काही देश पर्यटन केंद्रं म्हणून उदयास येत असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी विमानतळांचं आणि विमानसेवेचं खर्चिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि जाळं स्वतः त्यांच्या देशात निर्माण केलं.
- मालोजीराव जगदाळे, agdaleomkar5@gmail.com
Now Everyone Can Fly हे घोषवाक्य घेऊन एअर एशिया या विमान वाहतूक कंपनीने पर्यटन क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवली. विमान प्रवासाचे दर रेल्वे आणि बसच्या पातळीला आणून आपलं घोषवाक्य खरं करून दाखवलं. मी स्वतः मलेशिया ते सिंगापूर हा विमान प्रवास या एअरलाइनने सहाशे रुपयांत केला, त्यामुळे मीसुद्धा याचा साक्षीदार आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वसामान्यांना एकेकाळी अशक्य वाटणारा विमान प्रवास किंवा परदेशी पर्यटन यामुळे आवाक्यात आलं. परंतु हे सर्व शक्य कसं काय झालं? विमान प्रवासाचं हे वेगळं जग तुमच्यासमोर उलगडण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे, ज्यामुळे तुम्हीसुद्धा कदाचित या कल्पना वापरून आपला विमान प्रवास सुखकर, सोपा आणि अतिशय स्वस्त करू शकाल.
दोन देशांतील अडचणींचे संबंध, विमानतळांचं मर्यादित जाळं, विमानांची उपलब्धता, देशात एखाद्दुसरीच शासकीय अथवा निमशासकीय विमान सेवा देणारी कंपनी असणं, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, अतिप्रचंड देखभाल खर्च, बस- रेल्वे- जहाज यांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात प्रवासी... इत्यादी कारणांमुळे पूर्वीच्या काळी विमान प्रवास अत्यंत खर्चिक बाब होती, त्यामुळे अत्यंत गरज असल्याशिवाय विमान प्रवास शक्यतो कोणी करत नसेल. नेते, उद्योगपती किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठीच कदाचित विमान प्रवास त्या वेळी नेहमीची बाब होती.
जागतिकीकरणामुळे परदेश प्रवास ही गरज बनली आणि अनेक देशांनी त्यांच्या व्हिसा रेग्युलेशनमध्ये सुलभता आणली. उदाहरणार्थ - भारतीय पासपोर्टधारकांना ६० हून अधिक देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा फ्री एन्ट्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल या प्रकाराने जाता येतं. जशी देशांनी किचकट नियमांना मुरड घातली, तशीच विमान तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली, त्यामुळे कमी खर्चात अत्याधुनिक पद्धतीची विमानं बनवणं शक्य झालं.
काही काही कंपन्या तर विमान कंपन्यांना विमानं भाड्याने देण्याचा व्यवसायसुद्धा करू लागल्या आणि त्यातूनच एलसीसी व यूएलसीसी म्हणजेच लो कॉस्ट कॅरिअर व अल्ट्रा लो कॉस्ट कॅरिअर या एअरलाइन प्रकारांची निर्मिती झाली.
अमेरिकेमध्ये डेल्टा, युरोपात रायन एअर, आखातात पीगॅसस, आशियात एअर एशिया, तर भारतापुरतं बोलायचं झालं तर इंडिगो, स्पाइस जेट, गो एअर इत्यादी एअरलाइन उदयास आल्या. व्यापार, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटनाचा एक मोठा पाया रचला गेल्याने देशांतर्गत व देशाबाहेर विमान प्रवास ही आता गरजेची गोष्ट झाली. ज्यामुळे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आणि विमान कंपन्यांमध्ये एक मोठी स्पर्धा निर्माण झाली, ज्याचा थेट फायदा प्रवाशांना व पर्यटकांना झाला.
काही देश पर्यटन केंद्रं म्हणून उदयास येत असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी विमानतळांचं आणि विमानसेवेचं खर्चिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि जाळं स्वतः त्यांच्या देशात निर्माण केलं. उदाहरणार्थ - पूर्वीच्या काळी युरोपातून आशियामध्ये जाण्यासाठी कनेक्टिंग एअरपोर्ट म्हणून कराची एअरपोर्टचा वापर केला जात असे; परंतु दुबईने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती केली. प्रचंड मोठी जागा, आधुनिक तंत्रज्ञान, कमी टॅक्सेस आणि विमान कंपन्यांसाठी अनेक सोयी-सुविधा, अत्यंत माफक टर्मिनल फी यामुळे कराची एअरपोर्टची मक्तेदारी कायमची संपवत दुबई एअरपोर्ट आता जगातील सर्वांत बिझी एअरपोर्ट बनलं.
अगदी याच प्रकारे मलेशियातील क्वालालंपूर एअरपोर्ट हे आग्नेय आशियासाठी मध्यवर्ती केंद्र बनलं, तर मध्य आशिया आणि युरोप यांना जोडणारं इस्तंबूल एअरपोर्ट हे मध्यवर्ती केंद्र बनले. भारताबद्दल सांगायचं तर भारत स्वतःच एक मोठी बाजारपेठ बनला. देशांतर्गत आणि देशाबाहेर जाणारे-येणारे विमान प्रवासी यांची संख्या वार्षिक १३ कोटींपर्यंत जाऊन पोचली. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे यात अग्रभागी आहेत. हे दोन एअरपोर्ट मिळूनच वार्षिक सहा कोटी विमान प्रवाशांना सुविधा देत असतात.
एअर इंडिया, एमिरेट्स, एअर फ्रान्स, सिंगापूर एअरलाइन्स, इतिहाद इ. फ्लॅगशिप एअरलाइन समजल्या जातात. याचा अर्थ असा की, या एअरलाइन्स त्या त्या देशांचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे एक चांगला दर्जा आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी यांचे दरसुद्धा तसेच असतात. उदाहरणार्थ - एमिरेट्सने मला मुंबई ते दुबई जायचं असल्यास तिकीट वीस ते पस्तीस हजारच्या दरम्यान असतं, तर हाच प्रवास मला एखाद्या लो कॉस्ट एअरलाइनने करायचा झाल्यास सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
फ्लॅगशिप एअरलाइनमध्ये उत्कृष्ट सेवा पुरवली जाते. जसं की, चांगलं जेवण, ड्रिंक्स, चहा-कॉफी, ब्लँकेट, आरामदायी आसन व्यवस्था, इन्फोटेन्मेंट इत्यादी; तर लो कॉस्टमध्ये तुम्हाला अक्षरशः कधीकधी पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं आणि अतिशय दाटीवाटीने बसल्याचा अनुभव येईल अशी आसन व्यवस्था असते. परंतु माझ्या मते जर प्रवास हा अवघ्या दोन-चार तासांचा असेल, तर असा दाटीवाटीने प्रवास करण्यास माझी अजिबात हरकत नाही, जर दुपटीतिपटीने पैसे वाचत असतील तर.
परदेशी पर्यटन करताना खर्चाचा सर्वांत मोठा भाग हा विमान प्रवासाचा असतो, त्यामुळे त्या खर्चात एकदा मोठी बचत झाली की, संपूर्ण ट्रीप ही कमी खर्चात करणं शक्य होतं. फ्लाइट बुक करताना काही गोष्टी जर पाळल्या, तर या खर्चात अजून कपात होण्याची शक्यता असते. शक्यतो कोणतीही परदेशी ट्रीप ही दोन महिने अगोदर प्लान करावी, जेणेकरून प्रवासाच्या तीन ते सहा आठवडे अगोदर विमानाची तिकिटं बुक करावीत, ज्यामुळे खर्चात वीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
शक्यतो अनेकजण नियोजन करताना शनिवारी किंवा रविवारी निघून पुन्हा परत रविवारी किंवा सोमवारी येतात. सर्वजण या ठराविक पद्धतीने नियोजन करत असल्याने या दिवशी फ्लाइट्स इतर दिवसांच्या मानाने महाग असतात. बुधवार किंवा गुरुवार फ्लाइट बुक करण्यासाठी सर्वांत चांगले वार समजले जातात. या दिवशी बहुतांश ऑफर्स बघायला मिळतात, किंवा प्रोमो पद्धतीच्या फ्लाइट उपलब्ध असतात, ज्या नवीन प्रवासी आकर्षित करण्यासाठी एअरलाइन कंपन्यांनी इश्यू केलेल्या असतात.
ज्याप्रमाणे विमान कंपन्या पर्यटकांना विमान प्रवासासाठी उद्युक्त करत आहेत, त्या पद्धतीनेच स्वतःचा देश पर्यटन केंद्र बनावा, या उद्देशाने विमान कंपन्यांच्या मदतीने अनेक देशसुद्धा प्रयत्नशील आहेत. याचं उदाहरण म्हणजे, देशांकडून ट्रान्झिट किंवा स्टॉप ओव्हर सुविधा उपलब्ध करून देणं. एअर अस्तानाकडून कझाकस्तानची राजधानी अस्तानामध्ये, इथोपियन एअरलाइनकडून अडीस अबाबा इथिओपियामध्ये, ओमान एअरकडून मस्कतमध्ये ही उदाहरणं आहेत स्टॉप ओव्हरची, ज्यामध्ये फुकट किंवा माफक किमतीत पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्याला १-२ रात्र थांबून त्या शहराचा झटकन दौरा करता येतो. युएईचा व्हिसाचा खर्च ७५०० रुपयांपर्यंत येतो; पण जर तुम्ही दुबईमार्गे किंवा अबुधाबीमार्गे युरोप किंवा अमेरिकेत अथवा पुढे इतर देशात जाणार असाल, तर या देशांच्या इतिहाद आणि एमिरेट्स या एअरलाइन्सकडून ४८ ते ९६ तासांचा व्हिसा दिला जातो, जो फक्त १२०० रुपयांना उपलब्ध आहे.
जगातील अग्रगण्य एअरलाइन कंपन्यांचा एकत्र समूह असलेल्या स्टार अलायन्सने जगप्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी आगळीवेगळी सुविधा काही वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. राउंड द वर्ल्ड असं हे तिकीट असून, ज्यामध्ये तुमच्या सोयीप्रमाणे पाहिजे ते देश निवडून उदाहरणार्थ - मुंबई ते मुंबई अशी जगाला प्रदक्षिणा घालता येईल, तेही वाटेत अनेक देशांत थांबून. जगातील अनेक एअरलाइन तर ऑनलाइन उपलब्ध नाहीत, ज्या अतिशय कमी किमतीमध्ये ऑपरेट करतात. मुख्यत्वे आफ्रिकेत तर अशा प्रकारच्या बऱ्याच कंपन्या आहेत, यांची माहिती असेल तर प्रवासाचं नियोजन आणखी उत्तम होऊ शकतं.
विमान प्रवासात झालेल्या सुलभतेने जग खऱ्या अर्थाने जवळ आलं, सर्वसामान्यांना देशाटन करणं शक्य झालं. परदेश प्रवास खर्चिक असतो, गुंतागुंतीच्या कागदोपत्री अडचणी असतात, हा समज काढून टाकला पाहिजे. विविध देशांकडून, विमान कंपन्यांकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या ऑफर्सकडे डोळसपणे लक्ष देऊन याचा लाभ घेता यायला हवा.
(लेखक इतिहास अभ्यासक असून, अनेक देशांमध्ये त्यांनी साहसी पर्यटन स्वरूपाची भटकंती केली आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.