s s virk
s s virk 
सप्तरंग

जी. टी. रोड : एक मर्डर, एक कहाणी : 1 (एस. एस. विर्क)

एस. एस. विर्क

ढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाह सूरीची कारकीर्द तशी फार मोठी नव्हे. सम्राट बाबरानंतर हुमायूँचा राज्याभिषेक झाला. हुमायूँ काही फार मोठा योद्धा नव्हता. अफगाणिस्तानातून आलेल्या शेरखाननं मोगलांचा पराभव करून त्यांच्या विशाल साम्राज्यावर कब्जा केला. शेरखाननं नंतर बंगाल आणि बिहार हे प्रांतही ताब्यात घेतले. शेरखानाच्या आक्रमणामुळे हुमायूँला लाहोरला पळून जावं लागलं. तिथून मग हुमायूँ मूळ ठिकाणी पर्शियात आश्रयाला गेला. नंतरच्या काळात शेरखान हा शेरशाह सूरी म्हणून राज्यकारभार पाहू लागला. त्यानं अल्प काळच राज्य केलं; पण त्या काळात त्यानं राज्यकारभारात आणि प्रशासनात विविध सुधारणा केल्या. शेतजमिनींचं मोजमाप करून शेतसाऱ्याची नव्यानं रचना केली. शिक्षणप्रसारावर भर दिला. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शेरशाहनं कोलकत्यापासून पेशावरपर्यंत "जर्नैली सडक' या नावानं एक प्रचंड रस्ता बांधून घेतला. ब्रिटिशांनी नंतर याच रस्त्याचं नामकरण "ग्रॅंड ट्रंक रोड' (जी. टी. रोड) असं केलं. आज साडेचारशे वर्षांनंतरही, देशातला एक प्रमुख व्यापारी-मार्ग म्हणून जी. टी. रोडचं महत्त्व अबाधित आहे.

अगदी पहिल्यापासून जी. टी. रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी, यात्रेकरूंसाठी दर दोन मैलांवर सराया होत्या, भरपूर पाणी असणाऱ्या विहिरी होत्या आणि रस्त्याच्या दुतर्फा फळझाडं, तसंच भरपूर सावलीची डेरेदार झाडं लावण्यात आली होती. कोलकत्याहून येणारा हा रस्ता आजही नवी दिल्लीला पंजाबशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. हाच रस्ता पुढं पाकिस्तानात लाहोर आणि त्याही पलीकडं जातो. पिढ्यान्‌पिढ्यांचा व्यापारी-मार्ग असल्यानं या रस्त्यावर अनेक समृद्ध शहरं निर्माण झाली, भरभराटीला आली. प्रचंड वाहतूक हे या रस्त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. कोणतंही ठिकाण पाहा, रहदारीच्या वेळी या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मिळून एका मिनिटात शंभरेक वाहने ये-जा करत असतात. फगवाडा हे याच रस्त्यावरचं एक महत्त्वाचं शहर.

रोजच्या गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या वायरलेस मेसेजेसची फाईल सकाळी न चुकता वाचण्याच्या माझ्या (वाईट!) सवयीबद्दल मी आपल्याला याआधी सांगितलंच आहे. मी पंजाबमध्ये पोलिस महासंचालक असताना, सन 2005 च्या ऑगस्ट महिन्यात एक दिवस फगवाडा पोलिस ठाण्याकडून आलेल्या वायरलेस मेसेजमध्ये, काही अज्ञात हल्लेखोरांनी अमरसिंग या प्रवासी भारतीयावर (एनआरआय) केलेल्या हल्ल्याचा उल्लेख होता. साठीच्या आसपास असलेले अमरसिंग काही आठवड्यांसाठी इंग्लंडहून भारतात आले होते. ता. 16 ऑगस्टच्या दुपारी एकच्या सुमाराला जी. टी. रोडवर "गोकुळ' ढाब्यावर जेवण करून ते हात धूत होते. त्याच दरम्यानच्या काळात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही तरुणांनी त्यांना हॉकी स्टिक्‍स आणि बेसबॉलच्या बॅटींनी बेदम मारहाण केली होती. बेशुद्ध पडलेल्या अमरसिंग यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून विशेष उपचारांसाठी त्यांना लुधियानातल्या रुग्णालयात हलवण्यात आलं; पण तिथं नेत असतानाच त्यांचा मृत्यू ओढवला. स्थानिक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. माझ्या नेहमीच्या सवयीनुसार, मी तिथल्या वरिष्ठ एसपींना तपासावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. जी. टी. रोडवर दिवसाढवळ्या हत्या होणं ही माझ्या दृष्टीनं अत्यंत गंभीर बाब होती. ढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती.
मी यासंदर्भात फोनवर विचारणा केल्यावर वरिष्ठ एसपींनी सांगितलं की अमरसिंग यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मूळ गावातल्या, रायपूरमधल्या, काही लोकांवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्या लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर, गुन्ह्यात त्यांचा काहीच हात नसल्याचं सिद्ध झाल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं होतं. अमरसिंग यांचं कुणाशी शत्रुत्व होतं का, संपत्तीचा वाद, विवाहबाह्य संबंध असे इतर मुद्देही पोलिसांनी तपासले होते; पण त्यातूनही काही निष्पन्न झालं नव्हतं; पण त्यांचा तपास सुरू होता.

अमरसिंग यांचे चारही भाऊ आणि बरेचसे इतर नातेवाईक 40-50 वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले होते. वाहतूक, गॅस स्टेशन्स आणि जमिनींच्या व्यवहारात त्यांच्या चारही भावांनी चांगलं बस्तान बसवलं होतं. त्यांचे दोन भाऊ स्थानिक राजकारणातही सक्रिय होते. इंग्लंडमधल्या आणि भारतातल्या मालमत्तेकडं आणि गुंतवणुकीकडं अमरसिंग लक्ष द्यायचे. खुनाच्या तीन आठवडे आधी ते भारतात आले होते. लुधियाना, जालंधर परिसरात त्यांनी काही निवासी प्लॉट आणि शेतजमिनी पाहिल्या होत्या; परंतु काही व्यवहार झालेला नव्हता. ज्या जमिनी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातल्या कुणाचा या खुनाशी संबंध असू शकतो का, याचीही पोलिसांनी पडताळणी सुरू केली होती.

माझ्या मते "गोकुळ' ढाब्यावरच खुनाचे काही धागेदोरे सापडायला हवे होते. एक तर तो जी. टी. रोडवरचा एक मोठा ढाबा होता. हल्ला व्हायच्या जवळपास एक तास आधीपासून अमरसिंग तिथं होते. त्यांच्याबरोबर
रामकिशोर नावाचा एक स्थानिक इस्टेट एजंटही होता. जेवण झाल्यावर हात धुऊन बिल देण्यासाठी अमरसिंग बाहेर आले तेव्हा रामकिशोर आत बसलेले होते. स्कॉर्पिओतून आलेल्या सात-आठ दणकट तरुणांनी अमरसिंगांवर हल्ला केला, ते बेशुद्ध होऊन खाली पडल्यावर सगळे हल्लेखोर तिथून वेगानं पसार झाले होते. रामकिशोर यांनी सर्व घटना पाहिली होती; पण हल्लेखोरांपैकी कुणालाही ओळखलं नव्हतं. हल्ला झाला तेव्हा ढाब्यावर चार वेटर, दोन कूक आणि भांडीबिंडी घासणारे दोन जण होते. ढाब्याचे मालक रमेश तिवारीही कॅश काउंटरवर होते. आश्‍चर्याचा भाग म्हणजे त्यातल्या कुणीही, अमरसिंग जेवले आणि मग त्यांच्यावर हल्ला झाला याव्यतिरिक्त काहीच पाहिलं नव्हतं. पोलिसांच्या चौकशीत प्रत्येकानंच "मी आणखी काही पाहिलं नाही,' असंच उत्तर दिलं होतं.

एका महिन्यानंतरही तपासात काही ठोस प्रगती नसल्यानं मी वरिष्ठ एसपींना चर्चेला बोलावलं. ते येण्याच्या आदल्या दिवशी मी गुन्ह्याची फाइल मागवून घेतली आणि बारकाईनं वाचली. तपासाला काहीच दिशा मिळत नसल्यानं सगळंच ठप्प झाल्यासारखी परिस्थिती होती. आम्ही पुन्हा गावातले स्थानिक वाद, मालमत्ता, एखाद्या महिलेचा संबंध किंवा पैशाचे व्यवहार, गुंतवणूक अशा मुद्द्यांची चर्चा केली. चर्चा करताना अचानक माझ्या लक्षात आलं की अमरसिंग जवळपास 40 वर्षं इंग्लंडमध्ये वास्तव्याला होते. आपण हल्ल्याचं कारण भारतात शोधतो आहोत; पण ते इंग्लंडमध्येही असू शकतं. इंग्लंडमध्ये अमरसिंग ज्या भागात राहायचे तिथं त्यांचं बऱ्यापैकी वजन असल्यानं त्या काउंटीच्या पोलिसांनीही फोनवरून या खुनाची माहिती घेतल्याचं तपास करणाऱ्या उपअधीक्षकांनी मला सांगितलं. त्या काउंटीच्या पोलिसांना एक अधिकृत ई-मेल पाठवून, खुनाचा हेतू काय असू शकतो हे तपासण्यास त्यांनी मदत करावी, अशी विनंती करण्यास मी उपअधीक्षकांना सांगितलं. तिथं असू शकणारा मालमत्तेचा किंवा कौटुंबिक वाद, विवाहबाह्य संबंध - ज्याबद्दल आम्हाला इथं माहिती मिळू शकली नसती - यासंदर्भात आम्ही ब्रिटिश काउंटी पोलिसांची मदत घ्यायची ठरवली.

"तुमच्या माहितीवर काम सुरू असून काही दिवसांत आम्ही आणखी काही सांगू शकू,' असं त्या काउंटीच्या पोलिसांनी कळवल्याचं संबंधित उपअधीक्षकांनी एके दिवशी मला सांगितलं. तेव्हा "काउंटी पोलिसांच्या संपर्कात राहून इथल्या तपासाची माहिती त्यांना कळवत राहा,' अशी सूचना मी उपअधीक्षकांना दिली.
"तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही मिळवत आहोत,' असा आणखी एक निरोप काही दिवसांनी काउंटी पोलिसांकडून आला. त्यांनी त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना पंजाब पोलिसांच्या मदतीसाठी भारतातही जायला सांगितलं होतं. तपास सुरू ठेवण्यास आणि त्याविषयीची अद्ययावत माहिती मला वेळोवेळी कळवण्याविषयीच्या सूचना मी उपअधीक्षकांना दिल्या.

एके दिवशी मला उपअधीक्षकांचा फोन आला. फोनवर त्यांनी सांगितलं : ""सर, इंग्लंडमधल्या काउंटी पोलिसांचे दोन इन्स्पेक्‍टर - बॉयर आणि लेकर - आलेले आहेत. त्यांनी आम्हाला खूप उपयुक्त माहिती दिली आहे. ते तुम्हालाही यासंदर्भात भेटू इच्छितात.''

ते दोघंही दुसऱ्या दिवशीच आले. त्यांना प्रकरणाची इत्थंभूत माहिती होती. इंग्लंडमधल्या काही व्यक्तींनी भाडोत्री मारेकऱ्यांकडून हे घडवून आणलं असावं, असा त्यांना संशय होता; पण असा हल्ला घडवून आणण्यासाठी काही कारण नक्कीच असणार. असं काही कारण त्यांच्या नजरेस आलं होतं का? तसं काही कारण दिसत तर नव्हतं; पण त्यांना संशय होता. इंग्लंडमधल्या "वैयक्तिक अधिकार आणि नागरी स्वातंत्र्यविषयक नियमां'मुळे ते संशयितांकडं चौकशी करू शकले नव्हते. त्यांच्या कायद्यानं त्यांना तशी परवानगी नव्हती, म्हणून "येनकेनप्रकारेण आम्ही त्या लोकांना ताब्यात घेऊन ती चौकशी करावी', असं त्यांनी सुचवलं. इथल्या कायद्यांबद्दल, प्रक्रियांबद्दल त्यांच्या मनात बरेच गैरसमज होते, हे लक्षात येत होतं. मी त्यांना म्हणालो : ""आमच्याही कायदेशीर प्रक्रियांना "ब्रिटिशवारसा' आहे! आणि नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य याबाबत आम्हीही त्यांच्याइतकेच; किंबहुना थोडे अधिकच जागरूक आहोत.''

बॉयर आणि लेकर यांनी आणलेली माहिती अतिशय रंजक होती. व्यवसायावरून आणि संपत्तीवरून अमरसिंग यांच्या कुटुंबात मतभेद होते; पण भांडणं, वादविवाद नव्हते. ते सगळे अजूनही एकत्र काम करत होते; पण त्यांनी व्यवसाय स्वतंत्र ठेवलेले होते. हिशेबही अगदी पारदर्शी होते. हल्ला होण्याचं एकही कारण त्या आघाडीवर तरी दिसत नव्हतं. मात्र, स्त्रियांशी असलेल्या संबंधांच्या बाबतीत मात्र जरा जास्तच गुंतागुंत होती. अमरसिंग हे पत्नीपासून वेगळे राहत होते; पण त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतलेला नव्हता. कारण, ती सगळी प्रक्रिया अत्यंत महागडी होती. ते दुसऱ्या एका बाईबरोबर राहत होते.

ती महिलादेखील तिच्या पतीपासून वेगळी राहत होती; पण तीदेखील कायदेशीररीत्या विभक्त झालेली नव्हती. अमरसिंग यांनी आपल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट न दिल्यानं आणि त्या महिलेचाही तिच्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट न झाल्यानं अमरसिंग तूर्त त्या महिलेशी विवाह करू शकत नव्हते. त्याचप्रमाणे, अमरसिंग यांचा मुलगा आणि मुलगीही त्यांच्या त्यांच्या जोडीदारांपासून वेगळे राहत होते; पण त्यांचेही कायदेशीर घटस्फोट झालेले नव्हते. सगळीच परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती. कारण, न्यायालयात जाऊन रीतसर घटस्फोट घेणं म्हणजे जवळजवळ अर्धी संपत्ती गमावण्यासारखं होतं. घटस्फोट मंजूर झाले तर आपल्या जोडीदाराला भरपूर पैसा मिळेल म्हणून या सगळ्यांनी न्यायालयांमध्ये वेगळे वेगळे खटले दाखल केलेले होते. अमरसिंग यांचा जावई आणि सूनही त्यांच्या जोडीदारांसोबत राहत होते. थोडक्‍यात, यातल्या प्रत्येकाकडं अमरसिंग यांचा खून करायला निश्‍चितच काहीतरी कारण होतं. मी बॉयर आणि लेकर यांना त्यांचे निष्कर्ष विचारले. ते म्हणाले : ""सर, हा सगळा गोंधळ आहे. आम्हालाही निश्‍चित असं काही सांगता येत नाहीये.''
""काळजी करू नका,'' मी म्हणालो : ""आपण तपास करू. आणखी माहिती काढू.''
त्यानंतर जिल्हा पोलिस मुख्यालयात झालेल्या आयजी, डीआयजी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मासिक बैठकीत मी हा मुद्दा मांडला. या प्रकरणावर एक ब्रेन-स्टॉर्मिंग सेशन करावं असं सगळ्यांचंच म्हणणं पडलं. मग आम्ही एक तारीख ठरवली. आयजी आणि डीआयजी केसची फाईल घेऊन आले.

""सर, तपासात कोणत्याच दिशेनं काहीच प्रगती नाही'', ते म्हणाले.
तपास अवघड आहे याची मला कल्पना होती. लक्षपूर्वक परिश्रम करणं आवश्‍यक होतं.
मी त्यांना म्हणालो : ""मी या प्रकरणाचा तपास 72 तासांत लावू शकतो, हे निश्‍चित. मात्र, एसपींचं काम मी करायला लागलो तर माझं काम कोण करेल?''
मग मी त्यांना प्रश्न विचारू लागलो. माझा पहिला प्रश्न होता : "लुधियानाहून फगवाडाकडं जाताना "गोकुळ' ढाबा रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे की डाव्या?' या प्रश्नाचं उत्तर कुणीच देऊ शकलं नाही.
मी म्हणालो : ""गुन्हा घडला ती जागा तुम्ही पाहिलेली नाही, हे उघड आहे, म्हणूनच तुम्हाला त्या जागेची कल्पना नाही. ऑफिसमध्ये बसून कोणतंही प्रकरण उघडकीस आणता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्या जागेला फक्त भेट देऊन काही उपयोग नाही. तुम्हाला गुन्ह्याच्या ठिकाणाचा "अभ्यास' करावा लागतो. सर्वप्रथम त्या जागेचा अभ्यास करा आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करा.''

गुन्हा घडून तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला होता. एवढ्या दिवसांनंतरही मी त्यांना तिथं जाण्यास प्रोत्साहित केलं.
""सर, आणखी काय करायला हवं?'' त्यांनी विचारलं.
मी म्हणालो : ""मी जर तुमच्या जागी असतो तर मी तिथं एक पोलिस अधिकारी म्हणून नव्हे, तर एक साधा नागरिक म्हणून गेलो असतो. तिथं चहा घेतला असता, जेवण केलं असतं. ढाब्याच्या मालकाशी मैत्री करून, सहज बोलल्यासारखा खुनाचा विषय काढला असता. मग त्या बोलण्यातले धागे जुळवत माझी केस मी उभी केली असती.''
मग मी त्यांना शांतपणे नियोजन करण्यास सांगितलं आणि म्हणालो : ""ओळख न देता तिथं जाऊन, भीतीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांनी उघडपणे न बोलणाऱ्या लोकांकडून मी माहिती घेतली असती. लोक पोलिसांना काही सांगत नाहीत; परंतु दुसऱ्या एखाद्या सर्वसामान्य माणसाबरोबर ते बोलतील, निदान मला तरी असं वाटतं.''
एवढी चर्चा झाल्यावर ते सगळे जण ऑफिसमधून बाहेर पडले.

(पूर्वार्ध)
(ही कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र, व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.)

(या लेखाचा "इंटेलेक्‍च्युअल प्रॉपर्टी हक्क' लेखकाकडं आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT