ipl world cup icc bcci undisputed popular in cricket ms dhoni sport N Srinivasan sakal
सप्तरंग

क्रिकेटमधला निर्विवाद लोकप्रिय

धोनी सामन्याअगोदर संघाची बैठक घेऊन खूप चर्चा करत नाही की योजनांचे जाळे पसरवत नाही.

सुनंदन लेले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे जुने जाणते संयोजक एन श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंह धोनीला संघाचा नेता निवडताना दूरदृष्टी दाखवली. विविध देशांच्या आणि काही संपूर्णपणे अनोळखी ताज्या दमाच्या प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळणार्‍या भारतीय खेळाडूंना एका संघात सामावून घेऊन त्यांना योग्य दिशा दाखवणे मोठे आव्हानाचे काम होते.

धोनी सामन्याअगोदर संघाची बैठक घेऊन खूप चर्चा करत नाही की योजनांचे जाळे पसरवत नाही. त्यामुळे मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरत असताना कप्तान नात्याने धोनी काय सूचना देतो काय योजना मांडतो याचे खेळाडूंना औत्सुक्य होते.

प्रसंग होता पदार्पणाच्या म्हणजे २००८ मधल्या पहिल्या ‘आयपीएल’चा. सात संघांच्या मालकीसाठी चढाओढ झाली असताना आठव्या शेवटच्या संघाला कोणी पटकन बोली लावत नसल्याने ललित मोदींनी राजस्थान संघाची स्वत:च मोट बांधली. संघ मालकीचे आकडे ऐकून लोक हैराण झाले.

मुंबई संघाकरिता रिलायन्सने शंभर कोटी रुपये मोजल्याचे ऐकून कानावर विश्वास बसेनासा झाला. भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू एक एका संघाचे स्टार बनले आणि रातोरात कोट्यधीश झाले.

इतके दिवस सगळे भारतीय खेळाडू आपापल्या राज्याच्या किंवा प्रगती झाली असेल तर देशाच्या संघासाठी खेळत होते. चांगल्या कामगिरीसाठी दडपण असायचेच पण आता संघ मालक संपूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन या वातावरणात खेळण्याचे अपेक्षांचे भलतेच दडपण जाणवू लागले होते. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सगळे खेळाडू मैदानात उतरण्याअगोदर एकत्र येतात ज्याला क्रिकेटमध्ये हडल म्हणतात.

त्या हडलमध्ये सगळे एकाग्र झाले आणि धोनीचे वाक्य कानावर पडले, ’संपूर्ण स्पर्धेत आपल्याला सकारात्मक आणि खिलाडू वृत्तीने खेळताना फेअर प्ले ट्रॉफी जिंकायची आहे इतकेच लक्षात ठेवा’, धोनी इतकेच बोलला आणि संघाला घेऊन मैदानात उतरला.

खेळाडूंवरचे सामन्यात काय करायचे याचे दडपण धोनीने एका वाक्यात दूर केले. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम फेरी गाठली होती हे तुम्हांला आठवत असेलच. थोडक्यात सांगायचे तर धोनी खरच वेगळा माणूस, वेगळा नेता आहे.

रंग आमचा वेगळा

आयपीएल म्हणजे भलामोठा प्रसिद्धीचा झोत. इतका मोठा की त्याची नशा भल्या भल्या खेळाडूंना संयोजकांना आणि नामांकित संघ मालकांना बेहोश करून टाकते. ललित मोदींना त्याच प्रसिद्धीच्या झोताने खलास केले. खेळाडूंच्या लिलावाच्या वेळी संघ मालक टेबलवर बसून निर्णय घेतात तसेच भरपूर प्रसिद्धीपण मिळतात.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची बात न्यारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या एकाही लिलावाला ना संघ मालक श्रीनिवासन हजर असतात ना कर्णधार धोनी. तरीही सगळे सुरळीत चालू असते. धोनी शांतपणे विचार करून तीन पर्याय प्रत्येक खेळाडूसाठी देतो.

योग्य किंमतीत लिलावाची बोली लागली तरच चेन्नई संघ खेळाडूला सामावून घेतात नाहीतर लगेच पुढील पर्यायाकडे जातात. फार नामांकित खेळाडूंच्या मागे ते क्वचित धावताना दिसतात. कोणाचे नुसतेच नांव मोठे आहे आणि कोणता कमी प्रसिद्ध खेळाडू जास्त परिणामकारक कामगिरी करायची शक्यता आहे याचे आडाखे धोनी बांधतो. हेच

कारण असेल की कागदावर भक्कम न दिसणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ कामगिरी मात्र भरभक्कम करताना दिसतो. इतकेच नाही तर श्रीनिवासन स्वत: सामना बघायला मैदानावर हजरही राहात नाहीत त्यामुळे बाकी संघाच्या मालकांच्या हजेरीने खेळाडूंवर येणारे भयानक दडपण चेन्नई संघातील खेळाडूंवर कधीच येत नाही. या बाबतीत मालक म्हणून श्रीनिवासन आणि कर्णधार म्हणून धोनीचा रंगच वेगळा आहे.

बऱ्याच वेळा चेन्नई सुपर किंग्जच्या संघ निवडी बाबतीत टीकाकारांनी धोनीवर टीका केली. टी२० क्रिकेट जास्त करू न तरुण खेळाडूंचे असल्याचे दाखवून देताना चेन्नई संघात वयाची तिशी पस्तिशी पार केलेले खूप खेळाडू आहेत.

चेन्नई संघ म्हणजे डॅडस् आर्मी आहे असे टोचून बोलले गेले. धोनीने या टीकेला कधीच शब्दांनी उत्तर दिले नाही. नेहमी उत्तम कामगिरी करून चेन्नई सुपर किंग्जचा संघ टीकाकारांना गप्पं बसवत गेला.

दुसरी खासियत अशी आहे की बाकीचे संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक संघाच्या बैठका आयोजित करून योजनांचा काथ्याकूट करत असताना धोनी क्रिकेटवर कमीतकमी चर्चा करतो. गोलंदाजी प्रशिक्षकांना गोलंदाजांची बैठक घ्यायला सांगून स्वत: विचार करायला भाग पाडून योजना आखायची मुभा देतो.

त्याच बरोबर हा भरवसा देतो की पहिल्यांदा गोलंदाजांच्या मनातील योजनाच राबवली जाईल आणि समजा ती योजना फसली तर चिंता करू नका माझ्याकडे दुसरी योजना तयार असेल. याच कारणाने चेन्नई संघात सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू अत्यंत शांत चित्ताने सामना खेळतो कारण अनावश्यक दडपण धोनी वाढू देत नाही.

अशक्य सातत्य...प्रचंड प्रेम

२०१३ मध्ये गुरुनाथ मय्यपनच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे लागलेल्या गालबोटाचा भाग सोडला तर चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी कमालीची सातत्यपूर्ण झालेली आहे. आत्तापर्यंत १४ आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने फक्त दोन वेळा शेवटच्या चार संघात प्रवेश मिळवलेला नाही. ४ वेळा विजेतेपद पटकावताना ५ वेळा उपविजेतेपद मिळवले आहे. आणि आता २०२३ टाटा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ येऊन दाखल झाला आहे.

चेन्नईच्या क्रिकेटप्रेमी लोकांना आपल्या आयपीएल संघाचा प्रचंड अभिमान आहे तसेच अशक्य प्रेम आहे. महेंद्रसिंह धोनी लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सामना तर सोडाच प्रत्येक मोसमाच्या सुरुवातीला पहिल्या सराव सत्रात धोनीला चेपॉक मैदानावर उतरताना बघायला हजारो प्रेक्षक न बोलवता हजर होतात आणि धोनीला कानठळ्या बसवणार्‍या पाठिंबा देतात. स्मितहास्य करत धोनी त्यांच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करतो हे सगळेच लोभसवाणे वाटते.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा अंतिम सामना धोनीच्या स्पर्धात्मक क्रिकेट कारकिर्दीचा कदाचित शेवटचा सामना असेल. वयाची चाळीशी पार केलेल्या धोनीला श्रीनिवासन सोडायला तयार नसले तरी त्याच्या कारकिर्दीचा शेवट जवळ आल्याचे सगळ्यांनाच स्पष्ट जाणवत आहे.

भारतीय खेळाडू असोत की परदेशी खेळाडू, स्वत:च्या संघातील खेळाडू असो की प्रतिस्पर्धी संघातील, आजी खेळाडू असो की माजी आणि प्रशिक्षक असो की कॉमेंटेटर्स, सगळेच धोनीवर मनापासून प्रेम करतात. लक्षणीय बाब अशी की हे प्रेम लख्खं दिसून येते.

मैदानावर आणि मैदानाबाहेर धोनीची वागणूक कमालीची सभ्य राहिली आहे ज्याने खेळाडूंसाठी तो आदर्श बनला आहे. सचिन तेंडुलकरनंतर अशी निर्विवाद लोकप्रियता मिळालेला धोनी कदाचित शेवटच्या स्पर्धात्मक सामन्यात खेळताना बघताना मन नक्कीच हळवे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT