Habit
Habit 
सप्तरंग

सवय

राहुल नार्वेकर saptrang@esakal.com

जीवनात यशस्वी होण्याची मोठी स्वप्न पाहणार्‍या माझ्या मित्र, मैत्रिणींनो, ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून सुरू झालेल्या या सदरामुळं स्टार्टअप विश्‍वाची आम्हांला ओळख होतेयं, प्रोत्साहन मिळतेयं, दिशा कळतेयं असे असंख्य ई-मेल मला आले. यात अनेकांनी विचारले होते की, त्यांच्याकडं स्टार्टअप सुरू करण्यासाठी नवी आयडिया, नियोजन, टीम, पैसा आदी सर्व गोष्टी आहेत, तरीही त्यांना हवे तसे यश मिळत नाही, असे का होते? तर आजच्या सदरात आपण यावरच चर्चा करणार आहोत. गेली अनेकवर्ष मी उद्योगजगतात वावरत असल्याने आतापर्यंत छोटेसे स्टार्टअप सुरू करणार्‍यापासून बिलेनिअर्सला भेटत असतो. यामुळं एक गोष्ट लक्षात आली आहे की, याचा ठोस असा फॉम्यूला वगैरे काहीच नसतो किंवा अमुक एक व्यक्ती खूप हुशार आहे, म्हणूनच तो यशस्वी झाला, असंही काही नसतं. मात्र यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान आढळून आली ती म्हणजे त्यांच्या सवयी! 

आपल्याकडे एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...याचा अर्थ नेमका काय आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाचं दैनंदिन आयुष्य म्हणजे असंख्य सवयींची गोळाबेरीज असते. आयुष्याला जो चांगला किंवा वाईट आकार येतो, जे वळण लागते त्याचे मूळ सवयींमध्ये असते. आयुष्यात यशस्वी होणार, की अयशस्वी हे सवयींमधून घडते.

छोट्या छोट्या सवयींचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यामुळे कायमस्वरूपी बदल होतो. आपल्यापैकी बरेच लोक स्वतःला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून खरंच जागृत असतात. म्हणून तुम्ही किती प्रतिभावान आहात यापेक्षा तुमच्या सवयी काय आहेत? यावर ठरते की तुम्ही यशस्वी होणार का अपयशी!

आर्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे. पण प्रत्येकाला आयुष्यात यश मिळते असे नाही. चाणक्यनिती असे सांगते की यशस्वी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये काही चांगल्या सवयी असणं फार महत्त्वाचे आहे. चांगल्या सवयीशिवाय जीवनात यश मिळत नाही. याचं एक चांगलं वैशिष्ट म्हणजे, आपण म्हणतो की, टॅलेंट इनबॉर्न असते पण सवयी आपण कधीही स्वत:ला लावू शकतो. माझा वैयक्तिक अनुभव आहे की, मी जेंव्हा मुंबईच्या चाळीमध्ये राहत होतो. तेंव्हा तेथे अनेकांना ‘भाई’ बनायचे होते. यामुळे अनेकजण जीममध्ये जाऊन बॉडी तयार करत होते. मात्र त्याकाळी माझ्याकडे जीममध्ये जाण्यासाठीही पैसे नव्हते. लहानपणापासून मला पुस्तकं वाचण्याची प्रचंड आवड होती. पुस्तकं खरेदीसाठी पैसे नसल्याने मी एका रद्दीवाल्याशी मैत्री केली होती. वेळ मिळाला की त्याच्या रद्दीच्या दुकानात जावून मी तासनंतास विविध मासिकं, पुस्तकं वाचायचो. या पुस्तकांमुळेच मी चाळीतून व चाळीच्या मानसिकतेमधून बाहेर पडलो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुस्तकांमुळं माझी विचारसरणी बदलली, माझी इंग्रजी भाषेवर पकड आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इंटरेस्टींग व्यक्ती बनलो. याचीही मोठी गंम्मत आहे. इंटरेस्टींग व्यक्ती म्हणजे कॉलेजमध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असल्याने अनेकजण मला कॅन्टींगमध्ये घेवून जायचे, तिथं माझ्या वडापाव, सामोसा व शीतपेयाचा खर्च ते उचलायचे. मी बोलत असतांना त्यांना मजा यायची. पुढे मला लोक चर्चेसाठी बोलवायला लागले. हे सर्व झालं ते पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळं... 

यासाठी प्रत्येकानं वाचायलाच हवे (फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवरचे  फॉरवर्डेड मेसेज नव्हे) या ठिकाणी वाचन म्हणजे सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्र वाचन नव्हे तर अशा पुस्तकांचं आपण रोज सकाळी वाचन केलं पाहिजे ज्यामुळे आपल्या मध्ये नवीन सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.

पुस्तकं वाचताना या गोष्टीची नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे की अशी पुस्तकं वाचण्यामुळं तुमच्यामधील विचार करण्याची सवय वाढीस लागेल. तुम्हाला त्या वाचनामधून काहीतरी सकारात्मक घेता येईल अशीच पुस्तकं नेहमी वाचावीत. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे, आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्या उठल्या जगभराचं टेन्शन घ्यायची सवय असते. काहीजण सकाळी उठले की लगेच पेपर घेऊन बसतील किंवा सकाळी मोबाईलवरती बातम्या पहात असतील. अशामुळे तुम्ही प्रतिक्रियेच्या पवित्र्यात जातात. परिणामी तुमची सर्जनशीलता संपते. 

यासाठी सकाळी उठल्यावर किमान अर्धातास तुम्ही शांतता अनुभवायला हवी. यात अनेक प्रकार आहेत, प्राणायाम करा, योगासन करा, मेडिटेशन करा अगदी काहीही करा. पण सकाळी टेन्शन न घेता अर्धा तास शांतपणे आपल्या दिवसाची सुरुवात करा. जर आपण यशस्वी लोकांचा दिवसक्रम पाहिला तर ते कधीही सकाळी उठल्यावर डोक्यावर जगाचे टेन्शन न घेता त्यांच्या दिवसभराचे प्लॅनिंग करतात.

तुम्हीही हे सहज करु शकता, सकाळी ऑसम डे चा विचार करा, पहिला एक तास तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा घ्या. हाच प्रयोग रात्री झोपतांनाही करा. झोपण्याआधी किमान एक तास मोबाईल पासून दूर रहा. मी देखील असेच करतो. रात्री झोपण्याच्या आधी १५ मिनिटे आज दिवसभरात काय केले याच्या नोंदी करा व उद्या काय करणार आहोत याचेही बुलेट पॉइट्स काढा. 

ज्या विषयाबद्दल तुम्हाला अडचण आहे, मनात गोंधळ आहे, द्विधा मनःस्थिती आहे ते, सगळं कागदावर लिहून काढा, अनेकवेळा त्याचे उत्तर तुम्हाला सकाळी सकाळी उठल्यावर मिळेल ! हे करत असतांना एक अजून महत्त्वाची गोष्ट करा, स्वत:ला सकारात्मक लोकांमध्ये सामावून घ्या. 

आपली ज्या विविध कारणांसाठी प्रशंसा करतात व योग्य मार्गदर्शन करतात त्या लोकांशी मैत्री करा. आपण नवीन मित्र बनविता तेव्हा स्वत: ला विचारा की ती व्यक्ती आपल्याला प्रेरणादायक, सकारात्मक आणि आत्मविश्‍वास वाढवणारी बनवेल का? कधी कधी असा स्वार्थी विचार करण्याची आवश्यकता असते. जीवनात स्वत:चे फिल्टर लावायला शिका, कॅटगिरी करा. जे लोकं तुम्हाला प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात त्यांना जवळ करा व जे खाली खेचतात, निगेटिव्ह वातावरण निर्माण करतात त्यांना स्वत:च्या विचारांमधून डिलीट करा. अशा लोकांना सोशल मीडियावरही ब्लॉक करा. मित्रांनो, तुम्ही म्हणजे तुमच्या सवयी आहात, तुमचे व्यक्तिमत्व असे बनत जाते, जशा तुमच्या रोजच्या सवयी असतील. श्रीमंत लोक स्वतःला काही विशिष्ट सवयी लावून घेतात म्हणून ते अजून श्रीमंत आणि यशस्वी बनत जातात. श्रीमंत लोक मोठी स्वप्ने बघतात, ते प्रत्यक्षात कसं येईल, त्याचं बारकाईनं नियोजन सुद्धा करतात, आणि एवढं करुनही अपयश आलंच तर निराश अजिबात होत नाहीत, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्तीमध्ये एक उच्च प्रतीचा आत्मविश्‍वास असतो.

जेव्हा तुम्ही साधारण परिस्थितीत असता, जेव्हा लोक तुमच्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत, त्यांना वाटेल तुम्ही अपयशी आहात, तेव्हा भविष्यात श्रीमंत होण्यासाठी स्वतःवर विश्‍वास ठेवणं, अत्यावश्यक असतं. अशा वेळी रोज स्वतःशी बोलण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमच्या सेफ झोनमधून बाहेर पडावं लागेल. स्वप्नातलं आयुष्य जगण्यासाठी आळस कमी करावा लागेल. दहा ते पाच काम करण्याची मानसिकता असणारे, मोजून मापून काम करणारे लोक यशस्वी कसे होऊ शकतात, याचा ज्याने त्याने आपापल्या परीने विचार करावा. शेवटी मी वाचलेला व मी देखील फॉलो करत असलेला वॉरेन बफे यांचा एक नियम तुम्हाला सांगतो. वॉरेन बफे म्हणतात की, तुम्हाला लाईफमध्ये जे करायचे आहे त्याची आधी लिस्ट करा व त्यातील पहिल्या पाच गोष्टींवर फोकस करा. मित्र, मैत्रिणींनो तुमच्या सवयीच तुम्हाला बदलू शकतात. तर चला मग याची सुरुवात आजपासूनच करुया...ऑल द बेस्ट!

(सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक व विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT