Tennis Sakal
सप्तरंग

टेनिसच्या नकाशावर पुणे ठळक !

२०२१ : आयपीएलला भारतामध्ये प्रारंभ. मे महिन्यात दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात अनेक संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफला संसर्ग. स्पर्धा स्थगित.

मुकुंद पोतदार balmukund11@yahoo.com

२०२१ : आयपीएलला भारतामध्ये प्रारंभ. मे महिन्यात दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात अनेक संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफला संसर्ग. स्पर्धा स्थगित.

जानेवारी २०२२ : भारतामधील आशियायी फुटबॉल महासंघाची (एएफसी) महिला स्पर्धा : खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला कोरोनाची बाधा झाल्यामुळे २३ जणींच्या संघातून १३ जणींचा संघ निवडणे अशक्य. परिणामी भारताची स्पर्धेतून माघार. आधीची कामगिरी अवैध. संघाच्या पारड्यात शून्य गुण. मायदेशातील स्पर्धेद्वारे महिला फुटबॉलचे ब्रँडिंग करण्याच्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता नाही.

२०२१ : आयपीएलला भारतामध्ये प्रारंभ. मे महिन्यात दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात अनेक संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफला संसर्ग. स्पर्धा स्थगित. उर्वरित लढती संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळविणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला भाग.

इंग्लिश प्रीमियर लीग : कोरोनामुळे स्पर्धेत अडथळा, लढती पुढे ढकलणे भाग.

कोरोनाच्या जगभर धुमाकूळ घातलेल्या विषाणूने नव्या वर्षाच्या प्रारंभीही पाठ सोडलेली नाही. या जागतिक साथीमुळे किती स्पर्धा, प्रदर्शनं, महोत्सव आणि कार्यक्रमांना फटका बसला आहे, याची गणती न केलेलीच बरी. अगदी ऑस्करपासून ही यादी सुरू होते. प्रारंभी उल्लेख केल्यानुसार क्रीडा स्पर्धाही त्यातून बचावलेल्या नाहीत. वास्तविक बायो-बबलचं सुरक्षित कवच असूनही या स्पर्धांमध्ये व्यत्यय आला. यावरून कोरोनाचा धोका कमी होऊनही संयोजकांसाठी हा काळ किती आव्हानात्मक आहे, हे स्पष्ट होतं. या पार्श्वभूमीवर पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एका वर्षाच्या खंडानंतर टाटा ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या चौथ्या अध्यायाची घोषणा झाली. पहिले चार दिवस बायो-बबल आणि शेवटचे तीन दिवस निर्बंधांनुसार बोलावता येतील तेवढ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने घेण्याचा संकल्प संयोजकांनी सोडला आणि तो तडीसही नेला. अर्थात, हे काही विनासायास घडलं नाही. त्यासाठी संयोजकांना कमालीचं नियोजन आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागली.

दिल्लीत प्रारंभ झालेल्या स्पर्धेचे २१ अध्याय चेन्नईत पार पडले. त्यात स्पेनच्या रॅफेल नदाल याने कारकीर्द भरात असताना सहभाग घेतला. अशी स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आली. राज्य सरकारचा भक्कम पाठिंबा लाभला.

या स्पर्धेच्या निमित्ताने एक आठवडा स्टेडियममध्ये अॅक्शन झाली. पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकल्यानंतर पोर्तुगालच्या जोओ सौसा याने स्वतःला कोर्टवर झोकून दिलं. दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या सौसाने पहिल्या फेरीपासून जिगरबाज खेळ केला. उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता त्याला प्रत्येक लढतीत तीन सेटपर्यंत झुंजावं लागलं. कारकीर्दीत प्रथमच एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या फिनलंडच्या एमिल रुसुवूरीविरुद्ध त्याने खेळ उंचावला. जेतेपदाच्या लढतीमधील चुरस आणि दर्जेदार खेळामुळे प्रेक्षकांना पर्वणी मिळाली. प्रेक्षकांनी सौसाला जसं चिअर केलं, तसंच एमिलच्या खेळालाही दाद दिली. सौसाचा उत्स्फूर्त जल्लोष त्यामुळेच प्रेक्षणीय ठरला. त्याचे ट्रेनर तसंच प्रशिक्षक मर्क्वी फेडेरिको कोर्टलगतच्या स्टँडमध्ये बसले होते. विजयानंतर सौसाने त्यांना आलिंगन दिलं. पॅरिसमधील रोलाँ गॅरोच्या सेंटर कोर्टवरील लाल मातीवर किंवा विंबल्डन स्पर्धेत ऑल इंग्लंड क्लबच्या हिरवळीवर अत्यानंदाने झोकून देणारे चँपियन टीव्हीवर सगळेच बघतात. असं दृश्य तुमच्या शहरात तुम्हाला पाहायला मिळतं तेव्हा तो क्षण एखाद्या टेनिसप्रेमीसाठी किती रोमांचक ठरतो, याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही.

सौसाला पत्रकार परिषदेत टर्निंग पॉइंट विचारला असता, त्याने लोकल बॉय अर्जुन कढे याच्याविरुद्ध दोन टायब्रेकसह तीन सेटपर्यंत रंगलेल्या पहिल्याच फेरीचा उल्लेख केला. रविवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी दुहेरीचा अंतिम सामना झाला, त्यात रोहन बोपण्णा-रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने बाजी मारली. ल्युक सॅव्हिल-जॉन पॅट्रिक स्मिथ या पारडं जड असलेल्या अग्रमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीविरुद्ध त्यांनी पराभवाच्या खाईतून विजय खेचून आणला. बोपण्णा-रामकुमार या दोघांनीही प्रेक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्वीडनचा एलियास इमर, गतविजेता यिरी वेसेली, अग्रमानांकित अस्लन कारात्सेव अशा खेळाडूंना तुफान प्रोत्साहन मिळालं. इमर तर इतका भारावून गेला की, पुढील वर्षी लहान भाऊ मिकाईल याच्यासह भाग घेण्याचं त्याने नक्की केलं.

वास्तविक कोरोनाच्या निर्बंधांमुळे केवळ पाचशे प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी मिळणार होती. तसं पाहिलं तर चार हजार क्षमतेच्या स्टेडियमवर इतकेच प्रेक्षक येऊ शकणार असतील, तर धोका का पत्करायचा, असं क्षणभर वाटू शकेल. संयोजकांनी मात्र सकारात्मक विचार केला. ही स्पर्धा बायो-बबलमध्ये सुरळीत पार पडली असती असं म्हणण्यास, किंवा तसा प्रश्न विचारण्यास आता जागाच नाही. घराला घरपण येण्यासाठी त्यात माणसं असावी लागतात. याप्रमाणेच प्रेक्षकांमुळे स्पर्धेला स्पर्धेचं रूप प्राप्त झालं.

कोणत्याही क्षेत्रात शून्यातून सुरुवात करावी लागते, त्याशिवाय शिखर गाठता येत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. एका शून्यावर कितीही शून्य दिले तरी अर्थ बदलत नाही, असं गणिताचं पुस्तक सांगत असलं, तरी कोरोनानंतर जीवनाच्या लढाईत या शून्याचं प्रमाण कित्येक पटींनी वाढलं आहे. टेनिसच्या खेळात मात्र शून्याचा उल्लेख ‘लव्ह’ असा अगदी प्रेमाने केला जातो. प्रत्येक टेनिस लढतीला प्रारंभ करण्यापूर्वी चेअर अम्पायर ‘लव्ह ऑल’ असा पुकारा करतात. याचा अर्थ दोन्ही खेळाडूंचा स्कोअर शून्य आहे. या उल्लेखानंतर पंच खेळाडूंना खेळ सुरू करण्यास सांगताना ‘प्ले’ असं म्हणतात. टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेचं चौथं पुष्प हाच संदेश अधोरेखित करतं.

पाचशे जणांना रोजगार

कोरोनामुळे काही खेळांमधील प्रशिक्षकांना आत्महत्या करणं भाग पडलं असताना, टाटा ओपनमुळे टेनिसचं चक्र सुरू झालं. लाइनमन, बॉल बॉइज, वाहनचालक, हाउसकीपिंग, इव्हेंट मॅनेजमेंट यांसह किमान पाचशे जणांना रोजगार मिळाला, याचा उल्लेख स्पर्धा संचालक प्रशांत सुतार आवर्जून करतात.

बालगोपालांना प्रेरणा

अंतिम सामन्याच्या वेळी स्पर्धकांना कोर्टवर घेऊन येण्यासाठी संयोजकांनी बालगोपालांमधून निवड केली. सौरवी प्रभुणे व अर्णव देवी यांना त्यातून हा बहुमान मिळाला. टेनिसबद्दल काही प्रश्न विचारून त्यांची निवड झाली. मुलांना अगदी अनपेक्षितपणे मातब्बर खेळाडूंसह कोर्टवर येताना पाहून त्यांचे पालक, परिचित भारावून गेले.

टेनिसप्रेमींची निष्ठा

अखेरचे तीन दिवस प्रेक्षकांना परवानगी असल्यामुळे अनेक जण येण्यास उत्सुक होते. कित्येकांची संयोजन समितीमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी मैत्री होती. पाचशे जणांच्या मर्यादेची कल्पना असल्यामुळे अनेकांनी प्रवेशिकेसाठी संपर्क साधून पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्याऐवजी घरी बसून टीव्हीवर सामना पाहणं पसंत केलं. पहिल्या तीन वर्षी स्पर्धा प्रत्यक्ष स्टेडियमवर येऊन पाहिलेल्या के. एल. सुंदर यांनी हीच भावना व्यक्त केली.

वायपीओचं भरीव मानांकन

तरुण उद्योजकांच्या वायपीओ (यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन) या संघटनेने स्पर्धेला दहापैकी ९ इतकं रेटिंग दिलं.

भारतीयांचा विजय भावपूर्ण

टाटा ओपनमध्ये पुण्यात एकूण दुसऱ्यांदा आणि यंदाच्या मोसमात सलग दुसऱ्यांदा रोहन बोपण्णाने विजेतेपद मिळवलं. लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यानंतर बोपण्णाने दुहेरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा फडकावण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. त्याच्या जेतेपदाचं याचि देही याचि डोळा साक्षीदार होणं भावपूर्ण ठरलं, अशी ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांची भावना प्रातिनिधिक ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT