file photo
file photo 
सप्तरंग

जगण्यावरचा विजय म्हणजे आनंददायी वृद्धत्व

डॉ. स्वाती धर्माधिकारी
एक घर होतं. त्यात पतीपत्नी आणि त्यांची दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी राहात होते. कालांतराने दोन्ही मुलांची लग्नं झाली. दाम्पत्याच्या घरात आता सून आली. घर गजबजलेलं असायचंच. पण, का कोण जाणे पूर्वीसारखा चिवचिवाट नव्हता तिथे. त्याची जागा आता धुसफुसीने घेतली होती. घरात कुरबुरी वाढल्या. कोणाच्याच मनाला शांतता नव्हती. "घरात हसरे तारे'पासून सुरू झालेला त्या दाम्पत्याचा प्रवास एका उदास, निराश हतबलतेच्या थांब्यावर येऊन थांबला. ही शहरातली "घर-घर की कहानी' आहे. हो ना? याला अपवाद आहेत जे आनंद वाढवणारे आहेत. जीवनचक्र हे अव्याहत सुरू असणारच. एकेका स्थितीमधून पुढे जात-जात आपणही वृद्धावस्थेला पोहोचणारच. त्याची तयारी आपण करतो का? की परिस्थिती नकळत अंगावर येऊन कोसळते? नोकरीमधून निवृत्ती घेतल्यानंतर घराची घडी तशीच सुरळीत असते की विस्कटते? पत्नी गृहिणीच असली तरी निवृत्त होऊ शकतेय का? जगण्याच्या धबडग्यात मनमोकळे क्षण जगायचे राहून गेले, असं या पतीपत्नीला वाटतंय का? काही निवांत क्षण परत जगून घ्यायची असोशी किंवा निदान इच्छा वा तयारी तरी आहे का? वृद्धत्व आजकाल जरा उशिराच मान्य केले जाऊ लागलं आहे. आम्ही शरीराने जरी थकलो तरी मनाने तरुण आहोत, असा विचार करणारे वृद्धतरुण आता वाढत चालले आहेत. घराघरांमधून या विचारांचे पडसादही आहेत. घरातल्या वृद्धांची कहाणी काय आहे आता? आणि त्यांच्या जगण्यातले दुखरे हसरे कंगोरे काय आहेत? सर्वसाधारण घरांमधून पेन्शन मिळणारे पालक असल्यास मुलांवर जास्त ओझं नसतं. एखाद्या वेळेस तेच मुलांना सांभाळत आहेत, असेही चित्र आहे. अगदी 35 वर्षांचा धाकटा मुलगा नोकरी न करता केवळ आईच्या पेन्शनवर ऐश करतोय हे दिसतं. कधी एकत्र कुटुंब अजूनही वडिलांच्या पेन्शनमधून घरखर्च करतंय; कारण मुलाचे उत्पन्न फारसे नाही. कधी हा खर्च जाणीवपूर्वक केला जातो. "पुढे जाऊन त्यांनाच तर करायचे आहे सारे. जमतंय तोवर करूयात खर्च.' हा विचार त्यामागे असू शकतो. ज्यांना पेन्शन नाही; पण संपत्ती आहे त्या संपत्तीच्या मागे सारे असतात, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही. नटसम्राट आजही घडत असतेच. वृद्धांची काळजी घ्यायला हवी हे मान्य आहे. तरीही काही मुलं कृतघ्नपणे वृद्ध पालकांना आयुष्यातून बाजूला काढतात. त्यांची जबाबदारी झटकून मोकळे होऊ शकतात. मामला म्हणूनच कदाचित केवळ आर्थिक नाही. नाती घट्ट असावीत. विसविशीत नात्यांना तुटायला कितीसा वेळ लागणार? बाळ लहान असताना केले गेलेले संगोपन हे एका आशावादातून होते. ते साखरेचे पोते असते कारण त्या संगोपनाची फलश्रुती दिसत असते. बाळाची निरोगी वाढ त्याचा सर्वांगीण विकास हे सारे आनंददायी असते. मात्र, वृद्धांची काळजी घेताना त्यांच्या वाढत्या आरोग्याच्या समस्या, वाढते परावलंबीत्व हे सारे एक ओझे होऊ लागते. आरोग्याची घसरण, विविध अंगांची वाढती अकार्यक्षमता विदीर्ण करत जाते. भारतातीलच नव्हे, तर जगातील वृद्धांची संख्या वाढते आहे. त्यासाठी आपले बदलते राहणीमान, आर्थिक सुबत्ता, मृत्युदरातील घट, औषधोपचारांची उपलब्धता यासारखी कारणं असतीलच. संख्येसोबत त्यांचे प्रश्नही वाढणारच. ज्येष्ठांच्या प्रश्नांना समर्थपणे हाताळणे अत्यावश्‍यकच. एक आणखी लक्षणीय बाब म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या वृद्धांची संख्या खूप जास्त आहे. मागच्या जनगणनेत जवळपास 70 टक्के वृद्ध हे ग्रामीण भागात आढळले. याचा अर्थ हा की, वृद्धांकरिता सेवा उपलब्ध करून देताना ग्रामीण विभागप्रमुख्याने विचारात घेतला पाहिजे. ग्रामीण भागात राहणाऱ्या वृद्ध पुरुषांपैकी 66 टक्के अजूनही कार्यरत असतात, तर 28% वृद्ध स्त्रिया कार्यरत असतात. शहरात राहणाऱ्या वृद्धांपैकी 47% च काम करतात. शहरी वृद्ध महिलांचे कार्यरत असण्याचे प्रमाणदेखील फक्त 11% इतके कमी आहे. एक आणखी महत्त्वाची बाब म्हणजे महिलांचे सरासरी आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असते. या संख्यांचे विश्‍लेषण आपल्याला एका तत्थ्यापर्यंत नेते. ते म्हणजे शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या वृद्धांच्या समस्या वेगळ्या आहेत. महिलांकरिता विशेष योजना आवश्‍यक आहेत. वृद्धांच्या वाढत्या समस्या सामाजिक विकासासाठी बाधा ठरणारा मुद्दा आहे. आज वृद्धांच्या समस्यांवर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक म्हणजे वाढती एकल कुटुंबपद्धत. शिक्षण घेऊन घरट्यातून उडून गेलेली पाखरं घरी कधी परततील? परततील तरी का? याची चातकाप्रमाणे वाट बघणारी कुटुंबे खूप आहेत. परदेशी स्थाईक झालेली मुले वृद्धांची काळजी घेण्यासाठी इथे नोकरी सोडून येऊ शकत नाही. हे वास्तव स्वीकारणे वृद्धांना कठीण असते. त्यातून एकाकी जगणे वाट्याला येते. त्यातून विक्षिप्तपणा निर्माण होऊ शकतो. अशा एकाकीपणाला समर्थपणे तोंड देणारेदेखील सापडतातच. ओंकारनाथ शर्मा, 82 वर्षांहून अधिक वय असलेली ही व्यक्ती दिल्लीत दारोदारी फिरून न वापरलेली औषधे गोळा करत ती गरजूंना वाटत असते. महाराष्ट्र व राजस्थानमधील खेड्यांमध्ये इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्यासाठी मुंबईमध्ये लोकलमध्ये अक्षरश: भीक मागून पैसा उभा करणारे संदीप देसाई असोत की, नागपुरात तरुणाईला वाहतुकीचे नियम शिकवणारी ज्येष्ठांची जनआक्रोशसारखी संघटना असो. स्वतःला विसरून ज्यांनी समाजासाठी काम करत स्वतःचं आभाळ विस्तारित केलं त्यांना एकाकीपणा स्पर्शू शकत नाही. विस्मरण, जोडीदाराचा मृत्यू, शारीरिक विकलांगता आल्याने निर्माण झालेली परस्वाधीनता, अल्झायमर्ससारखा चिरकालीन आजार यावर मात करण्यासाठी आवश्‍यक संवेदनशीलता वृद्धांच्या परिवारातही हवीच. त्यांना या सर्वाला एकट्याने तोंड द्यावे लागू शकते त्यासाठी आधार केंद्र असायला हवीत. एका आदर्श समाजात वृद्ध, अपंग, बाल, महिला किंवा पीडितांकरिता प्रत्येक वॉर्डात समुपदेशन/आधार केंद्र असायला हवे. वृद्धत्व हा आजार नसून तो जगण्यातल्या नैराश्‍य, विफलता, अपेक्षाभंग, नियतीच्या कोलांटउड्या व लहरींवर सर्व शक्तिनीशी मिळवलेला विजय असतो. वृद्ध व्यक्तींच्या समृद्ध ज्ञानाचा उपयोग करत त्यांना कुटुंब, समाज आणि राजकीय क्षेत्रातही समाविष्ट करत केलेला विकास "शाश्वत विकास' असेल हे नक्की. वृद्ध व्यक्तींच्या नकारात्मक पैलूंपेक्षापेक्षा त्यांच्या यशोगाथा म्हणूनच सांगितल्या गेल्या पाहिजेत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT