Brihadratha (Magadha) Dynasty
Brihadratha (Magadha) Dynasty esakal
सप्तरंग

राजवंश भारती : बृहद्रथ (मगध) राजवंश

सकाळ डिजिटल टीम

लेखक : ॲड. सुशील अत्रे

बृहद्रथ वंशाची माहिती महाभारत तसेच मत्स्य व विष्णू पुराणात दिलेली आहे. त्याच्या नावाचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. कुरू वंशातील राजा उपरिचर वसू याच्या पाच मुलांपैकी थोरला मुलगा बृहद्रथ. याने वडिलांचे चेदी राज्य बाजूला ठेवून स्वत: नवे राज्य उभे केले. त्याचे नाव मगध. \

त्याची राजधानी होती ‘गिरिव्रज’; म्हणजे आजचे बिहारमधील ‘राजगीर.’ या मगध राज्यावरील राजवंशाला ‘मगध वंश’ किंवा ‘बृहद्रथ वंश’ म्हटले गेले. पुराणातील संदर्भानुसार या बृहद्रथ वंशाने एक हजारापेक्षा जास्त वर्षे राज्य केले. (saptarang latest Marathi article on bruhadrath magadh rajvansh)

प्राचीन राजवंशांमध्ये कुरू आणि यादव वंशाच्या बरोबरीने प्रसिद्ध झालेला वंश म्हणजे मगध राजवंश.वसूच्या चेदी साम्राज्याची राजधानी ‘शुक्तिमती’ ही नगरी होती. बृहद्रथाने नवे साम्राज्य उभे केले, त्याची नवी राजधानीही वसवली. ती त्याने नैसर्गिकरीत्या पाच टेकड्यांची तटबंदी लाभलेली जागा निवडून तिथे वसविली. ते नगर ‘गिरिव्रज’ किंवा ‘राजगृह’ या नावे ओळखले गेले. रत्नगिरी, विपुलगिरी, वैभवगिरी, सोनगिरी आणि उदयगिरी या पाच टेकड्यांनी हे नगर वेढलेले आहे. आज ते बिहार राज्यात असून, ‘राजगीर’ या नावाने ओळखले जाते.

या नगराचा महाभारत काळात अत्यंत वैभवशाली नगर असल्याचा उल्लेख आहे. तो प्रदेश ‘मगध प्रदेश’ या नावाने प्रसिद्ध होता, म्हणून राजवंशालाही ‘मगध’ वंश म्हटले गेले. वंश सुरू झाला तो बृहद्रथापासून; म्हणून या वंशाला तेही नाव होते. इतकेच नव्हे, तर या वंशातील सर्वच राजांना ‘बृहद्रथ’ संबोधन होते. ‘राजा’ला तो समानार्थी शब्द होता.

या बृहद्रथाचा मुलगा म्हणजे ‘जरासंध.’ महाभारतात याची कथा प्रसिद्ध आहे. जरासंध हा प्राचीन मगध वंशातील सगळ्यात शक्तिशाली आणि वैभवशाली राजा होता. मात्र तो महाभारतात खलनायक म्हणून येतो. तो राज्यावर आला, तेव्हापासूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी त्याने आजूबाजूच्या राजांशी युद्ध करून ८६ राजांना बंदिवासात ठेवले होते.

असे १०० राजे बंदी झाले, की त्यांचा बळी देऊन तो भगवान शंकराला प्रसन्न करू इच्छित होता. यातला लक्षणीय मुद्दा असा की ८० पेक्षा जास्त राजांचा पराभव करण्याइतका तो बलाढ्य आणि शूर होता. त्याच्या मुली ‘अस्ति’ आणि ‘प्राप्ती’ यांचा विवाह मथुराधीश कंसाशी झाला होता. कृष्णाने कंसाचा वध केल्यामुळे जरासंध कृष्ण व बलरामाचा शत्रू झाला.

त्याने मुलींच्या वैधव्याचा सूड म्हणून मथुरेवर १७ वेळा स्वाऱ्या केल्या. प्रत्येक वेळी कृष्णाने मथुरेचे संरक्षण केले, पण अखेर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्याने आपली राजधानी भारताच्या थेट पश्चिम टोकाला द्वारकेला नेली. युधिष्ठिराने राजसूर्य यज्ञ करायचे ठरवले तेव्हा कृष्णाने त्याला सांगितले, की जरासंधाला मारल्याशिवाय तो हा यज्ञ परिपूर्ण करूच शकणार नाही आणि युद्धात त्याला हरवणे शक्य नाही.

त्यामुळे कृष्णाने भीमाकरवी मल्लयुद्धात जरासंधाचा वध घडवून आणला आणि बंदिवासातील राजांची सुटका केली. यानंतर कृष्णाने जरासंधाचा मुलगा सहदेव यालाच मगधाच्या सिंहासनावर बसविले. तो मात्र पांडवांचा अंकित राहिला. महायुद्धात तो पांडवांकडून लढला आणि त्याचा वध शकुनीमामाने केला.

बृहद्रथ वंशात एकूण २४ राजे होऊन गेले. त्यांच्यापैकी अखेरचा राजा रिपुंजय. त्याचा महामंत्री पुनिक याने रिपुंजयाची हत्या केली आणि स्वत:चा मुलगा प्रद्योत याला गादीवर बसवले. तेव्हापासून मगध प्रदेशावर बृहद्रथाच्या जागी प्रद्योत राजवंशाची राजवट सुरू झाली. प्रद्योताला ‘चंडप्रद्योत’ असेही नाव होते.

तो अवंती प्रदेशातून राज्य करीत होता. त्याच काळात ‘कोशांबी’ला वत्स वंशाचे छोटेसे राज्य होते. वत्सराजा उदयन हा तेव्हाचा राजा होता. त्याचा महामंत्री यौगंधरायण! प्रसिद्ध संस्कृत नाटककार भास याने लिहिलेले नाटक ‘स्वप्नवासवदत्ता’ या प्रद्योत राजाशी संबंधित आहे. वासवदत्ता ही प्रद्योताची मुलगी. तिला वीणावादन शिकवताना राजकैदी असलेला उदयन राजा आणि वासवदत्ता कसे एकमेकांच्या प्रेमात पडले, याची कथा या नाटकात आहे.

प्रद्योत वंशानंतर मग ‘शिशुनाग’ आणि त्यानंतर ‘नंद’ वंश मगधाच्या गादीवर होऊन गेले. प्रद्योताने आपली राजधानी ‘उज्जैन’ला नेली होती. शिशुनाग वंशाचा राजा बिंबिसार याने ही राजधानी ‘पाटलीपुत्र’ येथे नेली. ‘पाटलीपुत्र’ म्हणजेच आजचे पाटणा शहर... रिपुंजयानंतरचे राजे तसे प्रदीर्घ काळ सत्तेत नव्हते. बृहद्रथानंतरच्या सर्व मगध राजवटी अल्पजीवी ठरल्या.

यापैकी बिंबिसार राजाची राजवट इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. कारण भगवान महावीर आणि भगवान बुद्ध हे दोघेही त्याच्याच काळात होऊन गेले आणि या दोन्ही महापुरुषांचे मार्गदर्शन बिंबिसाराने वेळोवेळी घेतल्याचा उल्लेख आढळतो. पुराणातील उल्लेखाप्रमाणे बिंबिसार हा शिशूनाग वंशाचा होता.

तर अश्वघोषाच्या बुद्धचरित्रानुसार बिंबिसार हा ‘हर्यंक’ या वंशाचा होता. एक गोष्ट नक्की- पौराणिक कालखंड आणि अद्य ऐतिहासिक कालखंड यांच्या संधिकाळात तो होऊन गेला. या दोन कालखंडांचा तो एक प्रकारे दुवा आहे. त्याचा उल्लेख पुराणे, बौद्ध साहित्य व जैन साहित्य या तिन्ही ठिकाणी आढळतो.

बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने नंतर बापाला कैदेत टाकले (मारले असेही म्हणतात!) आणि तो स्वत: राजा झाला. बुद्धांचे महापरिनिर्वाण या अजातशत्रूच्या राजवटीत झाले होते. त्याचा दहावा वंशज ‘महानंदी’ या नावाचा राजा होता. त्याचा अनौरस मुलगा महापद्म नंद याने शिशुनाग वंश संपविला व स्वत:चा ‘नंद’ वंश स्थापन केला.

इथून पुढे बलाढ्य मगध साम्राज्य नंदवंशाच्या आधिपत्याखाली होते. अशा प्रकारे प्राचीन मगध राजवंशाचा एक धागा असलेला नंद राजवंश यासाठी महत्त्वाचा आहे, की तिथपासून आपल्याला परिचित असलेला चाणक्य-चंद्रगुप्ताचा इतिहास सुरू होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT