Article by Shruti Panse about Parenting
Article by Shruti Panse about Parenting 
सप्तरंग

‘उभयपक्षी’ संवाद (डॉ. श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे

सहज फसलं जाणारं लहानगं वय :
‘‘आई, मला ते दे!’’
‘‘काय देऊ तुला?’’
‘‘मला खेळायचंय त्या जोकरशी.’’
‘‘अरे, तो जोकर गेला निघून. काही नाही तिथं.’’
‘‘नाहीये?’’
‘‘अरे, तो जोकर तर काऊनं नेला. आता उद्या परत मिळेल हं! आता झोपायचं!’’
‘‘काऊनं नेऽऽऽलं जोकरला?’’
‘‘नेलं...’’
***
‘‘तो बघ त्या तिकडं अंधारात एक बुवा बसला आहे. जी मुलं मोठ्या माणसांचं ऐकत नाहीत, त्यांना तो घेऊन जातो’’
‘‘आणि काय करतो तो?’’
‘‘काही करत नाही. घेऊन जातो आणि पुन्हा आई-बाबांकडे सोडत नाही. घरीपण जाऊ देत नाही.’’
‘‘मग काय करतो तो अशा मुलांना?’’
‘‘त्याच्या घरी ठेवतो पकडून.’’
‘‘पण का ठेवतो?’’
‘‘कारण तो बुवा खूप वाईट असतो, दुष्ट असतो. म्हणून तो अंधारात राहतो. लपून बसतो. म्हणून मोठ्यांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं असतं. नाही तर तो बुवा येऊन घेऊन जातो.’’
एक वय असतं, जेव्हा मुलं आई-बाबांवर, शिक्षकांवर आणि जवळच्या सगळ्या मोठ्या माणसांवर विश्वास ठेवतात. इतकं की आई जर पलीकडच्या खोलीत असेल आणि दार लावलेलं असेल, तर आई पुन्हा दिसेल की नाही या कल्पनेनं मूल अस्वस्थ होतं आणि भोकाड पसरतं. जे समोर दिसतं आहे आणि मोठी माणसं जे सांगत आहेत त्यावर विश्वास ठेवणारं हे वय.
***

हळूहळू कळायला लागतं ते वय ः
‘‘बाबा, मला ते दे ना.’’
‘‘काय हवं तुला?’’
‘‘अरे, दे ना!’’
‘‘अरे ते तर गेलं. काऊनं नेलं.’’
‘‘काऊनं नाही नेलं. मला नाही दिसला कावळा. कावळ्याकडं नाहीये. तूच खिशात ठेवलंयस. दे मला.’’
मोठ्या माणसांनी सांगितलेलं सगळंच खरं नसतं. त्यांच्यातली स्वतंत्र विचारक्षमता जागृत होण्याचा हा काळ. कार्यकारणभाव कळण्याचं हे वय. जी मुलं चुकून अंधाराला घाबरत असतील, त्यांना अंधारात मुद्दाम नेऊन तिथला लाईट लावून, तिथं काहीही नाही हे दोन-तीन वेळा, त्यांची खात्री पटेपर्यंत आवर्जून दाखवण्याचा हा काळ.
***

अविचारी कृतीला विचारी वळण लावण्याचं वय ः 
‘‘हा खडू तू कुठून आणलास?’’
‘‘मला नाही माहीत... हा माझ्या दप्तरात कुठून आला!’’
‘‘तुला कसं नाही माहीत? हे तुझं दप्तर आहे ना? तूच आणला असशील. कोणाचा घेतलास हा खडू? शाळेतला उचलून आणला नाहीस ना?’’
‘‘देवबाप्पा शिक्षा करतो का मग खोटं बोलणाऱ्याला?’’
‘‘देवबाप्पा शिक्षा नाही करत... पण हा खडू ज्या कोणाचा असेल, ते शोधत असतील ना?’’
‘‘.......’’

‘‘तुझ्या शाळेतल्या ताईंचा आहे का खडू? खडू नसेल तर त्या फळ्यावर कशानं लिहिणार? त्यांना सकाळी शाळा भरायच्या आधी हा द्यायला पाहिजे. हो ना?’’
‘‘हो. मी देईन.’’
***

‘‘हे काय? आज चक्क स्वच्छ केलाय डबा. भाजी आवडली का? शाब्बासकी द्यायला पाहिजे तुला!’’
‘‘हो! मी पूर्ण संपवला डबा.’’
‘‘पण खरंच ना? मला खरं वाटत नाहीये...’’
‘‘मी सोनूला मुळीच नाही दिला डबा. मी एकटीनंच संपवला आख्खा. हवं तर तू विचार तिला. मीच संपवला.’’ 
‘‘बरं! उद्या मी तुला थोडी वेगळी भाजी देऊ का म्हणजे तुम्हाला दोघींना मिळून खाता येईल.’’
‘‘हो. चालेल.’’

आपली आई/ आजी किंवा शिक्षक आपण कसे वागलो तर नाराज होतात, कसे वागलो तर रागावतात, याचा अंदाज मुलांना आलेला असतो. त्यामुळं ते एखाद्या प्रश्‍नानं आधीच सावध  होतात आणि खोटं बोलू बघतात. मुलं खोटं बोलत  आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांना न रागवता किंवा ओरडता योग्य प्रकारे विषय वळवला, तर मुलं पुढच्या वेळी खडू घेताना विचार करतील. ‘मी खडू घेतला तर आई रागावते/ मारते,’ असा विचार न करता ‘मी खडू घेतला तर ज्याचा तो हे त्याला कसं वाटेल,’ याचा विचार त्यांच्या मनात आला आणि उचललेला खडू तिथंच ठेवून मुलं परतली, तर जिंकले त्यांचे आईबाबा!!!

आपण डबा खाल्लेलाच नाही हे आईला कळलंसुद्धा नाही; पण ती दोघींसाठी आवडीच्या भाजीचा डबा देणार आहे, यामुळं मुलं खूश होतात.  

नावडती भाजी डब्यात दिली म्हणजे मुलं आपसूक खातील, हा बऱ्याच पालकांचा गोड गैरसमज असतो. न आवडलेला डबा एकतर मुलं वाटून टाकतात किंवा सरळ शाळेजवळच्या कुत्र्याला खाऊ घालतात किंवा सरळ नाकारतात. त्यापेक्षा नावडत्या भाजीचे प्रयोग आपल्यासमोर घरी करावेत.
***

पोकळ धमकीला उत्तर देण्याचं वय :
‘‘तू मला खूप त्रास देतोस ना, म्हणून मी आता कुठं तरी निघून जाणार आहे. मग तू इथं एकटीच राहा हां...’’
‘‘नको आई, नको. मी एकटा नाही राहणार. तुला त्रास नाही देणार. कधीच नाही... तू जाऊ नकोस कुठंच.’’

कित्येक आईबाबा मुलांना अशा धमक्‍या देतात. ज्या लहानपणी मुलांना शंभर टक्के खऱ्याच वाटतात. त्या वयात या धमक्‍यांमुळं त्यांना असुरक्षित वाटतं. हळूहळू त्यातला फोलपणा त्यांना कळतो. यातून चिमुरडी मुलं हेच बोलायला शिकतात. 
‘मी तुला सोडून जाईन. कायमचं मित्राकडं/ मैत्रिणीकडं राहायला जाईन. त्याची/ तिची आई सांभाळेल मला’, ‘मी मरून जाईन,’ अशी  वाक्‍यं सात-आठ वर्षांची मुलं बोलतात. 
***
शिंगं फुटण्याचं वय :
‘‘तू मुळीच अभ्यास करत नाहीस. परीक्षेत चांगले मार्क मिळवत नाहीस. त्यामुळं मला वाईट वाटतं. तुझ्या वर्गासमोर माझा अपमान होतो. जा निघून इथून. मार्क मिळवलेस तरच मला तुझं कौतुक आहे, नाहीतर मुळीच नाही. तुझ्यापेक्षा तुझी बहीण बरी.’’
अशी वाक्‍यं आईबाबा आपल्या प्रिय मुलांना ऐकवतात. मुलांनी अभ्यासाला लागावं हेच यातून सांगायचं आहे आणि त्यातून आपल्या मुलांचं भलं व्हावं हीच एकमेव त्यांची अपेक्षा असते; पण मुलं हा संदेश असाच घेतील असं नाही. आपल्यामुळं आईबाबा दु:खी आहेत, आपणच याला कारणीभूत आहोत, असा विचार करून संवेदनशील मुलं चुकीचं पाऊल उचलू शकतात. ‘अभ्यास कर’ असा संदेश द्यायचा असेल तर थेट तसाच आणि योग्य भाषेत, तर्कसंगत संदेश द्यावा. वास्तविक अभ्यासातल्या अडचणी कशा सुटतील हे बघावं, त्यात उगाच नाट्यमयता किंवा मानापमान कशाला आणायचे? मार्क हे मुलांच्या असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत का? 
***
शिंगं फुटलेल्या वयात :
‘‘.........’’
ज्या आया आपल्या मुलांचं किंवा मुलीचं स्टेटस नेहमीनेहमी चेक करतात आणि त्यांना नंतर शंभर प्रश्न विचारतात, बोलतात, त्या आयांना त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी ब्लॉक केलं आहे, हे ढळढळीत सत्य आहे!!!
***
संवाद संपल्याची आणि मुलांनाच काऊनं आपल्यापासून दूर नेल्याची ही एकतर्फी खूण नाही ना? 
जर असेल तर कट्ट्यावर जमणाऱ्या समस्तांनी आपला छान संवाद आणि तोही दुतर्फा (!) चालू आहे ना, याची कृपया खात्री करून घ्यावी.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT