file photo
file photo 
सप्तरंग

पडद्यामागील बाप...

मारोती चवरे
बाप राबतो घरासाठी. लेकरांसाठी. आपल्या वेदना हृदयात दफन करून तो तुडवतो काट्यागोट्याची एकेरी पाऊलवाट. संकटाला सामोरे जाऊन बेगडी आनंद मिरवून जपतो आयुष्यभर लेकरांची इज्जत. म्हणून तर कुठे नाही पण संकटात बापाची आठवण पहिले होते. बाप असेल तर हिंमत येते. आपले संकट बाप पार करून नेईल, हा विश्वास असतो. पण हाच बाप एखाद्याच्या आयुष्यातून निघून जातो तेव्हा सर्वांना वाटते, आपण पोरके झालो. बापाचे छत्र हरविल्यावर आईच्या जीवनातील काळोख तिलाच माहीत. तिने कितीही पंखाचा पिसारा फुलविला तरी बापाची उणीव भरून निघत नाही. ही कहाणी आहे अमरावती जिल्ह्यातील डांगे कुटुंबाची. शेतीचे अपयश आत्महत्येचे कारण ठरले. कुटुंबाला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुरक्षितता देता आली नाही म्हणून पश्‍चात्तापाने स्वत:ला दिलेली शिक्षा म्हणजे शेतकरी आत्महत्या. सुनील डांगे असे त्याचे नाव. या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याला वाटले, आपल्या जाण्याने संकट संपेल; पण झाले उलटे. त्याच्या जाण्याने संकट कमी होण्यापेक्षा अधिक तीव्र झाले आणि संसाराचा रथ कोलमडला. बायको, लेकरांची वाताहत झाली. त्यांची पत्नी आपली कहाणी सांगत होती. डोळ्यातील पाणी पदराने पुसत ती म्हणाली... संकट आज ना उद्या हटले असते, जसे जगत आलो तसे पुन्हा दिवस काढले असते; पण जे झाले त्याची भरपाई कदापि होणार नाही. तीन एकर आमची कोरडवाहू शेती आहे. एकेकाळी शेतीवर सर्व कुटुंब निर्भर होते; पण आता शेती पर्याय नाही म्हणून करावी लागते. महागाईमुळे उत्पन्न होऊनही खर्च निघत नाही म्हणून कर्ज वाढले. चार वर्षे झाले बॅंकेचे कर्ज भरणे झाले नाही. मागील वर्षी दुष्काळाने शेती तोट्यात गेली. वाटले, या वर्षी तरी निसर्गाची कृपा आपल्यावर राहील; पण या वर्षी सुरुवातीला पाऊस न आल्याने पेरलेले सोयाबीनचे पीक मोडले. दोन मुले बरोबरीने शिकणारे, घरखर्च, या सर्वांना तोड देत शेतात टाकलेल्या पैशाची झालेली माती पाहून माणूस संकटासमोर हरला. त्याची चिंता वाढली. घरी कोणी नाही हे पाहून त्याने घरी फाशी लावून स्वत:लाच शिक्षा दिली. त्याच्या जाण्याने आम्ही पोरके झालो. घरात पाय ठेवला की तो त्याचा चेहरा आणि प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. ही व्यथा त्याची पत्नी सांगत होती. संगीताला दोन मुले आहेत. मोठा वैभव अमरावतीला एमपीएससीची तयारी करत आहे. तर अजय बीए शिकतो. बापाच्या सोडून जाण्याने संसार उघडा पडला. पण अर्ध्यात पडलेला संसार पुढे नेण्याचा प्रयत्न करते लोकांची मजुरी करून. दोन मुले बरोबरीने शिकणारे. त्यांचा बाप होता तर हिंमत होती. आता आयुष्य एकाकी झाले. दोन महिने झालीत मुले शिक्षण सोडून गावी आहेत. घरी बैलजोडी आहे. तिला चारायला एक स्वतंत्र माणूस लागतो. विकतो म्हटले तर आज पैसे घडत नाहीत, म्हणून अजय शिक्षण सोडून बैल व शेती पाहतो. अजय सांगतो, मी अमरावतीला जाणार होतो; पण आता एकाची घरी गरज आहे. माझे स्वप्नही एमपीएससी करून आयपीएस होण्याचे आहे; पण दोन भावांचा खर्च आईला झेपणारा नाही. आईची हिंमत खचू नये म्हणून मी या वर्षी अमरावतीला न जाण्याचा निर्णय घेतला. वैभवही अमरावतीत काम करून शिकतो. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो स्वीटमार्टमध्ये काम करतो. त्याला जाणीव आहे आपल्या मागे कोणी नाही. त्यासाठी आपल्या गरजा आपणच भागवायच्या हा त्याचा प्रयत्न. स्वीटमार्टमध्ये आठ तास कामाच्या बदल्यात त्याला पाच हजार रुपये मिळतात. एकीकडे श्रीमंतीचे बेट आहे आणि दुसरीकडे गरिबीची खाई. वैभव मोठ्या तडजोडीत शिक्षण मिळवत आहे. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो. तो सांगतो, वडील असताना काळजी नव्हती; पण आता घरात मोठा असल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो. स्वप्न तर माझेही मोठे आहे; पण त्या स्वप्नाला आकार देणारा व पाठीशी असणारा बाप हरविल्याने परिस्थितीशी लढण्यास आम्ही एकटे पडलो आहे. संकटातून तर तरून जाईन, पण बापाची उणीव कधीच भरून काढता येणार नाही असे त्याला वाटते. अशा कहाण्या आपल्या आसपास खूप असतील; पण कुटुंबावर त्याचे होणारे परिणाम हे दीर्घकालीन असून परिस्थितीशी संघर्षही त्यांनाच करावा लागतो, जे संकटाचे शिकार झाले. अलीकडे जंगली जनावरांना संरक्षण देणारा प्रभावी कायदा आहे; पण शेतकऱ्याला सुरक्षा देणारा कायदा नाही. शेती धोक्‍यात आली. पिकाला भाव नाही. रोजगार संपत चालले. व्यापार भांडवली खेळ झाला. शिक्षण महाग झाले. सरकारचा महसुली लगान वाढत आहे आणि शेतकऱ्याचे आयुष्य घटत आहे. पाखरांच्या दुनियात तरी आनंद दिसतो. किमान ते वर्तमान तर जगतात. आमचा भविष्यासाठी वर्तमानच हरवला आहे. माणसे मरोत पण रोबोट पाहिजे... विज्ञानाने जग जवळ येत चालले आणि दूर होत चालली माणसे आणि माणसाची माणुसकी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT