Education 
सप्तरंग

आय, अन् माझं शिक्षान...

नितीन पवार koripati.production@gmail.com

यंदा नववीच्या वर्गात जाणार म्हणून वाईचं धास्ती हुती...पोर म्हणायची धाव्वीपेक्षा नववी आवघड आसती, मला तर तसं काय वाटलं न्हाय... आयं रोज मला अभ्यासाला बसवायची... शनवारी शाळा सुटली की त्याचं कापडावर मी गुराकडं जायचो... आय रयवारी कापडं धुवायची, त्यामुळं शनवारचा सगळा दिवस त्या कपड्यात जायचा... नेमकं नकं तिथंच चड्डी दोनदा फाटली हुती... चड्डी नवी घे असं आयेला म्हटलं तरी  चार - दोन दिवसानं सुयी- दोरा घिवून बस्ती... खाकी चड्डीला तिला कवाच खाकी रंगाचा दोरा घावला न्हाय...कारण घावंलं त्या रंगात समाधान मानायची ती... पाचवीला हुतो तवा आबा गेलं... दाद्याच्या लय जवळ हुतं आबा... दाद्याच्या डोस्क्यावर परिणाम झाला म्हणून त्यानं हिरीत उडी घितली म्हणत्यात... आयं माझ्याकडं बघून जगती म्हणत्यात, पण खरं सांगायचं तर मीच आयंकडं बघून जगतो...

नुस्त जगतोय न्हाय माज सगळंच जग आय हाय... उठलो की चांगलं दगडानं घासून आंगुळ घालती मला, आता मी मोटा झालोय म्हणलं तरिबी... दर शनवारी बाजारातनं भज्जी आणती मला...आन आक्का एक पारलेचा पुडा माझ्या एकट्यासाठी आणती..पुढला शनवार आला तरी माझ्याकडं चार तरी बिस्कुटं शिल्लक असत्यात... आय रानात जाताना डबा करून देती... कधी भांगलायला गेली तर पहाटं पाचला उठून करती, पण मला कवा उपाशी ठेवंत न्हाय...चार दोन रुपयं हातावर ठिवून, खा म्हणायला, पैशाचा डबा भरल्याला नगो व्हयं... लयच गडबड असली तर कांदा आन भाकरी खा म्हणती... मला लय आवडती... आमच्याकडं न्हाय म्हटलं तरी आठवड्यातनं चारदा असती ती लाल चटणी, कांदा आन बाजरी न्हायतर नाचणीची भाकरी... आमची आजुळची आजी धाडायची समदं... धाडायची म्हजी, धा दिस झालं तिला देवाघरी जाऊन..आज आयं तिकडचं गेलीए धावं हाय तिज...

रातच्या गाडीन आयं घरी आली... पडवीवर नुसतीच बसून हुती... मला इचारलं, ‘ भात ठेवलास का, ठिव !'' मी म्हटलं ''शिजला बी आसल, आणू का दोन घास खातीस का...'' नगो भूक न्हाय, आस म्हणली.. मला जवळ बोलावून घेतलं, तोंडावरनं हात फिरवला...

मला म्हणली ‘‘ माजी तब्येत आता काय साथ देईना लेकरा... नववीचा अभ्यास अवगड, त्यात तुला घरातली कामं, रानातली कामं, शाळेतन येऊन, पुन्हा मी रानातंन यायला उशीर झाला, तर तुला सयंपाक बी करायला लागतुय... तू आस कर तालुक्याला जा शाळंला... तिकडं हॉस्टेलला राहा, काय कमी पडायचं न्हाय तुला’’ आयं पुढं बोलत राहिली तवर माझं डोळं पाण्यानं डबडबल... मला पुढचं कायचं दिसना, आय काय बोलतीय त्ये आयकू ईना... आयला सोडून जायचं, आयबिगर रहायचं एवढ्यानंच मी गांगारलो हुतो...आडाणी राहीन पण आयपाशीच... आन आय घरात आसताना  पुस्तकाची गरजच काय..? आय उठून सयंपाकाला लागली, माज्या आवडीची भाजी केली पण माजी जेवणावरनं वासनाच गेली हुती...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लय रडलो, आयच्या पाया पडलो, पण भाकरीन बोटाला सादं भाजलं तर हात पाण्यात भिजवणारी आय, आज कोरडी पडली हुती... माझ्या डोळ्यात पाणी बघून सुदा ती गप हुती... काळजाचा तुकडा म्हणायची मला, तरिबी मी का लांब जावं आसं वाटलं आसलं तिला.. मी लय येळा इचारलं पण आयं कायंच बोलत नव्हती... मला आता खरंच झेपत न्हाय म्हणली...

एकामागोमाग तीन जवळंची माणसं जाताना बघितली व्हती तिनं... माजी काळजी घ्यायला, मला बघायला कोण नव्हतं तिकडं, तरी आईला मी नको हुतो... दहावा जसा झाला तसं आय बदलली हुती... मला आयचा लय राग आला, कवा  
कवा वाटायचं ही माजी आय न्हायचं... असली कुटं आय असती व्हयं, पण माज कायं चाललं न्हाय...

मामा आला, मला हास्टेलला घिवून गेला तरी आई रडली न्हाय... त्या दिवशी तिला बरं नव्हतं.. मी रडत रडत तिज्या पाया पडलो अन निघालो... मला हास्टेलला अजिबात करमलं न्हाय... सारकी आयची आठवण याची, तिज्याकडं जावं वाटायचं...पण आय माझ्याशी कशी वागली हे आठवून म्या गप रहायचो... मामा, आय आजारी हाय म्हणायचा, पण मी जायाचो न्हाय... मला आयचा लय राग आला हुता..
एक दिवस सकाळी आई देवा घरी गेल्याचा निरोप आला..

अग्नी दिल्यावर मामा माझ्यापाशी आला म्हणला ‘‘ तू गेल्यापासन नुसती रडायची, आन पाणी आधीच सोडल हुत... तिला कुणी दिल्यालं पैसे नगो हुत... आता तब्येत साथ देत नव्हती... आता कमवून तुला शिकवायची, तिची कुवत नव्हती ... तुझं शिक्षाण थांबवायचं न्हाय म्हणली... त्याला आईचा राग आला, तरच त्यो जाईल हितंन आन तसच झालं...तिला मरान दिसलं असावं बहुतेक..." 
आता मला मी हास्टेलला गेल्यावरचा आयचा रडतानाचा चेहरा लक्क दिसत हुता, पण तिजं डोळं पुसायची माजी कुवत नव्हती...!
(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्युब’ वरील वेबमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT