Ghodbunder Fort
Ghodbunder Fort sakal
सप्तरंग

घोडबंदर किल्ला

प्रशांत ननावरे

मुंबईवरून ठाण्याला आणि ठाण्यावरून मुंबईला येण्या-जाण्यासाठी घोडबंदरमार्गे जाणे सर्वांत सोयीचे आहे. मिरा रोड-भाईंदर सोडलं की उजव्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल आणि डाव्या बाजूला खाडी परिसर सुरू...

मुंबईवरून ठाण्याला आणि ठाण्यावरून मुंबईला येण्या-जाण्यासाठी घोडबंदरमार्गे जाणे सर्वांत सोयीचे आहे. मिरा रोड-भाईंदर सोडलं की उजव्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल आणि डाव्या बाजूला खाडी परिसर सुरू होतो. पुढे घोडबंदर रोडच्या दिशेने जाताना उल्हास खाडीचा विस्तार वाढत जाऊन खाडीचे मोठे पात्र एका बाजूला दिसायला लागते. एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला खाडी परिसर पाहता आपण मुंबई परिसरात नसून कोकणातील एका प्रदेशातून जात आहोत की काय असा भास काही काळ होतो. डावीकडे असलेल्या खाडी परिसराला अलीकडेच चौपाटीचे स्वरूप देण्यात आले आहे. या खाडीतून रेती उपसा करणाऱ्या मोठाल्या बोटींची ये-जा सुरू असते. याच रस्त्याने अर्धा किलोमीटर पुढे गेल्यास सरळ रस्ता थेट गुजरातच्या दिशेने जातो आणि फाऊंटन हॉटेलच्या सिग्नलला उजवीकडे वळल्यास ठाण्याला जाता येते. घोडबंदर रोडवरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात, परंतु त्यामागचा इतिहास लोकांना क्वचितच ठावूक असतो. एवढंच काय, फाऊंटनच्या सिग्नलवरून डावीकडे आत गेल्यास पाचशे वर्षे जुन्या इतिहासाची साक्ष असलेला घोडबंदर किल्ला आजही आपले पाय घट्ट रोवून उभा आहे याची कल्पना नसते. असो. इतर कुणी या छोटेखानी किल्ल्याला भेट देवो अथवा न देवो, पण मुंबई आणि ठाणेकरांनी तरी हा किल्ला आवर्जून पाहायला हवा.

घोडबंदर किल्ल्याकडे जाण्यासाठीच्या रस्त्यावर उजव्या बाजूला खाडी परिसर आणि डाव्या बाजूला कोळी लोकांची वस्ती लागते. खाडी परिसर असला तरी किल्ला थोडा उंचावर आहे. त्यामुळे वस्तीतून किल्ल्याकडे जाण्यासाठीच्या शेवटच्या शंभर मीटरच्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी आजमितीस शिल्लक नाही, पण तटबंदीचे अवशेष जागोजागी आढळतात. भारतात सर्वांत प्रथम आलेल्या पोर्तुगीजांनी कोकण किनारपट्टीवरील सागरावर आपली सत्ता राखण्यासाठी जे किल्ले बांधले, त्यापैकी हा एक किल्ला होय. अरबी समुद्रापासून काहीसा आत खाडीवर वसलेला तरीही गलबतांच्या साह्याने पोहण्यास सोयीचा असा हा किल्ला पोर्तुगीजांचे बलस्थान होता. पोर्तुगीजांनी पंधराव्या शतकात आपले ठाणे या किल्ल्याच्या ठिकाणी सर्वप्रथम बांधले; मात्र आज अस्तित्वात असलेला किल्ला सतराव्या शतकात बांधून पूर्ण झाला. पुढे मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला आणि अठराव्या शतकात ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला व ईस्ट इंडिया कंपनीच्या जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले.

खाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती, पण त्याचबरोबर येथूनच पोर्तुगीज समुद्रमार्गे अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करीत असत. त्या काळी घोड्यांचे मोठे बंदर म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध असल्याने या जागेला घोडबंदर हे नाव पडले. असेही सांगितले जाते, की उल्हास नदीच्या खाडीच्या दोन बाजूंना डोंगराच्या दोन सोंडा खाली उतरल्या आहेत, त्यापैकी एक सोंड घोड्यासारखी दिसते, म्हणून त्याला घोडबंदर असे म्हणतात. किल्ल्याची बरीच पडझड झाल्यामुळे मुख्य प्रवेशद्वार लगेच लक्षात येत नाही, पण गावातून दिसणाऱ्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. किल्ल्यावर पाहण्याच्या ठिकाणांमध्ये कमानी, बांधकामाचे काही अवशेष, तटबंदीचे अवशेष, बुरूज व पाण्याची टाकी यांचा समावेश होतो. भग्न प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर तीन बाजूंनी इमारत व मधोमध मोकळी जागा अशा स्वरूपाची इमारतीची रचना आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात तटबंदीच्या रुंदीचा अंदाज येतो. किल्ल्याच्या मध्यभागी मोकळी जागा असून तिन्ही बाजूंनी मोठ्या भिंती आहेत. एका भिंतीला काही दरवाजे असून त्या खोल्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जात असाव्यात असे दिसते.

इमारतीच्या वायव्येस टेहळणी बुरूज आहे. या बुरुजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा बुरुज तटबंदीच्या सलगतेत नाही. बुरूज पूर्णपणे स्वतंत्र असून फक्त टेहेळणीसाठीच बांधला गेला असावा असे दिसते. बुरुजावर जाण्यासाठी बाह्यांगातच एक दरवाजा आहे. या दरवाजातून आत गेल्यावर माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या असलेल्या मार्गावरून काही उंचीवर गेल्यावर एक सपाट भाग असून त्याच्या एका अंगाला एका खोलीचा दरवाजा लागतो. या खोलीचे छत म्हणजेच बुरुजाचा माथा. ही खोली बंदुका वगैरे सामुग्री ठेवण्यासाठी व टेहेळणी करणाऱ्या शिपायाच्या विश्रांतीसाठी वापरण्यात येत असावी. बुरुज माथा हे किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आहे. या बुरुजावरून उल्हास नदीचे पात्र आणि खाडीचे विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते. पूर्वेला जवळच पोर्तुगीजकालीन चर्च आणि दक्षिण व पश्चिमेला मिरा-भाईंदर शहर आहे. गार वारा अंगावर घेत या बुरुजावर वेळ घालवता येतो. सकाळी लवकर आल्यास बुरुजावरून सूर्योदय आणि सध्याकाळी सूर्यास्त पाहता येतो.

नेहमीच्या वाटेवर असणाऱ्या अनेक ऐतिहासिक जागांपासून आपण अनेकदा अनभिज्ञ असतो. घोडबंदरचा किल्ला हादेखील त्यापैकीच एक म्हणता येईल. एखाद्या सुट्टीच्या दिवशी अर्धा दिवस जरी हाती असला तरी आवर्जून भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये या जागेला प्राधान्य द्यायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT