centenarians japan sakal
सप्तरंग

शतायुषी नागरिकांचं बेट

जपान हा देश म्हणजे १४ हजार १२५ बेटांच्या समूहानं तयार झालेला भूभाग आहे. नुकताच या देशात पर्यटनासाठी जाण्याचा योग आला.

संजीव शहा

जपान हा देश म्हणजे १४ हजार १२५ बेटांच्या समूहानं तयार झालेला भूभाग आहे. नुकताच या देशात पर्यटनासाठी जाण्याचा योग आला. होक्कायडो, होन्शू, शिकोकू, क्युशू आणि ओकिनावा ही पाच बेटं इथली मुख्य बेटं आहेत. यातलं ओकिनावा हे बेट माझ्या जपानभेटीमध्ये माझं मुख्य आकर्षण होतं. याचं कारण म्हणजे या बेटावर जगातल्या कुठल्याही ठिकाणापेक्षा दीर्घायुषी किंबहुना शतायुषी लोक राहतात असं मी ऐकलं होतं. खरं म्हणजे ओकिनावा हा देखील लहान-मोठ्या बेटांचा एक समूहच आहे. यातल्या मुख्य आणि सर्वांत मोठ्या बेटाचं नाव ओकिनावा आहे.

ओकिनावा समूहामध्ये या ठिकाणी ऊस, अननस आणि फुलं यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. ओकिनावाला अमेरिकेचा लष्करी तळ देखील आहे. सुमारे १०६ किमी लांब आणि ११ किलोमीटर रुंद असं हे बेट आहे. इथलं हवामान उप-उष्णकटिबंधीय म्हणजे सबट्रॉपिकल आहे. साधारण आपल्या मुंबईसारखं दमट आणि उष्ण.

ओकिनावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली जमिनीवरची सर्वांत मोठी रक्तरंजित लढाई इथं झाली. या लढाईमध्ये सुमारे ९५ हजार जपानी सैनिक आणि २० हजार अमेरिकन सैनिक मरण पावले. सामान्य नागरिकांपैकी तब्बल दीड लाख जपानी लोकही या लढाईमध्ये ठार झाले. त्यानंतर जपानच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारलेल्या अमेरिकेनं इथेच आपला लष्करी तळ उभारला जो आजही आहे. चीन ज्याप्रमाणे आपल्या अरुणाचल प्रदेशवर दावा सांगतो, त्याचप्रमाणं ओकिनावा बेटावरही त्याचा डोळा आहे.

आशियातल्या सर्वांत मोठ्या वर्षावनांपैकी एक यानबारू हे वर्षावन (रेन फॉरेस्ट) ओकिनावाच्या उत्तर भागामध्ये आहे आणि इथल्या वनस्पती व वन्यजीवांचं वैविध्य विलक्षण आहे. आम्ही बुलेट ट्रेननं क्योटोहून टोकियोला गेलो. तिथून विमानानं ओकिनावाला. ओकिनावाला जायचं होतं; पण तिथलं काहीही माहिती नव्हतं. फक्त हॉटेलचं बुकिंग झालं होतं. पण आमची चिंता टोकियोला आमची जी गाइड मुलगी होती, तिनं दूर केली. तिनं भराभर काही फोन करून आम्हाला एका जपानी मनुष्याचा फोन नंबर दिला.

ओकिनावाला विमानतळावर तो मनुष्य अगदी वेळेवर आम्हाला घ्यायला आला. त्या जपानी सद्गृहस्थाचं वय होतं ७४ वर्षं आणि त्याला जपानी सोडून कुठलीच भाषा येत नव्हती. गुगल ट्रान्सलेटर आमच्या मदतीला आलं. कसंबसं त्यानं आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये पोहोचवलं. आता प्रश्न होता इथे फिरायचं कसं आणि काय पाहायचं ?

हॉटेलमध्ये चौकशी केल्यावर आम्हाला समजलं, की इथे पर्यटकांकरता कुठेही चढा, कुठेही उतरा अशा बसेस असतात ज्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर घेऊन जातात. पण पुढचे तीन दिवस त्यांचं बुकिंग उपलब्ध नव्हतं. टॅक्सी खूपच महागडं प्रकरण ठरणार होतं. मग आम्ही ठरवलं, की आधी जेवण करू या, मग पाहू. जेवण्याकरता पुन्हा गुगलसाहेबांची मदत घेतली आणि एखादं भारतीय रेस्तराँ सापडतं का ते पाहिले. भारतीय तर नाही, पण आशियाई रेस्तराँ सापडलं आणि योगायोगानं ते आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होतं.

आम्ही गेलो. पुन्हा एकदा भाषेची अडचण येणार का, इथे शाकाहारी काय मिळेल असे प्रश्न मनात घेऊन आम्ही रेस्तराँच्या मालकाला गाठलं तर तो आम्ही भारतीय म्हटल्यावर आमच्याशी हिंदीमध्ये बोलू लागला. आम्हाला हा आश्चर्याचा धक्काच होता. तो नेपाळी होता. अत्यंत खुशीत आम्ही त्याला विचारलं, की आम्हाला एक गाइड हवा आहे. त्यानं समोरच्या टेबलवर जेवायला आलेल्या एका जपानीच दिसणाऱ्या मुलीकडे बोट दाखवून म्हटलं, की ती तुम्हाला मदत करेल.

तो पुढे म्हणाला, चिंता करू नका, ती नेपाळी आहे आणि तिला मोडकं-तोडकं हिंदी आणि इंग्रजी येतं. आम्ही तडक तिच्याकडे मोर्चा वळवला आणि आम्हाला काय हवं आहे ते तिला सांगितलं. थोड्याफार चर्चेनंतर ती आमच्यासोबत तीन दिवस फिरायला तयार झाली इतकंच नाही तर तिनं स्वतःची कार देखील आमच्याकरता बाहेर काढली. मग काय, पुढचे तीन दिवस इशिता आणि आम्ही ओकिनावा फिरलो.

आलो त्याच संध्याकाळी सेंगा बेट पाहिला. दुसऱ्या दिवशी जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं मत्स्यालय पाहिलं. या दरम्यान आणि एकूणच जपानच्या दौऱ्यामध्ये आम्हाला काही गोष्टी तीव्रतेनं जाणवल्या. एक म्हणजे जपानी लोक अतिशय शिस्तप्रिय असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यामधून आपल्याला ते जाणवतं. ‘चलता है’ हा प्रकार नाही. दुसरं, ते अतिशय वक्तशीर असतात. इशितानं आम्हाला सकाळी ९.१५ वाजता येते असं म्हटल्यावर बरोब्बर ९.१५ वाजताच ती हजर असायची.

आणखी एक आपल्या तुलनेत सांगायचं, तर स्वच्छता. आमच्या संपूर्ण वास्तव्यामध्ये आम्हाला कुठेही, अगदी हायवेवरसुद्धा कागद वा प्लास्टिकचा एक तुकडादेखील दिसला नाही. जपानमध्ये एक घोषणावजा वाक्य आहे ‘ तुमचा कचरा ही तुमची मालमत्ता आहे.’ याचा अर्थ प्रत्येकानं स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाटही स्वतःच लावावी.

त्याकरिता इतर कुणाकडून अपेक्षा ठेवू नये वा दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. त्याहीपुढे, समजा कुणी पादचारी वा वाहनचालक रस्त्यानं चालला असता त्याला कुठे काही कागद-कपटा दिसला, तर त्याच्याशी त्यांचा संबंध नसूनही थांबून तो कागद-कपटा उचलून स्वतःजवळच्या पिशवीमध्ये टाकणार.

त्यानंतर प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे जपानी लोक अतिशय प्रामाणिक असतात, मदत करणारे असतात आणि अगदी नम्र असतात. लांडीलबाडी, उद्धटपणा या गोष्टी त्याही देशात कदाचित एखाद्या पातळीवर असतीलही, पण त्या आपल्याला अनुभवाला येतच नाहीत. तसंच, जपानमध्ये जागा अतिशय मोलाची असल्यामुळे इथे उजाड, ओसाड, मोकळी पडलेली जमीन आपल्याला दिसत नाही. बाग, घर, कार्यालय, कारखाना असं काहीतरी तिथे उभं असतंच.

ओकिनावा फिरून झाल्यानंतर आमचा तिथं जाण्याचा मुख्य उद्देश आम्ही इशिताला सांगितला. आम्हाला अशा गावामध्ये ने, जिथे दीर्घायुषी किंबहुना शतायुषी लोक राहतात. तिनं आम्हाला सांगितलं, की असं कुणीही, कधीही उठून तिथे जाऊ शकत नाही. त्याकरिता पूर्वपरवानगी घ्यावी लागते. मग तिनं तिच्या ओळखी वापरून आमच्याकरता परवानगी मिळवली आणि आम्ही अशा ओगीमी गावात गेलो.

तिथे जेवायला म्हणून आम्ही एका जपानी रेस्तराँमध्ये गेलो, तर तिथे आचाऱ्यापासून वेट्रेसपर्यंच सगळी वयोवृद्ध माणसं होती. एका वृद्ध इमीको नावाच्या वेट्रेसशी भेट झाली. त्याच्याशी बोलताना (अर्थातच इशिताच्या माध्यमातून) आम्हाला समजलं, की या गावातली साठी-सत्तरीतली मंडळी रोज सकाळी डे-सेंटरमध्ये जमतात. मग दिवसभर ते एकत्र काम, व्यायाम, गप्पा, खेळ, गाणी अशा गोष्टी करण्यात आनंदानं वेळ घालवतात.

९० वर्षांच्या पुढचे लोक व्यायाम करत नाहीत, पण ते शेतामध्ये काम करतात. त्यांच्या गरजेच्या आणि आवडीच्या भाज्या, फळं ते स्वतः पिकवतात. यात त्यांचा वेळ तर जातोच, पण आरोग्य किंवा इतर गोष्टींच्या तक्रारी करण्याची वेळही त्यांच्यावर येत नाही.

इथेच आम्हाला एक अतिशय महत्त्वाचा जीवनविषयक नियम समजला. अर्थात आपल्या आयुर्वेदातही हा सांगितला आहे, पण ओकिनावातले लोक त्याचं काटेकोरपणे पालन करतात. हा नियम म्हणजे, ‘हारा हाची बन मी’. अर्थ- खाताना फक्त ८० टक्के पोट भरा. २० टक्के रिकामं ठेवा. आयुर्वेदामध्येही भरपेट जेवणं निषिद्ध सांगितलं आहे, त्याची इथं आठवण आली.

इथल्या लोकांच्या दीर्घ, कृतिशील आणि निरोगी जीवनाची हीच गुरुकिल्ली आहे. खाण्याच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे, इथले लोक कारलं, रताळं वाफवून पालेभाज्या खातात. तसंच मांसाहार मर्यादित असून शाकाहारावर भर दिला जातो. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे लोक आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.

मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, ‘सांगा कसं जगायचं? कण्हत-कण्हत की गाणं म्हणत...’ ही कविताच जणू आम्हाला ओकिनावामध्ये मूर्त रूपात भेटली. तर असं हे ओकिनावा. याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे पण... दैवयोगानं माझ्या आयुष्यामध्ये एकदा तरी जावं अशी अनेक ठिकाणं मी पाहिली आहेत. पण त्यांपैकी काही ठिकाणं अशी आहेत, की तिथे आणखी एकदा तरी जावं. त्या यादीमध्ये ओकिनावाची भर पडली आहे.

(लेखक हे ‘स्वानंद फाउंडेशन’चे संस्थापक तसंच साहसी गिर्यारोहक असून जगभरातल्या विविध ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT