Tiger Waghdoh
Tiger Waghdoh Sakal
सप्तरंग

जंगलातले सेलिब्रिटी

अवतरण टीम

घरात मूल जन्माला आले की त्याचे नाव ठेवण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. नेमका असाच प्रकार वाघांच्या बाबतीतही घडत आहे.

- किशोर रिठे

घरात मूल जन्माला आले की त्याचे नाव ठेवण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. नेमका असाच प्रकार वाघांच्या बाबतीतही घडत आहे. जंगलात वाघाचा नवा बछडा दिसला की त्याचे नाव काय ठेवायचे, यासाठी स्पर्धा सुरू होते. नावाचा हा महिमाच म्हणावा लागेल की आज विदर्भातील जंगलांमधील वाघ त्यांच्या युनिक कोडपेक्षाही जास्त या मानवी नावांनी ओळखले जातात. त्याच नावाने अनेक वाघ सेलिब्रेटी झाले आहेत, त्यातलाच एक ताडोब्यातील ‘वाघडोह’ होता. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याला श्रद्धांजली अर्पण करणारे पोस्टर्सही झळकले...

'वाघडोह’सारखेच दीर्घ आयुष्य मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘कॉलरवाली’ वाघिणीलासुद्धा लाभले. तिचा जानेवारी २०२२ मध्ये वार्धक्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाला; पण मृत्यूनंतर तिच्या नावे एक अनोखा विक्रम नोंदविण्यात आला. ही वाघीण १७ वर्षे वयापर्यंत जगली आणि या १७ वर्षांमध्ये तिने तब्बल २९ शावकांना जन्म दिला. प्राणिसंग्रहालयात एखादा वाघ १८ वर्षे वयापर्यंत जगल्याची उदाहरणे होती; परंतु जंगलात अनेक समस्यांचा सामना करीत तब्बल १७ वर्षे जगायचे, सोबत २९ शावकांना जन्म द्यायचा हे अनोखेच काम ‘कॉलरवाली’ने केले होते. या दोन्ही घटना वन्यजीव विज्ञानातील गृहितकांना छेद देणाऱ्या व वन्यजीव शास्त्रज्ञांना आव्हान देणाऱ्या आहेत.

नर पिल्लांची आईपासून विभक्त होण्याची प्रक्रिया साधारणतः १८ महिन्यांनंतर सुरू होते. नंतर या वाघांचा ‘जंगलाचा राजा’ म्हणून प्रवास सुरू होतो. त्याची शिकार झाली नाही किंवा त्यांना कुठलाही अपघात किंवा आपसातील भांडणांमध्ये गंभीर इजा झाली नाही तर वाघ तब्बल १२ ते १४ वर्षे जगून आपल्या वन क्षेत्रावर साम्राज्य करू शकतो, हे आतापर्यंत सिद्ध झाले होते. ‘वाघडोह’ आणि ‘कॉलरवाली’ यांनी आता हा आकडा १७ वर नेऊन ठेवला आहे.

कोणत्याही वाघासाठी मुळात जंगलात असे वाघ बनून रुबाबात फिरणे, जगणे तसे अत्यंत कठीण काम असते. आजच्या आधुनिक काळात जगताना त्याला अनेक अडथळे पार करावे लागतात. घनदाट जंगलांमध्ये झालेला मानवी वावर, तेथील वाढत्या लोकसंख्येच्या वाढलेल्या गरजा, जंगलांमध्ये झालेले डांबरी रस्त्यांचे मार्ग, रेल्वे मार्ग, महामार्ग, कालवे यांचे जाळे व आधुनिक दळणवळणाची साधने यामुळे जंगलांवर प्रचंड जैविक दबाव पडतो. त्यातून वाघांना सुरक्षित राहता येईल, असे आकाराने मोठे व मनुष्यवावर विरहित जंगलेच आता कमी झाली आहेत. सोप्या व सरळ भाषेत सांगायचे तर मानवी वावर आता जंगलाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे, किंबहुना तो वाढला आहे. त्यातून वाघ व माणूस यांच्या सहजीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, पण ‘वाघडोह’ किंवा ‘कॉलरवाली’ अशा काही धिप्पाड वाघांच्या नशिबी पेंच आणि ताडोबासारखे सुरक्षित आणि खाद्याची रेलचेल असलेले वनक्षेत्र येतात आणि मग १७ वर्षांपर्यंत जगण्याचे विक्रम शक्य होतात. दुसरे म्हणजे काही वाघांच्या नशिबी आलेली प्रसिद्धी, अर्थात ती त्या वाघासाठी कधी सोयीची तर कधी धोक्याचीही होऊ शकते. याची सुरुवात होते ती या वाघांच्या नामकरणापासून!

या वाघांना वन खात्याकडून शास्त्रीय नाव दिले गेले असले तरी त्यांना गाईड, पर्यटक काही नावे देतात आणि मग ती प्रचलित होतात. अगदी जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांपासून तर वनकर्मचारी आणि अधिकारीही यात मागे नसतात. घरात मूल जन्माला आले की त्याचे नाव ठेवण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. नेमका असाच प्रकार वाघांच्या बाबतीतही घडत आहे. जंगलात वाघाचा नवा बछडा दिसला की त्याचे नाव काय ठेवायचे, यासाठी स्पर्धा सुरू होते. नावाचा हा महिमाच म्हणावा लागेल की आज विदर्भातील जंगलांमधील वाघ त्यांच्या युनिक कोडपेक्षाही जास्त या मानवी नावांनी ओळखले जातात. विशेष म्हणजे वाघांच्या या मार्केटिंगला वन विभाग आणि स्वयंसेवी संघटनांनीही काही आक्षेप घेतले नाहीत. तसे वाघांना नाव देण्याची पद्धत पाश्चिमात्य देशांमधून भारतात आली. ती सर्वप्रथम रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात आली असे दिसते.

राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘बम्बुराम’ हा वाघ सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या भारतभेटीच्या वेळी प्रसिद्ध झाला. त्यानंतर येथे ‘मछली’ ही वाघीण पर्यटकांना सर्वाधिक छायाचित्रे दिलेली वाघीण म्हणून प्रसिद्ध झाली. सातपुड्यामध्ये मात्र ‘जय’ हा वाघ सर्वात अधिक प्रसिद्ध झाला. २००८-०९ मध्ये याच ताडोबा-अंधारीत एक शेपटी तुटलेली वाघीण होती. त्यामुळे तेथील वनकर्मचारी आणि गाईड तिला ‘बांडी’ किंवा ‘कटरी’ असे संबोधित असत. या ‘बांडी’ला बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची येथे गर्दी होऊ लागली. आणि बघताबघता ही ‘बांडी’ बॉलीवूडच्या एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. वाघाच्या नावाचे अशा पद्धतीनेही मार्केटिंग होऊ शकते, हे लक्षात येताच इतर अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांमध्येही वाघांच्या नामकरणाचा सपाटा सुरू झाला. नंतर नागझिराच्या जंगलात ‘माई’चे आगमन झाले. उमरेड-कऱ्हांडलातला हरविलेला प्रसिद्ध वाघ ‘जय’ म्हणजे या माईचाच बछडा. त्याचा भाऊ म्हणजे ‘विरू’. नागझिराच्या जंगलात आपला दबदबा निर्माण करणारी ही ‘माई’ अखेर २०१६ ला चोरखामाराजवळ मृतावस्थेत आढळली. नागझिऱ्यातच ‘डेंडू’ आणि ‘राष्ट्रपती’ नावाचेही वाघ होऊन गेलेत. उमरेड-कऱ्हांडलात जयसोबत श्रीनिवास, बिट्टू, चांदी, राई, फेअरी या नावाने वाघ ओळखले जातात; तर बोर अभयारण्यात ‘कतरिना’ आणि ‘बाजीराव’ची चलती होती. पेंचमध्ये एका ढाण्या वाघाचे नाव ‘वीरप्पन’ ठेवण्यात आले. तोतलाडोहपासून खुर्सापारपर्यंत फिरतो तो ‘प्रिन्स’ तर फेपरीकुंडकडे दर्शन देते ती ‘शीला’. सोनू, मोनू, लंगडी अशी नानाविध नावे पेंचमधील या वाघांना ठेवण्यात आलीत. पेंचमध्येच टी-५ वाघिणीचे दोन बछडे ‘बाजीराव-मस्तानी’ या नावाने परिचित होते; तर मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘कॉलरवाली’ वाघीण प्रसिद्ध होती. २००५ मध्ये जन्मलेल्या या वाघिणीने २०२० पर्यंत तब्बल २९ शावकांना जन्म दिल्याचे सांगण्यात येते. ताडोबाची ‘माया’, उमरेडची ‘चांदी’, बोरची ‘कतरिना’, मध्य प्रदेशातील पेंचची ‘कॉलरवाली’ आणि तेलियाची चार बछड्यांची ‘राणी’ अशा काही प्रसिद्ध वाघिणी!

अशा या नाव ठेवण्यावर तसे आक्षेप घेण्याचे काही कारण नाही; परंतु मार्केटिंगचा हा फंडा जंगलाच्या या राजाच्या जीवावर बेतणार नाही, हे पाहणेही तेवढेच गरजेचे आहे. वाघांचे हे नामकरण म्हणजे कुतूहलाचा आणि कधी-कधी चिंतेचा विषय ठरले आहे. विदर्भातील वाघ लोकप्रिय झाले, त्यात त्यांच्या नावांचे योगदान महत्त्वाचे असले तरी त्याचा अतिरेक होता कामा नये.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी रणथंबोर अभयारण्यात ‘बम्बुराम’ नावाचा वाघ बघितल्यानंतर तो बेपत्ता झाला, तेव्हा खूपच गदारोळ झाला होता. खूप प्रसिद्धी मिळाली की त्या वाघाचे काहीही होऊ शकते. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर त्या वाघाच्या जीवाला आम्ही थोड्या फार प्रमाणात धोका निर्माण करीत असतो. याशिवाय नावाने प्रसिद्ध असणारा वाघ एखाद्या प्रचलित ठिकाणाहून त्याच्या जैविक स्वभावानुसार दुसरीकडे जाताच त्याला बेपत्ता ठरवून संपूर्ण वन विभागाला त्या एका वाघाच्या शोधात लागावे लागते. वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांचा सातत्याने सामना करावा लागतो. यामध्ये इतर वाघांचे व्यवस्थापन व संवर्धन यावर दुर्लक्ष होऊन विपरीत परिणाम होऊ शकतात.

या सर्वांमध्ये ‘जय’ वाघाने प्रसिद्धीची परिसीमाच गाठली. ‘जय’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या नर वाघाचे वन्यजीव विभागाच्या दप्तरातील नाव ‘यूके-टी १’ असे होते; तर त्याचा जन्म नागझिरा अभयारण्यात झालेला. या वाघाने सुमारे १०० ते १२० कि.मी अंतर प्रवास करून जून २०१३ मध्ये उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात प्रवेश केल्याचे कॅमेरा ट्रॅपमध्ये निदर्शनास आले. त्यानंतर तो दिसेनासा झाल्यानंतर थेट राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयांना त्याची दखल घ्यावी लागली! पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘कॉलरवाली’च्या निधनानंतरचे माध्यमांमधील बातम्या किंवा ‘वाघडोह’च्या निधनानंतरच्या श्रद्धांजली यासुद्धा वाघ केंद्रित पर्यटन व त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या रोजगाराचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

(लेखक सातपुडा फाऊंडेशन या मध्य भारतातील अग्रगण्य संस्थेचे संस्थापक असून, मागील ३० वर्षांपासून वाघ व आदिवासी विकास यासाठी कार्यरत आहेत. ते भारत सरकारच्या केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT