cambodia bafvan shivmandir sakal
सप्तरंग

सर्वांत मोठं शिवमंदिर

जगातील सर्वांत मोठं मंदिर हे कंबोडियातील अंकोरवट इथं आहे, हे कदाचित सर्वांनाच माहिती आहे; परंतु जगातील सर्वांत मोठं शिवमंदिर हेसुद्धा कंबोडियामध्येच आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

जगातील सर्वांत मोठं मंदिर हे कंबोडियातील अंकोरवट इथं आहे, हे कदाचित सर्वांनाच माहिती आहे; परंतु जगातील सर्वांत मोठं शिवमंदिर हेसुद्धा कंबोडियामध्येच आहे. कंबोडियातील ख्मेर साम्राज्याची प्राचीन राजधानी असणाऱ्या यशोधरपूरमध्ये हे शिवमंदिर आहे. याचं पूर्वीचं नाव स्वर्णाद्री असून, सध्या बाफवान नावाने हे मंदिर ओळखलं जातं. या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गोष्ट अतिशय रंजक आहे.

एखाद्या वास्तूचा जगातील सर्वाधिक काळ संवर्धन आणि पुनर्बांधणीचा विक्रम या मंदिराच्या नावावर आहे. १९६० मध्ये सुरू झालेला मंदिराचा जीर्णोद्धार २०१० मध्ये पूर्ण झाला. कामाचा प्रचंड आवाका आणि त्यातल्या गुंतागुंतीमुळे या प्रकल्पाला ‘जगातील सर्वांत मोठं कोडं’ किंवा ‘वर्ल्ड बिगेस्ट जीगसॉ पझल’ असं म्हटलं गेलं.

भारतातूनच दक्षिणेकडील साम्राज्यातील काही राजवंशाचे लोक कंबोडियामध्ये आले आणि इथं ख्मेर राजसत्तेची स्थापना केली. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच इथं लहान लहान राजसत्ता होत्या, त्यांचं नंतर एकत्रीकरण होऊन एकच मोठी राजसत्ता स्थापन झाली. तसा सातव्या शतकापासून उपलब्ध इतिहास आहे, त्यानुसार पहिल्यांदा महेंद्र पर्वत, नंतर हरिहरलय आणि शेवटी यशोधरपूर अशा ख्मेर साम्राज्याचा राजधान्या निर्माण झाल्या. नंतर यशोधरपूर हे अंकोरवट नावाने प्रसिद्धी पावलं.

इजिप्त येथील राजांप्रमाणे अंकोरवटचे राजेसुद्धा स्वतःला देवराजा म्हणजे देवाचा अंश मानत. या साम्राज्याची राजधानी असलेल्या यशोधरपूरची लोकसंख्या दहाव्या-अकराव्या शतकात सुमारे दहा लाख होती. तत्कालीन जगातील हे सर्वांत मोठं शहर होतं. या शहराचं क्षेत्रफळ नव्याने उजेडात आलेल्या माहितीनुसार आत्ताच्या लंडनच्या दुप्पट, तर मुंबई शहराच्या पाचपट होतं, यावरूनच या साम्राज्याची व्याप्ती आणि आधुनिकता लक्षात येईल.

उपलब्ध तत्कालीन पुराव्यांनुसार या अंगकोर साम्राज्याचा सम्राट उदयआदित्यवर्मन (दुसरा) (कारकीर्द इ.स. १०५० ते १०६६) याने हे शिवमंदिर ११ व्या शतकाच्या मध्यात बांधलं. त्याकाळी हे मंदिर त्या राज्याचं स्टेट टेम्पल म्हणजे कुलदेव होतं. पिरॅमिड पर्वत पद्धतीची रचना असणाऱ्या या मंदिराची कळसासह उंची १६५ फूट असावी. काळाच्या ओघात वरचा सोन्याचा मुलामा असलेला लाकडी कळस नष्ट झाला आहे. सध्या मंदिराची कळसाशिवाय उंची ११५ फूट आहे. मंदिर ३२५ X ४१० फूट असं पसरलेलं असून, बाहेरून मंदिराला चारी बाजूंनी मजबूत तटबंदी आणि दगडी पायवाट आहे.

मंदिरावर शिव, विष्णू, राम, अर्जुन, रावण, इंद्रजित यांच्या चित्रांसह रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग कोरले आहेत. तेराव्या शतकात चिनी राजदूत झो दागुआन याने यशोधरपूरला भेट दिली असता हे मंदिर बघितलं होतं व त्याचं वर्णन लिहून ठेवलं होतं, त्यानुसार संपूर्ण मंदिर हे ब्राँझ धातूच्या पत्र्याने अच्छादित असून, त्यावर जो कळस होता तो सोन्याचा होता. तसंच, मंदिराच्या मध्यभागी अतिशय भव्य असं शिवलिंग स्थापन केलेलं होतं. पिरॅमिडप्रमाणे एकावर एक रचलेले दगडांचे मजले, वरच्या बाजूला निमुळतं होत गेलेलं बांधकाम, अशी या वास्तूची मूळ रचना होती.

अतिशय अस्थिर असलेल्या रेतीच्या पायावर हे मंदिर उभं केलेलं होतं. आजूबाजूला असलेल्या लहान खंदक व जलाशयांमुळे ही रेती ओलसर राहत असे, ज्यामुळे या प्रचंड अवजड वास्तूला तोलून धरता येणं शक्य होतं. ख्मेर साम्राज्याचं १४ व्या शतकाच्या नंतर अधःपतन व्हायला सुरुवात झाली, ज्यामुळे बराच काळ हे राजधानीचं शहर दुर्लक्षित राहिलं. आजूबाजूचे जलस्रोत आटल्याने या भव्य मंदिराचा पाया असलेली रेती वाळून भुसभुशीत झाली व मंदिराचा प्रचंड डोलारा अस्थिर होऊन याचा मोठा भाग कोसळला.

नंतरची काही शतकं हे मंदिर पूर्णपणे विस्मृतीत गेलं होतं व जंगलाने गिळंकृत केलं होतं. मंदिराचा भाग असलेले सुमारे ५०० किलोचे हजारो दगड या आसपासच्या जंगलामध्ये विखुरले गेले होते. कंबोडिया सरकारने या मंदिराची पुनरुभारणी करण्याचं ठरवलं; परंतु त्यांना स्वतःला हे शक्य नसल्याने त्यांनी यासाठी जगभर आवाहन केलं, ज्याला प्रतिसाद देऊन फ्रेंच पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या एका टीमने या कामाचं शिवधनुष्य उचललं व प्रत्यक्ष कामाला १९६० मध्ये सुरुवात झाली.

मंदिराशी संबंधित सर्व कागदपत्रं, शिलालेख इत्यादी एकत्र केलं गेलं व कंबोडियाची राजधानी नॉम् पेन्ह इथं फ्रेंच पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयामध्ये हे ठेवण्यात आलं. दरम्यान, १९७० मध्ये कंबोडियामध्ये यादवी युद्ध सुरू झाल्याने या प्रकल्पात अडथळा तर आलाच; परंतु ख्मेर रोग या कट्टरवादी संघटनेने फ्रेंच पुरातत्त्व विभागाचं नॉम् पेन्ह येथील कार्यालय जाळून टाकलं. मूळ कागदपत्रं नष्ट झाल्यामुळे आता मंदिर पुन्हा कसं उभारायचं हा जटिल प्रश्न उभा राहिला. दरम्यानच्या काळामध्ये मंदिराचे जंगलात विखुरलेले सर्व भाग एकत्र केले गेले, जे जवळपास हजारो तुकडे होते. या तुकड्यांना एकत्र करून आता मंदिर बांधायचं होतं, त्यामुळे हे मंदिर उभारणं म्हणजे जगातलं सर्वांत मोठं कोडं बनलं. मंदिराचे विखुरलेले हजारो सुटे भाग असल्याने या प्रोजेक्टला ‘बाफ़ुआन पझल’ असं नाव दिलं गेलं.

फ्रेंच स्कूल ऑफ फार ईस्ट संस्थेचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ पास्कल रॉयेर यांनी आव्हान स्वीकारून कंबोडियातील यादवी युद्ध संपुष्टात आल्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा कामाला सुरुवात केली. जागेवर उभं असलेलं, थोडंफार शिल्लक असलेलं मंदिरसुद्धा काढून सर्व भाग सुटे करण्यात आले. हे जवळपास तीन लाख तुकडे होते. मूळ कागदपत्रं आणि रेखाटनं नष्ट झाली असल्यानं आता फक्त अनुभवावरून आणि स्थानिक कंबोडियन तज्ज्ञांच्या मदतीने मंदिर पुन्हा उभं करावं लागणार होतं.

या वास्तूचे १९१० पासून उपलब्ध असलेले ९४० फोटो मिळवण्यात यश आलं आणि याच्या मदतीने सर्व तीन लाख दगडांचं नंबरिंग करण्यात आलं. पूर्वीप्रमाणे पुन्हा हे मंदिर कोसळू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली. अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची यंत्रणा नव्यानं निर्माण केली गेली, तसंच पाया भक्कम व्हावा यासाठी अतिरिक्त दगड वापरले गेले. शास्त्रज्ञ पास्कल रॉयेर यांना जगभरातील अनेक संस्थांनी या कामासाठी तांत्रिक साहाय्य पुरवलं. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाचासुद्धा समावेश होता. २०१० मध्ये हे मंदिर पुन्हा एकदा उभं राहिलं.

हे जगातील सर्वांत क्लिष्ट बाफ़ुआन पझल सोडवून पुन्हा मंदिर उभारण्यासाठी तब्बल ५० वर्षं लागली. यात कंबोडियाला भारत सरकार, फ्रान्स सरकार आणि युनेस्कोने भरीव मदत केली. कंबोडियाचे राजे नोर्डोम सिन्हमणी आणि फ्रान्सचे प्रधानमंत्री फ्रांस्वा फिलन यांनी या मंदिराचं लोकार्पण केलं. ३ जून २०११ ला हे मंदिर पुन्हा जगभरातील लोकांसाठी पाहण्यास खुलं करण्यात आलं. तुम्ही जर कंबोडियामध्ये अंकोरवट बघण्यासाठी जाणार असाल, तर जवळच असणारं तेथील हे शिवमंदिर न चुकता आवर्जून बघा.

(लेखक जगभर भटकंती करणारे असून, साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT