poem 
सप्तरंग

वैचारिक कवितेची काव्यभाषा

गणेश कनाटे

गेल्या काही दशकांत मराठी कवितेत ज्या प्रमाणात विचार, विचारसरणी आणि वैचारिकता यांचा प्रभाव वाढला आहे, तेवढा संत-काव्यानंतर मर्ढेकरांच्या काळापर्यंत नव्हता, असे म्हणायला हरकत नाही. विचारसरणींचा प्रसार करण्यासाठी कवितेचा हत्यारासारखा वापर करणे इतके वाढले आहे की, कवितेवरून कवीच्या राजकीय व सामाजिक चळवळींचा अंदाज बांधणे सहज शक्‍य होते.
याचा अर्थ कवितेत विचार किंवा वैचारिकता निषिद्ध आहे, असे नाही. या उलट ज्या कवितेमागे कवीची जीवनदृष्टी उभी राहते ती कविता उजळून निघते. परंतु, विचारसरणी आणि जीवनदृष्टी यांच्यातला भेद न कळल्यामुळे बहुसंख्य कवितांमध्ये वैचारिकतेच्या आधिक्‍याने काव्यमूल्याचा गळाच दाबला जातो. असेच काहीसे आध्यात्मिक चिंतनाला कवितेत आणू पाहणाऱ्या कवींकडूनही घडत असते. ग्रंथांमध्ये, पोथ्यांमध्ये, प्रवचनांमध्ये सापडलेले मोती कवितेत विखुरले जातात. तसेच ध्यानधारणा व साधनेदरम्यान आलेले अतिंद्रिय अनुभव कवितेत वर्णनाच्या रूपाने आणले जातात. असे करताना कविता हीदेखील कलेच्या प्रांगणातून बाहेर पडून विचारसरणीच्या किंवा आध्यात्मिक साधनेच्या कक्षेत प्रवेश करते, हे भानच या प्रकारच्या कविता रचणाऱ्या कवींना राहत नाही किंवा ते तसे जाणीवपूर्वक करत असावेत. हा आक्षेप तसा नवा नाही. केशवसुतांच्या कवितेत आगरकरांच्या सुधारणावादी विचारांचा प्रतिध्वनी ऐकू येतो, असे निरीक्षण आहेच.

कवितेतील वैचारिकता व तिचे काव्यमूल्य यांचा परस्पर संबंध काय असतो, याची साधकबाधक चर्चा घडायला हवीच. एकूणच साहित्यातून तसाही विचारांचा आविष्कार होत असतोच. परंतु, त्या विचारांमुळे साहित्याचे साहित्यमूल्य वृद्धिंगत होते किंवा नाही, या बाबतीत मतभेद असू शकतात. या बाबतीत ज्यांना पाश्‍चात्य साहित्यशास्त्राच्या परंपरेत Formalist म्हटले गेले त्यांचे एक टोकाचे मत आहे की, मंडळी रूपबंधाच्या निर्मितीत सहभागी होणारे, रूपाशी संबंध नसलेले सर्व घटक (ज्यात विचारही आले) आनुषंगिक असतात. त्यामुळे या आनुषंगिक घटकांचा व रुपबंधाच्या साहित्यमूल्याचा, गुणवत्तेचा संबंध राहत नाही. याविरुद्ध लौकिकतावादी अशी भूमिका घेतात की, साहित्यकृतीचे मूल्य हे तिचे रूप व सौंदर्यात्मक संघटना यांच्यासोबतच इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. त्या घटकांमुळे रुपबंधाची गुणवत्ता वाढत असते. त्यांच्या मते साहित्यातील वैचारिकता हा साहित्याच्या गुणवत्तेचा एकमात्र नसला तरी एक निकष ठरतो. या ठिकाणी ही वैचारिकता कवीच्या अनुभवाशी एकजीव होऊन कवितेत शिरत नसेल, तर ती उपरी, परकी आणि दिखाऊ वाटते व म्हणूनच अवांछनीय वाटते, हे समजून घेतले पाहिजे.

सर्वच प्रकारच्या कवितांमध्ये वैचारिकता असतेच असे नाही. बालकवी, बा. भ. बोरकर, पु. शि. रेगे, इंदिरा संत, ना. धों. महानोर, ग्रेस, म. म. देशपांडे, इत्यादी कवींच्या कवितांची चर्चा करत असताना, वैचारिकतेची चर्चा सहसा कोणी करत नाही. या कवींच्या कवितांमध्ये उपस्थित असलेले रोमॅंटिक किंवा आधुनिक विश्वभान त्या कवितांची गुणवत्ता ठरविण्यासाठी पुरेसे असते. परंतु, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, आदि संत कवींनी एका विशिष्ट हेतूने काव्यनिर्मिती केली, असे दिसून येते. संत कवींनी प्रतिमा, प्रतीके, रूपके आदि अलंकारांचा मोठ्याप्रमाणात आणि उत्तम वापर केला. यामुळे काही समीक्षक याला "भाष्यपर काव्य' असेही म्हणतात.
मात्र, आजच्या काळात कवितेच्या केंद्राशी अनुभव ही संज्ञा आलेली आहे. कवितेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाच्या साहचर्याने आलेले विचार वेगळे व स्वतंत्ररीत्या कवितेच्या रूपबंधात प्रवेश करणारे विचार वेगळे. केवळ विचारांच्या मांडणीसाठी आज आपण निबंधादी गद्य रूपांचा वापर करतो, हे सामान्यतः मानले जाते. या पार्श्वभूमीवर विंदा करंदीकर यांचा अष्टदर्शने हा तत्त्वज्ञांच्या विचारांना संक्षेपाने पण पद्यरूपात मांडणारा काव्यसंग्रह आवर्जून वाचून बघावा. ज्या तत्त्वज्ञांचे विचार मांडले गेले ते उच्च दर्जाचे आहेत. परंतु, त्यामुळे संग्रहाला काव्यमूल्य लाभतेच, असे नाही.

या पार्श्वभूमीवर जागतिक कवितेत प्रचारकी (Propogandist), प्रतिरोधाच्या (Protest) आणि निषेधाच्या (Dissidence) वैचारिकतेशी निगडित असलेल्या कविता कशा लिहिल्या जातात आणि त्यांची काव्यभाषा कशी घडते/असते, याचा मराठी काव्यविश्वात विचार केला पाहिजे, असे वाटते. 1970 च्या दशकात वैचारिकतेने प्रेरित कवितांनी एक मोठा अवकाश निर्माण केला व गेल्या 40-50 वर्षांत या अवकाशाचा विस्तार होत गेलेला आहे. परंतु, या प्रकारच्या सर्व कवितांना विद्रोहाच्या एका मोठ्या चौकटीत सामावून घेण्याचा सबगोलंकार प्रयत्न केला गेला. या कवितांच्या काव्यभाषेबद्दलही फारसे साहित्यशास्त्रीय चिंतन झालेले नाही किंवा जे झाले ते एकांगी व अपुरे आहे. यासंदर्भात रा. ग. जाधव, रावसाहेब कसबे, गंगाधर पानतावणे, भा. ल. भोळे, यशवंत मनोहर, म. सू. पाटील, महेंद्र भवरे इत्यादी अभ्यासक समीक्षकांच्या मांडणीचा नव्याने परामर्श घेण्याची गरज आहे.

पाश्‍चिमात्य देशांमध्ये Protest Poetry आणि Dissidence Poetry या दोन स्वतंत्र काव्यप्रकारांमध्ये भरपूर कविता लेखन झालेले आहे; पण त्या कवितांच्या काव्यमूल्याबद्दल समाधान व्यक्त करता येते. अमेरिकेची Adrienne Rich, ग्रीकचा Yannis Ritsos, पॅलेस्टिनी Mahmoud Darwish, रशियाच्या Anna Akhmatova आणि Marina Tsvetaeva ही काही प्रातिनिधिक नावे आहेत की, ज्यांच्या कवितांमधील वैचारिकता काव्यमूल्याचा बळी देऊन आपले स्थान निर्माण करत नाही. स्त्रीवादी प्रतिरोधाची कविता ही तर जगभरातल्या समाजमाध्यमांवर अत्यंत लोकप्रिय अशी कविता आहे. उदाहरणार्थ, Denice Frohman या तरुण मुलीच्या अनेक कविता अगदी You Tube सारख्या दृकश्राव्य माध्यमावर बघता येतील.

Formalist ंडळींप्रमाणे वैचारिकता व कविता यांच्यात पोलादी भिंत उभी करण्याचे काहीही कारण नाही. परंतु, वैचारिकतेने कवितेत प्रवेश करताना काव्यभाषेचे नेमके कोणते रूप धारण करावे, कुठल्या काव्यालंकारांचा किंवा Poetic Devices चा वापर करावा, याबाबत निश्‍चितच काही एक मूलगामी विचार करणे हे मराठी काव्यविश्वापुढचे आव्हान आहे.  

Remarks :
गणेश कनाटे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT