Katewadi Sakal
सप्तरंग

काही प्रसंग, काही प्रसंगावधान...!

वर्ष १९५६. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं बाळसं धरलेलं होतं. माझे वडीलबंधू वसंतराव हे नामांकित वकील आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) कार्यकर्ते. घरात थोडंसं डावीकडे झुकलेलं वातावरण.

प्रताप पवार

- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

वर्ष १९५६. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं बाळसं धरलेलं होतं. माझे वडीलबंधू वसंतराव हे नामांकित वकील आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) कार्यकर्ते. घरात थोडंसं डावीकडे झुकलेलं वातावरण. वर्तमानपत्रं वाचणं आणि नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा वगैरे आम्हां सर्वांमध्ये होत असत.

अगदी मोठ्या बहिणीही यात सहभागी होत. पुणे जिल्ह्यातील; विशेषतः बारामतीतील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नेतृत्व बंधू वसंतरावांकडे - आम्ही त्यांना दादा म्हणत असू - आलेलं स्पष्ट दिसत होतं.

पुढील तीन-चार वर्षं अनेक नेत्यांच्या भेटींचं-सभांचं नियोजन वगैरे आमच्या घरात होत असे. आचार्य प्र. के. अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील अशी कितीतरी मंडळी आमच्याकडे येत. काही वेळा राहत. आचार्य अत्रे यांच्या अग्रलेखांवर आम्हा सर्वांच्या चर्चा होत असत; अगदी माझ्यापर्यंत.

त्या वेळी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीप्रमाणे काटेवाडीतील वस्तीवर होतो. तिथून खताळपट्टा दोन-तीन किलोमीटरवर. तिकडे माझे मित्र होते. साहेबराव बलवंड, नाना झारगड आदींच्या घरांतील मुलं माझे जवळचे मित्र. अनेकदा मी त्यांच्याकडे अथवा ते आमच्याकडे ‘पडीक’ असत. महाशिवरात्रीचा दिवस होता. अचानक गडबड सुरू झाली.

दादांची सभा सोनगावला, म्हणजे तिथून पाच-सहा मैलांवर होती. नीरा आणि कऱ्हा नदीच्या संगमावर वसलेलं हे गाव. आज्ञा झाली : ‘चला रं पोरांनो, आपल्याला सोनगावला सभेला जायचंय.’ आम्हाला फक्त आज्ञेचं पालन करणं एवढंच माहीत होतं. संध्याकाळी सहा-साडेसहाला बैलगाडीतून सोनगावला पोहोचलो. सभा सुरू झाली.

आम्हाला सभेत फारसा रस नव्हता. तिथं जत्रा भरलेली होती. तिकडे आम्ही काही वेळानंतर हुंदडलो. तास-दोन तास कसे गेले ते कळलंही नाही. भानावर आलो तेव्हा समजलं की, सभा केव्हाच संपली होती आणि आमची वडीलमंडळी बैलगाडीतून परतली होती. रात्रीची वेळ, भूक लागलेली. आता काय करायचं हा प्रश्न पडला. कारण, परतीचे दोर कापलेले होते.

माझी मित्रमंडळी माझ्यापेक्षा अधिक टग्या वृत्तीची होती. मित्र म्हणाले : ‘हे बघ, तू इथं बसून राहा. आम्ही काही तरी व्यवस्था करतो.’ मित्रांनी आणलेले पदार्थ खाऊन पोटाची शांती केली. आता प्रश्न होता, झोपायचं कुठं? महाशिवरात्रीचा तो दिवस होता. देवळात सर्वत्र गर्दी भरपूर. इकडे-तिकडे...महादेवाच्या देवळात सगळीकडे पाहिलं...काही वाव दिसला नाही. थंडी पडायला लागली होती. या मित्रांचा सल्ला मानणं प्राप्त होतं.

सर्वांनी ओळीनं कोरडी वाळू उकरली. तीत झोपून अंगावर वाळू टाकून तिचंच पांघरूण केलं. तोंड फक्त उघडं ठेवलं. पहाटे जाग आल्यावर सर्वजण वाळू झटकून घराकडे चालायला लागलो. ज्याचं घर आधी लागलं तिथं राखुंडीनं दात घासले व मिळेल तो नाश्ता केला आणि आपापल्या घरी गेलो. आता सांगा, प्रत्येक महाशिवरात्रीला मला याची आठवण होणारच ना?

ही गोष्ट मी मृणाल आणि आमची नात जान्हवी यांना दिवाळीत सहज सांगितली, तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. ‘हे कसं शक्य आहे? घरात गोंधळ उडाला नाही का...?’ वगैरे प्रश्न विचारले गेले.

कदाचित्, ‘दोन मुलांची आई’ आणि ‘अकरा मुलांची आई’ यांतला फरक असावा; परंतु या प्रश्नांनी मात्र माझी व त्यांचीही करमणूक झाली होती. एक किंवा दोन मुलं असलेली आई ही तिच्या बाळांची जिवापाड काळजी घेते, काळजी करते. कदाचित् अकरा मुलांची आई परिस्थितीमुळे तिच्या मुलांना स्वतःच्या पंखांवर, स्वतःच्या बळावर जगायला शिकवते. भारती, मृणाल आणि माझी आई यांची आपापल्या मुलांबद्दलची वागणूक यांमध्ये हाच फरक मी अनुभवला.

वर्ष १९७७. मी नुकताच ‘बारामती ग्रेप इंडस्ट्री’च्या जबाबदारीतून मोकळा झालो होतो. डॉ. बोस्का, डॉ. रॉसी ही मंडळी मिळालेल्या यशामुळे माझ्यावर खूश होती. इकडे आमचा एक्स्पोर्ट सुरू झाला होता. त्यामुळे मी युरोपला जायचं ठरवलं होतं. आपल्याकडील मे-जूनचा महिना. सहज विचार आला, भारतीला बरोबर घेऊन जावं.

डॉ. बोस्का, डॉ. रॉसी यांच्यामुळे इटलीमध्ये सोय होणार होती, तर इंग्लंडमध्ये आर्किटेक्ट असलेले बंधू लंडनमध्ये होते. माधवरावांनी पाठिंबा दिल्यानं मार्ग सोपा झाला होता. माझ्याकडे आवश्यक व्हिसा होता. भारतीसाठी व्हिसा काढायला वेळ मर्यादित होता. स्पेन वगळता इतर देशांचे व्हिसा तिच्यासाठी मिळवले.

जर्मनी, फ्रान्स, इटली आणि लंडनपर्यंत आमचा प्रवास छान झाला. बोस्का मंडळींनी आमची उत्तम बडदास्त ठेवली होती. भारतीही अर्थात खूश होती. लंडनहून स्पेनमध्ये माद्रिद इथं जायचं होतं. दोघांचं तिकीट होतं; परंतु वेळेअभावी भारतीकडे स्पेनचा व्हिसा नव्हता. मी धोका पत्करायचं ठरवलं. आम्ही माद्रिदच्या विमानतळावर उतरलो. कस्टममध्ये मी पुढं जाऊन आम्हा दोघांचे पासपोर्टस् समोर ठेवले.

शिस्तीनं वागणाऱ्या तिथल्या अधिकाऱ्यानं, भारतीकडे ‘व्हिसा नाही; तात्पर्य, परत लंडनला जा’ असं सांगितलं.’ मी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु गडी काही ऐकेना. शेवटी मी त्याला म्हणालो : ‘तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मला भेटायचं आहे.’ सुदैवानं त्यानं ते मान्य केलं.

मी त्या अधिकाऱ्याला म्हणालो : ‘साडी नेसलेली एखादी सुंदर महिला तुम्ही पाहिली आहे का?’

त्यावर त्यानं विचारलं : ‘साडी? हा काय प्रकार आहे?’

मी म्हटलं : ‘कृपया ऑफिसच्या बाहेर येऊन पाहा.’

तो आला. भारतीनं सुंदर बनारसी सिल्कची पिवळीजर्द साडी नेसलेली होती. तो तिला पाहून म्हणाला : ‘अरे देवा! काय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.’

मी पटकन् म्हटलं : ‘अशा व्यक्तिमत्त्वाला, विशेषतः महिलेला, तुम्ही लंडनला परत पाठवणार? व्हिसा काढायला वेळ नव्हता तरी, तुमचा सुंदर देश तिला दाखवावा म्हणून, मी तिला आणण्याचा प्रयत्न करत आहे.’

त्यानं विचार केला आणि म्हणाला : ‘आम्ही कसं काय त्यांना परत पाठवू...?’

लगेच त्यानं आमच्या पासपोर्टवर शिक्के मारले आणि स्पेनमधील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. त्याच्या शुभेच्छांनी आमची स्पेनची भेटही संस्मरणीय झाली हे सांगायला नकोच.

हो, लंडनच्या आमच्या वास्तव्याची गोष्ट सांगायची राहिलीच. बोस्का मंडळींच्या प्रयत्नांतून भारतीला अनेक प्रकारच्या वाईनची चव चाखायला लावली. संकोचानं का होईना, ती चमचाभर वाइन जिभेवर ठेवत होती. परत निघालो तर बोस्कांनी शॅम्पेनच्या बारा बाटल्या दिल्या. सांगून पाहिलं; परंतु ते ऐकेनात. शेवटी, आम्ही सहा बाटल्या विमानतळावरच हळूच ठेवून दिल्या आणि उरलेल्या बाटल्या घेऊन बंधूंचं घर गाठलं.

त्यांची पत्नी, म्हणजे आमच्या वहिनीसाहेब, खास ब्रिटिश (आंग्ल). शॅम्‍पेनच्या सहा बाटल्या पाहून त्यांना आश्चर्याचा व आनंदाचा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी मी कामासाठी बाहेर पडलो ते संध्याकाळी साडेसात-आठ वाजता घरी आलो.‘कसा दिवस गेला? काय काय झालं?’ अशी वहिनीसाहेबांनी चौकशी सुरू केली. मी म्हटलं

:‘हार्ले स्ट्रीटवर माझे एक जवळचे मित्र आहेत. त्यांच्याबरोबरच बराचसा दिवस गेला.’

हार्ले स्ट्रीट म्हणजे इंग्लंडमधील सर्वोत्तम डॉक्टर्स यांची हॉस्पिटल्स किंवा सल्ला मिळण्याची जागा.

‘काय सांगताय?’ वहिनीसाहेबांची प्रतिक्रिया.

‘मग पुढं काय झालं?’

मी म्हटलं : ‘आमची ‘पुणे अंधशाळे’बद्दलची चर्चा झाल्यावर ते मला हाऊस ऑफ पार्लमेंटला घेऊन गेले. तिथल्या काही खासदारांबरोबर माझी ओळख करून दिल्यावर तिथंच जेवण वगैरे केले. मला आणखी एक मीटिंग असल्यानं त्यांचा निरोप घेतला आणि माझं काम संपल्यावर मी घरी आलो.’

वहिनीसाहेब या ‘वैशिष्ट्यपूर्ण इंग्रज’ असल्यानं आमच्या घरात फक्त त्यांचे पती सुसंस्कृत, सुशिक्षित आहेत अशी त्यांची समजूत होती. त्या समजुतीला पहिल्या दिवशीच ‘भूकंपाचे अनेक धक्के’ बसले. आम्हा उभयतांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. ‘आम्हाला जी संधी आयुष्यात मिळाली नाही ती तू पहिल्या दिवशीच सहज मिळवलीस...’ असं त्या जरूर पुटपुटल्या; परंतु त्यांना दोष कसा देणार? त्या परदेशी युवती होत्या. माझ्या आयुष्यात असे अनेक अनुभव आले. मी ‘वाटचाल’मध्ये ‘उचलली जीभ’ हा लेख लिहिला आहे. वेळ मिळाल्यास तो लेख जरूर वाचावा.

आम्हां उभयतांच्या परदेशी प्रवासाला सुरुवात झाली होती. काही काळानंतर आम्ही जर्मनीमध्ये म्युनिक या गावी उतरलो. तिथं आम्हाला घ्यायला एक मराठी तरुण मित्र आला होता. त्याच्याकडे राहायला हवं याबाबत तो आग्रही होता. थोडा चेंगट असल्यानं तीन-चार गाड्या बदलत जवळच्या स्टेशनवरून बॅगा ओढत आम्ही त्याच्या घरी, म्हणजे त्याच्या प्रेयसीच्या माहेरी, गेलो. त्यांचं तीनमजली घर. मधल्या मजल्यावर हे दोघं. प्रेयसी जर्मन आणि सुस्वभावी.

आम्ही त्याच्या दृष्टीनं ग्रामीण असल्याच्या समजुतीनं मित्रानं तिथल्या राहणीबद्दल, चाली-रीतींबद्दल आमचं ‘शिक्षण’ सुरू केलं. आम्हाला शिस्त अथवा वळण नाही असं त्या जर्मन लोकांना वाटता कामा नये, या भूमिकेतून हे ‘मास्तर’ आमचं सारखं ‘शिक्षण’ करत होते. तरी बरं, आम्ही अनेकदा परदेशप्रवास केलेला होता हे त्याला माहीत होतं.

भारती थोडी वैतागली होतीच. दुसऱ्या दिवशी माझ्या एक शालेय मित्राला आम्ही एकत्रित भेटलो. ‘मास्तरकी’ सुरू होतीच! थंडीमुळे माझ्या मित्राला कोटाच्या खिशात हात घालून बोलायची सवय होती. हे आमच्या ‘गुरुजीं’ना खटकलं. ‘कोटाच्या खिशातून हात बाहेर काढ आणि बोल’ असं माझ्या या मित्राला ‘गुरुजीं’नी तीन-चार वेळा सुचवलं-सांगितलं. माझा बालमित्र आता मात्र खवळला.

आमच्याकडे पाहत आणि ‘गुरुजीं’ना उद्देशून तो चिडून म्हणाला : ‘मी काय तुझ्या कोटाच्या किंवा पँटच्या खिशात हात घालून बोलतो आहे का? माझा हात आणि माझा कोट आहे. मी कुठल्याही खिशात हात घालून बोलेन...तू शहाणपणा शिकवू नकोस.’ मला या दोघांच्या वादामुळे - आणि दोघांचे स्वभाव जवळून माहीत असल्यामुळे - हसू आवरेना. कसाबसा विषय बदलून आम्ही पुढील प्रवास सुरू केला.

इकडे मित्राच्या घरात ‘टबमधील पाणी सांडू नका...ओल्या पावलांनी बाथरूममधून बाहेर येऊ नका; कार्पेट असतात...’ वगैरे आमचं ‘प्रशिक्षण’ ‘गुरुजी’ करतच होते. आम्ही काटेवाडीकर ना!

चिडलेल्या भारतीच्या ध्यानात आलं की, या मित्राचं लग्न झालेलं नाही आणि तरीही ते एकत्र राहत आहेत. त्यानं भारतीला सहज विचारलं : ‘कशी वाटते माझी मैत्रीण...लग्न करावं, म्हणतो!’

भारती उडालीच! मला रात्री म्हणाली : ‘मी इथं राहणार नाही. असं कसं शक्य आहे? हे कसं तिच्या आई-वडिलांना चालतं?’

मी उत्तरलो : ‘तुला काय काळजी पडली आहे? मित्राच्या भावी सासू-सासऱ्यांना चालतंय, त्यांच्याच घरात हे दोघं राहत आहेत. हा काही आपला देश नाही. नीतिमत्तेच्या कल्पना प्रत्येक समाजात वेगवेगळ्या असतात. काळानुसार त्या बदलतही असतात, त्यामुळे तू काही रागवायचं कारण नाही.’

यथावकाश त्या दोघांचं पुण्यात लग्न झालं. मुला-मुलींसह त्यांचा संसार सुरू आहे.

आपल्या आणि इतर देशांतील, धर्मांतील चाली-रीतींमध्ये फरक असतो एवढंच आपण समजून घ्यायला हवं. हेच तर वेगळेपण आपल्याला प्रगल्भ करत असतं, म्हणूनच आपण म्हणतो ना ‘केल्याने देशाटन...’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT