Article by Vijay Tarawade
Article by Vijay Tarawade 
सप्तरंग

‘साहित्य-सहकार’चा ‘पाळणा’ (विजय तरवडे)

विजय तरवडे

फर्ग्युसन महाविद्यालयात असताना ‘साहित्य-सहकार’ या संस्थेत एकमेकांच्या लेखनावर चर्चा-कम-चिरफाड व्हायची. त्या धीरगंभीर वातावरणात माझा वात्रट जीव गुदमरायचा. ‘साहित्य-सहकार’नं छान मित्र मात्र दिले. ‘सहकार’च्या एका सभेत सुहास शिरवळकरशी ओळख झाली. मी बीएच्या शेवटच्या वर्षाला होतो आणि सुहास बीकॉम करून पुन्हा बीएच्या  वर्गात दाखल झाला होता. त्यानं त्याच वेळी रहस्यकथा लिहायला सुरवात केली होती. ‘सहकार’च्या आणखी एका सभेत बोलताना सुहासनं ललितकथा आणि रहस्यकथा यांची तुलना करून धमाल उडवली होती. त्याच्या युक्तिवादानुसार, ललितकथेत नायक-नायिकेतलं प्रेम, त्यांच्यातला दुरावा किंवा नायिकेला खलनायक न आवडणं वगैरे गोष्टींना कोणतंही तर्कसंगत कारण दिलेलं नसतं. मात्र, रहस्यकथेत चोरी, दरोडा, खून किंवा अन्य प्रकारचा जो गुन्हा असतो, त्या गुन्ह्याला काही ना काही मोटिव्ह असतो आणि तो मोटिव्ह तर्कसंगत असतो आणि म्हणून ललितकथेपेक्षा रहस्यकथा सरस ठरते. त्याचा युक्तिवाद त्या सभेत इतरांना खोडता आला नव्हता. गं. ना. जोगळेकरसरदेखील समारोप करताना मंद हसले होते.
***

आम्ही कॉलेज सोडल्यावर काही वर्षांनी स. शि. भावे पुण्यात आले. त्यांनी ‘सहकार’च्या माजी सहकाऱ्यांचा एक खास मेळावा घेतला आणि त्यात मला नेलं. तेव्हा बाळ गाडगीळ यांनी ‘माझ्या आजीचा फोटो’ ही विनोदी कथा गंभीर आवाजात वाचली होती. कुणी हसलं नाही. नंतर गाडगीळांची पुस्तकं वाचनालयातून आणून मी वाचली तेव्हा लक्षात आलं, की त्यांचं विनोदी लेखन फर्मास होतं; फक्त त्या दिवशीचं वाचन फसलं होतं.

***

एका वर्षी ‘सहकार’ची सहल कार्ला इथं गेली होती. सहलीबरोबर प्राध्यापक गं. ना. जोगळेकर आणि प्राध्यापक द. न. गोखले होते. विद्यार्थ्यांमधली प्रदीप भिडे, आनंद देशमुख, शिवाजी गावडे, रामदास नेहुलकर, विद्या पवार (चित्रकार ल. म. कडू यांची पत्नी), मंदाकिनी खोले (प्रा. नीलिमा बाक्रे), गडकरी, गुर्जर एवढीच नावं-आडनावं आत्ता आठवतात.

मारिओ पुझो या पाश्‍चात्त्य लेखकानं ‘गॉडफादर’ कादंबरीत म्हटलं आहे ः ‘प्रत्येक माणसाची अशी एकच नियती असते’(Every man has only one destiny). कार्ल्याच्या सहलीच्या वेळी या उक्तीचा प्रत्यय आला. ‘सहकार’च्या ‘पाळण्या’त आमच्यातल्या तीन जणांचे पाय दिसले! लेणी पाहून झाली. डबे खाल्ल्यावर गप्पाष्टक जमलं. त्या वेळी आनंद देशमुखनं ‘लबों पे तराने अब आ न सकेंगे, कि अब जिंदगी में मुहब्बत नहीं है’ हे गाणं गायलं होतं. पुढं त्याचं ‘सवाई गंधर्व महोत्सवा’शी नातं जडलं. प्रदीप भिडेनं व. पु. काळे यांच्या ‘ऋतु बसंती रूठ गयी’ या कथेचं सफाईदार अभिवाचन केलं आणि पुढच्या आयुष्यात त्यानं त्याच्या त्याच कौशल्याची रेघ ओढून ती उंचावर नेली. दूरदर्शनवरच्या करिअरच्या आरंभी प्रदीपनं श्री. ना. पेंडसे यांच्या ‘पंडित, आता तरी शहाणे व्हा’ या नाटकात मोठी भूमिका केली होती. सहलीच्या वेळी आनंद आणि प्रदीप आपापले कलागुण दाखवत असताना सबंध सहलीत हास्यविनोद आणि थट्टामस्करी करून मी मागच्या बाकावरच्या खोडकर मुलाची भूमिका पार पाडली. पुढच्या लेखनप्रवासात प्रामुख्यानं त्याच प्रांतात, म्हणजे विनोदी साहित्यप्रकारात, माझी मुशाफिरी झाली. रवींद्र पिंग्यांच्या भाषेत सांगायचं तर त्या सहलीच्या वेळी नियतीनं आमच्या लल्लाटी जसं लिहून ठेवलं, तसंच हुबेहूब नंतरच्या आयुष्यात घडत गेलं. प्रदीपची आणखी एक मजेदार आठवण आहे. कॉलेज संपल्यावर तो मुंबईला गेला. मी औरंगाबादला जाऊन काही दिवसांनी पुण्याला परतलो. सन १९७८ मध्ये माझी एक कादंबरी प्रकाशित झाली. तिच्या हस्तलिखितावर जयवंत दळवींनी विस्तृत अभिप्राय लिहिला होता आणि तीमधला काही भाग कादंबरीच्या ब्लर्बवर छापण्यात आला होता. कादंबरीची पहिली प्रत दळवींना देण्यासाठी मी रात्रीच्या गाडीनं मुंबईला गेलो. पहाटे पोचल्यावर सकाळ होईतो फलाटावर बसून राहिलो.

दळवींना प्रत दिल्यावर आणि त्यांचा पाहुणचार घेतल्यावर तिथून निघालो. कुठंतरी वाट चुकलो आणि उलटसुलट हिंडताना रानडे रोडजवळ अचानक प्रदीप भेटला. कॉलेज सुटल्यावर चारेक वर्षांनी आम्ही भेटत होतो. त्यानं मला रानडे रस्त्यावरच्या सुजाता हॉटेलमध्ये नेलं. जेवता जेवता जुन्या आठवणी निघाल्या. त्यानं सुचवलं ः ‘पुस्तकाच्या प्रती सर्व दैनिकांमध्ये नेऊन दे, तिथं त्यावर अभिप्राय छापून येऊ शकतो.’ विविध दैनिकांमध्ये असलेल्या त्याच्या मित्रांची नावं त्यानं सांगितली.  स्टेशनच्या दिशेनं कोणत्या मार्गानं जायचं ते मला सांगितलं आणि निरोप दिला. योगायोग असा की दोन वर्षांनी माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी मुंबईला आलो तेव्हा थोरल्या मेव्हणीचं घर या सुजाता हॉटेलसमोरच आहे हे समजलं. यानंतर गेल्या ३० वर्षांत अनेकदा मुंबईला गेलो; पण कसं कोण जाणे प्रदीपला भेटायचं प्रत्येक वेळी राहूनच गेलं. मुंबईतली जीवघेणी अंतरं! टीव्हीशी संबंधित माझा जुना पत्रकार-मित्र राजेंद्र शिखरे मला दोन वर्षांपूर्वी अचानक फेसबुकवर भेटला आणि ‘दोन दिवस सुट्टी काढून ये, तुला प्रदीपच्या घरी नेऊन आणतो,’ असं आश्वासन त्यानं मला दिलं. मात्र, अजून तो योग आलेला नाही; पण सुजाता हॉटेलसमोरून जाताना प्रदीपची आठवण हमखास येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT