द. मा. मिरासदार sakal news
सप्तरंग

माणसांची दुनिया उभारणारा साहित्यिक

द. मा. मिरासदार यांनी आपल्या कथांद्वारे ग्रामीण जीवनातील विसंगतीबरोबरच बेरकी, विक्षिप्तपणा, इरसालपणा, भोळसरपणा आदी मानवी स्वभावांचे दर्शन घडवले.

सु. ल. खुटवड

ग्रामीण जीवनाचं अस्सल प्रतिबिंब असणारं भोकरवाडी हे गाव आपल्या साहित्यात वसवणारे, वेगळ्या शैलीतील कथांद्वारे विविध स्वभावाच्या माणसांची दुनिया साकारण्याबरोबरच कथाकथनात वेगळा बाज जपणारे द. मा. मिरासदार यांनी मराठीतील ग्रामीण विनोदाला एक मोठी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्‍वातील विनोदाची ‘मिरासदारी’ संपली आहे.

- सु. ल. खुटवड

द. मा. मिरासदार यांनी आपल्या कथांद्वारे ग्रामीण जीवनातील विसंगतीबरोबरच बेरकी, विक्षिप्तपणा, इरसालपणा, भोळसरपणा आदी मानवी स्वभावांचे दर्शन घडवले. त्यातील वैविध्य त्यांनी उत्तमरीत्या फुलवले. नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, नाना घोडके, व्यंकू आदी पात्रे मराठी साहित्यात अजरामर ठरली. ती त्यांच्यातील गोष्टीवेल्हाळ निवेदनशैलीच्या वेगळ्या हातोटीमुळे. या पात्रांना आपण अनेकदा भेटलोय, असं वाचकांना सतत जाणवत राहायचं, ही खरी त्यांच्या लेखणीची कमाल होती.

मिरासदार यांचे बालपण पंढरपूर, अकलूज या भागात गेले. त्यांचे वडील हे वकील होते. त्यामुळे त्यांच्या घरी येणारी खेड्यातील माणसे त्यांनी जवळून पाहिली. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे ते बारकाईने निरीक्षण करीत असत. पुढे ते कथालेखन करू लागल्यानंतर कथाविषय व त्यातील पात्रे ही त्यांच्या अनुभवाच्या पोतडीतूनच बाहेर पडू लागली. ग्रामीण भागातील विनोदाचा अचूक धागा त्यांनी पकडण्यामागे ही पार्श्‍वभूमी आहे. मिरासदार यांनी कथालेखनाबरोबरच कादंबरी, स्फुट, ललित, पटकथा- संवाद असे साहित्याचे विविध प्रकार हाताळले. त्यांनी सुमारे तीनशे कथा लिहिल्या आहेत. त्यात १६०च्या आसपास विनोदी कथांचा समावेश आहे. कथालेखनातही त्यांनी साहित्याचे सर्व प्रकार हाताळले. मात्र, ग्रामीण विनोदी कथांमुळे त्यांना सर्वाधिक ओळख मिळाली.

चोर, चोरी व पोलिस हे मिरासदार यांचे अतिशय आवडते विषय. यावर त्यांनी भरपूर कथालेखन केले. त्यातील ‘माझी पहिली चोरी’ ही कथा अफलातून आहे. आपल्या घरातील चोरी बघायला येणाऱ्यांची गर्दी दुसरीकडे वळविण्यासाठी निवेदक दुसऱ्या ठिकाणी चोरी करतो, अशी ही मजेशीर कथा. ‘पंचनामा’, ‘तपास’, ‘पोलिसी खाक्या’, ‘दक्षता’, ‘एका गारुड्याचे मरण’, ‘बाटलीवाले बाबूराव ही आणखी काही उदाहरणे. पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी उपहासात्मक लिहून, या कथांनी एक वेगळी उंची गाठली. न्यायालय व साक्षीदार हाही त्यांचा अतिशय आवडता विषय. ‘भवानीचा पक्षकार’, ‘साक्षीदार’, ‘अब्रू’, ‘निकाल’ या काही त्यांच्या गाजलेल्या कथा या विषयांवर आधारित आहेत. मिरासदार हे प्राध्यापक होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विसंगती, तेथील गमतीजमतीवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यातील अतिशय लोकप्रिय ठरलेली त्यांची कथा म्हणजे ‘माझ्या बापाची पेंड’ ही होय. शालेय विद्यार्थी व शिक्षकाने गांजा असलेली पेंड खाल्ल्यानंतर उडालेला सावळा- गोंधळ म्हणजे ही कथा. ‘ड्रॉईंग मास्तरांचा तास’, ‘गणिताचा तास’, ‘शिवाजीचे हस्ताक्षर’, ‘शाळेतील समारंभ’, ‘साहेब’, ‘तपकीर’, ‘दळण’, ‘शाळेतील संततीनियमन’ या कथांना विनोदी साहित्यात वेगळे स्थान मिळाले ते त्यातील विसंगती, सूक्ष्म निरीक्षण व उपहासामुळे.

मूळच्या निरोपात बदल होऊन डॉक्टर बाईचे नाचणाऱ्या बाईत रूपांतर करणारी कथा म्हणजे ‘निरोप,’ नाना घोडकेची ‘नव्याण्णवबादची सफर’, महिला व पुरुष यांच्यातील भानगडीवरील प्रकाश टाकणारी ‘कळस’, नागू गवळ्याच्या झोपेच्या अतिशोयोक्तपूर्ण वर्णनाची ‘झोप’, गंडगुळ्याच्या माळरानावर अस्तित्वात नसलेल्या भुताला पुन्हा प्रकट करणारी ‘भुताचा जन्म.’ आळशी वृत्तीचे दर्शन घडविणारी ‘कंटाळा’ आदी अनेक कथा मराठी साहित्यविश्‍वात अजरामर झाल्या. ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. मिरासदार यांनी विनोदाबरोबरच गंभीर विषयांनाही हात घातला. ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’, पंचाक्षरी, ‘हुबेहूब’ आदी कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. त्या वाचून वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहायचा नाही, एवढी त्यांच्या लेखणीची ताकद होती.

कथाकथनातही मिरासदार यांचे नाव मोठे आहे. या प्रकाराला त्यांनी लोकप्रिय करण्याबरोबरच मोठी उंची मिळवून दिली. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि मिरासदार या तिघांनी १९६२ पासून कथाकथनाद्वारे राज्यभरातील रसिकांना भुरळ घातली होती. हे तिघेही आपल्या कथांबरोबरच इतरांच्या कथांचेही सादरीकरण करत असत. विशेषतः मिरासदार हे चिं. वि. जोशी यांच्या कथा फार ताकदीने सादर करत असत. त्यांनी ‘एक डाव भुताचा’ या गाजलेल्या चित्रपटाचे त्यांनी कथा-पटकथा लेखन केले होते. शिवाय यात हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी उत्तमरीत्या वठवली होती. ‘व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून ‘गुरुकृपा’ हा मराठी चित्रपट निघाला होता, तर त्यांच्या कथांवर आधारित ‘भोकरवाडीतील चावडी’ ही दूरदर्शनवरील मालिकाही खूप गाजली होती. विनोदी कथा, कथाकथन, व्याख्याने याद्वारे मराठी रसिकांवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या मिरासदार यांच्या निधनाने विनोदी लेखन करणाऱ्यांचा मार्गदर्शकही हरपला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT