popatrao pawar 
सप्तरंग

संस्कार माती अन्‌ पाण्याचे (पोपटराव पवार)

पोपटराव पवार

हिवरेबाजार एकेकाळी कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. परिसरातलेच नव्हे, तर देशपातळीवरचे अनेक नामवंत कुस्तीपटूंची पायधूळ आमच्या घराला लागली. इतर क्षेत्रातलेही अनेक जण यायचे. तीच प्रेरणा ग्रामविकासाची कामं करताना माझ्या मनात सतत होती. आताही राजकीय नेत्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक जण गावात येऊन पाहणी करून जातात. मातीचे आणि पाण्याच्या संस्कारांचा धागा अशा प्रकारे कायम राहिला आहे. अशाच संस्कारकथा गावोगावी प्रत्येकानं जिवंत केल्या पाहिजेत.

पंधरवड्यापूर्वी लिहिलेल्या लेखात आजोबांच्या बागेतली प्रेरणा लिहिताना त्या बागेतल्या विहिरीचं पाणी आणि तिची माती यांचे संस्कार किती दूरवर पोचले होते, याविषयी अनेक गोष्टी, प्रसंग आणि माणसं डोळ्यांपुढं येऊन गेली. हिवरेबाजार हे त्या काळी "कुस्तीच्या क्षेत्रातलं प्रतिकोल्हापूर' म्हणून ओळखलं जायचं. प्रत्येक घर गायी-म्हशींच्या दुधानं भरलेलं असायचं. त्यामुळं प्रत्येक घरात पैलवान असायचे. त्यामुळंच नगर जिल्ह्यातल्याच नव्हे, तर देशभरातल्या मल्लांच्या आकर्षणाचं केंद्र हिवरेबाजारच्या कुस्तीचा आखाडा (दंगल) हे असायचं.

हिवरेबाजार आणि नगर परिसरात कुठलाही मल्ल आला, तरी त्यांच्या विश्रांतीचं ठिकाण आमच्या बागेचा मळा हे असायचा. आजोबांचा घोड्यावरून शंभर किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास व्हायचा. वडील आणि चुलत्यांना घेऊन ते अनेक कुस्तीच्या आखाड्यांवर जायचे. त्यामुळं बाहेरच्या नामवंत मल्लांना गावातल्या कुस्ती आखाड्याचं निमंत्रण ते द्यायचे. हे मल्ल आले, की मुक्काम आमच्याच घरी असायचा. गावामध्ये बाबासाहेब पवार, बागुजी पवार, रावसाहेब पवार, बाळाजी पवार, नामदेव पांडू ठाणगे, बापूराव पादीर, ज्ञानदेव ठाणगे, तुळशीराम बुवा ठाणगे, मंज्याबापू चत्तर, विश्वनाथ पादीर असे एकापेक्षा एक धिप्पाड शरीरयष्टीचे पैलवाल इसवीसन 1975 पर्यंत गावचं वैभव टिकवून होते. त्यांच्या ख्यातीमुळंच जिल्ह्यातले एकनाथ पैलवान, किसनसिंह परदेशी, सहादू गुंजाळ, छबुराव लांडगे यांच्यासारखी काही मोठी व्यक्तिमत्त्वं नियमितपणे इथं येऊन जायची. महाराष्ट्रातून हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी दीनानाथसिंह, महाराष्ट्रकेसरी रघुनाथ पवार, अशोक शिर्के, गुलाब बर्डे आणि देशातून नवी दिल्लीचे, गुरू-हनुमान व्यायामशाळेचे महान भारतकेसरी मास्टर चंदगीराम, हिंदकेसरी बंतासिंग पंजाबी, हिंदकेसरी तुफान पंजाबी आणि इतर असंख्य कुस्तीगीर आमच्या मोसंबीच्या बागेत विश्राम करून, मोटेच्या पाण्याखाली अंघोळ करून विहिरीचं पाणी पिऊन या मातीला कुस्तीचे संस्कार देऊन गेले. त्या काळच्या समृद्ध कुस्तीच्या वैभवाच्या गोष्टी आजही गावातल्या घराघरांमध्ये अभिमानानं सांगितल्या जातात.

स्वातंत्र चळवळीतही योगदान
कुस्तीसोबतच पुढं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात पत्रीसरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांची पावलंसुद्धा या बागेला लागली. चळवळींमध्ये आमचे वडील बागुजी पवार, चुलते भाऊसाहेब पवार हे पोवाडे गायचे. विठोबा ठाणगे गुरुजी, धोंडिभाऊ ठाणगे मेजर, वनाजी ठाणगे गुरुजी ही शिकलेली मंडळी त्यांना पोवाडे लिहायला मदत करायची. गावातले स्वातंत्र्यसैनिक धोंडिबा दळवी यांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या आणि याच बागेत भूमिगत झाले. अनेक चळवळींचं नियोजन आणि पोवाड्यांची रंगीत तालीम आमच्या बागेतच व्हायची. आलेल्या पाहुण्यांचं जेवण बनवण्यातच आमची आई, चुलत्या आणि पाच-सहा सालगडी यांचा दिवस जायचा.

कम्युनिस्ट चळवळीचंही नातं
कम्युनिस्ट चळवळीचंसुद्धा इथल्या मातीशी घनिष्ट नातं होतं. आमदार पी. बी. कडू पाटील, बाळासाहेब भारदे, कॉम्रेड माधवराव गायकवाड, बापूसाहेब भापकर, कॉम्रेड बाजीराव पाटील जगताप यांच्यासारखी स्वातंत्र्य चळवळीतली माणसं या बागेत आश्रयाला येऊन गेली. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक निवडणुकांच्या प्रचारासाठी हे लोक परिसरात यायचे, तेव्हा ही बाग हे म्हणजे हक्काचं घरच असायची.
त्या काळचे माती आणि पाण्याचे हे संस्कार दीर्घकाळ गावावर प्रभाव पाडत राहिले. त्यानंतर 1972 चा दुष्काळ, 1977-78 आणि 1980-81 या सलगच्या दुष्काळांमुळं हे वैभव लयास गेले. मात्र, असं म्हटलं जातं, की माती आणि पाण्याचे संस्कार हे कधी ना कधी प्रेरणा देऊन जातात. असंच माझ्या बाबतीतही घडलं. घरामध्ये लहानपणापासून आई, चुलते, भाऊ, नातेवाईक यांच्याकडून या समृद्धीच्या गोष्टी नेहमी मनावर बिंबत गेल्या. 1990 मध्ये सरपंच झाल्यावर ही सुप्तावस्थेतले प्रेरणा पुनःपुन्हा खुणावत राहिली. त्याच बागेच्या मळ्यात राहतो. तिथूनच ग्रामविकासाची प्रेरणा मिळाली. हिवरेबाजारच्या या देशव्यापी कामांमुळं आता फक्त देशच नाही, तर जगभरातली प्रत्येक क्षेत्रातली मोठमोठी माणसं याच मातीची प्रेरणा घेऊन जातात. ज्येष्ठ नेते शरद पवार, आर. आर पाटील यांच्यासारखे राजकारणातले अनेक दिग्गज नेते, संघातले माणिकराव पाटील, चित्रपट अभिनेते आमिर खान, मकरंद अनासपुरे; तसंच डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भाटकर, डॉ. अंजली तेंडुलकर; साहित्यिक रा. रं. बोराडे, ना. धों. महानोर, डॉ. सदानंद मोरे; डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि जगभरातल्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी, शास्त्रज्ञ आणि 112 देशांतले लोक इथं येऊन गेले. हे सगळं पाहिलं, की जुने दिवस पत आल्यासारखे वाटतात. बालपणीच्या गोष्टी ग्रामविकासाच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होताना दिसत आहेत. म्हणून प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये असलेल्या माती आणि पाण्याच्या संस्कारकथा पुन्हा जिवंत केल्या पाहिजेत. गावाच्या पारावर, मंदिर-मशीद, चर्च, बुद्धधाम, यांच्यापासून ते पानाच्या टपरीपर्यंत या प्रेरणादायी कथा चर्चिल्या गेल्या, तर सुप्तावस्थेत असलेला हा प्रेरणास्रोत अनेक गावांत नवीन नेतृत्व निर्माण करून ग्रामपरिवर्तनाची मोठी चळवळ उभी करू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Explained: NDA अंतर्गत मोठा राडा! मोदींच्या खुर्चीला देखील हादरे, बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?

Nashik Police : दिवाळीत घरफोडी करणाऱ्यांची खैर नाही! नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांकडून दिवस-रात्र गस्ती पथकांत मोठी वाढ

Viral Video : क्या हाल है भाई! Rohit Sharma ने नवा कर्णधार शुभमनला पाहताच विचारला प्रश्न, विराट कोहलीला केला मुजरा; मन जिंकणारा क्षण

Latest Marathi News Live Update : मुंबई एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे सेनेत राडा

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक महापालिकेची मोठी मागणी: ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करणार

SCROLL FOR NEXT