‘भाभीजी घरपे है’मध्ये शुभांगना अत्रे आणि असिफ शेख.
‘भाभीजी घरपे है’मध्ये शुभांगना अत्रे आणि असिफ शेख. 
सप्तरंग

विनोदाची ‘दीर्घसूत्री’

मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

एखादी विनोदी मालिका किती भुरळ घालू शकते? अमेरिकेतल्या ‘द सिंप्सन्स’चं उदाहरण सांगता येईल. सन १९८९पासून ही ‘सिटकॉम’ सुरू झालीय ती अजून सुरूच आहे. अर्थात ही अॅनिमेटेड मालिका; पण बाकी ‘द बिग बँक थेरी’, ‘फॅमिली मॅन’ वगैरे सिटकॉम्सची बरीच उदाहरणं आहेत. रशियातली ‘केव्हीएन’ नावाची मालिका तर ‘सिंप्सन्स’च्याही आधीपासून सुरू आहे म्हणे... पण बाहेरचं सोडा, भारतात सर्वांत जास्त काळ चाललेली विनोदी मालिका कोणती माहितेय? येस्स!! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. सध्या तारक मेहता यांच्या मूळ ‘चष्म्या’तला एखादा कण तरी शिल्लक राहिला आहे की नाही माहीत नाही; पण या मालिकेनं तब्बल तीन हजारपेक्षा जास्त एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘जेठालाल’, ‘दयाबेन’, ‘बबिताजी’ ही नावं गुजराती मंडळींनाच नव्हे, तर देशभरात माहीत आहेत. या मालिकेखालोखाल सध्या ‘देशकी धडकन’ असणारी आणि बराच काळ चालूनही लज्जत कमी न झालेली मालिका आहे ‘भाभीजी घर पे है’. ‘छपरा युनिव्हर्सिटीतला टॉपर’ असूनही कामधंदा काही न करता फिरणारा ‘भरभुती’, त्याची ‘गोरी मेम’ बायको अनिता, ‘कच्छेबनियान का खोका’ असणारा तिवारी आणि ‘सही पकडे है’ म्हणणारी अंगुरी भाभी हे लोक घराघरात पोचले आहेत. ही मालिका सहा वर्षांपासून रोज सुरू असूनही तिच्यातला विनोदाचा एलिमेंट कमी झालेला नाही हे तिचं यश. 

भारतात दीर्घ काळ चाललेली पहिली विनोदी मालिका होती ‘ऑफिस ऑफिस’. एका जाहिरात एजन्सीत काम करणारा मोहन, तिथं त्याची बायको मीरा त्याची बॉस; या मीराचा बॉस विनोद वर्मा तिच्यावर लट्टू आणि मोहन-मीराचं लग्न झालंय हे त्याला माहीतच नाही अशी धमाल थीम असलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंच ‘सब टीव्ही’ हे पूर्ण विनोदाला वाहिलेलं चॅनेल उचलून धरलं होतं. जवळजवळ दहा वर्षं या मालिकेनं हसवत ठेवलं. त्याच्याही आधी अशोक सराफ, विद्या बालन अभिनित ‘हम पांच’ खूप काळ चालली होती. ‘एफआयआर’ ही अशीच अतरंगी व्यक्तिरेखांची मालिकाही दीर्घकाळ चालली होती.

अर्थात ‘क्योंकी सांसभी कभी बहु थी’, ‘पवित्र रिश्ता’सारखे सोप-ऑपेरा दीर्घकाळ चालण्यामागचं कारण काय हे जसं कुणाला कळलं नाही, तसंच ठरावीकच ‘सिटकॉम्स’ दीर्घकाळ चालण्यामागचं रहस्य कुणाला कळलं नाही. गंमत बघा, ‘भाभीजी’च्या टीमनं नंतर ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘जिजाची छतपर है?’ नावाच्या तशाच ‘सिटकॉम्स’ आणल्या होत्या. तशी अतरंगी दुनिया, तशीच थोडी विचित्र स्टोरीलाइन; पण त्या मालिका गुंडाळाव्या लागल्या. इतकंच कशाला, अगदी थेट ‘भाभीजी’ची स्टोरीलाइन असलेली मालिका पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांच्यासारखे विनोदवीर घेऊन मराठीत ‘हम तो तेरे आशिक है’ नावानं आली होती; पण तिलाही फार प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित हिंदीतल्या व्यक्तिरेखांची छाप इतकी होती, की मराठीत तो ताळमेळ बसला नसावा. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखादी सिटकॉम दीर्घकाळ चालायला एक गोष्ट नक्की लागते ती म्हणजे कन्व्हिन्सिंग स्टोरीलाइन. दुसरं फार महत्त्वाचं म्हणजे अतिशय ठाशीव व्यक्तिरेखा. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये दयाबेनच्या एका विचित्र आवाजानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं, ‘एफआयआर’मध्ये बाकी सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना डॉमिनेट करणाऱ्या चंद्रमुखी चौटालाच्या व्यक्तिरेखेनं अशीच विरोधाभासी गंमत दाखवली होती. तीच गोष्ट ‘श्रीमान-श्रीमती’मधल्या राकेश बेदी आणि अर्चना पुरणसिंग यांनी साकारलेल्या धमाल व्यक्तिरेखांची. ‘भाभीजी घर पर है’मध्ये तर कोणतीही व्यक्तिरेखा सरळ नाही. शॉक लागल्यावर किंवा फटका मारल्यावर रडण्याऐवजी हसू येणारा आणि ‘आय लाइक इट’ म्हणणारा सक्सेना, सदैव पैसे खाणारा पोलिस हप्पुसिंग, प्रत्येक वेळी खिडकीतून बोलताबोलता काही ना काही वस्तू पाडणाऱ्या ‘अम्माजी’ अशा अर्कचित्रांसारख्या व्यक्तिरेखांमुळे ही मालिका जास्त लोकप्रिय होत गेली. 

अर्थात एखादी विनोदी मालिका खूप काळ चालते म्हणून दुसरी चालेलच असं नाही. तिच्यातली स्टोरीलाइन ‘तारक मेहता’सारखी थेट ‘कनेक्ट’ व्हायला पाहिजे, किंवा ‘भाभीजी’सारखी त्यात अर्कचित्रं पाहिजेत हे जितकं खरं, तितकाच त्यातला विनोद ‘कन्व्हिन्सिंग’ वाटला पाहिजे हेही खरं. हे सगळं म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर अवघड असल्यानंच दीर्घकाळ चालणाऱ्या विनोदी मालिकांची उदाहरणं मोजकीच आहेत. 

मराठीत तर रंगभूमीवर ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’सारख्या फार्सपासून ‘शोभायात्रा’सारख्या ‘ब्लॅक कॉमेडी’पर्यंत विनोदांचे असंख्य प्रकार असताना छोट्या पडद्यावर मात्र अक्षरशः ‘निर्भेळ’ विनोद फार कमी आहे. स्टोरीलाइन विनोदी वाटावी अशी असली, तरी नंतर त्यात कौटुंबिक रंगांची भेसळ होते आणि विनोद संपतोच. बाय द वे, ही चर्चा सुरू असताना ‘वागले की दुनिया’ पुन्हा एकदा भेटायला आली आहे. पूर्वीची ‘वागले की दुनिया’ प्रचंड लोकप्रिय झालेली असताना तिचा हा पुढचा भाग प्रेक्षकांना आवडतो की नाही हे बघणं म्हणजे प्रेक्षकांच्या बदलत्या विनोद-रुचीचीही ‘लिटमस टेस्ट’ ठरणार आहे. नव्वदीतला प्रेक्षक भाबडा होता आणि आत्ताचा ‘व्हॉट्सॲपोत्तर, फेसबुकोत्तर’ काळातला प्रेक्षक चाणाक्ष आहे. त्यामुळे या ‘टेस्ट’मध्ये ती पास झाली आणि खूप काळ चालली, तर आपणही अंगुरीभाभींसारखंच एवढंच म्हणू...‘सही पकडे है!!’

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT