Donation
Donation sakal
सप्तरंग

डोळस देणगीदार

सकाळ वृत्तसेवा

- प्रताप पवार, editor@esakal.com

व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

‘पुणे अंधशाळे’त त्या वेळी पैशाची फारच कमतरता होती. पहिलं काम होतं ते काहीही करून संस्थेसाठी पैसे मिळवायचे.

डोळस देणगीदार

pratap pawar writes pune blid school donar donation humanity pjp78

प्रताप पवार, editor@esakal.com

व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

मी १९६८ च्या एप्रिल अखेरीस पिलानीहून परतताना मुंबईत बीडेश कुलकर्णी यांच्या घरी उतरलो होतो. या कुटुंबीयांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि आतिथ्यामुळे त्यांना भेटूनच पुण्यात परतण्याचा बेत होता. त्याच वेळी स. का. पाटील यांच्या घरी माझ्यावर ‘पुणे अंधशाळे’च्या विश्वस्तपदाची धुराही सोपवण्यात आली. म्हणजे, माझ्या सामाजिक आणि औद्योगिक कामाला आता ५५ वर्षं पूर्ण झाली आहेत!

न विसरता येण्याजोगे अनेक अनुभव सामाजिक क्षेत्रात काम करताना आले हे सहज विचार करताना जाणवलं. यांपैकी बहुतेक अनुभव चांगलेच होते; पण काही अपमानकारकही अनुभव वाट्याला आले. मात्र, दुसऱ्याच्या हितासाठी आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा मानापमान दूर ठेवायचा असतो. गमतीनं म्हणावंसं वाटतं की, मी व्यावसायिक असल्यानं भरल्यापोटी सामाजिक कामात योगदान दिलं!

‘पुणे अंधशाळे’त त्या वेळी पैशाची फारच कमतरता होती. पहिलं काम होतं ते काहीही करून संस्थेसाठी पैसे मिळवायचे. अनेक दाते हे महिना एक रुपयापासून ते शंभर रुपयांपर्यंत देणगी देत असत! आमच्या प्रयत्नांना जसजसं यश येऊ लागलं तसतसे आम्ही पाच हजार रुपये, दहा हजार रुपये देऊ शकतील अशा देणगीदारांचा पाठपुरावा करायला सुरुवात केली.

यमुताई किर्लोस्कर याही विश्वस्त असल्यानं त्यांच्याबरोबर शंतनुराव किर्लोस्कर यांना भेटून २५ हजार रुपयांची देणगी मिळवली. मोठा प्रश्न सुटला होता; परंतु असे पैसे मिळू शकतील हा विश्वास निर्माण झाला. यातून शामदासानी या हाँगकाँगच्या देणगीदाराचा परिचय झाला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधल्यावर ते म्हणाले : ‘मी काही वेडा माणूस नाही! कुणालाही कल्पना न देता मी शाळेत जाऊन आलो. त्या वेळी तुमच्या संस्थेतील मुलांच्या तब्येतीत, गुणवत्तेत सुधारणा दिसली, त्यामुळेच मी पैसे देत आहे.’

त्यानंतर पुढील काही वर्षांत मुलींच्या शाळेचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी, अंधांच्या शिक्षकांचं ट्रेनिंग कॉलेज, बालवाडी व अन्य गोष्टींसाठी शामदासानी यांनी २५ लाख रुपये दिले. नंतर संस्थेनं मागं वळून पाहिलंच नाही. ही निवासी शाळा असून मुला-मुलींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीनं हातमागावरील कापड तयार करणं, शिवणकाम, संगीत, फिजिओथेरपी, मेणबत्त्या तयार करणं आणि त्यांची विक्री करणं अशा अनेक गोष्टी केल्या जातात. या प्रकारच्या कौशल्याधारित शिक्षणामुळे अनेक मुली आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. त्यांचे विवाह ठरण्यात याची मोठी मदत झाली. ती आज एक आदर्शवत् अंधशाळा म्हणून पाहिली जाते.

‘विद्यार्थी सहाय्यक समिती’मध्ये सतत वाढ सुरू आहे; मग ती विद्यार्थिसंख्या असो अथवा नवीन वसतीगृह. सरकारी मदत शून्य. त्यामुळे देणगीदारांवरच शंभर टक्के भिस्त असते. याला प्रमुख कारण म्हणजे डॉ. अच्युतराव आपटे यांचं धोरण.

जोपर्यंत आपण समाजहिताचे प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहोत, तोपर्यंत समाज आपल्याला मदत करेल. सरकारी मदत घ्यायचीच नाही हा या धोरणाचा दंडक आहे. तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या समितीकडे आजमितीला ८५० मुले-मुली निवासी आहेत.

पुढील वर्षभरात आणखी ७५० मुला-मुलींची निवासी व्यवस्था पुणे आणि नगर इथं सुरू केलेल्या वसतिगृहात होईल. यासाठी देणगीदारांकडून सुमारे ४५ कोटी रुपये मिळाले आहेत. मी १९७५ मध्ये ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’चा विश्वस्त झालो. माझ्यावर १९८१ मध्ये समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली ती आजतागायत आहे.

सर्व विश्वस्त, कार्यकर्ते संस्थेच्या वृद्धीसाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात. मी ‘किर्लोस्कर फाउंडेशन’चा १९७४ मध्ये विश्वस्त झालो. अनेक कारणांनी ‘लकाकि’वर, म्हणजे किर्लोस्कर यांच्या घरी जाणं होत असे. यमुताई आणि शंतनुराव यांच्याशी माझे वेगळेच ऋणानुबंध निर्माण झालेले होते. ‘किर्लोस्कर फाउंडेशन’बाबत माझी विनंती शंतनुरावांना शंभर टक्के मान्य होत असे. ‘समितीसाठी २५ हजार रुपये द्यावेत,’ अशी विनंती मी त्यांना १९८२-८३ मध्ये केली. त्यांच्या स्वभावानुसार, क्षणातच त्यांनी उत्तर दिलं. ‘अजिबात नाही.’

‘का?’ मी विचारलं.

ते म्हणाले : ‘तुम्ही सर्व तुमच्या समाधानासाठी राबता. विद्यार्थी स्वतःसाठी काय प्रयत्न करतात?’

माझ्याकडे त्या वेळी उत्तर नव्हतं.

मी १९८५ मध्ये ‘सकाळ’ची सूत्रं ताब्यात घेतल्यावर सर्व गोष्टींत लक्ष घालायला सुरुवात केली. वर्तमानपत्रासाठी लागणाऱ्या कागदात सुमारे आठ ते नऊ टक्के कागद या ना त्या कारणानं वाया जात असे. तो रद्दीच्या भावानं व्यापारी घेऊन जात. त्याचं ते काय करतात अशी चौकशी केल्यावर कळलं की, ते कागद नीटनेटका कापून रीमच्या आकाराचे कागद दीड ते दुप्पट किमतीनं बाजारात विकत असत. मला सुचलं की, हे काम तर ‘समिती’चे विद्यार्थीही करू शकतील.

यातून अर्थार्जनही होणार होतं व ‘सकाळ’चंही काही नुकसान होणार नव्हतं. आमच्याकडे जुनी कटिंग मशिन्स पडलेली होती आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावरच्या कामगारांना अनुभव होता. ही कल्पना विद्यार्थी सहाय्यक समितीतही आवडली. त्यासाठी वसतिगृहात एक शेड बांधणं आवश्यक होतं. सुमारे ५० हजार रुपये खर्च येणार होता. मी लगेच शंतनुरावांकडे गेलो आणि ‘विद्यार्थी काम करत असे पैसे मिळवू शकतील,’ असं त्यांना सांगितलं.

त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी लगेच ५० हजार रुपयांचा धनादेश दिला, त्यामुळे जवळपास दीडशे मुला-मुलींचं अर्थार्जन होऊ लागलं. आता जवळपास सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी ‘कमवा आणि शिका’ पद्धतीनं शिक्षण घेत आहेत. संस्था एवढ्यावरच थांबली नाही. आता विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेचा कल वाढावा यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक मिळवून दिले जात आहे. काळानुरूप पावलं उचलत कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आदीचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.

असाच आणखी एक सुखद अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. उद्योगपती नवलमल फिरोदिया यांच्याशीही माझा अकृत्रिम स्नेह होता. त्यांच्या विचारात एक धार, स्पष्टता, व्यवहारीपण आणि सामाजिक जाण होती. त्यांच्याकडे एका सायंकाळी गप्पा मारत असताना मी त्यांना बालकल्याण संस्थेबद्दल माहिती दिली. ही सरकारी संस्था असून सरकारचं अनुदान मर्यादित असल्यानं सर्व नवीन सुधारणा, प्रकल्प यासाठी आम्ही विश्वस्त निधी जमवण्यासाठी प्रयत्न करत असू.

त्याअंतर्गतच, मी त्यांना ‘बालकल्याण’ला भेट देण्याची विनंती केली व ती त्यांनी लगेच मान्य केली. दोन-तीन दिवसांनी आम्ही बालकल्याण संस्थेत गेलो. मी सर्व माहिती दिली. त्यांनी सर्वत्र जाऊन वास्तू पाहिली आणि विचारलं : ‘आता तुमची सर्वांत महत्त्वाची गरज काय आहे?’ मी उत्तरलो : ‘‘ग्रंथालय. त्यामुळे इथं सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना-शिक्षकांना पुस्तकं वाचायला मिळतील. त्यांच्या प्रबोधनासाठी पुस्तकांचा चांगला उपयोग होईल.’

त्यांनी विचारलं : ‘‘किती पैसे लागतील?’

मी म्हटलं : ‘सुरुवातीला एक लाख रुपये तरी हवेत. कालांतरानं हळूहळू आम्ही त्यात वाढ करू.’

इकडच्या-तिकडच्या गप्पा, चहा झाल्यावर ते मिश्किलपणे म्हणाले : ‘प्रताप, तुला साधे आपण पैसे किती मागावेत हेपण कळत नाही!’

माझा चेहरा प्रश्नांकित होता. ते म्हणाले : ‘‘उद्या कुणाला तरी घरी पाठव. तीन लाख रुपयांचा धनादेश तयार ठेवतो!’

बालकल्याण संस्था आता देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षिसं मिळवत आहे. नवलमलजींसारख्या अनेकांचे आशीर्वाद, पाठिंब्याचं बळ या सगळ्यामागं आहे.

अर्थात् त्यांची परंपरा पुढच्या दोन्ही पिढ्यांनीही सुरू ठेवली आहे. सीओईपी- धातुशास्त्र इमारतीसाठी आणि इतर सुधारणांसाठी फिरोदिया कुटुंबीयांतर्फे नुकतीच साडेपाच कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आणि एक कोटी रुपयांचं आधुनिक यंत्रही त्यांनी मिळवून दिलं.

तथापि, यामुळे लहान देणगीदारांचं महत्त्व कमी होत नाही. एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांचे फोन यायला लागतात. त्यांना आपापल्या परीनं मदत करायची असते. उन्हात उभं राहून ‘सकाळ रिलिफ फंडा’ला पैसे देणारे आमच्या लेखी तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या विश्वासाला नेहमीच पात्र राहण्याची नैतिक जबाबदारी आम्हा विश्वस्तांना आणि कार्यकर्त्यांना घ्यावी लागते. ही समाधानाची बाब असते. समाजातील इतरांचंही भलं करता आलं तर त्यात आपला खारीचा वाटा तितकाच महत्त्वाचा असतो.

पाहा, काय करता येईल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT