Language Communication
Language Communication esakal
सप्तरंग

भाषासंवाद : विरामचिन्हांशी भावसंवाद

सकाळ वृत्तसेवा

लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे

भाषासंवादात उच्चारातील भावना समजणे, त्या योग्य आवाजात व्यक्त करणे आणि त्यातील चढ-उतार हाताळता येणे या गोष्टींवर संवादातील परिणामकारकता अवलंबून असते. भाषेशी संवाद हा एक प्रकारे स्वतःशीच संवाद असतो. आपल्याला स्वतःला त्या संवादातील प्रवाह समजला, तर दुसऱ्यांसमोर तोच संवाद व्यक्त करायला एक वेगळाच आत्मविश्वास येतो. भाषा वाचत असताना ‘विरामां’चा विचार करणे फार आवश्यक आहे आणि त्यासाठी भाषेत वापरली जाणारी विरामचिन्हे उपयोगी पडतात. (nashik saptarang latest article by trupti tijare on language Communication of punctuation marks)

विराम याचा अर्थ किंचित थांबणे आणि त्या कालावधीत वाक्यातील भावनेचा विचार करून त्याप्रमाणे उच्चार करणे. भाषासंवादात विरामचिन्हे वाचता येणे हे एका उत्तम वक्त्याचे लक्षण आहे. उद्गारवाचक चिन्ह हे एक बोलके आणि उद्बोधक असे विरामचिन्ह आहे. ज्यातून उद्गार वाचता येतो, असे चिन्ह म्हणजे उद्गारवाचक चिन्ह.

वाक्य किंवा परिच्छेद लिहित असताना “!” असे चिन्ह वाक्यासमोर लावले जाते. याचा अर्थ, सामान्य वाक्यापेक्षा उद्गारवाचक वाक्य हे वेगळे उच्चारावे, असे या खुणेला अभिप्रेत आहे. उद्गार उच्चारता येणे हा भाषिक अभिनयातील महत्त्वाचा भाग आहे. साधे वाक्य बोलत असतानाची आवाजाची क्रिया साधी सरळ व एकसुरी, तर आणि उद्गार काढत असतानाची आवाजाची क्रिया ही चढ-उतारांची आणि बहुसुरी असते.

सामान्य आवाजापासून उद्गारासाठी लागणारा आवाज बदलण्यासाठी, आपल्या जबड्याच्या आतमधल्या पोकळ्यांमध्ये प्रचंड वेगवान हालचाली होत असतात. एखाद्या वाक्याचे उद्गारात रूपांतर करीत असताना, वाक्यातले चढ-उतार कळणे हा जरी भाषामानसशास्त्राचा भाग असला तरी त्यासाठीचा आवाज हाताळणे हा शरीरशास्त्राचा भाग असतो.

आवाजातील चढ-उतार जबड्याच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये वेगवान बदल घडून येत असल्यामुळे होत असतात, हे शरीरशास्त्र लक्षात घेण्यासारखे आहे. आवाजनिर्मिती ही वाक्यातील चढ-उतारांना प्रवाही करते, तर उच्चारनिर्मिती ही भाषेच्या स्पष्टतेला. त्यामुळे आवाज, उच्चार आणि भावना यांची सांगड कशी घालायची, हा भावसंवादाचा भाग आपण तज्ज्ञ आवाज प्रशिक्षकांकडून शिकून घेणे हिताचे असते. (latest marathi news)

बोलणे शिकत असताना भावनांचे संतुलन समजून उमजून, तसा उच्चार करण्यासाठी विशिष्ट सराव या क्षेत्रातील तज्ज्ञांनी तयार केलेले असतात. आवाजाचे किंवा भाषेचे प्रशिक्षक हे सराव आपणाकडून करवून घेत असतात.‌ गाण्यातील आवाज घडविण्यासाठी हल्ली अनेक गायक हा अभ्यास करीत आहेत. हा अभ्यास व असे सराव मी स्वतः, आवाज प्रशिक्षक सचिन चंद्रात्रे यांच्या ठाणे येथील आवाज साधना केंद्रात जाऊन ऐकले आहेत.

लेखक किंवा कवी आपल्या भावभावना शब्दात व्यक्त करून वाचकांच्या हाती सोपवत असतो; त्यानंतर त्यांचे मौन संगोपन सुरू होते, ते वाचकाच्या भावविश्वात आणि प्रत्यक्ष दर्शन घडते, ते वक्त्याच्या बोलण्यातून. लेखक, वाचक आणि वक्ता असे भाषेचे वर्तुळ पूर्ण होत असताना या तिन्ही घटकांचे अनुभवप्रांत वेगवेगळे असतात.

लिहिणाऱ्याने लिहिलेले, वाचणारा जोपर्यंत वाचत नाही आणि वाचून ते व्यक्त करत नाही, तोपर्यंत साहित्यातील भावसंवादास अर्थ प्राप्त होत नाही. एखादी भावपूर्ण साहित्यनिर्मिती करीत असताना त्यासाठी वापरलेले शब्द, वाक्य किंवा अक्षरे ही भावभावनांना जन्म देऊ शकतात. परंतु तरीही त्या भावभावना पुस्तकात असतात तोवर निर्जीव आणि निरर्थक असतात. म्हणून भाषेतील भावसंवादाला फार महत्त्व आहे.

आपण म्हणतो, की शब्दांमुळे अर्थाचा अनर्थ होतो. वास्तविक बोलण्याच्या बाबतीत, फक्त शब्दांमुळेच अनर्थ होत नसतो, तर ते शब्द किंवा वाक्य उच्चारण्याच्या पद्धतीमुळे आणि पर्यायाने त्यासाठी वापरलेल्या आवाजामुळे जास्त अनर्थ ओढवत असतो. कारण पुन्हा तेच. उद्गारांमुळे बरी-वाईट भावना कळून येत असते. म्हणून व्यावहारिक भाषेच्या बाबतीत भावभावनांचे आणि त्या समजून घेऊन उच्चारांचे वेगळे महत्त्व आहे.

हल्ली जाहिरातीच्या भाषेत आपल्याला भावभावना समजून घेऊन केलेले आवाजाचे भाषाप्रयोग बघता येतील. कार्यालयीन भाषा कार्यालयात जितकी एकसुरी आणि कोरडी असते, तितकीच ती त्या कार्यालयातील निरोप समारंभात मात्र भावपूर्ण आणि ओली होत जाते. किंबहुना, वाक्य उच्चारात मार्दवता आणि नम्रता या भावना आणल्या तर कार्यालयातील न होणारी कामेही कधी कधी सहजच होऊ शकतात, असा अनुभव जरूर घेतला पाहिजे.

लहान मुलांचे हट्ट परतवून लावायचे असतील, तेव्हा कठोर भाषा काहीच कामाची नसते; नवरा-बायकोचे संवाद रंगतदार व्हावेत की वादविवादाच्या फैरी झडाव्यात हे त्यांच्या भाषेतून व्यक्त होणारी भावनाच ठरवीत असते. एरवी आवेशात करारी व घणाघाती भाषण करणाऱ्या नेत्याचा आवाज श्रद्धांजलीच्या भाषणात बदलतो.

भाषेच्या बाबतीत भावनेच्या बाजूचा महिमा हा असा अगाध आहे. थोडक्यात काय, तर गोड बोलण्याची कला अवगत करायची असेल, तर त्यातील भावसंवाद समजून घ्यावा लागतो, तसेच उच्चारांपासून सुरू केलेला भाषाप्रवास उद्गारापर्यंत नेऊन न्याहाळावा लागतो. शरीर, श्वास आणि भावना हा संतुलन त्रिकोण लक्षात घेतला, तर भाषेचा प्रभाव आणि प्रवाह हा भावनेच्या तिसऱ्या बाजूवर अवलंबून असतो, हे आपल्या लक्षात येईल.

चांगल्या आवाजनिर्मितीद्वारे ही बाजू आपण नक्कीच मजबूत करू शकतो. पण भाषेचा प्रभाव ही काही आपल्या हातातली गोष्ट नाही, असे समजून काही जण कसेही आणि रुक्षपणे बोलू लागतात, असे का होते? कारण त्यांना तिच्यातला प्रवाहच माहिती नसतो. भाषेच्या झऱ्याकाठी ते कधी निवांतपणे बसलेलेच नसतात. तिच्या प्रवाहात त्यांनी आवाजातील चढ-उतार मिसळला, तर ते तिच्याशी नैसर्गिक भावसंवाद साधू शकतील.

आवाजाचा संतुलन त्रिकोण

ज्ञानेश्वरी वाचत असताना, जणू माउलीच वाचत आहेत, तुकारामाचा अभंग वाचत असताना साक्षात संत तुकाराम तो अभंग सांगत आहेत, बहिणाबाईंची गाणी म्हणताना जणू बहिणाबाईच गात आहे. बोरकर, कुसुमाग्रज, ग्रेस, पाडगावकर यांच्या कविता वाचताना, जणू ते कवी स्वतःच आपली कविता वाचत आहेत, असे झाले पाहिजे, तरच तो खरा संवाद... हा संवाद पूर्वी घराघरांत होत असे.

जात्यावरच्या ओव्या, सायंकाळचा परवचा, शाळेतले पाढे, बडबड गीते, संस्कार स्तोत्रे, बाळाचे पाळणे, मंगळागौरीची गाणी, डोहाळे, रामजन्म, कृष्णजन्म, कथा-कीर्तने, कवितेच्या चाली, रानमळ्यावरची गाणी, किती समृद्ध होते ते भावविश्व! म्हणूनच पूर्वीची व्यक्तिमत्त्वेदेखील निर्मळ होती. आपण हल्ली खूप शब्द वापरतो, पण तरीही हवा तसा परिणाम साधता येत नाही. कारण उद्गारांचा अभाव.

पूर्वी अगदी थोडेच शब्द वापरले जायचे. पण त्यातून मोठा परिणाम साधता यायचा. कारण त्यात भावनेचा ओलावा असायचा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जसा जगातील माहितीचा खजिना खुला करून दिला, तसा अनेक शब्दांचा महाविस्फोट झाला आणि शब्दातला उद्गारच जणू थिजला. उद्गार थिजला तसा भावसंवादही थबकला. माहिती तंत्रज्ञानाच्या या विस्फोटात भाषेतील भावसंवादाच्या रेषा पुसट होत चालल्या आहेत.

माहितीजन्य शब्द, ज्ञानजन्य शब्द आणि अनुभवजन्य शब्द यात अनेकांची गल्लत होऊ लागली आहे. या सगळ्या महाजालात भावसंवाद नेमका कोण आणि कोणाशी साधत आहे, असा मोठा प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असेल, तर एकवेळ शब्दांचे डोंगरच्या डोंगर उभे करता येतील. पण‌ डोंगराला प्रवाह नसतो. भावसंवादाचा प्रवाह अनुभवायचा असेल, तर भाषेच्या समुद्रात उडीच टाकावी लागते; मग उच्चार आणि उद्गारांचे हातपाय मारू लागल्यावर भाषेच्या समुद्रात पोहताही नक्कीच येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT