Rajaram Pangavhane esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : प्रत्येक काळात शिवचरित्र मार्गदर्शक

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : आदर्श राजा कसा असावा, याचे छत्रपती शिवाजी महाराज एक मूर्तिमंत उदाहरण आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लेखक : राजाराम पानगव्हाणे

छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. थोडक्यात फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन पारशीऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

आदर्श राजा कसा असावा, याचे छत्रपती शिवाजी महाराज एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबरच अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्यराष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले यातच त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. (nashik saptarang latest marathi article chhatrapati shivaji maharaj jayanti 2024 marathi news)

छत्रपती शिवाजी महाराज

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुकारले, तरी आपल्यामध्ये एक असामान्य ऊर्जा निर्माण होते, रक्त सळसळते. शिवाजी महाराज हे फक्त युद्ध व लढायापुरतेच मर्यादित नसून एक कुशल प्रशासक, व्यवहारकुशल अर्थनीतीतज्ज्ञ, स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्ते, कुशल संघटक अशा अनेक गुणांनी संपन्न असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

इतिहासात मात्र अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची बोटे छाटली याच मोहिमांचा उल्लेख अधिक प्रमाणात आढळून येतो. आपण जर शिवचरित्र व्यवस्थितपणे अभ्यासले, तर आपल्याला असे लक्षात येईल, की आजच्या आधुनिक युगातील समस्या सोडविण्यासाठी सुद्धा शिवरायांचे व्यवस्थापन लागू पडते. इतिहासातील अनेक उदाहरणांच्या माध्यमातून ते लक्षात येईल.

अद्वितीय मानवी संबंध

शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रतापराव गुजर युद्धात धारातीर्थी पडले. त्यांच्या मुलांना महाराजांनी सैन्यात अधिकारपदी नोकरी दिली. त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले असता त्यांच्या पत्नीने मुलगी जानकी हिच्या विवाहाबद्दल चिंता व्यक्त केली. महाराजांनी आपला मुलगा राजाराम याच्याशी जानकीचा विवाह करून दिला हे जगातील राजेशाहीतील एक दुर्मिळ उदाहरण होय.

शेतमाल विक्रीवर इन्सेन्टिव्ह

शेतीमालाचे कधी कधी अधिक उत्पादन होत असे. महाराजांनी शेतीमाल स्वतः खरेदी करावा, असे आदेश काढले व तो आपल्या मुलखात नव्हे, तर परमुलखात जाऊन त्याची विक्री करावी, जेणेकरून आपल्या भागातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. भाव कमी होणार नाही.

परमुलखामध्ये विक्री केलेल्या शेतीमालावर अतिरिक्त मोबदला दिला जाईल. म्हणजेच आजच्या युगातील प्रचलित असलेला शब्द म्हणजे ‘इन्सेन्टिव्ह’ होय. महाराजांच्या कारकीर्दीत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, हेच त्यांच्या आदर्श राज्यकारभाराचे यश होय.

पर्यावरणप्रेमी

आंबा व सागाची झाडे ही काही एका वर्षात वाढत नाही. त्यांना वाढीसाठी अनेक वर्षे लागतात. जसे आपण आपल्या अपत्यांना मोठे करतो, त्याप्रमाणे ही झाडेही आपण मोठी करावीत, त्यांची काळजी घ्यावी. जळाऊ लाकडासाठी या झाडांना कापणे म्हणजे आपल्या अपत्यांना कापणे, असे समजावे. जळाऊ लाकडासाठी जीर्ण झालेली झाडेच कापावीत. यामुळे जिवंत झाडांचा ऱ्हास होणार नाही, अशी महाराजांची धारणा होती.

करआकारणी म्हणजेच ‘टॅक्सेशन’

पोर्तुगीजांच्या कोकणामध्ये मीठ विक्रीच्या कंपन्या होत्या. त्यांचे मीठ आपल्या व्यापाऱ्यांच्या तुलनेत स्वस्त होते. त्यामुळे पोर्तुगीजांच्या मिठाला मागणी होती. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते, त्यांच्या मिठाची विक्री होत नव्हती. शिवरायांनी पोर्तुगाजांच्या मिठावर अतिरिक्त कर आकारला. त्यामुळे स्थानिक व्यापारी व पोर्तुगीजांच्या मिठाच्या किमतीत समानता आली व स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करणे सोपे झाले.

महसूल वसुली व इन्स्टॉलमेंट

ज्या समस्या आज आहेत, त्या पूर्वीही होत्या. पण महाराजांनी त्यावर उपाय शोधले व ते यशस्वीपणे अमलातही आणले. दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये ज्यांची जनावरे दगावली, त्यांना जनावरे दिली गेली. महसूल वसुलीसाठी जाणाऱ्या सैनिकांना महाराजांनी वसुलीसाठी तगादा लावू नये, असे सांगितले.

महसूल वसुली करताना ती टप्प्याटप्प्याने करावी, म्हणजे शेतकरी व व्यापाऱ्यांवर अधिक भार पडणार नाही. टप्प्याटप्प्याने वसुली म्हणजेच आपल्या आजच्या युगातील सुलभ हप्ता म्हणजेच ‘इन्स्टॉलमेंट’ होय. शून्य टक्के दराने कर्ज देणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले व शेवटचे राजे होय. (Latest Marathi News)

स्त्री-पुरुष समानता

महिला या पुरुषांच्या बरोबरीच्याच आहेत. त्यामध्ये भेदभाव करण्याचे बिलकूल कारण नाही, हे महाराजांनी सर्वांना पटवून दिले. एक कर्तबगार स्त्री यशस्वीपणे आपलं कुटुंब व राज्यकारभार करू शकते, अशी त्यांची धारणा होती. महाराजांनी केवळ उपदेश देण्यापेक्षा स्त्रियांना संधी देण्याची सुरवात स्वतःपासून केली. त्यांच्या सुनांना घोडा चालविणे, तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले त्यामुळेच महाराज नसतानाही महाराजांची सून ताराबाई हिने यशस्वीपणे राज्य चालविले.

सूक्ष्म निरीक्षण

छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन मोठा अपघात कसा टाळता येईल, याचा विचार महाराजांनी नेहमी केला. चिपळूणच्या जुमलेदाराला महाराजांनी दिलेले एक पत्र आहे, त्यात त्यांनी सांगितलं आहे, की सायंकाळी झोपण्यापूर्वी घरातील व घराबाहेरील तेलवात, दिवे बंद करावेत.

कारण झोपल्यानंतर दिव्यांना उंदीर अथवा कुठल्या प्राण्याचा जर धक्का लागला, तर दिवे कलंडतीलल व कदाचित आग लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे चारा पटकन पेट घेऊन नष्ट होईल. शेतीच्या पिकांनाही आग लागू शकते. त्यामुळे छोट्या गोष्टींची काळजी घेऊन मोठे संकट टाळता येते, असे महाराजांनी शिकविले.

युद्धनीती व व्यवस्थापन

शिवरायांची युद्धनीती व व्यवस्थापन हे देशातच नव्हे, तर परदेशातही स्वीकारले गेले आहे. महाराजांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. अशक्यप्राय मोहिमा फत्ते केल्या, साडेतीनशेहून अधिक किल्ले जिंकले. हे सर्व करत असताना त्यांच्यापेक्षा शत्रूचे सैन्य व शस्त्रसाठा हा कितीतरी पटीने अधिक होता.

तरीही त्यांनी ही कामगिरी लीलया पार पाडली. त्यांचे युद्ध कौशल्य व व्यवस्थापन किती चोख होतं, हेच यावरून आपल्या लक्षात येईल. मोहीम छोटी असो वा मोठी, शत्रू अनेक असो अथवा एक. पण, त्याच्याकडे जाताना आलेल्या आव्हानाला तोंड देताना पूर्ण तयारीनिशी त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊनच महाराज सामोरे जात असत.

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

महाराज एका जातीपुरते कधीही मर्यादित नव्हते. महाराजांच्या राज्यकारभारात व सैन्यामध्ये सर्व जातीधर्माची लोक होती. जिवा महाला, शिवा काशीद, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मीर मोहम्मद, नूरखान, दौलत खान, मदारी मेहतर अशी अनेक जाती धर्माची लोक त्यांच्या राज्यकारभारात महत्त्वाच्या पदांवर होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT