mukund lele write after retirement article in saptarang
mukund lele write after retirement article in saptarang 
सप्तरंग

निवृत्तीनंतरचा आधार (मुकुंद लेले)

मुकुंद लेले mukundlelepune@gmail.com

निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी या उद्देशानं नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरचा आधार स्वतःच तयार करण्यासाठी; तसंच करसवलतीचा अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी ती उपयुक्त आहे. या योजनेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर.

आपल्या देशात सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रस्थापित व्यवस्था नसल्यानं स्वतःच्या भविष्याची तरतूद स्वतःलाच करावी लागते. नव्या युगात सेवानिवृत्तीनंतर "पेन्शन'चा आधार तुटलेला आहे. त्यामुळे तरुण वयापासूनच काही रक्कम टप्प्याटप्प्यानं बाजूला ठेवून निवृत्तीनंतरची तरतूद आपली आपणच करणं अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकारनं नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही एक ऐच्छिक योजना सुरू केलेली असून, तिचा फारसा प्रसार झालेला दिसत नाही. योजनेचा उद्देश चांगला असूनही ती म्हणावी तितक्‍या प्रमाणात लोकांपर्यंत पोचलेली नाही. लोकांना निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. "एनपीएस'अंतर्गत, तुमची बचत ही "पीएफआरडीए'नं मान्यता दिलेल्या गुंतवणुकीच्या मार्गदर्शनानुसार व्यावसायिक फंड व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली गुंतविली जाते. यातले प्रमुख पेन्शन फंड पुढीलप्रमाणं आहेत ः 1) एचडीएफसी पेन्शन फंड, 2) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फंड, 3) एसबीआय पेन्शन फंड, 4) रिलायन्स पेन्शन फंड, 5) कोटक पेन्शन फंड, 6) यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशन फंड, 7) एलआयसी पेन्शन फंड, 8) डीएसपी ब्लॅकरॉक पेन्शन फंड. तुमचे पैसे सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर आणि शेअर यांमध्ये विभागून गुंतवले जातात. आपापल्या जोखीमक्षमतेनुसार गुंतवणूकप्रकार निवडण्याची मुभा यात आहे; शिवाय करसवलतीचा लाभ मिळतो, तो वेगळाच!

कोणाला सहभागी होता येतं?
"एनपीएस' योजनेत वय वर्षं 18 ते 60 च्या दरम्यानची कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. यासाठी संबंधित व्यक्तीस पोस्ट, निवडक बॅंका अथवा कॅम्स, कार्व्ही, स्टॉक होर्डिंग कॉर्पोरेशन यांसारख्या ठिकाणी आपलं खातं सुरू करता येतं. अशा बॅंका आणि त्याच्या शाखांची यादी "पीएफआरडीए'च्या साइटवर उपलब्ध असते. खातं उघडण्यासाठी विहित नमुन्यातला फॉर्म भरावा लागतो आणि त्यासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, बॅंकेचा धनादेश असणं आवश्‍यक आहे. आता हे खातं ऑनलाइन पद्धतीनंही उघडता येतं. खातं उघडल्यानंतर स्पीड पोस्टानं आपल्याला पॅन कार्डासारखं "प्राण कार्ड' मिळतं. "प्राण' म्हणजे पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर. हा प्रत्येक खात्यासाठी युनिक नंबर असल्यानं हे खातं संपूर्ण भारतात कुठंही वापरता येतं.

"एनपीएस'चे फायदे
- लवचिकता ः "एनपीएस'मधल्या गुंतवणुकीसाठी विविध पर्याय दिले जातात. तुमच्या गुंतवणुकीच्या वाढीसाठी पेन्शन फंड मॅनेजरचे पर्यायसुद्धा दिले जातात आणि तुम्ही गुंतवणुकीच्या एका पर्यायावरून दुसऱ्या पर्यायात बदल करून घेऊ शकता. कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना ऑटो किंवा ऍक्‍टिव्ह यातील एक पर्याय निवडावा लागतो.
- पोर्टेबिलिटी ः नोकरी किंवा रहिवासाचं ठिकाण बदललं, तरी चिंता करण्याचं कारण नसतं. कारण "एनपीएस' ही योजना सर्वांत चांगली पोर्टेबिलिटी देते.
- पारदर्शकता ः एनपीएस ही "पीएफआरडीए'च्या नियमांतर्गत येते. यांमध्ये गुंतवणुकीचे पारदर्शक नियम, नियमित देखरेख असते.
- कमी खर्च ः देशातल्या अन्य पेन्शन योजनेच्या तुलनेत "एनपीएस'च्या खात्याचा देखभालीचा खर्च कमी आहे.
- सुरक्षित निवृत्ती निधी ः "पीएफआरडी'च्या अंतर्गत यावर देखरेख होत असल्यानं सुरक्षितपणे निवृत्ती निधी तयार होतो.

एनपीएस योजनेत टियर-1 व टियर-2 अशी दोन खाती उघडता येतात. यातलं टियर-1 खातं उघडणं बंधनकारक असून, टियर-2 खातं उघडणं ऐच्छिक असतं. यातल्या टियर-1 खात्यास पेन्शन अकाऊंट असं म्हणतात आणि या खात्यात दर वर्षी किमान एक हजार रुपये भरावे लागतात. या खात्यात वर्षभरात कितीही वेळा आणि कितीही रक्कम जमा करता येते. या खात्यातली रक्कम आपणास हवी तेव्हा काढता येत नाही, वयाच्या साठीनंतर या खात्यावर अंतिम शिल्लक असलेल्या रकमेनुसारच पेन्शन दिली जाते. या खात्यावरची रक्कम काढण्याबाबत काही शिथिलता देऊ केली गेली आहे. दहा वर्षं पूर्ण झाल्यावर या खात्यावर जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम कुटुंबातल्या व्यक्तीच्या शिक्षणासाठी, गंभीर आजारपणासाठी आणि प्रथमच घेत असलेल्या घरासाठी काढता येते.

या खात्यास नामांकनाची (नॉमिनेशन) सुविधा असून, जास्तीत जास्त तीन नॉमिनी देता येतात आणि त्यांना देण्यात येणारा हिस्सादेखील सांगता येतो.
प्राप्तिकर कलम 80 सीनुसार करसवलतीची दीड लाख रुपयांची मर्यादा पूर्ण झाली असेल, तर आपण "एपीएस'मध्ये गुंतवणूक करून पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त किंवा वाढीव वजावट 80 सीसीडी (1ब) नुसार मिळवू शकतो.
थोडक्‍यात, "एनपीएस' हा करसवलतीबरोबरच निवृत्तीनंतरचा आधार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT