mahajanaka jataka painting gradation ajanta caves historical place Sakal
सप्तरंग

अजिंठ्याचं सुवर्णयुग (भाग २)

घनतेच्या जागी गडद रंगाचा वापर करण्यात आला आहे. ठळकपणे विषय दर्शवताना चित्रात छटेतला विरोधाभास प्रभावीपणे मांडला गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘महाजनक जातक’ या चित्राच्या आरेखनाची वैशिष्ट्यं गेल्या वेळच्या भागात आपण पाहिली. याच चित्रातल्या रंगसंगतीविषयी आता जाणून घेऊ.

‘महाजनक जातक’ या चित्रातल्या रंगसंगतीचे काही नमुने उपलब्ध झाले आहेत. त्या चित्रनिर्मितीतल्या रंगच्छटा (ग्रेडेशन) संख्येनं फार नसून कमी छटांमध्ये काम केलं गेलं आहे. बराच भाग हा तेजस्वी उजळ रंगात रंगवला गेला होता.

त्यातला काहीच भाग शिल्लक आहे, तर काळाच्या ओघात काही भाग पुसट झाला आहे. विषयानुसार उजळ-गडद रंग वापरून चित्रात लेव्हल्स निर्माण केल्या गेल्या आहेत. राजवाड्याचं छत, गावाच्या वेशीवरची नक्षी यांत उजळ रंगामुळं वेगळेपण जाणवतं, तर राजा मुनींच्या आश्रमात आला आहे हे दाखवताना मुनींचं वस्त्र उजळ दाखवून चित्रकारानं लक्ष वेधलं आहे. यातून मुनींच्या व्यक्तिरेखेची आकर्षकता आणि पावित्र्य दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं वाटतं.

घनतेच्या जागी गडद रंगाचा वापर करण्यात आला आहे. ठळकपणे विषय दर्शवताना चित्रात छटेतला विरोधाभास प्रभावीपणे मांडला गेला आहे. बुद्धिबळातल्या पटाप्रमाणे नक्षी हे त्यातलं उदाहरण आहे.

इथं उजळ-गडद तपकिरी, पिवळा, हिरवा व निळा या रंगांच्या छटा प्रकर्षानं जाणवतात. या चित्रातला हा भाग काळाच्या ओघात फिकट झाला आहे...त्यातले बरेच गडद रंग विरले आहेत. मात्र, उजळ रंगातला पार्श्वभाग (सर्फेस) मात्र शाबूत आहे. त्यावर रंगांचं ब्रशिंग बघायला मिळतं. चित्रकामात खूप मोठ्या आकारातल्या जाड ब्रशचा वापर केला गेला असावा असं वाटत नाही. खूप लांब स्ट्रोकचा वापर फारसा आढळत नाही. असं असलं तरी, रंग काही ठिकाणी पारदर्शक, तर काही ठिकाणी अपारदर्शक इफेक्टचा आभास निर्माण करतात.

रंगकामात ब्रशचा योग्य आकार व त्यावर दाब देऊन त्याच्या वाढलेल्या जाडीचा उपयोग करून सुंदर रेषांची, आकारांची मांडणी केली गेली आहे. गावाची वेस/सीमाद्वार हे मानवनिर्मित बांधकाम निसर्गातल्या पाना-फुलांत सामावलं जावं यासाठी तिथं रंगच्छटा हिरवी वापरण्यात आली आहे. राजदरबारात निळसर रंग राजाची श्रीमंती दाखवणारा आहे असं वाटतं.

अजिंठ्यात चितारलेला हा निळा रंग महत्त्वाच्या ठिकाणी जपून वापरला गेला आहे. चौथ्या भागांतल्या प्रसंगात राजा वेशीबाहेर जात असतानाच्या वेळी रक्षकांच्या समूहात मात्र हिरव्या रंगाचा घोडा पाहायला मिळतो.

राजा जनक किती समृद्ध होता याचं चित्रण चित्रकारानं केलं आहे. भव्य मोठा प्रासाद...उत्तम, सौंदर्यपूर्ण वास्तुरचना... कलात्मक निर्मिती, दुर्मिळ व मौल्यवान विविधरंगी दगडांचा वापर...दगडांची गोलाकार-लंबगोलाकार-दंडगोलाकार-चौकोनी-आयताकृती आकारांची रचना...उंचीचे स्तर, त्यांवरची नक्षी हे सगळं रेखीव व वास्तव आहे. या वास्तूंच्या रेखांकनामुळं त्या काळातलं वास्तूतलं वेगळेपण, प्रचलित कारागीरकौशल्य, साहित्य आदींची उपलब्धता दिसून येते.

वास्तूच्या बाह्य सौंदर्याप्रमाणेच अंतर्गत रचनाही खूप सुंदर आहे. स्तंभ व त्यावरील सुंदर त्रिमितीय नक्षी, तीवर मौल्यवान धातूंचं आलंकरण, छतावर लोंबणाऱ्या मोत्यांच्या सरींचं तोरण, छताच्या कोपरावर शिल्पाकृती, पडवीवर नक्षी अशी कलात्मक समृद्धी दिसते.

आजच्या काळातल्या वास्तुरचनेत जे आधुनिक घटक महत्त्वाचे मानले जातात; त्या दृश्यकलांच्या घटकांचा वास्तुकलेत महत्त्वपूर्ण सहभाग असतो. या सर्व घटकांच्या गुंफणीतून कलाकृतीत गुणवैशिष्ट्यं निर्माण होतात व ती या चित्रातल्या वास्तूला रचनात्मक सौंदर्य प्रदान करतात.

वास्तूची उंची, रुंदी, लांबी यांबरोबरच खिडक्या, दारं, स्तंभ, कमानी, तुळई आदी अनेक वास्तुघटक या चित्रात चितारण्यात आलेले आहेत. याशिवाय, अंतर्गत सजावटीचाही भाग इथं दिसतो. राजा महाजनक याच्या भव्य प्रासादात वरील सर्व प्रकारचे घटक पाहायला मिळतात.

बहुपर्णी कमानी, चबुतरे, चौकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरच्या गिलाव्यात केलेलं जडावकाम या विविध वास्तुघटकांमुळे, त्यांच्या संयोजनामुळे

राजप्रासादाच्या निर्मितीला लाभणारा खास भारतीय शैलीचा भव्यपणा, तसंच गावाची वेस व तीवरची कमान, कमानीवरची चौकटीची नक्षी पाहायला मिळते.    

अजिंठ्यातल्या अद्भुत वेशभूषा हा दोन हजार वर्षांपासूनच कौतुकाचा विषय आहे. याचं प्रमुख कारण हेच आहे की, आजही त्यातली मिळती-जुळती वेशभूषा आजूबाजूला बघायला मिळते. त्यातली नक्षी, आकार, आरेखन, अमूर्त-मूर्त आवर्तनं यांचा भास सातत्यानं होत असतो. ही सर्व चित्रवैशिष्ट्यं पाहता, अजिंठा इथल्या लेण्यांमधली चित्रं आणि शिल्पं हा भारतीय समाजासाठी कलेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आशय ठरतो.

(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच ‘अजिंठा कलासंस्कृती’चे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT