pravin tokekar
pravin tokekar 
सप्तरंग

माणुसकीचा बाग... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com

हिटलरच्या बॉंबफेकी विमानांनी माणसांची घरं उद्‌ध्वस्त केलीच; पण वॉर्सातलं प्राण्यांचं घरही सोडलं नाही. बॉंबहल्ल्यांत कित्येक प्राणी जळून मेले. कित्येक जायबंदी झाले. कित्येक पिंजऱ्यातून सुटून शहरात घुसले आणि नाझी सैनिकांची नेमबाजीची "प्रॅक्‍टिस' झाली. बिचारी मुकी जनावरं...माणूस नावाच्या प्रजातीनं हे काय आरंभलंय, हे त्यांना अर्थातच कळत नव्हतं. हकनाक मरण्या-मारण्याच्या शेकडो क्‍लृप्त्या या दोन पायाच्या जनावराकडे आहेत, हे त्या बिचाऱ्या प्राण्यांना कसं कळावं? मात्र, जिथं निष्कपट प्रेमाची सत्ता होती, त्या प्राणिसंग्रहालयाच्या उद्‌ध्वस्तामध्ये हलकेच एक माणुसकीची बाग फुलली. गपचूप. कुणालाही पत्ता लागू न देता... त्या माणुसकीच्या बागेची कहाणी 2017 मध्ये आलेल्या एका चित्रपटानं सांगितली होती. चित्रपटाचं नाव होतं ः "द झूकीपर्स वाइफ.'

बरोब्बर ऐंशी वर्षापूर्वी अशाच ऑगस्ट-सप्टेंबरात ते सगळं घडलं होतं. 17 ऑगस्ट 1939 रोजी हिटलरचा जर्मनी आणि स्टॅलिनचा सोव्हिएत रशिया यांनी अनाक्रमणाचा करार करून जगाला धक्‍का दिला होता. दोन बळिवंतांच्या या धूर्त चालीत बळी गेला तो पोलंडचा. करारावरची शाई वाळायच्या आत हिटलरच्या फौजांनी पोलंडचा घास घेतला. ती तारीख होती 1 सप्टेंबर 1939. राजधानी वॉर्साच्या तिठ्या-तिठ्यावर, चौका-चौकांत नाझी सैनिकांचा वावर दिसू लागला. रणगाडे फिरू लागले. शहराला ग्रहण लागलं. यहुद्यांची घाऊक गठडी वळण्याचा कार्यक्रम विनाविलंब सुरू झाला. म्हाताऱ्याकोताऱ्यांनासुद्धा मजुरीच्या कामाला जुंपलं जात होतं. पोलिश प्रतिकार अगदीच दुबळा होता. काही दिवसांत तो थंड पडला. आभाळात हिटलरची "स्टुका' विमानं घिरट्या घालू लागली. एका अटळ नष्टचर्याकडं पोलंड निघाला होता...
पिवळ्या-तपकिरी दगडी इमारतींचं वॉर्सा हे एक शांतपणे जगणारं एक आटपाट नगर होतं. नगराच्या मध्यवर्ती भागात एक दृष्ट लागेल, असं सुंदर प्राणिसंग्रहालय होतं. जगभरातले किती तरी प्राणी तिथं गुण्यागोविंदानं नांदायचे. सायबेरियन वाघ, ध्रुवीय अस्वलं, समुद्री सील, पेंग्विन्स, गरुड, मोर; मुंग्या खाणारं खवल्या मांजर, झेब्रे, हत्ती, ससे...किती तरी प्राणी. हिटलरच्या बॉंबफेकी विमानांनी माणसांची घरं उद्‌ध्वस्त केलीच; पण हे प्राण्यांचं घरही सोडलं नाही. बॉंबहल्ल्यांत कित्येक प्राणी जळून मेले. कित्येक जायबंदी झाले. कित्येक पिंजऱ्यातून सुटून शहरात घुसले आणि नाझी सैनिकांची नेमबाजीची "प्रॅक्‍टिस' झाली. बिचारी मुकी जनावरं...माणूस नावाच्या प्रजातीनं हे काय आरंभलंय, हे त्यांना अर्थातच कळत नव्हतं. हकनाक मरण्या-मारण्याच्या शेकडो क्‍लृप्त्या या दोन पायाच्या जनावराकडे आहेत, हे त्या बिचाऱ्या प्राण्यांना कसं कळावं?

जमिनीचा काही गुण असतो का? जिथं निष्कपट प्रेमाची सत्ता होती, त्या प्राणिसंग्रहालयाच्या उद्‌ध्वस्तामध्ये हलकेच एक माणुसकीची बाग फुलली. गपचूप. कुणालाही पत्ता लागू न देता... त्या माणुसकीच्या बागेची कहाणी 2017 मध्ये आलेल्या एका चित्रपटानं सांगितली होती. चित्रपटाचं नाव होतं ः "द झूकीपर्स वाइफ.' एरवी या चित्रपटानं कदाचित लक्ष वेधून घेतलंही नसतं. होलोकॉस्ट किंवा दुसऱ्या महायुद्धातली अमानुषता याचं प्रभावी चित्रण दाखवणारे खूप चित्रपट आहेत. त्यात आणखी एक भर, एवढंच या चित्रपटाबद्दल म्हणता आलं असतं; पण खरंच "सब घोडे बारा टक्‍के' या चालीवर "द झूकीपर्स वाइफ'ची गणना नगण्य चित्रपटांमध्ये नाही करता येत. एक तर हीसुद्धा एक खरीखुरी घडून गेलेली कहाणी आहे, हे कळल्यावर स्तीमित व्हायला होतं. माणुसकीचं हे आगळं दर्शन मन मोहवून टाकतं. "माणसापरास जंगली जनावरं बरी' असं एकीकडे वाटत असतं, आणि त्याच वेळी समोर माणुसकीचीच एक मनोहारी, जिवाला चटका लावणारी कहाणी उलगडत असते. माणूस म्हणून लाज वाटून घ्यायची की अभिमान? मन दुग्ध्यात पडतं.
या चित्रपटाला ऑस्कर-बिस्कर काही मिळालं नाही; पण सर्वसामान्य रसिकांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. विशेषत: युरोपात. तिथं आधीच प्राणिमात्रांबद्दल लळा थोडा जास्त. त्यात दुसऱ्या महायुद्धाच्या झळाही त्यांनाच जास्त लागल्या. कहाणी त्यांना अधिक आवडणं साहजिकच होतं; पण आपणही माणूस या प्रजातीतलेच आहोत, आणि अधूनमधून डोकं फिरल्यासारखे हिंस्र वागतोही. तेव्हा हा चित्रपट पाहणं आपल्या जाणिवांसाठीही गरजेचं आहे, असं वाटतं.
* * *

वॉर्सातली ती एक उन्हाळी सकाळ होती. पिवळ्यारंजन कोवळ्या उन्हात सारं काही न्हालं होतं. छोटुकला रिशार्ड पलंगावर गाढ झोपला होता आणि त्याच्या चिमुकल्या पायांशी सिंहाची दोन बछडी पहुडलेली. आईच्या मायेनं त्यांना गोंजारत अंतोनिनानं सज्जात येऊन नजर टाकली. वॉर्सा शहराचं भूषण असलेल्या या प्राणिसंग्रहालयाची अंतोनिना ही "आई' आहे. प्राणिसंग्रहालयाच्या आवारातच तिचं घर आहे. तिचा नवरा डॉ. यान झाबिन्स्की हा झूचा संचालक आहे. पेशानं प्राणीतज्ज्ञ. जनावरांचा डॉक्‍टर. प्राणीतज्ज्ञ म्हणून त्याचं नाव होतं; पण स्वभावानं अगदी साधा. निगर्वी. अंतोनिनाला तो "पुनिया' म्हणायचा. पुनिया म्हणजे पोलिश भाषेत छबूताई, बनूताई टाइप. कामाधामानिमित्त तो अनेकदा बाहेरगावी जायचा. तेव्हा अंतोनिनाच प्रेमानं सगळं बघायची. रिशार्ड ऊर्फ रीश जेमतेम साताठ वर्षांचा. त्याचंही बालपण प्राण्यांच्या सान्निध्यात छान चाललं होतं.

त्या प्रसन्न सकाळी अंतोनिनानं सायकलवरून झूची एक रपेट मारली. ""शुभ प्रभात मादाम!,'' प्राण्यांच्या पिंजऱ्यातून मैल्यानं भरलेल्या बादल्या वाहून आणणाऱ्या नोकरानं अदबीनं तिला सलाम केला. झूमधल्या कॅफेत दिवसभराची तयारी म्हणजे ग्लासेस, प्लेटी धुणं चाललेलं. दूर कोपऱ्यात तिचा नवरा हातात फावडं घेऊन शेणखताचा ढीग वरखाली करत होता. पुनियाकडे बघून तो मधुर हसला. तिनं आसपास नजर टाकली. ते चित्र तिला मनापासून आवडलं...

सुंदर सकाळ. तिला बघून पिंजऱ्यातली माकडं जागच्या जागी कुदली. झेबऱ्यांची जोडी उत्साहात आली. हरणांच्या कळपानं जाळीला नाकं लावली. कोल्हीणीनंही लाडात उड्या मारल्या. एक उंटाचं पिल्लू उगीचच तिडमिडत पळत गेलं. छोटे, निरुपद्रवी प्राणी बऱ्यापैकी वेळ तिथं मोकळेच हिंडत. पिल्लं तर खूपच. सकाळी दहाच्या सुमाराला झूचं फाटक उघडलं, की त्यांना त्यांच्या कुंपणात, पिंजऱ्यात धाडायचं. तेव्हा पर्यटकांचे लोंढे येत. शाळेच्या सहली येत. त्यांना प्राण्यांची माहिती द्यायला अंतोनिनासह सगळे तत्पर असायचे. काशिया आणि टेम्बो या हत्ती दाम्पत्याला भेटून अंतोनिनानं त्यांना फळं खायला घातली. काशियाचे दिवस अगदी भरत आलेत. कधीही बाळंत होईल, अशी टेकीला आलेली ही गजगामिनी. तिची काळजी घ्यायला हवी. त्याच रात्री झूच्या आवारातल्याच एका छोटेखानी पार्टीत तिला डॉ. लुट्‌झ हेक भेटले होते. त्यांच्याच स्वागताची पार्टी होती. जर्मनीतलं हे बडं प्रस्थ. बर्लिन झूचे सर्वेसर्वा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्राणीतज्ज्ञ. शिवाय हिटलरचे आवडते ढोर डॉक्‍टर! अंतोनिनाबद्दल त्यांना विशेष आकर्षण होतं.

""ओह, फ्राऊ अंतोनिना, किती दिवसांनी भेटतोय आपण! गेल्या वेळेपेक्षा जास्तीच सुंदर दिसता आहात!'' डॉ. हेक हा लोचट माणूस आहे; पण सध्या याच्या हातात झूच्या नाड्या आहेत. डॉ. हेकच्या बढाया ऐकून झाल्या. नंतर अंतोनिना पियानो वाजवत होती, तेव्हाच छोटा रिश धावत आला. म्हणाला ः ""मम्मा, काशियाला बाळ होतंय...चल लौकर!''
...हत्तीच्या कुंपणात मधोमध काशियाचं नवजात बाळ निचेष्ट पडलं होतं. टेम्बो उगीचच सोंड हलवत उभा होता. काशिया अस्वस्थ झाली होती. आपलं बाळ बाहेर येऊन हालचाल का करत नाही? "ए बाळा, उठ...उठ ना...' काशियानं त्या नवजाताला सोंडेनं ढकललं. धावत आलेल्या अंतोनिनानं पार्टी ड्रेसची पर्वा न करता बाळाची सोंड तपासली. त्याचा श्‍वास अडकला होता. महत्प्रयासानं तिनं गुदमरलेल्या बाळाचा श्‍वास मोकळा केला. काशियानं प्रेमानं तिला सोंडेनं कुरवाळली. जणू म्हणाली ः ""शाणी ग माझी बाय ती! तुझ्यामुळे माझं पोर वाचलं...'' डॉ. हेक यांना काही हा प्रकार आवडला नाही.
ही गोष्ट ऑगस्टमधलीच. बरोब्बर 1 सप्टेंबरला प्राणीसंग्रहालयावर बॉंबफेक झाली. अर्धेअधिक प्राणी होरपळून मेले, उरलेले तुटक्‍या पिंजऱ्यातून पळून गेले. सोनेरी उन्हासारख्या निवळशंख स्वप्नाची बघताबघता राखरांगोळी झाली.
* * *

बॉंबफेक थांबली. उरलेले प्राणी कसेबसे परत आणण्यात आले. वॉर्साची मसणवट झाली होती. यहुद्यांचे विशेष हाल होते. दूरच्या भागात यहुद्यांची छावणी उभी केली गेली. गावातले सगळे यहुदी तिथं डांबले गेले. प्राणिसंग्रहालयातले वाघ, सिंहाचे बछडे शहराच्या गल्लीकुच्यांमध्ये हिंडले. काहींना जिवंत पकडून आणलं गेलं. काहींची कलेवरं आणून पुरण्यात आली.
मॉर्शी फ्रॅंकेल आणि माग्दा ग्रॉस हे दोघंही झाबिन्स्की कुटुंबाचे जुने स्नेही. दोघंही यहुदी. एका संध्याकाळी ते यान आणि अंतोनिनाकडे आले. ""यान, मित्रा आपण लहानपणापासूनचे दोस्त आहोत. एक छोटंसं मागणं आहे. आम्हा ज्यू लोकांचं काही खरं नाही...कधीही जाऊ. गोळी खाऊन वर तरी, नाही तर त्या भयानक छावणीत...'' फ्रॅंकेल अवघडून बोलत होता. शेजारी डोळे गाळत माग्दा बसली होती.
""असं औपचारिक का बोलतोस मॉर्शी?..बोल, काय करू मी तुझ्यासाठी?'' यान मन:पूर्वक म्हणाला. ""मी कीटकांचा संग्रह करतो, हे तुला माहीत आहे. हा खजिना काही दिवस तुझ्यापाशी ठेवशील का?'' फ्रॅंकेल म्हणाला. याननं अर्थातच "हो' म्हटलं. रात्री झोपताना अंतोनिना म्हणाली ः ""कीटकच का? माग्दा राहिली आपल्याकडे तर? कुणाला कळणार आहे?''
..."अंतोनिनाला दुनिया कुठे चाललीये, त्याची जाणीव नाही. बाहेर परिस्थिती खूप बदलली आहे. नाझींच्या नकळत यहुद्यांना लपवण्याची मजाल आहे कुणाच्यात? निदान आपल्यात आहे? कुठं कळलं तर गोळी घातली जाईल... पण आपल्या दोस्तांना असं मरू द्यायचं? आपलीच माणसं मारणारं हे कसलं दळभद्री युद्ध?...' यान झाबिन्स्कीच्या मनात विचारांची खळबळ माजली.
* * *

अंतोनिनावर आशिक झालेल्या डॉ. लुट्‌झ हेकचे प्राणिसंग्रहालयातले हेलपाटे वाढत चालले. तो खुळ्यासारखा येऊन गूळ काढत बसायचा. प्राणिसंग्रहालयात फारसे प्राणी उरलेच नव्हते. तिथं सोयीसुविधा बऱ्या होत्या, म्हणून जर्मन फौजेच्या पलटणीनं चक्‍क मुक्‍कामच टाकला होता. यान घरी नाही, हे बघून एक दिवस डॉ. हेक घरात आला. ""अंतोनिना, तुझं दु:ख मला कळतं. पण मी तरी काय करू? हे प्राणिसंग्रहालय बंद करण्याचा निर्णय झाला आहे. प्राणी मारून टाकणार आहेत...'' डॉ. हेक म्हणाला.
""हे...हे...भयानक आहे...काही मार्ग काढता आला असता,'' अंतोनिना कसंबसं म्हणाली. "" म्हणूनच आलोय...तुझे काही दुर्मिळ प्राणी मी बर्लिनला घेऊन जातो. युद्ध संपलं, की परत आणून देईन. दोस्तांच्या फौजा टुकार आहेत, हिटलर झटक्‍यात जिंकेल हे युद्ध. काही काळजी करू नकोस. शेवटी मित्र कशासाठी असतात?,'' डॉ. हेकनं प्रस्ताव ठेवला. अंतोनिनाला समाधान वाटलं. अर्थात डॉ. हेकचा इरादा नेक नव्हता. वाघ, सिंह वगैरे मोठे प्राणी त्यानं ट्रकमध्ये घालून नेले. बाकीच्यांना चक्‍क गोळ्या घातल्या गेल्या.
* * *

गावाबाहेर दूरवर यहुद्यांची छावणी होती. थंडी वाढत चाललेली. खायला अन्न पुरेसं नाही, पांघरुणं नाहीत. किडा-मुंगीसारखी माणसं मरत होती. काहींची यातनातळांवर रवानगी होत होती. झाबिन्स्की कुटुंबाचे कितीतरी संपन्न मित्र आता त्या छावणीत आश्रिताचं जीवन जगू लागले. म्हातारी माणसं रस्त्यात मरून पडत. बाकीच्यांना मजुरीला जुंपलं जाई. तरणीताठी पोर तर बाहेर पडू शकत नसे...
अंतोनिनानं हट्टानं माग्दाला बोलावून घरात दडवून ठेवलं होतं. ती छळछावणीपासून वाचली. कुणालाही पत्ता लागला नाही. त्यानं यान आणि अंतोनिनाची भीड चेपली. याननं तर भयंकर धाडस केलं. जर्मन फौजांसाठी पोर्क, हॅम खूप लागतं. प्राणिसंग्रहालयाच्या मोकळ्या जागेत डुक्‍करपालन सुरू करता येईल, असं याननं डॉ. हेकला सुचवलं. डॉ. हेकनं ताबडतोब पन्नास-शंभर डुकरं आणून प्राणिसंग्रहालयाच्या रिकाम्या पिंजऱ्यात आणून टाकली. सोबत बायसनची एक जोडी आणून टाकली. बायसनचा संकर घडवून "ओरॉक्‍स' ही सशक्‍त महिष प्रजात पुन्हा निर्माण करण्याचा त्याचा शास्त्रोक्‍त खटाटोप सुरू होता. ओरॉक्‍स हे जर्मन संपन्नतेचं प्रतीक मानलं जायचं. एकेकाळी युरोपात मोठ्या प्रमाणावर असलेली ही महिष प्रजात आता नामशेष झाली आहे. जबरदस्त संशोधनाअंती "ओरॉक्‍स'चं पुनरुज्जीवन करून हेर हिटलरची मर्जी संपादन करण्याचा डॉ. हेकचा अंतस्थ हेतू होता. शिवाय या नव्या प्रकल्पामुळे अंतोनिनाचा सहवासही आपोआप वाढला असताच!
डॉ. हेकच्या अंतस्थ हेतूला खतपाणी घालत यान आणि अंतोनिना या जोडप्यानं आपलाही एक अत्यंत धाडसी बेत आखला. याच धाडसासाठी झाबिन्स्की दाम्पत्य पुढं आंतरराष्ट्रीय कीर्तीला पात्र ठरलं.
* * *

डुकरांसाठी सडकीकुजकी फळं, टाकाऊ अन्नपदार्थ असा ओला कचरा आणण्याच्या मिषानं यान झाबिन्स्की ट्रक घेऊन यहुद्यांच्या छावणीत जायचा. त्याला तिथं जाण्याची मुभा होती. या ओल्या कचऱ्याच्या ढिगाखाली तरुण यहुदी पोरं दडवून आणण्याचा सपाटा यान झाबिन्स्कीनं लावला. या थरारक सुटकेनंतर तरणेताठे एका छुप्या बोगद्याच्यामार्गे वॉर्सातून पळ काढायचे. त्यांची अन्यत्र सोय लागेपर्यंत यान आणि अंतोनिना त्यांना आपल्या घराच्या तळघरात दडवून ठेवायचे. तिथं अंतोनिना त्यांची काळजी घ्यायची. एरवी डॉ. हेकची हेकेखोर, कामुक छेडछाड सहन करायची. त्याला बेसावध ठेवण्यासाठी प्रसंगी त्याच्या घाणेरड्या स्पर्शांनाही सहन करायचं. त्याला आपल्या तळघरातील यहुदी लोकसंख्येची चाहूलही लागू द्यायची नाही, या उपक्रमात अंतोनिनाचं रक्‍त आटत होतं. यान शेवटी नवरा होता, सगळं समजत असूनही डॉ. हेक आणि अंतोनिनाचं सान्निध्य बघून त्याची तडफड व्हायची; पण इलाजही नव्हता.
यहुद्यांच्या छावणीत ट्रक नेताना तो डुकराचं थोडं मांस घेऊन जाई. तिथल्या यहुदी मित्रांना गपचूप देई. जाताना मुद्दाम छोट्या रिशार्डला घेऊन जाई. पोरगं बघितलं, की नाझी सैनिकांची तपासणी थोडी ढिली पडायची.
...अशी यहुदी जिवांची विधायक तस्करी करत यान आणि अंतोनिनानं तब्बल तीनशेहून अधिक यहुद्यांना जीवदान दिलं. माणुसकीची बूज राखली. ते सगळं त्यांनी कसं घडवून आणलं, हे समजून घेण्यासाठी "द झूकीपर्स वाइफ' हा चित्रपट बघणं क्रमप्राप्त आहे.
* * *

डायान अकेरमन या नामवंत पत्रकार, लेखिका आणि निसर्गप्रेमी. पोलंडच्या रानात छोट्या घोड्यांची एक जात आढळते, असं कळल्यामुळे त्या तिथं गेल्या होत्या. तिथं एका सहायकानं त्यांना झाबिन्स्की झूबद्दल माहिती दिली. अंतोनिना झाबिन्स्का (विवाहिता असल्यानं झाबिन्स्की या आडनावाचं झाबिन्स्का असं उच्चारण पोलिश भाषेत होतं...) यांनी लिहिलेल्या डायऱ्या खूप वर्षांपूवीं पोलिश भाषेत प्रसिद्ध झाल्याच होत्या. "माणसं आणि जनावरं' असं त्यांच्या पुस्तकाचं सुबोध शीर्षक होतं. अंतोनिना झाबिन्स्की यांचं निधन 1971 मध्येच झालं होतं. त्यानंतर तीनच वर्षांनी यान झाबिन्स्कीदेखील निवर्तले होते. अंतोनिनाच्या डायऱ्या वाचून अकेरमनबाई अस्वस्थ झाल्या. याची कादंबरी करावी का, असाही विचार अकेरमनबाईंच्या मनात आला; पण उगीच काल्पनिकाची फोडणी देऊन आशयाची माती करू नये, असं वाटल्यानं त्यांनी सरळ भाषेत अंतोनिना आणि यान झाबिन्स्की दाम्पत्याची सत्यकहाणी 2007मध्ये सांगून टाकली. झाबिन्स्कींना ओळखणारे काही जण पोलंडमध्ये हयात होते. त्यांच्याशीही त्या बोलल्या. मग त्याचं पुस्तक निघालं. नाव होतं "द झूकीपर्स वाइफ.' हेच.

त्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा स्त्रीकेंद्रित आहे. ती कहाणी सांगितली डायान अकेरमन या लेखिकेनं. याचा चित्रपट करायचा निर्णय घेतला तो निकोला जीन ऊर्फ निकी कॅरो या सुजाण दिग्दर्शिकेनं. चित्रपटाची पटकथा अँजेला वर्कमन या लेखिकेनंच लिहिली. मध्यवर्ती भूमिका पार पाडली जेसिका चॅस्टेन या नावाजलेल्या अभिनेत्रीनं...असा हा सगळा मामला आहे. हुशार बायकांच्या एका प्रतिभावान टोळीनं उभं केलेलं हे पडद्यावरचं गारुड भल्याभल्यांना थक्‍क करतं. या चित्रपटाच्या निर्मितीत स्त्रियांचा सहभाग खूपच मोठा आहे, हे श्रेयनामावली बघून कळतं. हा चित्रपट बघून दिग्दर्शिका निकी कॅरो यांना थेट डिस्नी कंपनीनं बोलावून पुढल्या चित्रपटाची गोष्ट त्यांच्या हातात सोपवली आहे, म्हणजे बघा.
यान आणि अंतोनिनाच्या धाडसी कृत्याची इस्राईल सरकारनं कृतज्ञतापूर्वक नोंद घेतली. त्यांना "राइटिअस अमंग द नेशन्स' हा मानाचा किताब बहाल केला. त्यांच्या नावे इस्राईलच्या मरुभूमीत एक झाड लावलं. यानच्या नावानं तर आजही वॉर्सातला एक हमरस्ता वर्दळीनं वाहतो आहे. वॉर्सातलं ते प्राणिसंग्रहालय आजही पर्यटकांची गर्दी खेचत असतं. निष्कपट प्राण्यांच्या पिंजऱ्यासोबतच तिथं यान आणि अंतोनिनाचं घर जतन करून ठेवलेलं आहे. तिथंच त्यांनी निरपराध यहुद्यांना मृत्यूपासून दडवून ठेवलं होतं...
...हा काही नुसता "राणीचा बाग' नव्हे. हे आता मानवतेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT