dr kisan maharaj sakhare
dr kisan maharaj sakhare 
सप्तरंग

अथांग, अनंत! (डॉ. श्री किसन महाराज साखरे)

डॉ. श्री किसन महाराज साखरे

आषाढ महिना लागला, की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोहळ्यामध्ये किती तरी वारकरी अतिशय समरसून सहभागी होतात. विठुमाउलीच्या भेटीची ओढ लागते, पावलं पडत जातात आणि मनात आनंदसरींचा वर्षाव होत राहतो. उत्साह कमी होत नाही, की त्यातलं भारलेपण कमी होत नाही. उद्या (२४) आणि परवा (२५) संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवत आहे. त्यानिमित्त या आनंदवारीची उलगडलेली वैशिष्ट्यं.

वारी हा एक आचारधर्म आहे. हा आचारधर्म आत्यंतिक महत्त्वाचा आहे. या आचारधर्माचं इतकं महत्त्व आहे, की या आचारधर्माचं परिपालन करणाऱ्यांना वारकरी हे नामाभिधान प्राप्त झालं. या आचारधर्माचं अनुष्ठान करताना काही पथ्यं सांगितली आहेत. त्यापैकी श्री विठ्ठलेशाविषयीची अव्यभिचरित-एकनिष्ठ प्रीती हे एक पथ्य आहे. भक्तीच्या क्षेत्रात अव्यभिचरितता ही अतीव महत्त्वाची आहे. या अव्यभिचरिततेसंदर्भात ज्ञानराज माऊली म्हणतात ः
तरी करोनि रससोय बरवी । कानी केवि भरावी ।
फुले आणोनि बांधावी । डोळा केवी ।
तेथ रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो घ्राणेचि घ्यावा ।
तैसा मी तो यजावा। मीचि म्हणोनि ज्ञानेश्वरी

याचा भावार्थ असा, की कान आणि रसना ही ज्ञानेंद्रियं असली, तरी चव ही जिभेनंच कळते. सुंदर पक्वान्न करून ते कानात ओतलं तर त्याचा काही उपयोग नाही, त्याप्रमाणं अनेक देव जरी असले, तरी माझी माझ्याच स्वरूपानं भक्ती करावी. याविषयी अशी शंका येणं साहजिक आहे, की अशा अंगिकारामुळं अनंगिकृत देवतांचा अपमान, अवज्ञा होईल का? त्यासाठी एक दृष्टांत देतो. एक सभागृह आहे. त्या सभागृहात सुंदरातिसुंदर स्त्रिया आसनस्थ झाल्या आहेत. एक आकर्षक मूल सभागृहात येतं. सर्व स्त्रियांना त्या बालकास घेण्याचा मोह होतो. त्या सगळ्या जणी त्या बालकास बोलवतात; पण ते बालक त्या सर्वाना सोडून सभागृहाच्या एका कोपऱ्यात बसलेल्या कुब्जा, कुरूप आईकडं जातं. या ठायी सुंदर स्त्रियांचा बालकाकडून झालेला अनंगिकार हा अवज्ञा अलंकार आहे, त्याचप्रमाणं श्री विठ्ठलेशाच्या अतीव ओढीनं विठ्ठलेशाकडं जाताना वाटेत आलेल्या इतर देवतांचा अनंगिकार हा भक्तीच्या क्षेत्रातला अवज्ञा अलंकार आहे.

या आचारधर्माचं परिपालन करताना तीन प्रकारचं तप घडतं. पायी चालत असल्यामुळं कायिक तप घडतं. वारीत वाटचाल करताना संसारिक गप्पा न मरता भगवंताचं भजन करावं असा दंडक असल्यानं वाचिक तप घडतं आणि मनामध्ये विठ्ठलेशाशिवाय कोणताही विषय नसल्यामुळं मानसिक तपही सहजच घडत असतं. अशा प्रकारे तीनही प्रकारचं तप घडत असल्यानं या आचारधर्मास भागवत संप्रदायात अतीव महत्त्व आहे.
वारी कशासाठी केली जाते, असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो. या प्रश्‍नाचं उत्तर ज्ञानेश्‍वर माऊली देतात ः
माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।
मी पंढरीस खांद्यावर पताका घेऊन का निघालो आहे, त्याचं कारण मला हा आचारधर्म म्हणजे वारी जीवापासून म्हणजे अगदी मनापासून आवडते. एखाद्यास एखादी गोष्ट का आवडते याची काही विशिष्ट कारणं बऱ्याचदा सांगता येत नाहीत- किंबहुना आवड ही निर्निमित्त असते. त्याप्रमाणं वारी ही आवडीनं म्हणजे कोणत्याही निमित्तावाचून निर्निमित्त करावी. एखादं उद्दिष्ट, एखादी फलाकांक्षा मनात ठेवून वारी करू नये. वारी करताना अंतःकरण हे निष्काम असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि माऊलींच्या सांगाव्याप्रमाणं आपण जर निष्काम अंतःकरणानं वारी केली, तर त्याचा मानसिक परिणाम काय होतो त्याविषयी ज्ञानराज माऊली सांगतात ः
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले ।
मन हे पांडुरंगाच्या भक्तिरंगात रंगून गेलं आणि मन हे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या भगवंताच्या षड्‌गुणांकडं आकृष्ट झालं. या भक्तिरंगात रंगून गुणाकृष्टतासहित श्री विठ्ठलेशास्वरूपदर्शनानं अजून काय झालं याविषयी ज्ञानराज माऊली म्हणतात ः
जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे।
पाहतां रूप आनंदी आनंद साठवे ।

मी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडं गेलो, अवस्थातीत झालो आणि भगवंताच्या स्वरूपदर्शनानं मला झालेला अनंद हा शब्दातीत आहे. ज्या श्रीविठ्ठलेशाच्या दर्शनानं शब्दातीत आनंद प्राप्त झाला, तो श्रीविठ्ठल नेमका कसा आहे त्याविषयी ज्ञानराज माऊली सांगतात ः
बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण। रूप विटेवरी दाविली खूण ×
वारकरी संप्रदाय हा ऐकांतिक सगुणवादी अथवा ऐकांतिक निर्गुणवादी नसून उभयस्वरूपाचा समन्वय सांगणारा आहे. ज्ञानराज माउली सांगतात ः वारीच्या माध्यमातून ज्या विठ्ठलाचं मला दर्शन झालं, तो विठ्ठल सगुण-निर्गुण उभय स्वरूपात्मक आहे. त्याचे दिसणारं रूप सगुण साकार आहे आणि ज्या विटेवर तो उभा आहे ती वीट निर्गुण स्वरूपाची खूण म्हणजे उपलक्षण आहे. आत्तापावेतो आपण वारीच्या एकनिष्ष्ठता, निर्मित्तता, निष्कामता, प्रेमोत्कटता या अंतरंग पथ्यांचं, नियमांचं चिंतन केलं. आता वारीच्या बहिरंग नियमांचं चिंतन करू. वारीमध्ये खरे नियमनिष्ठ वारकरी हे नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. माऊली सकाळी निघतात, त्याच्या आधी वारकरी आपलं अन्हिक आवरून, सात्त्विक वारकरी पोशाखात आपल्या दिंडीत टाळ अथवा पताका घेऊन आपल्या नेमून दिलेल्या जागेवर उभा असतो. माऊलीबरोबर चालताना तो संसारीक बिनकामाच्या गप्पा मारत नाही. तो फक्त भगवंताच्या नामाचं उच्चारण, चिंतन, अभंगगायन करत वाटचाल करतो. खरे वारकरी पालखीच्या पुढं अथवा मागं शक्‍यतो चालत नाहीत. ते आपल्या दिंडीत आपल्या नेमून दिलेल्या जागेवरच शिस्तीत चालतात. वारीच्या वाटेत अनेक भाविक सद्भावनेनं अनेक पदार्थांचं दान करतात; पण खरा वारकरी भजनात तल्लीन असल्यानं त्या वाटपाकडं त्याचं लक्षही जात नाही आणि त्याचा तो अंगिकारही करत नाही. हौशे, नवशे, गवशे मात्र वस्तूंच्या संग्रहातच दंग असतात. विसाव्याला माऊलींची पालखी विसावल्याशिवाय वारकरी खाली बसत नाहीत आणि पुन्हा माऊली निघण्याच्या आधी तो वाटचालीसाठी तयार असतो. तसंच एवढी वाटचाल झाली, तरी माऊलींच्या तळावरच्या रात्रीच्या हरिकीर्तनासही तो टाळ घेऊन नियमानं हजर असतो.
हल्ली या समाजमाध्यमांच्या युगामध्ये अनेक युवा, उच्चशिक्षित लोकही वारीत सहभागी होताना दिसतात. काही लोक या वारीकडं एक सामाजिक महोत्सव म्हणूनही बघतात. वारीला समाजमाध्यमांच्या द्वारे समाजापर्यंत पोचवण्याचा काही लोक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

वास्तविक वारी हे आंतरिक सात्त्विक, रम्य समाधान प्राप्त करून देणारं तपत्रयात्मक साधन आहे; पण हे आंतरिक रम्य समाधान वारी करताना आपण जर अंतरंग आणि बहिरंग पथ्यांचं, नियमांचं पालन केलं तर निश्‍चित मिळतं, असा संतांचा आणि आचारनिष्ठ वारकरी सांप्रदायिकांचा अनुभव आहे. हे रम्य, सात्त्विक समाधान सर्वांना प्राप्त व्हावं अशी प्रार्थन करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT