Bhimabai Dangat sakal
सप्तरंग

औदार्याचा अभिमान

स्वातंत्र्यचळवळीने भारलेला तो १९४२चा काळ. इंग्रजांना ठणकावून सांगितले जात होते छोडो भारत.

संपत मोरे

स्वातंत्र्यचळवळीने भारलेला तो १९४२चा काळ. इंग्रजांना ठणकावून सांगितले जात होते छोडो भारत. याच काळात सातारा जिल्ह्यातील क्रांतिवीरांनी एकत्र येऊन प्रतिसरकार स्थापन केले होते. या चळवळीचा सगळीकडे बोलबाला होता.

कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे गावातील लोकांनी इंग्रजी राजवट नाकारून प्रतिसरकारच्या राजवटीला मान्यता दिली होती. कुंडलचे शाहीर शंकरराव निकम हे या प्रतिसरकारचे प्रचारमंत्री होते. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून गावोगावी जाऊन प्रतिसरकारचा प्रचार सुरू केला होता. त्यांच्या पोवाड्याला जाईल त्या गावात लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळत होता. लोक स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत होते. मदत करत होते.

एक दिवस पुण्यातील मंडईत शाहीर निकम यांचा पोवाडा सुरू होता. शेकडो लोक जमले होते. शाहिरांनी पोवाड्यादरम्यान स्वातंत्र्यचळवळीला मदत करण्याचे आवाहन केले, तेव्हा प्रेक्षकांत उपस्थित असलेल्या भीमाबाई दांगट यांनी आपल्या अंगावरील दागिने काढून या शाहिरांना दिले. त्यांच्या दानशूरपणाचे कौतुक शाहिरांनी केलेच; पण उपस्थितांनीसुद्धा भीमाबाई यांच्या औदार्याचा अभिमान वाटला...

भीमाबाई दांगट यांच्याबद्दल अलीकडच्या पिढीला फारशी माहिती नाही; पण स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ या दोन्ही काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे भीमाबाई यांचे माहेर.

त्या गावातील सखारामराव पवार यांच्या त्या कन्या. त्यांचा विवाह पुण्यातील गंगाराम दांगट यांच्याशी झाला. ते खूप श्रीमंत होते. त्यांना श्रीमंत शेठ याच नावाने ओळखले जात होते. पुण्यात अनेक ठिकाणी त्यांची स्थावर मालमत्ता होती. ते दानशूर आणि परोपकारी होते; पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. तेव्हा भीमाबाई सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांच्या चांगल्या संसाराला दृष्ट लागली होती. इतर कोणी स्त्री असती, तर ती डगमगली असती; पण भीमाबाई यांनी या संकटाला मोठ्या धैर्याने सामोरे जायचे ठरवले. न खचता त्यांनी आलेल्या संकटावर मात करण्याचे ठरवले.

मुलगा सदाशिव यांचा सांभाळ करत त्या आपल्या शेतीवाडी आणि इस्टेटीची देखभाल करू लागल्या. एकवीस वर्षांची ती विधवा तरुणी कोसळलेल्या दुःखावर मात करत आपल्या आयुष्याची वाटचाल करू लागली. वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्या पुढे निघाल्या. पुढे दुःख सावरून आपल्या पतीचा सामाजिक कामाचा वारसा जपू लागल्या. गोरगरीब लोकांना मदतीचा हात देणे. त्यांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी अनेक कुटुंबाना बळ दिले. पुण्यातील अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात त्या उभ्या राहत आणि सढळ हाताने मदत करत.

तेव्हा पुण्यात नगरपालिका होती. या नगरपालिकेत महिलांना दोन जागा असाव्यात असा कायदा आला, तेव्हा पुणे शहरातून भीमाबाई दांगट या लोकशाही स्वराज्य आघाडी या पक्षाकडून निवडणुकीत उभा राहिल्या आणि मोठ्या मताने विजयी झाल्या. नगरपालिका सभागृहात त्यांनी गावातील सामान्य जनतेचे प्रश्न हिरिरीने मांडले. सभागृहात सामान्य माणसाचा आवाज त्यांच्यामुळे आला. या काळात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडून ते सोडवून घेतले.

१९३८ ते १९५० पर्यंत त्या नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. १९५० मध्ये महानगरपालिका स्थापन झाली तेव्हा बारा जणांचे सल्लागार मंडळ स्थापन झाले. त्यात त्यांना संधी मिळाली. १९५२ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. १९३८ ते १९५८ सलग वीस वर्षे नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन्ही सभागृहात त्यांनी काम करत पुण्याच्या जडणघडणीत योगदान दिले.

१९४२ चा इंग्रजी सत्तेच्या विरोधात उभा राहिलेला लढा. या लढ्यात महात्मा गांधी यांनी ‘करेंगे या मरेंगे’ असा मंत्र दिला होता. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले होते. या प्रतिसरकारमध्ये सहभागी असलेल्या क्रांतिवीरांवर इंग्रजी सत्तेचे वॉरंट होते. तेव्हा अनेक क्रांतिवीरांनी पुण्यात आसरा घेतला होता. ते भूमिगत होते. त्यावेळी भीमाबाई दांगट यांनी डॉ. लीलाताई पाटील, उत्तमराव पाटील या भूमिगतांना मदत केली होती. त्या लढ्याचे मुख्य नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनाही भीमाबाई यांनी भूमिगत काळात जेवण पोहोच केले होते. याच वेळी प्रतिसरकारचा पोवाडा म्हणणाऱ्या शाहीर शंकरराव निकम यांचा पोवाडा ऐकून त्यांनी त्याच ठिकाणी आपल्या अंगावरील सर्व दागिने प्रतिसरकारच्या कार्यासाठी दिले होते.

सातारच्या प्रतिसरकारला त्यांनी अनेकदा मदत केली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे  महत्त्वाचे योगदान होते. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रतिसरकारमधील नेते भीमाबाई दांगट यांनी प्रतिसरकारमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सांगत असत. त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असत. शाहीर शंकरराव निकम अनेक कार्यक्रमातून हा प्रसंग सांगत.

भीमाबाई यांचा स्वातंत्र्य चळवळीत जसा सहभाग होता तसा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतसुद्धा त्या सहभागी होत्या. मुंबई बेळगाव निपाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणा देत संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला होता. या वेळी काँग्रेस सोडून सर्व पक्ष एकत्र येत संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. या समितीने १९५७ मध्ये निवडणूक लढवत महाराष्ट्रातील जनतेचा कौल घेतला होता.

मराठी भाषक भागात जनतेने समितीला भरभरून साथ दिली होती. काँग्रेसचा संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला विरोध आहे, अशी लोकभावना निर्माण झाली होती. याला तत्कालीन काँग्रेस नेते आणि दिल्लीतले वरिष्ठ नेते यांनी घेतलेल्या भूमिका आणि काही विधाने कारणीभूत होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते जिथे जिथे जातील तिथे त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पुण्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते

तेव्हा त्यांना भीमाबाई दांगट यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. पदापेक्षा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात त्यांनी पुण्यात अनेकदा आंदोलन केली होती. एक रणरागिणी म्हणूनच पुण्यात त्यांची ओळख होती.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना भीमाबाई यांनी परोपकारी वृत्ती आणि दानशूरपणा कायम जपला. त्यांनी शेकडो लोकांना मदत केली. लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या. त्या दानशूर होत्या. त्यांनी गणेश पेठेतील एक वाडा शाळेसाठी दान दिला. या जागेवर मुलींची शाळा उभी राहिली. अशा दानशूरतेच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यांनी स्वतःचे दुःख विसरून समाजाच्या दुःखाची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.

भीमाबाई यांना जाऊन आज बरीच वर्षे झाली आहेत. त्यांचे लोकांना विस्मरण झालेय. कधीकाळी पुणे शहराच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असलेल्या दांगट यांचे लोकांना एवढ्यात विस्मरण व्हावे, ही दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्याबाबतची फारशी माहितीही कोणाकडे नाही. त्यांचा तो वैभवशाली कार्यकाल बघणारी माणसेही आज नाहीत.

पुणे नगरपालिकेतल्या पहिल्या महिला नगरसेविका असलेल्या भीमाबाई, स्वातंत्र्य चळवळीसाठी दागिने देणाऱ्या, महानगरपालिकेच्या शाळेसाठी वाडा दान देणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान देणाऱ्या, पुण्यातील उपेक्षित कष्टकरी माणसांचा आवाज असलेल्या भीमाबाई दांगट कुणाच्याही विस्मरणात जाऊ नये. त्यांच्या कार्याचे स्मरण आजच्या समाजकारण आणि राजकारणासाठी प्रेरणा देणारे आहे.

पुण्यातील मंडईत शाहीर निकम यांचा पोवाडा सुरू होता. शेकडो लोक जमले होते. शाहिरांनी पोवाड्यादरम्यान स्वातंत्र्यचळवळीला मदत करण्याचे आवाहन केले, तेव्हा प्रेक्षकांत उपस्थित असलेल्या भीमाबाई दांगट यांनी आपल्या अंगावरील दागिने काढून या शाहिरांना दिले. त्यांच्या दानशूरपणाचे कौतुक शाहिरांनी केलेच; पण उपस्थितांनीसुद्धा भीमाबाई यांच्या औदार्याचा अभिमान वाटला. स्वातंत्र्य चळवळीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत योगदान देणाऱ्या, पुण्यातील उपेक्षित कष्टकरी माणसांचा आवाज असलेल्या भीमाबाई दांगट कुणाच्याही विस्मरणात जाऊ नये...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT