Women Tikali
Women Tikali Sakal
सप्तरंग

तू टिकली लाव...

अवतरण टीम

महिला पत्रकाराला प्रतिक्रिया द्यायची की नाही, हा जसा तुमचा प्रश्न आहे, तसाच टिकली लावायची की नाही हा आमचा प्रश्न आहे. कपाळावर आडवं कुंकू नसलं, तरी आत्मविश्वासाची तलवार घेऊन हजारो सावित्रीच्या लेकी चहुबाजूला दिसतील.

- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com

महिला पत्रकाराला प्रतिक्रिया द्यायची की नाही, हा जसा तुमचा प्रश्न आहे, तसाच टिकली लावायची की नाही हा आमचा प्रश्न आहे. कपाळावर आडवं कुंकू नसलं, तरी आत्मविश्वासाची तलवार घेऊन हजारो सावित्रीच्या लेकी चहुबाजूला दिसतील. आता आग लागलीय... वणवा पेटतोय... त्यात भस्म होईल ‘किड्यां’ची मनुवादी वृत्ती!

नेहमीप्रमाणे दिवसभर भरगच्च कार्यक्रम, सगळे कार्यक्रम आटोपून सायंकाळी लवकर घरी जायचे होते. कारण घरीही बऱ्याच जणांना वेळ दिली होती. कार्यक्रमातून लवकर निघण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी उशीर होता होता, शेवटी घरी पोहोचायला रात्र होतेच. घरी अनेक जण थांबले होते. त्यात शाळेतील मैत्रीण मनीषा हिंगणे ही कोणाला तरी घेऊन आली होती. खूप दिवसांनी भेटत असल्याचा आनंद होताच; पण आज भेटायला काय विशेष, असे विचारताच मनीषाने माझी ओळख सोबत आलेल्या रत्नाताईंशी करून दिली. ‘‘या रत्नाताई चांदगुडे, कोपरगावहून तुला भेटायला आल्या आहेत. तुझी भेट होईना म्हणून दोन दिवस माझ्याकडे थांबल्यात. आज काहीही करून तुला भेटून त्यांना परत निघायचे आहे.

तुझे व्हिडीओ त्यांनी पाहिलेत. तुझ्या मतदारसंघातील सगळ्या ग्रामपंचायतींनी ‘विधवा प्रथा बंदी’चा ठराव करून घेतल्याचे तुझे कार्यक्रम त्यांनी पाहिलेत. रत्नाताईसुद्धा विधवा आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाचे निधन झाले. तसेच पतीचा अंत्यविधी करून घरी येताना आजारी आई गेल्याची बातमी समजली. एकाच वेळी घरातले सगळ्यांचे जाणे, हे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे आहे. खचून गेल्या होत्या त्या. मी एकटी जगून काय करू म्हणत होत्या; पण तुझे व्हिडीओ पाहिले. विधवांना धार्मिक कार्यात हळदी-कुंकवाचे वाण द्या, पतीच्या अंत्यविधीत तिचे मंगळसूत्र काढू नका, तिच्या पतीचे निधन होते, ती विधवा होते, यात तिचा दोष नाही. तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तोच आपल्याला तिला द्यायचा आहे. तुझ्या घरात तू काकूला दिलेला सन्मान आम्ही पाहिला म्हणून खास या रत्नाताई इथे आल्या आहेत.’

मनीषाने ओळख करून दिल्यानंतर रत्नाताई बोलू लागल्या, ‘खूप संकटं आली आयुष्यात. परिस्थितीशी दोन हात करत आयुष्य जगतेय; पण ज्यांच्यासाठी लढतेय तेच सगळे मला सोडून गेले. घरातले सगळेच देवाघरी गेलेत, तर हेच घर देवासाठी वापरू, म्हणून राहत्या घराचा वृद्धाश्रम केला. रूपालीताईंकडे बघून लढतेय आणि जगतेय. म्हणून माझी एक इच्छा होती, मला स्वतःला रूपालीताईंची ओटी भरायची होती, आज नवरात्रीच्या माळेचा पहिला दिवस. आजच लक्ष्मी घरी आल्यात. जिच्याकडे बघून मला जगण्यासाठी हिंमत मिळतेय, सन्मान मिळतोय, तिला आपण प्रत्यक्ष भेटायचे, अशी इच्छा होती; पण मनाची ताकद होत नव्हती. कारण मी विधवा, ताईंची ओटी कशी भरणार? मग मी मनीषाला फोन केला, ती आमच्या ओळखीची. ती मला म्हणाली, ताईच्या घरी जाऊ. ओटीचे सामान सोबत घेऊ. ती नाही म्हणणार नाही. म्हणून आम्ही आलो, भरू ना ताई तुमची ओटी?’

मी आनंदाने ‘हो’ म्हणाले. खास खणाची ओटी आणली होती. ओटी भरताना रत्नाताईंचे डोळे भरून आले होते, हात थरथरत होते, आपण विधवा आहोत, आपल्याला हळदी-कुंकवाचा मान कधी मिळणार नाही, कोणाची ओटी भरता येणार नाही, हा त्यांच्याप्रमाणे अनेकांचा गैरसमज मला दूर करायचा होता. त्यांनाही हळदी-कुंकू लावून त्यांची ओटी भरली, सोन्या-चांदीपेक्षा हळदी-कुंकवाची दोन बोटं मौल्यवान वाटतात, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते. मनातले स्वप्न पूर्ण होताना, आनंदाच्या पंखाचा पिसारा फुलवावा आणि आत्ममग्न होत डोळे मिटून स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यावा, इतक्या त्या सुखावल्या होत्या. काय बोलावं, हे त्यांना शब्दांत सांगता येईना, म्हणून घट्ट मिठी मारत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

कितीही धावपळ असली, तरी दिवसातून एकदा तरी रत्‍नाताईंचा तो आनंदी चेहरा आठवतोच. आणि आज तर डोळ्यासमोरून त्यांचा चेहरा जातच नाही. कारण आज एक महिला पत्रकाराने कोणाकडे तरी प्रतिक्रिया मागितली; पण तू टिकली लावली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही. तू आधी टिकली लाव, अशी उर्मट आणि विकृत मनोवृत्तीचे, सडलेल्या विचारसरणीचे दर्शन घडवले. महिला आयोगाची अध्यक्षा या नात्याने मी तातडीने नोटीस पाठवून खुलासाही मागितला. नोटीसला खुलासाही येईल; पण आम्हा महिलांना ‘नाच ग घुमा’ म्हणत अस्तित्वात नसलेल्या, कोठेही लिखित नसलेल्या, कपोलकल्पित संस्कृतीच्या नावाखाली स्वत:च्या विकृतीचा फेर आजूबाजूला वादंग वाजवू पाहतोय... म्हणून आमच्याही प्रश्नांना आता उत्तरं हवीतच!

शहाजी राजांच्या निधनानंतर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला राजमाता जिजाऊ खंबीरपणे उभ्या राहिल्या. कपाळावर कुंकू नव्हते, म्हणून त्यांचे योगदान नव्हते काय? स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य प्रतीक म्हणून राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख होतो, त्या वेळी त्यांच्या कपाळावर कुंकू नव्हते, म्हणून त्यांचे योगदान नाही का? पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर उत्तम शासन चालवलं, त्यांच्याही कपाळावर कुंकू नव्हतं, म्हणून त्यांचं योगदान नाही का? सैन्य दलात काम करणाऱ्या महिला टिकली लावत नाहीत, म्हणून त्यांचे योगदान काहीच नाही का? संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानला खडे बोल सुनावणारी आयएफएस अधिकारी स्नेहा दुबे यांनी टिकली लावली नव्हती, म्हणून त्यांचे योगदान काहीच नाही का?

कल्पना चावलाने अंतराळात असताना टिकली लावली नव्हती, म्हणून तिचे योगदान काहीच नाही का? आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी उत्तम सेवा देशाला दिली. कर्तव्यावर असताना त्यांनी टिकली लावली नव्हती. त्यांचे योगदान काहीच नाही का?

कोरोना कालावधीत हजारो पुरुषांचा मृत्यू झाला, त्यांच्या पश्चात लहानग्या मुलाच्या बोटाला धरून, पदर कंबरेला खोचून, रडायचं नाही, लढायचं म्हणत आयुष्याचा संघर्ष करणाऱ्यांचे योगदान मातीमोल आहे का?

महिला पत्रकाराला प्रतिक्रिया द्यायची की नाही, हा जसा तुमचा प्रश्न आहे, तसाच टिकली लावायची की नाही, हा आमचा प्रश्न आहे; पण कपाळावर टिकली असो की नसो, तुम्हाला महिलांचा सन्मान करावाच लागेल, हे तुमचे कर्तव्यच आहे हे सोयीस्कर विसरून चालणार नाही. सातत्याने महिलांची अवहेलना करणारी वक्तव्य करून, तिचे अस्तित्व नाकारून तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा झेंडा उंच करण्याच्या प्रयत्नात, तुम्ही अजूनही खुजे होताय, हे विसरू नका.

टिकलीवरून निष्फळ आणि निरर्थक वादळ निर्माण करणाऱ्यांनो, आमच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फार सुंदर आडवं कुंकू लावायच्या, डोक्यावर पदर घ्यायच्या, तरी तुम्ही शेणा-मातीची चिखलफेक त्या माऊलीवर केली... का? कपाळावर कुंकू नव्हतं? होतं कुंकू, तरीपण बाईच्या जातीला पायाला बांधून स्वतःच्या पुरुषी अहंकाराचा टेंभा मिळवणाऱ्यांनो, शेणातले ‘किडे’ शेणफेकच करणार. असे ‘किडे’ दीडशे-दोनशे वर्षांपासून वळवळतात. ही सगळी वळवळ चिरडून टाकायला, कपाळावर आडवं कुंकू नसलं, तरी आत्मविश्वासाची तलवार घेऊन हजारो सावित्रीच्या लेकी चहुबाजूला दिसतील. आता आग लागलीय... वणवा पेटतोय... तो आणखी भडकेल... या वणव्यात भस्म होतील ‘किडे’ आणि ‘किड्यां’ची मनुवादी वृत्ती!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT