saily-Panse-Shellikeri
saily-Panse-Shellikeri 
सप्तरंग

गायकाचे गुण-दोष

सायली पानसे-शेल्लीकेरी sailyshellikeri@gmail.com

जे चांगलं आहे ते समजण्याचं ज्ञान श्रोत्यांना असणं आवश्यक आहे. कोणतं गाणं चांगलं, कोणता गायक चांगला याचं भान श्रोत्यांना असेल तरच चांगल्या कलाकृतीचा अनुभव घेता येईल. श्रोते जाणकार असतील तरच, बरं-वाईट काय आहे, हे त्यांना समजू शकेल. चांगलं संगीत ऐकण्याचाही रियाज असावा लागतो. रत्नाची पारख जशी कुणालाही असू शकत नाही, ते जाणायला रत्नपारखीच असावा लागतो, त्याच धर्तीवर सांगायचं झाल्यास, श्रोतासुद्धा रत्नपारखी असावा लागतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आदर्श गवई कसा असावा व सामान्यपणे गायकात कोणते गुण-दोष असतात याचा ऊहापोह शास्त्रात करण्यात आलेला आहे. ते सर्व गुण प्रत्येक गवयात असतीलच असं नाही; पण त्यातले जास्तीत जास्त गुण अंगीकारल्यास एक आदर्श गवई तयार होईल हे मात्र नक्की. त्या सर्व गुण-दोषांचा आढावा घेऊ या...

गायकाचे गुण

  • गायकाचा आवाज मधुर असावा
  • शरीरसंपदा उत्तम असावी
  • नवीन काही शिकण्याची वृत्ती असावी
  • आवाजातून रागाचं स्वरूप नैसर्गिकरीत्या व विनासायास व्यक्त व्हावं
  • गायनानं श्रोत्यांवर मोहिनी घातली जाऊन त्यांचं रंजन करण्याचं कौशल्य त्याला असावं
  • श्रेष्ठ गायकांकडून श्रद्धापूर्वक विद्यासंपादन केलेलं असावं
  • विद्येबरोबरच नम्रपणाही असावा
  • राग-रागिण्यांचं परिपूर्ण ज्ञान असावं
  • गायनातून रागलक्षणं स्पष्ट दिसून यावीत
  • टीका पचवण्याची ताकद असावी
  • रागरूप व्यक्त करताना अत्यंत कल्पकता व प्रतिभा असावी
  • लय-तालाचं सूक्ष्म ज्ञान असावं
  • नियमित रियाज करत असावा
  • ज्येष्ठ कलाकारांविषयी आदर असावा

गायनात दिसून येणारी मोहकता, माधुर्य, स्पष्ट व योग्य वर्णोच्चार, निर्भय व साफ आवाजात गाणं, तिन्ही स्थानांतले स्वर स्पष्ट व योग्य प्रकारे लावणं, आवाज योग्य ठिकाणी लहान-मोठा करणं, ताल व लय बरोबर सांभाळणं, योग्य जागी विराम घेणं, गीताचा अर्थ समजून बंदिश वठवणं इत्यादी गोष्टी मुख्यत्वे गायकाच्या गुणांमध्ये अध्याहृत आहेत.

शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचे ‘उत्तम’, ‘मध्यम’ आणि ‘अधम’ असे तीन भेद शास्त्रानुसार आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचं ज्ञान, विविध राग व त्यांची अंगं यांचं ज्ञान, रागांचं ज्ञान, तालबद्ध व लयबद्ध गाण्याची निपुणता, तिन्ही सप्तकांत सहज गाण्याची क्षमता, गमकप्रयोग करण्याची शक्ती, कंठाची वशता, तालाचं ज्ञान, गाण्यासाठी श्रम करण्याची तयारी, घराणेदार गाण्याची पद्धती, दोषरहित गाणं हे सर्व उत्तम गायकाचे गुण मानण्यात आलेले आहेत. जो गायक सदोष गातो तो अधम समजावा, असंही नमूद आहे.

शास्त्रात आदर्श गायकाची दहा लक्षणं सांगण्यात आलेली आहेत. ती म्हणजे सुरेल, प्रसन्न, उत्तम उच्चार करणारा, वेगवेगळ्या तालांत सहज गाणारा, आनंदी वृत्ती ठेवून गाणारा, मधुर आवाजाचा, सुरुवातीचे व शेवटचे स्वर स्पष्ट दाखवणारा, सुकुमारपणे व्यक्त होणारा असा तो श्रेष्ठ गायक होय.

गायकाचे दोष

  • नीरस व कर्कश आवाजात गाणं किंवा अतिमोठ्या आवाजात गाणं
  • डोळे मिटून तोंड वेडंवाकडं करणं
  • वेडेवाकडे हातवारे करणे
  • रागनियम न सांभाळणं
  • बे-ताल असणं व लय न सांभाळणं
  • भीत भीत व चोरटा आवाज लावणं किंवा गाताना आत्मविश्वासाचा अभाव असणं
  • आवाजात कंप असणं
  • सानुनासिक स्वर लावणं
  • गर्वानं किंवा अभिमानानं गाणं
  • गाताना मध्येच थकून जाणं
  • सारखा घसा साफ करत, खाकरत गाणं
  • शब्दोच्चार अस्पष्ट करणं
  • अनावश्यक स्वरांचा समावेश करणं किंवा रागशुद्धता न राखणं
  • गाताना कष्ट होत आहेत असं जाणवणं
  • कौतुकासाठी हपापलेला असणं

गायन कसं असावं याबद्दल अनेक तज्ज्ञांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यात गायनप्रकारांचा उल्लेख आढळतो. ते भेद असे : सात्त्विक, राजस व तामस गायन.

सहज सात्त्विक गायन : ज्यात सात्त्विक भाव आहेत, ज्या आवाजात स्वाभाविकता आहे, ज्या गायनातलं माधुर्य ऐकताक्षणी मनाला आकर्षित करतं असं गायन सात्त्विक म्हणून ओळखलं जातं.

राजस गायन : ज्या गायकाचं स्वरांवर मन एकाग्र न होता गायनात कंप असतो, ज्या गायकाला चपळतेची अधिक आवड असते, रागाचं संथ-शांत स्वरूप न दाखवता जो द्रुत ताना घेऊ लागतो, ज्याची द्रुत लयीत गायची प्रकृती जास्त असते, ज्याला विलंबित लय साधता येत नाही असं गाणं राजस गायन म्हणून ओळखले जाते.

तामस गायन : याउलट चंचल प्रकृतीचे राग शांतपणे, विलंबित लयीत गायल्यास त्याला तामस गायन संबोधलं जातं. तामस गायनात स्वाभाविकता सुटते व गाताना अनेक चुका होताना दिसून येतात.

जे चांगलं आहे ते समजण्याचं ज्ञान श्रोत्यांनाही असणं आवश्यक आहे. कोणतं गाणं चांगलं, कोणता गायक चांगला याचं भान श्रोत्यांना असेल तरच चांगल्या कलाकृतीचा अनुभव घेता येईल. श्रोते जाणकार असतील तरच, बरं-वाईट काय आहे,  हे त्यांना समजू शकेल. चांगलं संगीत ऐकण्याचाही रियाज असावा लागतो. सध्याच्या लॉकडाउनमुळे प्रत्यक्ष संगीत ऐकण्यात खंड पडला आहे. रत्नाची पारख जशी कुणालाही असू शकत नाही, ते जाणायला रत्नपारखीच असावा लागतो, त्याच धर्तीवर सांगायचं झाल्यास, श्रोतासुद्धा रत्नपारखी असावा लागतो. रत्नपारखी जसा चांगलं रत्न ओळखून तेच दागिन्यांमधे वापरतो, तसंच रत्नपारखी श्रोता चांगल्या कलाकृतीमागं धावतो. गाणं जर रत्नासारखं मौल्यवान असेल तरच गाण्याला गर्दी होताना दिसते.

पुढच्या लेखात संगीतसमीक्षेविषयी जाणून घेऊ या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT