IPL Cricket
IPL Cricket Sakal
सप्तरंग

आयपीएल सुरू होतेय; पण...

शैलेश नागवेकर

देशातील सर्वोत्तम स्थानिक क्रिकेट असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. या स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा मोसम संपला आणि क्रिकेट विश्वाला आयपीएलचे वेध लागले. आजपासून सहाव्या दिवसापासून आयपीएलचा धुरळा उडणार आहे. सर्व जण पुन्हा एकदा आयपीएलमय होतील.

सर्व जण जीव तोडून आपलं कसब पणास लावतील. काही खेळाडूंकडून कदाचित क्षमतेपेक्षा जास्त जोरही लावला जाईल. हार्दिक पंड्यासारखा खेळाडू पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी कंबर कसून तयार झालाय. याच वेळी देशात लोकसभा निवडणुकांचाही बार उडणार आहे. एकीकडं प्रचार सभांचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला चौकार-षटकारांचा धडाका असणार आहे. सामान्यांसाठी मनोरंजनाचा धमाकाच जणू काही.

आयपीएलचे केवळ पहिल्या टप्प्याचं मोजक्याच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्यामुळं साधारणतः प्रत्येकी चारपाच साखळी सामने खेळल्यानंतर पुढं कोणाविरुद्ध आणि कोठं खेळायचं हे निश्चित नसलं, तरी आयपीएलची झिंग सलामीचा सामना २२ तारखेला झाल्यापासून नसानसात भिनणार आहे.

सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक लोकप्रिय अशा आयपीएलचे नगारे वाजत असताना जून महिन्यात ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक खेळायचा आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. सध्याच्या चर्चांनुसार आयपीएल मे महिन्याच्या मध्यावर संपेल आणि जूनच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडीज-अमेरिकेत हा टी-२० विश्वकरंडक होत आहे.

एप्रिल-मे महिन्यातील उकाडा. एका शहरातून दुसऱ्या शहरातील प्रवास दोन-तीन दिवसांनंतर होणारे लागोपाठचे सामने हा ताण सहन करत आपल्या मिळणाऱ्या पैशाचेही मोल कायम राखत खेळाडूंना कामगिरी करायची आहे. एकीकडे आपल्यासाठी फ्रँचाईसीने मोजलेल्या पैशाचे दाम वाजवी ठरवण्याचा विचार होत असला तरी आणि आयपीएल विजेतेपद महत्त्वाचे वाटत असले, तरी विश्वकरंडक सर्वश्रेष्ठ आहे याचा विसर खेळाडूंना कधीच पडणार नाही पण फ्रँचाईस आणि त्यांचे संघ व्यवस्थापन कशाला प्राधान्य देणार हे महत्त्वाचे आहे.

२०१३ नंतर एकही आयसीसी करंडक जिंकता आलेला नाही. २०११ मध्ये जिंकलेल्या विश्वकरंडकानंतर दुष्काळच सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी मायदेशात झालेला एकदिवसीय विश्वकरंडक हातात येता येता निसटला हे शल्य अजूनही सर्वांच्या मनात कायम आहे.

१९ नोव्हेंबरचा तो दिवस विस्मरणात जाणारच नाही अशी परिस्थिती असताना आयपीएल आणि त्यातील कामगिरी तसेच विजेतेपदासाठी होणारी स्पर्धा खऱ्याखुऱ्या क्रिकेट प्रेमींच्या पचनी पडणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळवलेल्या यशामुळे १९ नोव्हेंबरच्या दुःखावर थोडी फार फुंकर मारली गेली, पण दुधाची तहान कधीच ताकावर भागवली जात नाही.

इंग्लंडविरुद्धच्या याच मालिकेतून केएल राहुल, रवींद्र जडेजाला दुखापती झाल्या होत्या. जडेजा एका सामन्यानंतर परतला, परंतु राहुल पुन्हा खेळलाच नाही. सर्वांत हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमरासह मोहम्मद सिराज यांना आळीपाळीने वर्कलोड (सामन्याचा ताण) कमी करण्यासाठी एकेका सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली.

खरे तर पाच दिवसांचे सामने चार दिवसांत संपले होते तसेच तिसऱ्या-चौथ्या सामन्यात आठ दिवसांची विश्रांती होती तरीही बुमराला चौथ्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते, त्यावरून सुनील गावसकर सारख्या दिग्गजांनी टीकाही केली होती. सुदैवाने आपण तो सामना जिंकला आणि मालिकाही जिंकली होती पण कदाचित निकाल वेगळा लागला असता तर...?

असो निवड समितीचा विचार कदाचित वेगळा आणि खेळाडूंवरील सामन्यांचा आणि भविष्यातील स्पर्धा-सामन्यांचे गणित बांधून केलेला असू शकेल. हा विचार स्वागतार्ह आहे. पण सर्वांत मोठा प्रश्न आयपीएलमधील वर्कलोडचा आहे. बुमरासारख्या महत्त्वाच्या खेळाडूंसाठीचा वर्कलोडबाबतचा नियम आयपीएल फ्रँचाईससाठी बंधनकारक आहे का ? बीसीसीआय किंवा निवड समिती फ्रँचाईसला आदेश देऊ शकते का ? बुमराला सर्वच्या सर्व १४ साखळी सामने खेळवले जाणार का?

आयपीएलचा कालावधी मुळात दोन ते अडीच महिन्यांचा असतो. भले प्रत्येक सामन्यात गोलंदाजांना चारच षटके गोलंदाजी करावी लागते, परंतु सामन्यासाठी सराव करताना त्याने किती षटके गोलंदाजी केली याची सुद्धा आकडेवारी ठेवली जाते असे सांगितले जाते. पण रात्री उशिरापर्यंत लांबणारे सामने, एका शहरातून दुसऱ्या शहरातील प्रवास आणि वरती उल्लेख केल्याप्रमाणे उष्णता याचा परिणाम नाही म्हटला तरी शरीरावर होत असतो. शेवटी शरीरापेक्षा मानसिक थकवा अधिक परिणामकारक ठरत असतो.

आयपीएलनंतर होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळतील अशा खेळाडूंत समावेश असू शकणारा मोहम्मद शमी अगोदरच बाहेर गेला आहे. केएल राहुल आता दुखापतीमुळे कमी सामने खेळतोय आणि जास्त सामने बाहेर राहतोय, रवींद्र जडेजासारख्या चपळ खेळाडूलाही दुखापती होऊ लागल्या आहेत. सूर्यकुमार यादव तर अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे.

विश्वकरंडक स्पर्धेत ऑक्टोबरच्या मध्यावर गोलंदाजी करताना गुडघा दुखावलेला हार्दिक पंड्या आता इतक्या महिन्यानंतर तंदुरुस्त होऊन आयपीएल खेळण्यास सज्ज होत आहे. काही खेळाडूंची प्रकृती ही वारंवार होणाऱ्या दुखापतींची असते. त्या श्रेणीत केएल राहुल आणि हार्दिक पंड्याचा समावेश आहे. हार्दिकसाठी तर आता आयपीएल प्रतिष्ठेची आहे.

रोहित शर्माऐवजी तो मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. कशी कामगिरी करेल हे नंतर... तो पूर्ण १४ साखळी सामने खेळणे हेच महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संघात असू शकतील अशा खेळाडूंचा वर्कलोड नियंत्रणात ठेवला, तर ते भारतीय संघाच्या दृष्टीने हिताचे असेल, पण पुन्हा प्रश्न येतो संघ मालक किंवा त्यांचे संघ व्यवस्थापन हे ऐकणार का? वर्कलोडच्या या चक्रव्यूहात रोहित शर्माला सलाम करायला हवा.

कारण पस्तिशी पार केलेल्या रोहितची शरीरयष्टी शुभमन गिलसारखी काटक नाही तरी तो इंग्लंडविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांत पूर्ण तंदुरुस्त राहून खेळला. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत रोहित देशाचे नेतृत्व करणार आहे. आता त्याच्याकडे आयपीएलच्या कर्णधारपदाची जबाबदारी नसल्यामुळे रोहितला काही सामन्यांत विश्रांती द्यायला हरकत नाही.

इतिहास विरोधात

आयपीएलमधून होणारा सामन्यांचा ताण याचा ऊहापोह करण्याचा हेतू एवढाच, की आयपीएल संपल्यानंतर लगेचच म्हणजेच जून महिन्यात झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. अपवाद २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा.

खरे तर २०१३ मधील आयपीएल स्पॉटफिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे गाजली होती, धोनीचा चेन्नई संघ तत्कालीन सीईओ गुरुनाथ मय्यपन यांच्यामुळे संकटात सापडला होता, पण याच धोनीनं चॅम्पियन्स करंडक जिंकला होता. त्या यशानंतर गेल्या काही वर्षांत कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना गमावण्याची नामुष्की ओढावलेली आहे. या वेळेस ट्वेन्टी-२० करंडक जिंकणं हे अंतिम ध्येय असले, तरी सर्व प्रमुख खेळाडू तंदुरुस्त असावेत, हीच इच्छा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT