. पाणी जर दूषित झाले तर त्याचा फटका आदिवासी बांधवांबरोबरच वन्यप्राणी आणि पाळीव प्राण्यांनासुद्धा बसू शकतो. शासनाने पण या समस्येकडे आतापासूनच गंभीरपणे बघावे आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे. येणाऱ्या सर्व पर्यटकांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी येथील निसर्गाचा आनंद घेत असताना कुठेही घाण, कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT