- रविंद्र धुरजड
आपण जगण्यासाठी उपयुक्त असे इतर काही करत नसलो, तर दर १३ सेकंदाला मोबाईलचा स्क्रीन बघतो असे एक संशोधन सांगते. म्हणजे मग एकदा स्क्रीन बघितला की काही तरी करायलाच हवे या भावनेतून अनेक विकृती जन्माला आल्या आहेत.
एक माझा गावाकडचा मित्र आहे. अमरावतीला असतो तो आणि आजकाल सायकलिंग करतो. (सायकल एकोणतीस हजार सहाशे रुपये, हेल्मेट बाराशे तीस रुपये, रिबॉकची शॉर्टस एकोणीसशे नव्व्याण्णव रुपये, आयपीएलची मॅच बघायला गेला असतानाचे मुंबई इंडियनचे फुकट मिळालेले निळे टी-शर्ट असा बडेजाव असतो.) खूप लांब जातो.
त्याचे सायकलिंग झाले की शरीरावरून निथळणाऱ्या घामाच्या धारांची पर्वा न करता किंवा घामेजल्या हातांनी मोबाईल हाताळतांना तो खराब झाला तरी चालेल, अशा हिमतीने सेल्फी काढतो आणि काढलेला सेल्फी कधी व्हाट्सॲपवर टाकतो, असे त्याला होऊन जाते. या धडपडीत सायकल पडते. हेल्मेट तिरपं होतं. आजूबाजूचे लोक थांबून बघतात की काही विपरीत तर घडले नाही ना!
रेंज नसली आणि सेल्फी सेंड झाला नाही की त्याला कसंनुसं होतं. मग तो सायकल घेऊन पहिले रेंजमध्ये येतो. फोटो सेंड झाला आणि व्हॉट्सॲपवर दोन निळ्या टिकमार्क दिसल्या की त्याचा आत्मा शांत होतो. एका बोलावलेल्या कारच्या मागे सायकली लटकवून परतीचा प्रवास सुरू होतो. सायकल चालवणे हे शारीरिक आरोग्यास एकदम छान आहे.
दीर्घ आणि दर्जेदार शारीरिक आयुष्य जगायचे असेल तर ते अभिनंदनीय आहे; पण आमच्या या मित्राच्या सायकल ‘सेल्फी''ला मी लाईक केले नाही तर त्याला राग येतो, तो अस्वस्थ होतो आणि मग तो मला फोन करतो. ‘काय यार इतके किमी सायकल चालवली, त्याचे फोटो टाकले तरी तू लाईक करत नाही’ अशी तक्रार तो करतो.
आपण चालवलेल्या सायकल एक्सपेडिशनचे कौतुक सर्वांनी करावे असे का वाटावे? शिवाय या एक्सपेडिशनचे फोटो टाकण्याची घाई किंवा इच्छा यामागे निश्चित अशी काय प्रेरणा आहे? हे प्रश्न जर ‘विक्रमादित्याला’ वेताळाने ‘चांदोबा’च्या काळात विचारले असते तर नक्कीच त्या ‘विक्या’(विक्रमादित्यचा शॉर्ट फॉर्म)ला उत्तर आले नसते. त्याच्या डोक्याची शंभर शकले वेताळाच्या पायाखाली लोळण घेत असल्याचे दृश्य टिपण्याची वेळ चांदोबाच्या प्रकाशकावर आली असती.
थोडक्यात काय तर वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे आजकाल आवडीचे झाले आहे. वैयक्तिक काहीही छोटंमोठं फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर टाकणे ही मानसिक गरज झाली आहे. एक आमचा मित्र सहपरिवार चीनला गेला होता. अर्थातच घराला कुलूप लावून. चुपचाप फिरावे, यांग-चिंग-चू करावे, चायनामध्ये जाऊन चायनीज खावे इथपर्यंत ठीक आहे. पण गड्याने फोटो टाकले ना एफबीवर!
‘टुडे वि आ इन शांघाय’, ‘वि आ ष्ट्यँडिंग ॲट तिनानमेन स्क्वेयर’ असे फोटो एका टेक्नो-सॅव्ही चोराने फेसबुकवर बघितले अन् इकडे भारतातलं त्याचं घर पूर्ण साफ केलं. पोलिसांनी चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की या पिंटूने चायना एन्जॉय करण्याऐवजी तिथली प्रत्येक मोमेंट ही भारतातल्या लोकांना त्याच्या चायना टूरबद्दल असूया वाटावी, यासाठी फेसबुकवर शेयर केली होती. चोर त्याच्या घरात चोरी करताना इतके रिलॅक्स होते की पोलिसांना ते लोक स्वयंपाक करून यथेच्छ जेवून, चोरी करून गेल्याचं दिसलं.
कुटुंबातल्या एखाद्याचं प्रेरणादायी कार्य, उत्तुंग यश, सुखद अनुभव, दुःखावेग, माहितीपूर्ण असं कंटेंट असं किंवा सार्वजनिक उपयोगाचं काहीही असलं, तर ते समूहावर शेयर करणे वाजवी आहे आणि समर्थनीयसुद्धा आहे. पण ‘मी सध्या इथे आहे’, ‘आय एम एन्जॉइंग’, ‘आय एम डुईंग सो अँड सो’ असं सकाळपासून लोकांना सांगायची काही गरज नसते.
जे लोक लाईक देतात किंवा इमोजी वापरून प्रतिक्रिया देतात त्यांना हे फोटो वगैरे आवडलेले असतातच असे नाही. अंगठे वर केले एकदाचे की या अतिउत्साही कार्यकर्त्याचा ‘कंडू शमेल एकदाचा’ अशी खात्री त्यामागे असते. आपल्या हातात मोबाईल असला म्हणजे सेल्फी काढलाच पाहिजे, आलेली पोस्ट फॉरवर्ड केलीच पाहिजे, दुसऱ्याच्या घरी मयत किंवा अंतिम संस्कार चाललेले असले तरी आपण आपलं आता जे काय चाललेलं असेल ते पोस्ट केलंच पाहिजे अशी ‘फॉरवर्डी संस्कृती’ आता जोर धरू लागली आहे.
पूर्वी घरातली गोष्ट घरातच राहत असे, भांडणे, रुसवे-फुगवे, आंतरिक कलह हे बाहेर येत नसत किंवा तसे संस्कारच जाणीवपूर्वक केले जात असत. आत्ताच्या काळात तर घरच्या भांडणाचे व्हिडीओ, किंवा घरच्या भांडणामुळे मी आत्महत्या करत आहे, असा आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओही अनेकांनी बघितला असण्याची शक्यता आहे.
आपण जगण्यासाठी उपयुक्त असे इतर काही करत नसलो, तर दर १३ सेकंदाला मोबाईलचा स्क्रीन बघतो असे एक संशोधन सांगते. म्हणजे मग एकदा स्क्रीन बघितला की काही तरी करायलाच हवे या भावनेतून अनेक विकृती जन्माला आल्या आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्याचा बाजार मांडणे ही त्यापैकीच एक विकृती असावी कदाचित.
दुसरी विकृती म्हणजे कुठलीही घटना कुठेही घडत असो, त्या घटनेचे चित्रीकरण करणे व शक्य तितक्या लवकर ती फॉरवर्ड करणे. संकटात पडलेल्यांना वाचवणे किंवा मदत करणे सोडून जर कोणी चित्रीकरण करत असेल, तर या विकृतीचे समर्थन कसे करता येईल? काही ‘व्हाट्सॲपी’ हे मोबाईलवर आलेला प्रत्येक मेसेज पाठवण्यासाठीच ईश्वराने या धरतीवर आपल्याला पाठवले आहे.
या आविर्भावात मेसेज पूर्ण न वाचता किंवा त्याचे परिशिलन न करताच पुढे पाठवतात. ‘माझी बायको बाळंत झाली, आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. आपला आशीर्वाद असू द्यावा,’ असा आलेला मेसेजसुद्धा खाली आपले नांव टाकून फॉरवर्ड करणारे महाभाग आहेत. स्व हा प्रत्येक बाबतीत घुसवलाच पाहिजे, ही ती नंतरची विकृती होय.
कृत्रिम सृजनशीलतेला उत्तेजन देणारे भरपूर ॲप्स उपलब्ध झाल्याने फॉरवर्डी संस्कृतीला तर अक्षरशः ऊत आला आहे.
जैसे प्राप्तची जाहले...
तयात अपुले मिसळीले...
पाठवून पुढती दिधले..
अती आनंदे.
अशा वृत्तीने आपले स्व त्यात टाकले की क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो. सेल्फी लोकप्रिय होण्याचे मूळ कारणच हे आहे. स्वतःचे जे काही असेल ते टाका मोबाईलवर, असा ‘सेल्फी’चा विस्तृत अर्थ आहे. स्मार्टफोन आल्यानंतर जन्मलेल्या एखाद्याने किंवा एखादीने जर वयस्क झाल्यावर गुगल केलं तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याची ‘ट्रेल’ त्यांना नक्की सापडेल. कारण त्यांचे डिजिटल आईबाबा आणि ते स्वतः ‘वायफायच्या पुढचे लायफाय’ असणार आहेत.
सेल्फी‘श’ मधला ‘श’ भाषिक दृष्टीने काढलेला असला तरी ‘स्वार्थी भावना’ त्यात तशीच उरलेली आहे. स्वतःचं जोपासलेलं आयुष्य लोकांच्या ताटात त्यांची इच्छा नसताना का परोसतात, हे कळत नाही. सणवार आणि महनीय लोकांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या यावेळी शुभेच्छा देताना पण यांचा स्व इतका जागृत असतो की यांचा टेम्प्लेटमधला फोटो त्या महनीय विभूतींपेक्षा मोठा म्हणजे ‘लार्जर दॅन लाईफ साईज’ असतो.
ते बिचारे महान लोकं त्याच फोटोत उजवीकडील वरच्या कोपऱ्यात जीव मुठीत घेऊन केविलवाण्या नजरेने आपल्याच विचारधारेपासून हा गंपू किती प्रवाहपतीत झाला आहे हे उद्विग्न होऊन बघत असतात.
अतिशय शांतपणे स्वतःत रमलेला आणि निस्सीम आनंद घेणारा माणूस आता हरवला आहे. व. पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे माणूस गर्दीत हरवत नाही, तो एकटा असला म्हणजे हरवतो. या जगात आता माणूस इतका हरवला आहे की स्वतःला शोधण्यासाठी त्याला असं टुकार, सामान्य, स्वतःच्या फायद्याचं काम केलं तरी जगाला सांगावंसं वाटतं. मग कोणी हे कर्तृत्व लाईक केलं तरच तो स्वतःला सापडतो आणि त्याला हायसं वाटतं.
त्याला ‘खुद से मुलाकात’ झाल्याचं केवलज्ञान होतं. नाही तर तो अस्वस्थ होतो आणि मिसिंग असल्यासारखा वागतो. माझ्या पोस्टला लाईक का केलं नाही? मी काय इतका ‘हा’ आहे का? माझी तर किंमतच नाही.. वगैरे वगैरे. याउलट चार-दोन लाईक मिळाले की ‘तयाचा वेलू गेला गगनावेरी’वालेसुद्धा आहेत. त्यांना भावनाहीन आणि फॉर्म्यालिटीवाले लाईक्स आले तरी आपण कर्तृत्वान असल्याचा कोण आनंद होतो.
स्वतःलाच वा वा म्हणत आतल्या आत गुदगुल्या करून घेत पुढच्या पोस्ट फॉरवर्ड करायला ते जोमाने तयारीला लागतात. या आभासी जगात आनंद किंवा दुःख किती सवंग करून घेतलं आपण. क्षणकाल टिकणाऱ्या प्रसिद्धीचा मोह, या अफाट जगातल्या इतकुश्या ‘मी’ला अनाठायी ओळख देण्याचा फसवा प्रयत्न, आणि ही ओळख फसव्या इमोजीच्या माध्यमातून दृढ करण्याचा हट्ट. खरोखर आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ आहोत का, असा प्रश्न पडतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.