kevadia
kevadia 
सप्तरंग

केवडियाचं ‘आत्मनिर्भर’ मॉडेल

महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com

देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात, रोजगारनिर्मितीत पर्यटनाचा मोठा वाटा असतो. कोरोनामुळं गेल्या वर्षभरात या उद्योगाला खूप मोठा फटका बसला. यातून उभारी घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकारानं ‘असोसिएशन ऑफ डोमॅस्टिक टूर ऑपरेटर्स’चं तीनदिवसीय अधिवेशन गुजरातमधील केवडिया इथं नुकतंच झालं. सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वांत उंच पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) याच केवडियात उभारण्यात आलेला असून, त्याशिवाय अनेक उद्यानं, रिव्हर राफ्टिंग अशा प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनविकासाचं अनोखं मॉडेल विकसित करण्यात आलं आहे.

विविध योजनांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणाला पर्यटनाच्या नकाशावर आणत स्थानिकांना रोजगार मिळवून देणारा हा ‘आत्मनिर्भर’ पॅटर्न आता देशातील १७ ठिकाणी राबवण्यात येणार आहे. पर्यटन मंत्रालयासह पर्यावरण, रेल्वे, रस्ते, पाटबंधारे अशा सर्वच मंत्रालयांनी हातात हात घालून काम केल्यास एखाद्या ठिकाणाचा सर्वांगीण विकास कसा घडतो, याचं केवडिया हे आदर्श मॉडेल ठरतं. या ठिकाणाला भेट देऊन तिथल्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा. 

स्टॅच्यू ऑफ युनिटी 
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या आतून प्रवास करण्यासाठी जगातील सर्वांत वेगवान लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. या पुतळ्याचं अनावरण ता. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सध्या तिथं सुटीच्या दिवशी ५० हजार, तर इतर दिवशी १५ ते २० हजार प्रेक्षक भेट देतात. संध्याकाळी तिथं होणारा लेझर, लाइट अँड साउंड शो हे मोठं आकर्षण असतं. त्याच्याच बाजूला असलेल्या ‘युनिटी ग्लो गार्डन’मधील प्रकाशानं उजळलेल्या प्राणी-पक्षी-झाडं यांच्या प्रतिकृती डोळे दिपवून टाकतात. 

चिल्ड्रेन न्यूट्रिशन पार्क 
‘मुलांनी फास्ट फूड टाळून पौष्टिक अन्न खावं’ हा संदेश देण्यासाठी केवडिया परिसरात न्यूट्रिशन पार्क उभारण्यात आलं आहे. शेतीत पिकणाऱ्या अन्नापासून घरात पौष्टिक पदार्थ कसे तयार करावेत, कोणत्या ऋतूत कोणती फळं व भाज्या खाव्यात याची माहिती टॉयट्रेनमधून प्रवास घडवून आणत या पार्कमध्ये देण्यात येते. हे जगातील अशा प्रकारचं पहिलंच पार्क असून, शेवटी ‘७ डी’ शोच्या माध्यमातून भारतातील सर्व खाद्यसंस्कृतींची अनोखी सफरही घडवून आणली जाते.

सरदार सरोवरापाशी विकसित करण्यात आलेल्या या भागात धरणातील पाणी ‘गोडबोले गेट’मधून नियंत्रित करून रिव्हर राफ्टिंगची व्यवस्था उभारली गेली आहे. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात उभारण्यात आलेल्या धबधब्यांच्या मदतीनं इथं पाच किलोमीटरचं राफ्टिंग करता येतं, त्याचबरोबर ॲम्फी थिएटर, नर्सरी, मुलांसाठी नैसर्गिक रंगांच्या मदतीनं पेंटिंगची सोय, निसर्गशिक्षण व तंबू आणि ट्री-हाऊसमध्ये राहण्याची सोय अशा अनेक सुविधा आहेत. 

जंगलसफारी 
केवडियामध्ये जंगलसफारीचा आनंदही घेता येतो. इथं पक्ष्यांसाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. जगभरातल्या विविध देशांतून आणलेले पक्षी इथं पाहायला मिळतात, तसंच वाघ-सिंह, विविध जातींची हरणं, गेंडा, झेब्रा, जिराफ हे प्राणी पाहण्याची संधीही मिळते. याच्या जोडीला कॅक्टस व फुलपाखरू-गार्डन अशी आकर्षणंही या परिसरात आहेत. 

टूर ऑपरेटर्सच्या प्रश्‍नांत लक्ष घालू  - अरविंदसिंह
महाराष्ट्रात अनेक वर्षं अधिकारपदावर काम केलेले पर्यटनसचिव अरविंदसिंह यांनी अस्खलित मराठीत अनेक प्रश्र्नांची उत्तरं दिली. कोरोनाकाळात पुण्यातील टूर ऑपरेटर्सना भेडसावणाऱ्या समस्या ‘सकाळ’नं जाणून घेतल्या होत्या. 

‘या समस्यांवर पर्यटन मंत्रालय काय उपाययोजना करत आहे,’’ या प्रश्र्नावर अरविंदसिंह म्हणाले : ‘‘आम्ही टूर ऑपरेटर्सच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ऑपरेटर्सनी आणखी काही समस्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू.’’

‘केवडियाचं मॉडेल यशस्वी होण्यामागं केंद्र व गुजरात राज्याचे प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरले,’’ असं स्पष्ट करून अरविंदसिंह म्हणाले : ‘‘हे मॉडेल आम्ही देशातील १७ विविध ठिकाणी आता राबवणार आहोत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. केवडियात १२ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. केवडियाला येण्यासाठी मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई इथून खास ट्रेनही सुरू झाल्या आहेत.’’ 

‘रहस्य’ गोडबोले-गेटचं 
केवडियामध्ये फिरताना तिथल्या प्रत्येकाच्या तोंडी ‘गोडबोले-गेट’चा उल्लेख होत होता. त्याला ‘गोडबोले-गेट’ का म्हणतात आणि ‘हे मराठी गोडबोले कोण,’ हे मात्र कुणालाही सांगता येत नव्हतं. अनेक ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर ‘गोडबोले गेट्स’ ही महाराष्ट्रातील कंपनी असल्याचं स्पष्ट झालं. त्यांना फोन केला. कंपनीचे संचालक प्रशांत गोडबोले यांनी फोन उचलला आणि गोडबोले-गेटचा इतिहास सांगितला. 

ते म्हणाले : ‘‘बहुतांश धरणांचे दरवाजे विजेवर चालतात. मात्र, ‘गोडबोले-गेट्स’ला वीज लागत नाही, ते वॉटर प्रेशरवर काम करतात. माझे वडील प्रभाकर गोडबोले यांचं हे संशोधन असून, त्यांना १९८७ मध्ये त्याचं पेटंट मिळालं. इतर धरणांप्रमाणे सरदार सरोवराचं सर्व पाणी थेट कालव्यांत जात नाही. तिथल्या टोपोग्राफीचा वापर करून तीन छोट्या तळ्यांत पाणी साठवलं जातं व त्यांवर ‘गोडबोले-गेट्स’ बसवली आहेत. परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी या तळ्यांचा वापर होतो. तळी भरल्यानंतर हे दरवाजे आपोआप उघडले जातात. या दरवाजांमध्ये सुधारणा करून आम्ही ते मॅन्युअली उघडण्याची सुविधाही दिली आहे. याचा उपयोग करून रिव्हर राफ्टिंगसाठी पाणी पुरवलं जातं.’’ 

महाराष्ट्रात १८ ठिकाणी, तसंच देशभरात शंभरपेक्षा अधिक गेट्स बसवली आहेत, अशी माहितीही गोडबोले यांनी दिली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT