Laos
Laos Sakal
सप्तरंग

आशावादी, देखणा लाओस!

प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

आयुष्य घडत असताना असंख्य लोकांचा सहवास आपल्याला लाभतो. चांगले-वाईट अनुभव येतात. आपण शिकत असतो. कधी सुखी दिवस तर कधी अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेतून कोणीच वाचू शकत नाही. आपल्यासमोर तडजोडी करत आयुष्य चांगलं जगणं हेच तर खरं मोठं आव्हान असतं. कितीही संकटं आली तरीही जगत राहायचं. जरी खचलो तरी पुन्हा उभारी घ्यायची आणि हीच उभारी घेण्यासाठी आपल्या मनी नेहमी ‘आशा’ असावी लागते. आपण आशावादी असलो तर जगणं थोडंसं सोपं होतं. ‘Nothing is stronger than a small hope that doesn’t give up,’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो तर मनात छोटीशी आशा असेल, तर आपण कधीच हार मानत नाही. आशा बाळगणं आपल्याला खरंच उभारी देऊ शकतं, संकटांचा सामना करायला शिकवू शकतं आणि त्यातूनच आपलं आयुष्य घडत जातं.

मित्रांनो मी नेहमी आयुष्याला जोडणारं काही ना काही सांगत असतो. त्याचं कारणच हे आहे की आपण प्रवास करताना नव-नवीन गोष्टी अवगत केल्या पाहिजे. आज मी तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहे जो देश कायम आशावादी राहिला आहे. जगातील सर्वाधिक बॉम्बस्फोट झालेल्या राष्ट्रांपैकी एका देशाचा उल्लेख होतो तो म्हणजे लाओस (Laos). अमेरिका - व्हिएतनाम युद्धाच्यादरम्यान १९६४ पासून पन्नास हजारहून अधिक ‘लाओ’ लोक युद्धातील बॉम्बमुळे मारले गेले किंवा जखमी झाली. तेव्हा ३० टक्के बॉम्ब स्फोट होण्यात अयशस्वी ठरले.

व्हिएतनाम युद्धाच्या शेवटी अंदाजे ८० दशलक्ष न फुटलेले बॉम्ब अजूनही तेथील जमिनीत आहेत आणि ‘लाओ’ लोकांसाठी किंवा तिथे भेटी देणाऱ्या इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहेत.

२०१६ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा लाओसला जाणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. न फुटलेले बॉम्ब नष्ट करण्यासाठी पूर्वी खर्च केलेल्या १०० दशलक्ष डॉलर्सच्यावर बराक ओबामा यांनी अतिरिक्त ९० दशलक्ष डॉलर्सच्या मदतीचे वचन दिले. मातीमधून न फुटलेले बॉम्ब साफ करण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. खरंच लाओस देशातील अनिश्चिततेबद्दल चिंता वाटते. तरीही लाओ लोक जगण्याची आशा सोडत नाहीत आणि म्हणूनच त्यांचे फार कौतुक वाटते.

लवकरच एक दिवस असा येईल की लाओसमधील अनिश्चितता संपेल. हा देश आग्नेय आशियात आहे. मला उर्वरित जगापेक्षा कधीही आग्नेय आशियाच अधिक आवडतं. कारण तेथील साधी माणसं आणि प्राचीन संस्कृती. लाओसची लोकसंख्या सत्तर लाखाच्या आसपास आहे. तिथे ‘लाओ’ भाषा बोलली जाते. व्हिएंटियन ही लाओसची राजधानी. शेजारच्या व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रमाणे, लाओसने अमेरिका - व्हिएतनाम युद्धानंतर कात टाकली आणि या आकर्षक बौद्ध बॅकवॉटरला प्रवाशांच्या भाषेत बॅकपॅकर गटात पूर्णपणे पुनर्वसित करण्यासाठी एक पिढी लागली. देश उभारण्यासाठी काळ लागतोच परंतु जखमातून पुन्हा उभं राहण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात किंबहुना एका पिढीला येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी गाढून घ्यावे लागते.

आज, लाओस हा एक असा देश आहे जिथे आग्नेय आशियात येणारा प्रत्येकजण प्रेमात पडतो. तेथील सुव्यवस्थित, निवांत जीवनशैली आणि समृद्ध संस्कृती प्रवाशांना फार भावते. आणि हो, मुख्यतः तेथील प्रेमळ लोकांची कोणावरही भुरळ पडते. भारतापासून तर हा देश फार जवळ आहे. एवढंच नाही तर रस्त्याने बाईक किंवा कारने तिथे जाता येतं. काही वर्षांपूर्वी काही नियम व अटी पाळून सहज शक्य व्हायचे. परंतु गेल्या काही वर्षात म्यानमारमधील अशांत वातावरणामुळे थोडं अवघड झालंय पण विमानाने जाता येतं. उन्हाळ्याचा मोसम टाळण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महिने लाओसला जाण्यास योग्य मानले जातात.

लाओसला ‘The quiet heart of Southeast Asia’ असं संबोधलं जातं. पूर्व इतिहास, सांस्कृतिक विविधता आणि आकर्षक निसर्ग या साऱ्यामध्ये कुठलाही प्रवासी तिथे रमून जातो. खरं तर प्रवाशाने ज्या त्या क्षणात जगण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हजारो वर्षांहून अधिक काळापासून अनेक प्रकारच्या बांधकाम शैलींनी लाओसमध्ये आपला वारसा सोडला आहे. प्राचीन धार्मिक स्थळांपासून ते फ्रेंच वसाहती क्षेत्र आणि आधुनिक निर्मात्यांपर्यंत, सर्व चिन्हे तिथे दिसतात. राजधानीमधील फा थाट लाउंग (Pha That Laung) हा सोन्याचा स्तूप मुख्य आकर्षण आहे. भव्य स्तूप तिसऱ्या शतकातली असून प्रमुख राष्ट्रीय स्मारकांपैकी एक आहे. तिथेच जवळ १९५७ मध्ये बांधलेले Victory Gate किंवा Patouxay म्हणून ओळखलं जाणारं स्मारक आहे. हे गेट महत्वाच्या चौकात असल्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतं. त्या स्मारकावरील कलाकृती पाहण्यासारखी आहे. राजधानीतच १९५८ रोजी भव्य ‘बुद्ध पार्क’ उभारण्यात आलं. तिथे दोनशेहून अधिक धार्मिक पुतळे आहेत. तसेच निद्राधीन अवस्थेतील बुद्धांची मूर्ती आहे. त्याचबरोबर साहसी प्रवाशांसाठी माउंट फो सी (Mount Phou Si) येथे छोटे ट्रेक्स करता येतात. तिथेच अनेक धार्मिक स्थळ व नद्या आहेत. निवांत क्षण घालवण्यासाठी ही मस्त जागा आहे. थाम काओ राव (Tham Kao Rao) हा चुनखडीचा पर्वत असून ही लेणी आकर्षक आहे. एलिफंट केव्ह म्हणून ही एक लेणी प्रसिद्ध आहे. देशभरात असंख्य लेण्या आणि पुतळे आहेत. प्रत्येक ठिकाणाशी इतिहास जोडलेला आहे.

काही आदिवासी गावं आहेत तर काही ठिकाणी घनदाट जंगल आहे. नद्यांमध्ये निवांत बोटीत बसून एखादा सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याची मजाच काही और आहे. Lao-Lao नावाची भाताची वाईन आणि Beer Lao खूप प्रसिद्ध आहे. तिखट असलेला ‘Laap’ हा मांसाहारी पदार्थ लोक नियमित खातात. म्हाताऱ्यांचे सुरकुतलेले हसरे चेहरे आजूबाजूला सतत दिसतात. बौध्द भिक्षुक ध्यानात मग्न असलेले दिसतात. लाओसची हस्तकला व काही पारंपारिक कला देखण्या आहेत. उत्तरेकडील डोंगररांगांपासून दक्षिणेकडील नदी बेटांपर्यंत, लाओस ही अविश्वसनीय आश्चर्य आणि दुर्मिळ सौंदर्याची भूमी आहे. इतिहास, परंपरा, वैविध्यपूर्ण लँडस्केप आणि संस्कृतींनी समृद्ध असा हा लाओस आपल्यातील आंतरिक शोधकर्त्याला नक्कीच मोहित करेल.

आशावादी असणाऱ्याने लाओसला भेट दिलीच पाहिजे. इथे निश्चितच बजेट ट्रीप होवू शकते. आशा जागृत असेल तर काय होवू शकते हे या देशात बघायला मिळते. अजून या देशाची विकासाच्या दिशेने वाटचाल चालूच आहे. तर मित्रांनो, आशावादी होण्यासाठी तुम्हाला आनंदी राहण्याची गरज नाही. त्याऐवजी आपल्याला भविष्यातली अज्ञात बाजू स्वीकाराण्याची आवश्यकता आहे आणि त्या भविष्यातल्या अशा काही बाबी आहेत ज्या वर्तमानापेक्षा चांगल्या असू शकतात. हार न मानणारा प्रवासी हा आशावादी असतो. नक्कीच येणाऱ्या काळात या ‘Simply Beautiful’ असलेल्या लाओसला नक्की भेट द्या, बजेट ट्रीप करा आणि निवांत जिंदगी वसूल करा...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर असून ‘डू इट यूवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT