सप्तरंग

शिंदे-होळकरांचे विद्यार्थी!

प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

पुण्यातली एक प्रसन्न सकाळ.

स्थळ : हॉटेल श्रेयस. वेळ : सकाळचे सात-सव्वासात.

‘श्रेयस’चं एक विशाल दालन पत्रकारांनी खच्चून भरलेलं असतं. ‘ब्रेकफास्ट’ समोर आलेला असतो आणि अटलबिहारी वाजपेयी आपल्या संथ शैलीत पत्रकारांशी संवाद साधत असतात. दालन गच्च भरून गेलेलं असतानाही शांतता, टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी. वाजपेयींनी तो सुप्रसिद्ध ‘पॉज’ घेतला की मग तर ती शांतता अंगावरच येणारी. वाजपेयी आटोपतं घेतात आणि गाड्या लोहगाव विमानतळाच्या दिशेनं धावू लागतात, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाजपेयी एक दिवसासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले असतात. आदल्याच रात्री अलका टॉकिजच्या चौकात झालेल्या सभेला झालेल्या मोठ्या गर्दीचा आनंद त्या वार्ताहर बैठकीतही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो.

लोहगाव विमानतळावर गाड्यांचा ताफा पोचतो. मागच्या एका गाडीत सोबत कोलकात्याच्या ‘टेलिग्राफ’ची प्रतिनिधी उल्का भडकमकर असते. विमान अगदीच छोटेखानी असतं. अवघ्या सात वा नऊ सीट्‍स असतात. मध्ये एक माणूस जेमतेम जाईल एवढंच अंतर. पलीकडच्या सीटवर साक्षात वाजपेयी. त्यांचा ‘ऑरा’ इतका विलक्षण असतो, ते इतक्या शेजारी असतानाही त्यांना काही विचारावं, याचंही भान राहत नाही. विमान धुळ्याच्या दिशेनं झेप घेतं आणि वाजपेयी पुण्यातली मराठी वर्तमानपत्रं बाहेर काढतात. पहिल्याच पानावर साहजिकच त्यांच्या आदल्या रात्रीच्या सभेचा, गर्दीचा वृत्तांत फोटोसह छापून आलेला असतो. वाजपेयी अगदी बारकाईनं सगळे मराठी पेपर तपशिलात वाचत असतात. अगदी शेवटी पान अमुक पहा, असं आलं की त्या पानावरही जाऊन!

त्यांच्याकडे नुसतं बघत असताना, मग समोर (म्हणजे खरोखरच समोर. त्या विमानातील सीट्‍स आमने-सामने होत्या!) बसलेले अण्णा जोशीच बोलायला सुरुवात करतात. धुळे केव्हा येतं ते समजतही नाही. तिथली सभा संपते आणि विमान औरंगाबादच्या दिशेनं झेप घेतं. तिथं वाजपेयींसमवेत जेवणही होतं. पण त्यांच्याशी बोलणं असं काहीच झालेलं नसतं. मात्र, भारतीय जनता पक्षाचं नियोजन अगदीच चोख असतं. पुढची सभा औरंगाबादपासून ५०-६० किलोमीटरवर असते. तिथं जाताना वाजपेयींच्या गाडीत मी आणि येताना उल्का. दोघांनाही वाजपेयींशी स्वतंत्र बोलता यावं, असं मुंबईतच बसलेल्या अतुल भातखळकर यांनी ठरवलेलं असतं. गाडी सभेच्या दिशेनं निघते आणि काही तरी सुरुवात करायची म्हणून ओठावर प्रश्न येतो : तुम्ही सगळी मराठी वर्तमानपत्रं अगदी बारकाईनं वाचत होतात... अगदी नेमक्या पुढच्या पानावरही जात होतात...

आज या घटनेला दोन दशकांहून अधिक काळ उलटला आहे. तरीही त्यांनी वाक्य पूर्ण होण्याआधीच दिलेलं उत्तर आजही लक्षात आहे. माझ्या मोडक्या-तोडक्या हिंदीतल्या प्रश्नावर ते क्षणार्धात शुद्ध मराठीत उद्‍गारले : अहो, तुम्हीच ते शिंदे-होळकर तिकडे पाठवले नव्हते का आम्हाला मराठी शिकवायला ! - आणि ते दिलखुलास हसले.

पुढे हेच शिंदे कुटुंबीय म्हणजेच माधवराव असोत की ज्योतिरादित्य की वसुंधरा राजे; यांना कोणालाही मराठीत चार धड वाक्यं बोलायला किती कठीण जातं, तेही अनुभवता आलं. मात्र, शिंदे-होळकरांचा हा विद्यार्थी भलताच हुशार दिसत होता आणि तो मराठी चांगलंच बोलत होता. पुढच्या जवळपास तासाभरातही ते अधूनमधून मराठी बोलतच होते. वाजपेयींचं हे मराठी प्रेम सर्वश्रुत आहे. मुंबईत आल्यावर बहुधा त्यांचा मुक्काम हा माटुंग्याच्या गोयल कुटुंबात असायचा. तिथून शिवाजी मंदिर तसंच प्लाझा ही मराठी नाटक-सिनेमाची पंढरी अगदीच जवळ आणि एकमेकांपासूनही हाकेच्या अंतरावर. त्यामुळे आपल्या मुंबईतील मुक्कामात या पंढरीची वारी त्यांनी केली नाही, असं अगदी अपवादानंच घडायचं. पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेण्याआधी त्यांना फुरसतही बरीच असायची. त्या काळात ते अनेक नाटकं बघायचे. ‘सख्खे शेजारी’ हे नाटक त्यांना खूपच आवडायचं आणि भाजप नेते मधू चव्हाण यांची निर्मिती असलेला ‘हमाल दे धमाल!’ या मराठी चित्रपटातही ते अगदीच रंगून गेले होते...

अशा या अटलबिहारींची भाषणे ऐकणं हा खरोखरच एक आनंदायी अनुभव असायचा.... डावा हात वर करून ते सुरुवात करायचे : ‘पूर्वांचल जल रहा है...(आता उजवा हात वर) उधर काश्मीर मे आग बरस रही है (आणि तोच हात मग खाली करून) और निचे दख्खन मे...’ असं म्हणून ते आपला तो सुप्रसिद्ध ‘पॉज’ घ्यायचे. तेव्हा सारा जनसमुदाय चित्रासारखा स्तब्ध तर होऊन जायचाच; शिवाय त्याच्या डोळ्यापुढे भारताचा नकाशाच उभा राहायचा आणि कुठं काय चाललंय याची जाणीवही त्याला होऊन जायची... आणि मग ते आपला आवाज आणखीनच टिपेला नेत काँग्रेस सरकारवर तोफा डागायला सुरुवात करायचे. वक्तृत्वाच्या या अमोघ देणगीमुळेच गर्दी जमवणारा भाजपमधला (मोदीपर्व सुरू होण्याअगोदरचा) एकमेव नेता, अशी त्यांची कीर्ती होती. अर्थात, पुढे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चक्क तीनवेळा त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली आणि त्यांची अशी जाहीर भाषणं दुर्मीळ होत गेली. तरीही पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून त्यांनी केलेली भाषणं ही स्मरणात राहणारी अशीच होती.

वाजपेयींचं एकूणच व्यक्तिमत्त्व हे बहुरंगी आणि मुख्य म्हणजे रसरशीत असं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ यांच्या मुशीत राजकारणाचे धडे घेतले असले तरी ते चाकोरीबद्ध आणि तर्ककर्कश कधीच नव्हते. राजकारणाच्या धबडग्यात उभं आयुष्य गेलं, तरी त्यांची मूळ प्रकृती ही ‘काव्य शास्त्र विनोदेन, कालौ गच्छति धीमताम्’ अशीच होती. त्यामुळेच ते लखनऊतील मुशायऱ्यांत जितक्या समरसतेने सामील होत, तितक्याच आत्मीयतेनं ते सावरकरांवर भाषणही करू शकत. त्यामुळेच तर १९९५ मध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात पक्षाची सारी सूत्रं हाती असतानाही लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचंच नाव पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार म्हणून अचानक जाहीर करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. शिंदे-होळकरांच्या विद्यार्थ्याला मिळालेलं हे सर्वात मोठं प्रमाणपत्र होतं..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT