क्रिकेट हा मुळात इंग्लिश खेळ. आपल्या वसाहती असलेल्या देशांत त्यांनी तो आणला. स्थानिकांनी तो आपलासा केला.
- प्रतिमा जोशी
क्रिकेट हा मुळात इंग्लिश खेळ. आपल्या वसाहती असलेल्या देशांत त्यांनी तो आणला. स्थानिकांनी तो आपलासा केला. या ब्रिटिश वसाहतीतून पुढे स्वतंत्र झालेले भारत आणि पाकिस्तान हे दोन देश त्यापैकीच. खरं तर स्वातंत्र्याच्या बदल्यात एका सलग भूखंडाचे दोन देश निर्माण करणारे ब्रिटिशच. त्यांनी एक रेघ आखली आणि दोन देश आपसात कायम धुमसत राहिले. ज्यांची गुलामी झुगारून दिली, त्यांनीच आणलेला खेळ ही या दोन देशांच्या राष्ट्रभक्तीची जणू कसोटी ठरली. अलीकडे घडलेली घटना आणि त्यातून निर्माण झालेला तणाव अतिशय वेगळ्या स्वरूपाचा आणि म्हणूनच चिंताजनक आहे.
ब्रिटिशांनी जिथे जिथे राज्य केलं, त्या बहुतेक देशांत क्रिकेट रुजलं. क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ ठरला. इतका, की कधीकधी त्याला अटीतटीचं रूप येतं. विशेषतः भारत-पाकिस्तान असा सामना असेल तर जणू मैदानावर युद्धच चालू असतं. सामन्यातील हार-जित म्हणजे त्या त्या पूर्ण देशाचीच हार-जित जणू, असं वातावरण असतं. अगदी घरातला टीव्ही फोडण्यापासून ते रस्त्यावरील तणावापर्यंत परिस्थिती कितीही आणि कशीही चिघळू शकते.
मुळात हा इंग्लिश खेळ. आपल्या वसाहती असलेल्या देशांत त्यांनी तो आणला. स्थानिकांनी तो आपलासा केला, इतका की तो मूळ त्यांचाच होता. या ब्रिटिश वसाहतीतून पुढे स्वतंत्र झालेले भारत आणि पाकिस्तान हे दोन देश त्यापैकीच. पण खरं तर स्वातंत्र्याच्या बदल्यात एका सलग भूखंडाचे दोन देश निर्माण करणारे ब्रिटिशच! त्यांनी एक रेघ आखली आणि दोन देश आपसात कायम धुमसत राहिले.
ज्यांची गुलामी झुगारून दिली, त्यांनीच आणलेला खेळही या दोन देशांच्या राष्ट्रभक्तीची कसोटी ठरली. तो खेळ कमी आणि अस्मिता नि वैरभावनेचा आविष्कार अधिक, अशी स्फोटक वस्तुस्थिती तयार झाली. भारत-पाक सामन्यांदरम्यान तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना गेल्या ७५ वर्षांत घडल्या आहेत.
मात्र अलीकडे घडलेली घटना आणि त्यातून निर्माण झालेला तणाव अतिशय वेगळ्या स्वरूपाचा आणि म्हणूनच चिंताजनक आहे. प्राणांचे आणि त्यागाचे मोल देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दोन्ही देश साजरा करत असताना साडेसात दशकांनंतरही खेळ आणि राष्ट्रीय अस्मिता यांची फारकत करण्याची प्रगल्भता तर जाऊच दे, पण कुठं कसं व्यक्त व्हावं याचंही भान हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या देशबांधवांना राहत नसेल तर ती खरंच चिंतेची गोष्ट आहे.
गोष्ट आहे ब्रिटनमध्येच लिसेस्टर प्रांतात घडलेली. तारीख, २८ ऑगस्ट २०२२. निमित्त, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना. हा सामना संपल्यावर काही क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. थोडाफार कल्ला झाला. या धांदलीचा फटका एका शीख व्यक्तीला बसला. तिथं असलेल्या मुस्लिम व्यक्तीचं म्हणणं की, त्यांच्या विरोधातही घोषणा दिल्या गेल्या. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘घडलेला प्रकार किरकोळ होता, उगाच सारं अतिरंजित करून पसरवलं जात आहे’ अशी तक्रार काही हिंदू संघटनांनी केली. काही दिवसांनंतर हिंदूबहुल वस्त्यांमध्ये हल्ले होत असल्याचे आणि भगवा ध्वज खेचून काढत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. यातून परिस्थिती गंभीर होत गेली आणि तणाव वाढत गेला. मग अन्य प्रांतांत राहत असलेल्या अनिवासी भारतीयांना वाटलं की लिसेस्टरमधील आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी आपण काही तरी केलं पाहिजे. ते दर वीकेंडला लिसेस्टरमध्ये गोळा होऊ लागले. मग दुसऱ्या बाजूनंही हालचाली सुरू झाल्या.
त्यांनीही या जमावांचे फोटो व्हायरल करत चिंता व्यक्त केली. तिथंही तणाव निर्माण होऊ लागला. मग दोन्ही समूहांनी धार्मिक घोषणा देत रस्त्यांवर मोर्चे काढले. झेंडे खेचणं, जाळत असल्याचे व्हिडीओ फिरू लागले. दोन्ही बाजू राजकीय बनल्या, धर्मावर आधारित तणाव अधिक तीव्र झाला. परस्परांची निर्भर्त्सना झाली. पुढे तर मंदिरं आणि मशिदींवर हल्ले झाल्याच्या वार्ता पसरू लागल्या. हा सगळाच घटनाक्रम आता आंतरराष्ट्रीय रूप धारण करू लागला. लिसेस्टर पोलिसांनी वेगानं अटकसत्र सुरू केलं. आता या घडीला तिथं स्फोटक शांतता आहे.
या साऱ्या घटनाक्रमामुळं मूळ ब्रिटिश नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. परदेशातून लोक इथं त्यांची कौशल्यं आणि बुद्धिमत्ता जशी घेऊन येतात तशाच त्यांच्यातील उणिवा आणि दोषही घेऊन येतात, अशी भावना तिथं व्यक्त होत आहे आणि अशी भावना आपल्या भारतीयांबद्दलही त्यांच्या मनात उत्पन्न होणं ही खूपच अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक अशीच बाब आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश पत्रकार सनी हुंडाल म्हणतात, ही अशी तणावाची पहिलीच घटना नाही. असा तणाव आहे आणि तो अधिक चिघळत जाणार, कारण तसं व्हावं असा काही गटांचा हेतूच आहे आणि मी याकडं २०१९ पासून सतत लक्ष वेधत आहे, असं सनी यांचं म्हणणं आहे. ‘आपल्या’ लोकांचं रक्षण वगैरे व्हावं यासाठी गस्त घालणारं पथक रस्त्यावर उतरवणं म्हणजे ब्रिटनमधील कायदा-सुव्यवस्था यंत्रणेला एक प्रकारे आव्हान देण्यासारखंच आहे, असं त्यांनी म्हटलं आहे आणि ते तार्किकदृष्ट्या योग्यच आहे. २०२१ मध्ये लेबर पार्टीच्या काही खासदारांनीही ब्रिटनच्या भूमीत असा तणाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्या देशात कायमसाठी स्थलांतर करणाऱ्या भारतीयांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हे भारतीय त्यांच्या मायभूमीतील तणावसुद्धा इथं आणून इथल्या शांततेला आव्हान देत आहेत, असं या खासदारांचं म्हणणं आहे.
म्हणजे पाहा, खेळ ब्रिटिशांचा! त्यांचे पूर्वाश्रमीचे गुलाम देश तो खेळतात आणि त्यावरून त्यांच्यात सतत तू-तू मी-मी होतं... इतकं, की परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते. हे दोन्ही देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून आम्ही स्वातंत्र्य मिळवलं असं अभिमानानं सांगतात. या दोन्ही देशांतील लोक सुसंधी आणि सुबत्तेसाठी आपला देश सोडून याच ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होऊन ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारतात. आणि आपापल्या मायदेशाची अस्मिता जपत एका क्रिकेट सामन्यातील जय-पराजयावरून परस्परांना भिडतात. हे केवळ क्रिकेटपुरतं राहत नाही तर धार्मिक तणावाचं रूप घेतं. आणि हे घडतं कुठं? तर त्याच दस्तुरखुद्द ब्रिटनमध्ये! ज्या देशाच्या राज्यकर्त्यांनी जगाच्या नकाशावर हे दोन देश आणले त्या ब्रिटनमध्ये!
काय म्हणायचं याला? आम्ही भारताचे लोक स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात कुठं आणि कसं वागत आहोत? समोरच्याकडं बोट दाखवून आपल्यातली अप्रगल्भता आपण कशी लपवणार आहोत? कोणत्याही घटनेला दोन बाजू असतात... दोन काय, अनेक बाजू असतात, हे बरोबरच आहे... पण लंगडी बाजू आपली नसावी इतकी काळजी तर आपण घेऊ शकतोच. समोरच्याच्या चुकीच्या बाजू दुरुस्त करण्यासाठी असंख्य उपाय असू शकतात, याचं भान हरवायचं नाही हे तर करू शकतोच. आपल्याला मागच्या इतिहासात रुतायचं आहे की नवा इतिहास घडवायचा आहे, हे तर आपण ठरवू शकतो! समोरचा मागं जाऊ मागतो; पण आपल्याला पुढं जायचं आहे हे न विसरणं आपल्या हातात असू शकतं.
आपण भारतीय आहोत... आपल्याला हे सारं लक्षात ठेवावंच लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.