Anmol Garg Sakal
सप्तरंग

हसवावे, अन् ‘उद्योग’रूपी उरावे!

उद्योग ही गोष्ट हसण्यावारी नेण्याची नाही, हे तर खरंच; पण हसवण्याची गोष्ट उद्योगावारी नेता येऊ शकते का? अर्थात!! किंबहुना हसवणं या कौशल्यात गुंतवणूक करून किती तरी जणांनी मोठे उद्योग उभारले आहेत.

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

उद्योग ही गोष्ट हसण्यावारी नेण्याची नाही, हे तर खरंच; पण हसवण्याची गोष्ट उद्योगावारी नेता येऊ शकते का? अर्थात!! किंबहुना हसवणं या कौशल्यात गुंतवणूक करून किती तरी जणांनी मोठे उद्योग उभारले आहेत. टीव्ही, चित्रपट, वेब सिरीज ही विशिष्ट चौकटीची माध्यमं तर आहेतच; पण इतरही किती तरी माध्यमांमध्ये विनोदाचा वापर करून त्यातून प्रचंड उद्योगविश्व उभारता येऊ शकतं हे अनेक कल्पक मंडळींनी दाखवून दिलंय. ‘कॉमेडी इज इ सिरिअस बिझनेस’ असं म्हटलं जातं; पण अनेकांनी ते अक्षरशः खरं केलंय. ‘कॉमेडी’ आणि ‘बिझनेस’ यांची अतिशय बरोबर सांगड घालून अनेक जण यश मिळवतायत.

विनोदी कंटेंट तयार करणारी ‘द वायरल फिव्हर’, विनोदी कार्यक्रम उपलब्ध करून देणारी ‘बहरूपिया एंटरटेनर’, विनोदी सोहळ्यांपासून विनोदी कार्यशाळा आयोजित करण्यापर्यंत सगळं काही करणारी ‘इस्ट इंडिया कंपनी’ अशी नावं सांगता येतीलच; पण विनोदाचा वापर करून उद्योगवाटेवर जाणारी एक फौजच्या फौज तयार होते आहे. गर्व मलिकचं उदाहरण घ्या. एकीकडे तो कॉमेडी शोज करतोय; पण दुसरीकडं त्यानं नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करत उद्योग सुरू केलाय. मलिकचे ‘रोस्ट ऑफ बायजूज’ किंवा ‘रोस्ट ऑफ ज्युनिअर हॅट ज्युनिअर’ असे विनोदी कार्यक्रम एका वर्तुळात प्रचंड हिट झाले आहेत. मलिकनं मग या प्रकारच्या सादरीकरणाचे व्हिडिओ तयार केले आणि स्वतःच्या कंपनीची वेबसाइटच तयार करून त्यावर टाकले. ‘सबक्रिप्शन घ्या आणि व्हिडिओ बघा’ अशी शक्कल त्यानं लढवली. त्याला मिळणारा प्रतिसाद इतरांसाठीही धडा ठरला. विक्रम पोद्दार यांनी तर कॉमेडीचा उद्योग आणखीनच उंचीवर नेला. त्यांनी चक्क कॉमेडीसाठी कन्सल्टन्सी सुरू केली आहे. कन्सल्टन्सी आणि कॉमेडीसाठी? होय. बरोबर वाचलंय तुम्ही. त्यांनी चक्क ‘बोअर्डरूम कन्सल्टन्सी’ नावाची सेवा सुरू केली आहे. ‘बोर्डरूम’च्या ऐवजी ‘बोअर्डरूम’ हे नाव कल्पकच.

अनमोल गर्ग हाही एक अवलियाच. त्याच्या एका मित्राच्या स्टार्टअपला पाच वर्षं पूर्ण झाल्यानिमित्तानं त्याला स्टार्टअपविषयक काही विनोद असलेला एक प्रोग्रॅम हवा होता. अमोलनं तसं केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग, ‘बिझनेस कॉमेडी’ एवढ्याच विषयावर त्यानं भरपूर काम केलं आणि हा नवा उद्योग त्याला ‘खिसाभर आनंद’ देऊन गेला. आता तर त्यानं स्टार्टअपच्या विश्वावर आधारित ‘स्टार्टअप कॉमेडी’ नावाचा प्रयोग सुरू केला आहे आणि तो तुफान खपतोय.

गुजरातमध्ये मनन देसाई यांनी त्यांच्या पत्नीसमवेत ‘द कॉमेडी फॅक्टरी’ नावाची एक कंपनीच स्थापन केली आहे. ते चक्क कॉमेडीयन्स भाड्यानं देतात. म्हणजे कोणत्याही इव्हेंटसाठी कशा प्रकारचा विनोद हवा आहे हे सांगितलं की मग ही कंपनी तशा प्रकारचे विनोदी कार्यक्रम अरेंज करून देते. ‘म्युझिकल कॉमेडी’, ‘स्केच कॉमेडी’, ‘इंप्रॉव्ह कॉमेडी’ असे विनोदाचे बरेच प्रकार त्यांच्या या ‘मॉल’मध्ये आहेत.

अशी कित्ती तरी उदाहरणं सांगता येतील. विनोद ही अनेकांना एकत्र आणणारी गोष्ट असते ही गोष्ट जितकी खरी, तितकीच विनोदाची किती रूपं असू शकतात हे या नवीन ‘उद्योग’पतींनी सिद्ध केलंय. कशाकशाचे उद्योग करावेत या मंडळींनी? स्टँडअप कॉमेडी शोज अरेंज करण्यापासून मार्केटिंगमध्ये विनोदाचा तडका काय करून दाखवू शकतो हे सांगण्यापर्यंत आणि ब्रँड्सना विनोदाशी जोडण्यापासून विनोदी पोस्ट्स तयार करण्यापर्यंत कशातूनही उद्योग उभारता येऊ शकतो हे दाखवून दिलंय त्यांनी. कुणी कॉमेडी क्लबच स्थापन केलाय, तर कुणाची टीम कॉमेडी कंटेंट तयार करून देतीय, तर कुणी विनोदाशी संबंधित पुरस्कार वितरण सोहळे आयोजित करतंय. लाखो रुपयांची उलाढाल असणारे त्यांचे हे उद्योग ‘हसण्यावारी’ न्यायचे तरी कसे?

लॉकडाऊननं सगळ्यांवर परिणाम केला, तसा या कॉमेडी बिझनेसवरही केलाय. दिल्लीतला ‘कॅनव्हास लाफ क्लब’ बंद झाला, इतरही कॉर्पोरेट इव्हेंट्सवर पोसणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न खूप घटलं. त्याच वेळी इतरही काही परिणाम झाले.

‘एआयबी’सारखी कंपनी वादांमुळे बंद पडली. ‘हिरो से झिरो’च एकदम. ‘ओन्ली मच लाउडर’सारख्या कंपनीलाही वादांचा फटका बसला. विनोदी वेब सिरीज किंवा डिजिटल कंटेंट बनवणाऱ्या कंपन्यांना ‘नेटफ्लिक्स’सारख्यांनी लावलेल्या ‘ड्रामा’ आणि ‘थ्रिलर’च्या चटकेचा सामना करावा लागतोय. असं असलं, तरी पुन्हा एकदा विनोदाचा शिडकावा आणण्यासाठी हे सगळेच नवउद्योजक सिद्ध झाले आहेत. कपाळावरच्या आठ्यांपेक्षा चेहऱ्यावरची स्मितरेषा अनेक जादू करू शकते हे कॉर्पोरेट्सपासून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनाच पटलंय. त्यामुळेच हसवण्याच्या या उद्योगातला ‘अर्थ’ लॉकडाऊन किंवा अन्य कारणांनी सध्या थोडा पुसट झाला असला, तरी तो वाढत जाणार हे नक्कीच. ‘ह्युमर इंडस्ट्री’ नव्या वाटा शोधतच राहणार. त्यामुळे विनोदाला ‘नसते उद्योग’ असं म्हणताना यापुढे शंभर वेळा विचार करावा लागणार हे मात्र खरं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT