book review
book review 
सप्तरंग

एका भरारीचं हृद्य वर्णन (समीर देशमुख)

समीर देशमुख

यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये असणारा फरक म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली जिद्द. कोणत्या व्यक्तीनं कोणत्या देशामध्ये, कोणत्या शहरात आणि कोणत्या परिस्थितीमध्ये जन्म घ्यावा हे कोणाच्याच हातामध्ये नसतं; पण त्या परिस्थितीमध्येच राहायचं, की त्याच्यावर विजय मिळवून महान कार्य करायचं हे मात्र त्या व्यक्तीच्या हातामध्ये नक्कीच असतं. त्यामुळंच आज जे यशस्वी लोक आपल्याला दिसतात ते अशाच प्रकारे सर्वसामान्य परिस्थितीमधून पुढे आलेले आहेत.
"ट्रॅक्‍टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका' ही अशाच एका सर्वसामान्य माणसाची असामान्य यशोगाथा आहे. अतिशय सर्वसामान्य घरामध्ये आणि छोट्याशा गावामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या अशोक दळवी यांनी एमडीआरटी होऊन अमेरिकेला जाण्याचं स्वत:चं स्वप्न जिद्दीने पूर्ण केलं. कोल्हापूरजवळच्या एका लहानशा गावामध्ये बालपण गेल्यामुळं आणि आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाविषयी फारशी जागरूकता नसल्यामुळं शालेय शिक्षणामध्ये गंभीरतेपेक्षा अल्लडपणाच जास्त होता; पण वय वाढत गेलं तसं शिक्षणाचं महत्त्व कळल्यामुळं मोठ्या कष्टानं कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवली. वेळप्रसंगी पाच मित्रांमध्ये दहा रुपयांचा भडंगाचा पुडा खाऊनही दिवस काढलेल्या अशोक दळवींची ही आत्मकथा.
शिक्षण पूर्ण झाल्यावर गावाकडं ट्रॅक्‍टरवरच नाही तर वडाप, जीप आणि मिळेल त्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत करत आपल्या जीवनातल्या गरजा भागवायला सुरवात केली. अशातच शारीरिक स्वास्थ्य खचल्यामुळं वेगळीच समस्या समोर आली. आर्थिक संकट, शारीरिक आजारपण आणि मानसिक नैराश्‍य या सगळ्यामध्ये त्यांना साथ दिली ती प्रेरणादायी पुस्तकांनी. आजारपणामध्ये मिळालेल्या सक्तीच्या आरामाचा त्यांनी स्प्रिंगबोर्डसारखा उपयोग केला आणि मोठी भरारी मारण्याचं स्वप्न त्याच दिवशी पाहायला सुरवात केली. मात्र, सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतातच असं नाही. किरकोळ घरगुती भांडणातून त्यांना काही काळ घरापासून लांबही राहावं लागलं. त्या वेळी अक्षरश: हॉटेलमध्ये भांडी घासूनही त्यांनी दिवस काढले.
पुन्हा घरी आल्यावर आयुष्याला एक नवं वळण मिळालं. भावानं ट्रॅक्‍टर घेऊन दिला आणि खड्ड्याखड्ड्यांच्या रस्त्यावरून अशोकची गाडी सुरळीत चालायला लागली. ड्रायव्हरविषयीच्या रुढ संकल्पनांना तडा देत त्यांनी गावामध्ये स्वत:ची चांगली आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण केली. अर्थात गाडी म्हटलं की त्याच्या काही समस्या आल्याच, त्याप्रमाणं त्यांच्या ट्रॅक्‍टर चालवण्याच्या कामामध्ये आलेल्या विविध प्रसंगांचं वर्णनही त्यांनी या यशोगाथेमधून अतिशय कल्पकतेनं आणि त्यांच्या शैलीमध्ये मांडलं आहे. गावामधून कधी शहरामध्येही जाण्याची इच्छा नसलेल्या लोकांबरोबर राहून दळवींनी परदेशात जाण्याचं स्वप्न पाहायला सुरवात केली. त्यासाठी त्यांना साथ मिळाली ती एलआयसीची.

ज्या ठिकाणी सुबत्ता असते, लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्या ठिकाणी काही गोष्टी सहज शक्‍य होतात; पण जिथं लोकांचं मासिक उत्पन्नच चार-पाच हजारांच्या वर नाही, ज्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्नच सुटला नाही, ज्यांच्या रोजच्या गरजाही नीट भागलेल्या नाहीत अशा लोकांना एलआयसीच्या माध्यमातून बचतीचं आणि आयुर्विम्याचं महत्त्व सांगून यश मिळवणं कठीण असतं. ही आत्मकथा खरंतर फक्त एलआयसीमधीलच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठं काम करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठीच प्रेरणादायी कथा म्हणून सिद्ध होईल. लेखक गावाकडचे असल्यामुळं पुस्तकाच्या भाषेमध्ये गावाकडचा बाज आहे. लेखकाचं हे पहिलं पुस्तक आहे; पण अलंकारिक लिखाणापेक्षा जे जसं आहे, जे मनात आहे ते सर्वांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकानं केला आहे. लेखकाच्या कवीमनाची प्रचितीही पुस्तक वाचताना नक्कीच येते. म्हटलं तर यशोगाथा, म्हटलं तर चरित्र तर काही ठिकाणी लेखकाच्या आयुष्यातून उलगडणारे मॅनेजमेंटचे आणि व्यवस्थापनाचे धडे बरंच काही देऊन जातात. प्रत्येक सामान्य माणसामध्ये असामान्य कार्य करण्याची क्षमता असतेच. तिला योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांची जोड मिळाली तर कित्येक गोष्टी सहजसाध्य होतात हे या पुस्तकामधून नक्कीच वाचायला मिळतं.

पुस्तकाचं नाव : ट्रॅक्‍टर ड्रायव्हर ते एमडीआरटी अमेरिका
लेखक : अशोक दळवी
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे (020-24226432)
पानं : 128, किंमत : 150 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

SCROLL FOR NEXT