Mumbai hospitals patients coming health Ventilator
Mumbai hospitals patients coming health Ventilator sakal
सप्तरंग

‘व्हेंटिलेटर’ ची अतिदक्षता

अवतरण टीम

केईएम, सायन किंवा नायर यापैकी पालिकेच्या कुठल्याही मोठ्या रुग्णालयात कोणत्याही सायंकाळी गेलात तर तिथे अफाट गर्दी असते.

- डॉ. अविनाश सुपे

मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दूरवरून येत असतात. त्यातील अनेकांना अतिदक्षता विभागात ठेवून उपचार करण्याची गरज असते; पण तेवढ्या प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध नसतात. अशा वेळी प्राधान्य कोणत्या रुग्णाला द्यावे याविषयी संभ्रम निर्माण होतो.

केईएम, सायन किंवा नायर यापैकी पालिकेच्या कुठल्याही मोठ्या रुग्णालयात कोणत्याही सायंकाळी गेलात तर तिथे अफाट गर्दी असते. केईएममध्ये वर्षाला २० लाख बाह्यरुग्ण येतात. ७५० ते ८०० अत्यवस्थ रुग्ण आपत्कालीन किंवा अपघात विभागात रोज येतात. सायन रुग्णालयात साधारण ६०० रुग्ण येतात.

केईएममध्ये येणाऱ्या ७०० ते ८०० रुग्णांपैकी साधारणपणे २०० रुग्ण अत्यवस्थ असतात. त्यातल्या बऱ्याच जणांना अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची गरज असते. रोज १०-१५ नवे रुग्ण व्हेंटिलेटरवर असतात.

त्यातले काही एक ते दोन दिवस; तर काही अनेक दिवस ते महिने असतात. अनेक रुग्ण व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत असतात. अशा वेळी कोणाला व्हेंटिलेटर द्यावा व कोणाला अतिदक्षता विभागात ठेवून वाट बघावी, हा मोठा संभ्रम असतो.

बऱ्याच वेळा रुग्ण बाहेरगावाहून दुरदुरून येतात. कधी उपनगरीय रुग्णालये अत्यवस्थ रुग्ण पाठवून देतात. कित्येक लहान रुग्णालये रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घालून आधी काहीही चौकशी न करता पाठवून देतात. बेड आहे की नाही, व्हेंटिलेटरची उपलबद्धता किंवा रुग्णाला मोठ्या रुग्णालयात येण्याची आवश्यकता आहे की नाही, हे न विचारता रुग्ण येऊन धडकतात.

बरोबर त्यांचे नातेवाईक, मित्र किंवा शेजारचे असतात. रुग्ण आल्यावर तीन ते चार तास सोनोग्राफी, रक्त तपासणी इत्यादी आवश्यक बाबी निश्चित निदान करून त्याला घरी पाठवायचे, की दाखल करून घ्यायचे यासाठी लागतात. नाही म्हटले तरी केईएममध्ये प्रतिदिनी ३०० च्या आसपास नवीन रुग्ण दाखल होतात. त्यामधील ५० ते ६० जण अत्यवस्थ असतात.

सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नाला अपघात विभागाच्या डॉक्टरना सामोरे जावे लागते तो म्हणजे जो गंभीर रुग्ण आला आहे, त्याला अतिदक्षता विभागात जागा नसेल तर कुठे ठेवावे? नातेवाईक सर्वत्र फिरून किंवा लांबून आल्यामुळे त्रासलेले असतात.

ते आरडाओरड करतात. रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यासाठी ते राजकीय पक्षांचे, नेत्यांचे वजन आणतात. आमचा रुग्ण आहे ॲडमिट करा, व्हेंटिलेटर उपलब्ध करा असे फोन येऊ लागतात. बऱ्याचदा एका बाजूला ७० वर्षांचा यकृत खराब झालेला कोमात गेलेला, वाचण्याची शक्यता दुरापास्त असलेला रुग्ण असतो आणि त्याच वेळी कोणी तरुण त्याला योग्य उपचार मिळाले तर वाचू शकणारा रुग्ण असतो.

जर ७० वर्षांच्या रुग्णांसाठी शिफारस असेल तर तरुण रुग्ण असे दगावू द्यायचे का, असा प्रश्न डॉक्टरांच्या मनात असतो. शास्त्रीय धोरणाप्रमाणे बहुतांशी एकच व्हेंटिलेटर उपलब्ध असेल तर तरुण रुग्णाचा जीव प्राधान्याने वाचवला जातो व दुसऱ्याला इतर योग्य उपचार देऊन स्थिर केले जाते व नंतर व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला जातो.

अशा या आरोग्य व्यवस्थेतील समस्यांवर काही वेगळी व्यवस्था करणे गरजेचे आहे. यावर निश्चित ठोस उपाय करणे अत्यावश्यक आहे. मुंबापुरीसाठी जेथे महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून रुग्ण येतात, त्यांना तात्काळ योग्य उपचार मिळण्यासाठी या दोनतीन गोष्टी आपण करू शकतो.

१. महापालिकेची उपनगरीय रुग्णालये तशीच शासनाची जिल्हास्तरीय रुग्णालये सक्षम करणे. मी संचालकपदी असताना शताब्दी, भगवती, राजावाडी, अगरवाल अशा अनेक रुग्णालयांचा विकास सुरू केला होता. या वर्षात यातील काही रुग्णालये सुरू होतील.

तिथे मोठ्या इमारती आणि संसाधने आली. तिथे तज्ज्ञ डॉक्टरची नेमणूक झाली आहे. या रुग्णालयांतील आधुनिक सामुग्रीमुळे मोठ्या रुग्णालयांचा ताण कमी होईल आणि बाहेरगावचे रुग्ण तिथे सामावून घेऊन तात्काळ आणि आधुनिक उपचार मिळतील.

२. सरकारवरही निधीबाबत बंधने असतात. अशा वेळी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेद्वारे आरोग्य क्षमता वाढवता येईल.

३. कोविड काळात यशस्वीपणे राबवलेले छोट्या रुग्णालयांचे नेटवर्क तयार करून कुठे आयसीयू बेड उपलब्ध आहे इत्यादी माहिती एकाच ठिकाणी लगेच उपलब्ध होईल. सायन रुग्णालयातील नवजात शिशु विभागात ही संकल्पना गेली काही वर्षे यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.

तिथे दूरध्वनीवरून कुठे आयसीयू बेड उपलब्ध आहे, त्याचा शोध लावून नवजात शिशूला तात्काळ तिथे पाठवले जाते. अशा प्रकारची वेबसाईट तयार करून ती यशस्वीपणे राबवता येईल. मंत्रालयातील मुख्य सचिव बांठिया यांनी असा प्रयत्न केला होता; पण त्याला मूर्त स्वरूप देऊन त्या कार्यरत करणे आवश्यक आहे.

आरोग्य व्यवस्थेतील सर्व धुरिणांनी एकत्र येऊन अशी सुव्यवस्था निर्माण केली तर लोकांचा त्रास कमी होईल, महत्त्वाचा वेळ वाचेल आणि कॅज्युअल्टीमधील डॉक्टरांचा संभ्रम संपेल, निदान खूप कमी होईल.

जगातील जर्मनी, यूके, युरोप अशा बहुतांशी देशांतील आरोग्य व्यवस्था कोविडच्या महामारीनंतर काहीशी विस्कळित झाली आहे. नर्सेस आणि डॉक्टर्सची प्रचंड कमतरता आहे. आपल्या देशातही अनेक समस्या आहेत. कोविड महामारीच्या अनुभवातून आपण शिकून अशी आयसीयू बेड उपलब्ध करून देणारी वेबसाईट व व्यवस्था तयार केली तर अनेक रुग्णांचा जीव वाचेल व नातेवाईकांचा त्रास कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT