Sunset on Tikona Fort
Sunset on Tikona Fort Sakal
सप्तरंग

‘तिकोना’वरून पाहावा सूर्यास्त!

प्रशांत ननावरे

डोंगरभटकंती करण्यासाठी पावसाळा हा सर्वांत चांगला ऋतू. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली की तरुणाईला गड-किल्ल्यांवर चढाईचे वेध लागू लागतात; पण अलीकडे ट्रेकिंगसाठी कोणताही विशेष ऋतू राहिलेला नाही.

तिकोना किल्ल्याच्या माथ्यावरून सारा पवन मावळ नजरेत भरतो. खाली अथांग पसरलेला पवना धरणाचा जलाशय दिसते. लोहगड, विसापूर हे दुर्ग आणि पवनेच्या जलाशयात मधोमध विसावलेला तुंग त्याच्यामागचा खोटा तुंगी, दूरवरचा कोरीगड, बेडसे लेणी, भातराशीचा डोंगर असे सह्याद्रीचे सारे शिलेदार आपल्याला खुणावत असतात. उन्हाळ्यात जितका हा परिसर मोकळा दिसतो, पावसाळ्यात तितकीच या मुलखाला एक नवी झळाळी प्राप्त होते. किल्ल्यावरून सूर्यास्त पाहणे हा एक नयनरम्य सोहळाच असतो.

डोंगरभटकंती करण्यासाठी पावसाळा हा सर्वांत चांगला ऋतू. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली की तरुणाईला गड-किल्ल्यांवर चढाईचे वेध लागू लागतात; पण अलीकडे ट्रेकिंगसाठी कोणताही विशेष ऋतू राहिलेला नाही. वर्षाचे बाराही महिने लोकांना भटकंती करायची असते. उंच गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी पावसाळा सुयोग्य असला तरी इतरवेळी एका दिवसात सहज करता येतील असे छोटे किल्लेही सह्याद्रीच्या कुशीत भरपूर आहेत. पुण्याजवळील १२ मावळांपैकी एक असलेल्या पवन मावळात तर असे किल्ले एकमेकांना खेटून उभे आहेत. कोणत्याही गडावर जा, तिथून आजूबाजूच्या किल्ल्यांचे दर्शन सहज होते. लोणावळ्याच्या दक्षिणेकडे सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पवना नदीच्या खोऱ्यातील असाच एक भक्कम किल्ला म्हणजे तिकोना किल्ला ऊर्फ वितंडगड.

पवन मावळात पवना धरणाच्या सान्निध्यात असणारा तिकोना ऊर्फ वितंडगड हा किल्ला मुंबईपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी थेट गाडीने पोहोचता येते. अथवा कामशेत रेल्वे स्थानकात उतरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गापर्यंत आल्यास तिथून पवना धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत जाण्यासाठी म्हणजेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर गाड्या मिळतात. सध्या एसटीचा संप सुरू असल्याने तो पर्याय खुला नाही. खरे तर तिकोना म्हटलं की त्याचा साथीदार असलेल्या तुंगचा उल्लेख टाळता येत नाही. कारण तुंग-तिकोना हे संपूर्ण पवनपट्ट्याचे रक्षण करणारे दोन शिलेदार. ऊन, पाऊस, वारा आणि गनीम या सर्वांशीच झुंजत आणि काळाशीही झगडत शतकानुशतकं उभे आहेत.

भौगोलिकदृष्ट्या योग्य स्थान, नैसर्गिक सौंदर्य आणि आकाराने त्रिमितीय असल्याने हा किल्ला तिकोना या नावाने ओळखला जातो. या परिसरात कधीही फार मोठी लढाई झाली नाही, पण तरीही पवन मावळातील एक मुख्य चौकी म्हणून तिकोना गडाचे महत्त्व मोठे होते. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जात असल्या, तरी तहाद्वारे हा किल्ला स्वराज्यात आला असल्याचे वेगवेगळे पुरावे सांगतात. किल्ल्याचे बांधकाम शिवकाळात झाले असले, तरी किल्लाच्या पोटातील लेणीवरून त्याचे अस्तित्व प्राचीन काळापासून असल्याचे दिसते. बहमनी काळापासून या किल्ल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात.

समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवर असलेल्या या किल्ल्याचा माथा गाठण्यासाठी ३० ते ४० मिनिटे पुरेशी होतात. किल्ल्यावर जाण्यासाठी काशिग, घेवंड आणि पायथ्याच्या तिकोना पेठ या तीन वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो. तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा चढतात. एक सरळ उभ्या चढणीची आणि दुसरी लांबची, गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपी. दोन्हीपैकी कुठल्याही वाटेने वर गेल्यास अधेमधे असलेल्या दगडी पायऱ्या आणि मळलेल्या वाटेमुळे कुठेही न भरकटता थेट माथ्यापर्यंत पोहोचता येते. किल्ल्याच्या माचीवर दगडात भलामोठा मारुती कोरलेला आहे. पुढे गेल्यावर किल्ल्याचे काही अवशेष दिसतात. या परिसरात राज्यकारभार चालवण्यासाठीची सदर होती. तिथेच मोठ्या कातळात कोरलेली एक प्राचीन लेणी आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेणीच्या समोरच एक भलेमोठे तळे खोदलेले आहे.

तिकोनाच्या बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेवरच चुन्याचा घाणा आहे. तिथून पुढे बालेकिल्ल्याची उभ्या चढणीची व अरुंद वाट सुरू होते. काळ्या कातळात खोदलेल्या उंच पायऱ्या चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. तिथून आत प्रवेश करताच उजव्या हाताला पाण्याचे एक खोदीव टाके आहे. बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची पायऱ्यांची वाटही उभा कातळ फोडून तयार केलेली आहे. पायऱ्यांची ही वाट दमवणारी नसली तरी धडकी भरवणारी नक्कीच आहे.

बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा प्रशस्त आणि आखीवरेखीव आहे. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज असून आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. दरवाजाच्या आत उजव्या हाताला पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत; तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. यानंतर तिसरा दरवाजा ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ला छोटासाच आहे. माथ्यावर छोटेखानी त्र्यंबकेश्वराचे मंदिर, एक मोठा तलाव, दोनचार खोदीव टाक्या, धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात.

किल्ल्याच्या माथ्यावरून सारा पवन मावळ नजरेत भरतो. खाली अथांग पसरलेला पवना धरणाचा जलाशय दिसतो. लोहगड, विसापूर हे दुर्ग आणि पवनेच्या जलाशयात मधोमध विसावलेला तुंग त्याच्यामागचा खोटा तुंगी, दूरवरचा कोरीगड, बेडसे लेणी, भातराशीचा डोंगर असे सह्याद्रीचे सारे शिलेदार आपल्याला खुणावत असतात. उन्हाळ्यात जितका हा परिसर मोकळा दिसतो, पावसाळ्यात तितकीच या मुलखाला एक नवी झळाळी प्राप्त होते. किल्ल्यावरून सूर्यास्त पाहणे हा एक नयनरम्य सोहळाच असतो. किल्ल्याच्या पायथ्याशी वाहने पार्क करता येतात. तिथेच जेवणाचीही सोय आहे. गरमागरम शाकाहारी-मांसाहारी जेवण तुमच्या आवडीप्रमाणे बनवून दिले जाते. एका दिवसात थोडा दूरचा गाडी प्रवास आणि छोट्या ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल तर सहकुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींसह तिकोनाचा विचार करायला हरकत नाही.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT