wrestler bhagwanrao more sakal
सप्तरंग

साधेपणाची ताकद!

कधीकाळी देशभरातील मैदान गाजवलेले आणि कुस्तीच्या आखाड्यात समोरच्या मल्लांशी लढत देणारे बाबाजी विचाराने गांधीवादी आहेत.

संपत मोरे

कधीकाळी देशभरातील मैदान गाजवलेले आणि कुस्तीच्या आखाड्यात समोरच्या मल्लांशी लढत देणारे बाबाजी विचाराने गांधीवादी आहेत.

कधीकाळी देशभरातील मैदान गाजवलेले आणि कुस्तीच्या आखाड्यात समोरच्या मल्लांशी लढत देणारे बाबाजी विचाराने गांधीवादी आहेत. कुस्ती मेहनत करून मिळालेल्या ताकदीचा वापर अरेरावीसाठी नाही, तर दुबळ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी करायचा असतो, हा विचार आयुष्यभर जगलेले मल्ल बाबाजी. महाराष्ट्र केसरीचे मैदान गाजवणारे महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे यांच्या साधेपणाचीच त्या काळातील अनेक पैलवानांना भीती वाटायची. त्यांच्याबद्दल कायम आदरयुक्त धाक वाटत आला.

आज जो भाग सांगली जिल्ह्यात आहे, तो पूर्वीचा दक्षिण सातारा होता. सांगली जिल्ह्याची निर्मिती नंतर झाली. या सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुका. राजकारण, समाजकारण, साहित्य, सहकार या सर्व क्षेत्रांत तालुक्याची एक वेगळी ओळख आहेच; पण कुस्ती क्षेत्रातही या तालुक्याने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. एकाच तालुक्याने तीन महाराष्ट्र केसरी दिले आहेत. महाराष्ट्राचे दुसरे महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा आणली. त्यानंतर गणपतराव खेडकर यांनी सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा ‘किताब’ मिळवला. त्यानंतर आप्पासाहेब कदम यांनीही १९७८ मध्ये अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरले. असे तीन महाराष्ट्र केसरी वाळवा तालुक्यात झाले आहेत.

वाळवा तालुक्याचे पहिले महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे. रेठरे हरणाक्ष गावचे. या गावाला मोठी कुस्तीची परंपरा. या गावात अनेक पैलवान होऊन गेले. बलोपासना करणारे गाव. याच गावातील भगवानराव मोरे यांनी सांगलीला जाऊन कुस्तीचे धडे गिरवले. सांगलीच्या भोसले व्यायामशाळेत त्यांची जडणघडण झाली. पैलवान म्हणून त्यांची इथंच कारकीर्द सुरू झाली. भारतभीम जोतिरामदादा सावर्डेकर आणि अब्दुल बेलीफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कुस्तीतली वाटचाल होऊ लागली. अपार मेहनतीच्या बळावर ते काही काळातच एक तुफानी मल्ल म्हणून उदयास आले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने १९५३ पासून कुस्तीचे राज्य अधिवेशन घ्यायला सुरुवात केली, पण १९६१ पासून अंतिम लढतीत विजयी होणाऱ्या पैलवानाला ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब द्यायला सुरुवात केली. पहिला किताब सांगली जिल्ह्यातल्या दिनकर पाटील दह्यारीकर यांनी मिळवला. धुळे येथे १९६२ मध्ये झालेल्या अधिवेशनात दुसरे महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे महाराष्ट्र केसरी झाले. दुसऱ्या अधिवेशनातले अंतिम लढतीतले त्यांचे प्रतिस्पर्धी सदाशिव ताकमोगे यांनी मोरे यांच्यासोबत लढत करायला नकार दिला, कारण बाबाजी ज्येष्ठ पैलवान आणि हे दोघेही एकाच पठडीतील होते. सदाशिव ताकमोगे यांनी मैदानात हात उंचावून त्यांना विजयी घोषित केले. कुस्ती परंपरेतील ही एक आगळीवेगळी घटना होती.

भगवानराव मोरे हे महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रात बाबाजी म्हणून प्रसिद्ध आहेत. बाबाजी माहिती नाहीत असा एकही कुस्तीशौकीन सापडणार नाही. त्यांच्या कुस्तीतल्या कारकिर्दीत त्यांनी महंमद हनीफ, सिद्धाप्पा हीचकीट्टी, काश्मिरी महिबूब या नामांकित पैलवानांशी त्यांच्या झालेल्या कुस्त्या चर्चेत राहिल्या. या मोठ्या पैलवानांशी केलेल्या कुस्त्यांची नोंद कुस्तीच्या इतिहासात आहे, अशा किमान पन्नास कुस्त्या त्यांनी केल्या. गुटना आणि घिस्सा हे त्यांचे खास डाव होते.

कुस्ती सुटली आणि बाबाजी त्यांच्या रेठरे हरणाक्ष या मूळ गावी गेले आणि शेती करू लागले. त्यांनी त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली याव्यात म्हणून एक सहकारी तत्त्वावर पाणीपुरवठा संस्था स्थापन केली. कृष्णा नदीवरून पाणी शेतात नेले. विना सहकार नाही उद्धार हा सहकारी क्षेत्राचा विचार या महान मल्लाने आचरणात आणला. दिव्याने दिवा लावला की अंधार दूर होतो, हे अमलात आणणारा हा माणूस. चांगुलपणा जवळ असलाच पाहिजे ही त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांच्याजवळ असलेला चांगुलपणा जे त्यांना भेटतात त्यांना अनुभवता येतो.

कधी काळी देशभरातील मैदान गाजवलेले आणि कुस्तीच्या आखाड्यात समोरच्या मल्लांशी लढत देणारे बाबाजी विचाराने गांधीवादी आहेत. महात्मा गांधी यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे. त्यांचे सत्याचे प्रयोग त्यांनी किती तरी वेळा वाचलेले. कुस्ती मेहनत करून मिळालेल्या ताकदीचा वापर अरेरावीसाठी नाही, तर दुबळ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी करायचा असतो, हा विचार आयुष्यभर जगलेले मल्ल बाबाजी. लहान मूल जरी भेटले तरी त्यांना अहोजाहो बोलणाऱ्या या माणसाला विनम्रता दागिन्यासारखी शोभते. ताकद असूनही क्षमाशील असणे वेगळे असते. ही क्षमाशील वृत्ती त्यांनी आजअखेर दाखवली आहे.

महाराष्ट्र केसरीचे मैदान गाजवणारे महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे यांच्या साधेपणाचीच त्या काळातील अनेक पैलवानांना भीती वाटायची. बाबाजी दिसले तरी भले भले समोर येत नसत. त्यांच्याबद्दल कायम आदरयुक्त धाक वाटत आला. लहानपणापासून मीही या महान मल्लाच्या गोष्टी ऐकत आलो. हा एक कुस्तीगीर आमच्या परिसरातल्या कुस्तीशौकीनाच्या आदराचा विषय आहे. माणूस कसा असावा याचा मापदंड म्हणजे बाबाजी. कुस्त्या बघायला गेले तरी स्वतः आपण आल्याची वर्दी कधी देणार नाहीत. एका बाजूला बसून कुस्त्या बघतात. सत्कार, मान-सन्मान प्रसिद्धीपासून दूर राहिलेला हा मोठा माणूस. हा माणूस गुगलवर सापडत नसला, तरी आज ज्यांचे वय ६० च्या पुढे आहे, त्यांच्या आणि ज्यांच्या ज्यांच्या आजोबांनी त्यांची कीर्ती ऐकवली आहे, त्या आजच्या पिढीच्या अंतःकरणात हा माणूस आहे.

आयुष्यात कधी चौकात बसले नाहीत, घरातून बाहेर पडले तर एक तर शेतात जातील किंवा गावातील जंगली महाराज यांच्या मठात दर्शनासाठी जातील. इतर वेळी वाचन आणि चिंतन ही त्यांची दिनचर्या. एवढा मोठा कुस्तीतला दबदबा, पण कोणाशीही वाद नाहीत, संवाद मात्र अनेकांशी तोही मोजक्या शब्दांत आणि विनम्र भाषेत. एवढं सुंदर आयुष्य जगता येतं हे बाबाजी यांना भेटल्यावर कळतं.

मी एका संध्याकाळी रेठऱ्याला गेलो. त्यांना नमस्कार केला; पण केलेला नमस्कार न स्वीकारता असूद्या औक्षवंत व्हा असं म्हणाले. वय नव्वदीच्या आसपास गेलंय. कोणतीही व्याधी जवळ आलेली नाही. सकाळी सहा वाजता दिवस सुरू होतो. आम्ही गेलो तेव्हा सायंकाळ झालेली. चेहऱ्यावर थकवा नव्हता. प्रसन्नता होती. अगत्य होते. या वयातही किती प्रसन्नता! आयुष्याच्या संध्याकाळी हा माणूस किती समृद्ध आहे, याचीच प्रचीती आली.

कधीकाळी महाराष्ट्रात कुस्तीचा बुलंद आवाज असलेले बाबाजी आज सुखात आपले आयुष्य कंठत आहेत. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत आहे. आयुष्यात येणाऱ्या सुख-दुःखाच्या क्षणांनी नाउमेद न होता आपल्याला जे चांगलं काही करता येईल, ते करत राहायचं हाच या भगवानराव मोरे या महाराष्ट्र केसरींचा पॅटर्न आहे.

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT