Book Plantone
Book Plantone Sakal
सप्तरंग

विज्ञानातून गैरव्यवहाराला आव्हान!

सम्राट कदम

एकाच कादंबरीत दोन स्वतंत्र कथानकं - एक सामाजिक परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं, तर दुसरं विज्ञानजगताचा सारिपाट नेमक्या पद्धतीने मांडणारं!

एकाच कादंबरीत दोन स्वतंत्र कथानकं - एक सामाजिक परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं, तर दुसरं विज्ञानजगताचा सारिपाट नेमक्या पद्धतीने मांडणारं! विशेष म्हणजे, ही दोन्ही कथानकं समांतर असली तरी, परस्परांमध्ये आत्मीय सहसंबंध पाहायला मिळतो आणि त्यामुळेच वैज्ञानिक संकल्पनांपासून कोसो दूर असलेल्या वाचकालाही ‘प्लॅंटोन’ कादंबरी कवेत घेते. या कादंबरीत साहस, सामाजिक वास्तव, राजकीय कुरघोड्या, ध्येयवेडी माणसं, प्रेमाचा हळुवार स्पर्श, समर्पित जीवन, सर्वसामांन्यातला नायक आणि त्याहूनही सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वैज्ञानिक समुदायाची कार्यपद्धती आणि विज्ञानाचा अद्‍भुत आविष्कार असं सारं काही येतं.

विज्ञान कथालेखक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. संजय ढोले यांची ही पहिलीच विज्ञान कादंबरी, कथानक ज्या वेगाने पुढे जातं, त्याच वेगाने आजूबाजूची कल्पनासृष्टी आपल्यासमोर उभी राहते. खानदेशातील वनपरिक्षेत्र आणि कथानकाचा प्रमुख नायक वनपाल सुनील सोनवणे आपल्या भेटीला येतात. त्यांचे स्वागतच वनपरिक्षेत्रात चालणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडींचं अचूक टिपण करतं.

वाचकाला याच सुरवातीच्या घडामोडींतून कादंबरीच्या उत्कटतेची ओढ लागते. सोनवणेंच्या कर्तव्यदक्ष कारकीर्दीचा लेखाजोखाच आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेतील जळजळीत वास्तव समोर ठेवतो. निसर्गसंपन्न रामपूर परिक्षेत्रात बदली होऊन आलेले सोनवणे, त्यांचे सहकारी जाधवकाका, साहाय्यक वनपाल निशिकांत ठाकरे, वाहनचालक नटवरसिंग या वनविभागातील प्रामाणिक लोकांचे प्रयत्न दर्शवतात आणि त्यांच्याभोवती फिरणारं कथानक सर्वच भ्रष्ट यंत्रणांचा बीभत्स चेहरा समोर आणतं. विज्ञान कथानकाचा प्रमुख नायक सोनवणेंचा घनिष्ठ मित्र डॉ. समीर ताटकरे एका पत्राच्या रूपाने भेटायला येतात. हे पत्र मित्रप्रेमाची साक्ष तर देतंच, त्याचबरोबर वाचकाला अनपेक्षित धक्का देत नव्या समांतर कथानकाची रुजवण करतं. सोनवणेंचा भ्रष्ट यंत्रणेविरुद्धचा लढा आणि देशप्रेमापोटी भारतात परतलेल्या डॉ. समीर यांचा विज्ञानजगताला थक्क करणारा संशोधनाचा प्रवास हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे.

रामपूरमध्येच एका वनस्पती संरक्षण व संशोधन केंद्रात रुजू झालेले डॉ. समीर वनस्पतींमधील स्मृतिसदृश प्रथिनांचा शोध अशा ठळक अक्षरांत जेव्हा प्रबंध मांडतात, तेव्हा कादंबरीच्या बीजकथानकाला सुरुवात होते. वनस्पतींतील स्मृती प्रथिनांचा शोध घेणारं यंत्र म्हणजे ‘प्लॅंटोन’ कादंबरीचा नायक आहे. या यंत्राची निर्मिती केवळ विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या वाचकालाच थ्रिलर अनुभव देते असं नाही, तर सर्वसामान्य व्यक्तीही ‘वनस्पतींना मेंदू आहे का?’ या कल्पनेनेच प्रभावित होते. डॉ. समीर यांच्या सहकारी डॉ. अंजली सहसंशोधक म्हणून कार्य करतात. संशोधन संस्थेतील वातावरण देशातील आजच्या रखडलेल्या संशोधनामागचं कारण अगदी लिटमस टेस्टसारखं स्पष्ट करतं. कथानकाच्या निमित्ताने का होईना, सर्वसामान्यांना देशात संशोधन कसं चालतं, प्रकल्प कसे सादर होतात, चर्चा कशी होती आणि देशात कोणकोणत्या संशोधन संस्था आहेत याची तरी जाणीव होते. त्यांची कार्यपद्धती वाचकाच्या नकळत स्मरणात राहते.

वनसंपदेने समृद्ध असेलेल्या वनपरिक्षेत्रातील चंदन तस्करी रोखण्यासाठी सोनवणे आटोकाट प्रयत्न करतात; परंतु अगदी वनरक्षकापासून वरिष्ठ अधिकारी, आमदार ते मंत्री अशा अनेकांच्या कुटील साखळीमुळे हे प्रयत्न अपुरे ठरतात. अगदी जीवघेण्या प्रसंगांचाही सामना त्यांना करावा लागतो. अशा वेळी त्यांना दैनिक चव्हाट्यावर या वृत्तपत्राचे वार्ताहर जयंत पाटील, पोलिस सबइन्स्पेक्टर गोविंद पवार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष संरक्षक लाभतात. डॉ. समीर यांनी वनस्पतींमधील स्मृती प्रथिनांचा घेतलेला शोध, त्याचा चंदनतस्करी रोखण्यासाठी होणारा उपयोग आणि त्याहीपेक्षा सोनवणेंना न्याय मिळवून देण्यासाठी वनस्पतीने दिलेली साक्ष, एक थ्रिलर अनुभव वाचकाला देते. वैज्ञानिक तथ्यांशी कोणतीही तडजोड न करता लेखक अगदी सहजतेने सर्वसामान्य व्यक्तीला विज्ञानाच्या उत्कटतेची सफर घडवून आणतो. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचं समाजातील महत्त्व अधोरेखित होतं. कथानकाबरोबरच उत्कटतेचा प्रवासही परमोच्च बिंदू गाठतो. वाचकाला जाणवणाऱ्या उत्कटतेला न्याय देणारा वेग कादंबरीने साधला आहे. म्हणजे कादंबरीच्या शेवटी वाढलेला वेग उत्कटतेला पूरक ठरतो. मराठी विज्ञान कादंबरीच्या प्रवासात ही कांदबरी एक मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

पुस्तकाचं नाव : प्लॅंटोन

लेखक : डॉ. संजय ढोले

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस (०२० - २४४७६९२४)

पृष्ठं : ४६२,

मूल्य : ५९५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT