Chitangrao Guruji Sakal
सप्तरंग

पाणीवाले चितांगराव गुरुजी

मी ज्या ‘पाणीवाले गुरुजी’ यांच्याविषयी सतत लोकांकडून ऐकत होतो, ते गुरुजी शिवाजी विद्यालय सातारी येथे शिक्षक होते.

संदीप काळे sandip.kale@esakal.com

मी त्या दिवशी माझ्या गावी पाटनूरला होतो. सकाळी वर्तमानपत्र वाचत होतो. एक बातमी होती. लोकसहभागातून होणाऱ्या कामासाठी पाचवीत शिकणाऱ्या एका मुलाने आपला खाऊच्या डब्यात साठवलेले पैसे दिले. बातमीच्या खोलात जाऊन सर्व माहिती घेतली आणि त्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या नागापूर गावाकडे मी निघालो. मी येत आहे अशी अगोदरच फोनाफोनी केली होती.

मी, गजानन मोरे, संभाजी पुयड, नितीन खरात आम्ही नागापूर गावात जाऊन पोहचलो. एक भली मोठी दाढी असलेल्या गुरुजींसह अनेक जण नागापूरमध्ये आमची वाट पाहत होते. आम्ही त्या गुरुजींच्या घरी गेलो. चहापान झाले. जे काम पाहण्यासाठी आम्ही आलो होतो, त्या कामाच्या ठिकाणी आम्ही पोहचलो. सगळीकडे पाणीच पाणी. शेकडो एकरमध्ये बागायती जमिनी. मोठे पूल आणि लोकसहभागातून उभे राहिलेले मोठे ऐतिहासिक काम. त्या कामाचे जनक होते ते दाढीवाले गुरुजी जे आता ‘पाणीवाले गुरुजी’ म्हणून त्या भागाला परिचयाचे होते.

मी ज्या ‘पाणीवाले गुरुजी’ यांच्याविषयी सतत लोकांकडून ऐकत होतो, ते गुरुजी शिवाजी विद्यालय सातारी येथे शिक्षक होते. त्यांच्यामधली कामाची तळमळ पाहून त्यांच्या गावातले मोठे व्यक्तिमत्त्व असलेले प्राचार्य आपाराव कुर्मे यांनी तुम्ही पूर्णवेळ सेवाभावी कामात स्वतःला झोकून द्या, असा सल्ला या गुरुजींना दिला. त्या शिक्षकानं राजीनामा दिला आणि पूर्णवेळ सेवाभावी कामात स्वतःला झोकून घेतले. गुरुजींनी आपल्या कामाची सुरुवात आपल्या गावापासून, आपल्या विभागापासून केली आणि पायाभरणीतच एक इतिहास निर्माण झाला. हाडाचे शिक्षक ते लोकांच्या मनातले सेवक असा त्यांचा थक्क करणारा ‘पाणीवाले गुरुजीचा’ प्रवास मी अनुभवत होतो.

मी ज्या गुरुजींचे काम पाहून थक्क झालो, त्यांचे नाव चितांगराव गणपतराव कदम (९४२१४१२५२३). गुरुजींचा प्रवास अगोदर गुरुजी, शिक्षक मग सरपंच आणि आता मुळावा जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य असा. तत्त्वनिष्ठ, कमालीचा साधेपणा, इमानदारीने दिलेला शब्द पाळणारी व्यक्ती हे सगळे शब्द जणू चितांगराव गुरुजी यांचे अलंकार आहेत, असे तिथल्या लोकांना बोलताना मला जाणवत होते. शिक्षक असताना त्यांनी केलेल्या अनेक प्रयोगांचा इतिहास झाला. सरपंच असताना राज्यपातळीवरचे अनेक पुरस्कार नागापुर गावाला मिळाले. आता जिल्हा परिषद सदस्य असताना लोकसहभागातून त्यांनी त्या परिसराला नंदनवन केले. सरकारकडून एक नवा पैसा न घेता, मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या अनेक गावांना त्यांनी पूल बांधले. त्या पुलावर पाणी अडवणारे बांध बांधले. हे बांध, पूल बांधल्यामुळे शेकडो मुलांच्या शाळेचा प्रश्न मिटला, ३२ गावातल्या पिण्याचा, शेतीच्या पाण्याबाबतचा, अविकसित शिक्षक प्रणालीचा प्रश्न सुटला.

आम्ही कामाच्या ठिकाणी पोहचलो. तिवरंग ते तळणी, दिवटीपिंपरी ते साप्ती, बिटरगाव ते काळेश्वर, पळसी ते मनुला, पिंपरी ते पळशी अशा अनेक ठिकाणी पूल बांधण्याचे काम झाले होते. त्या पुलावरून संथ वाहणारे पाणी पाहून राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन लोकांची तळमळ ओळखणारी माणसे असतील, तर काय होऊ शकते, असे प्रश्न माझे मलाच पडत होते. आम्ही ज्या बंधाऱ्याचे काम पाहत होतो, तिथे असणाऱ्यांमध्ये एक पाचवीत शिकणारा मुलगाही होता. त्याला मी थोडे बोलते केले. तो म्हणाला, पावसाळ्यातले किमान चार महिने तरी शाळेत जाणे शक्य नव्हते. या पुलासाठी जेव्हा लोकवर्गणी मागायला सुरुवात झाली, तेव्हा मी माझ्या खाऊच्या डब्यातले पैसे गुरुंजींना दिले. आता या पुलामुळे मला शाळेत नियमित जाता येते. तो चिमुकला मोठ्या माणसासारखा बोलत होता. गुरुजी राजकारणात आले, तरी त्यांचा शिक्षक असलेला पिंड अजून कायम होता. हे त्या मुलाच्या बोलण्यातून जाणवत होते.

आम्ही जिथे जात होतो तिथे महिला-पुरुष भरभरून बोलत होते. आम्ही कारमध्ये होतो आणि गुरुजी त्यांच्या ‘यशवंती’ नाव लिहिलेल्या दुचाकीवरून आमच्या पुढे होते. आमच्यासोबत असलेला गुरुजींचा मुलगा आदित्य सांगत होता, बाबांनी हजारो किलोमीटरचा प्रवास ‘यशवंती’वर केला आहे. दुचाकीवर फिरताना लोकांशी बोलता येते, लोकांचे प्रश्न समजतात, अशी बाबांची धारणा आहे, म्हणून ते दुचाकीवर फिरतात.

आम्ही गाडीतून पुढे पाहत होतो, रस्त्याने अनेक जण सन्मानाने हात जोडून गुरुजी यांच्यासमोर नतमस्तक होत प्रेमाने मिठी मारायचे. पळशी पुलावर एक आजोबा काठी टेकवत-टेकवत माझ्याजवळ येऊन म्हणाले, बाबा, माझी तीस एकर जमीन. पण काय करू. एक रुपयाचा माल व्हायचा नाही. पाणी नसलेल्या जमिनीची अवस्था एखाद्या आई नसलेल्या लेकरासारखी असते बघ. आता पाणी आणि आमच्या जमिनीचे पिढीजात दारिद्र्य संपले. दोन वेळच्या तुकड्याला महाग असलेला आमचा भाग गुरुजींच्या तळमळीने आता सोन्याचे घास खाऊ लागलाय.

दिवस मावळतीकडे जात होता. त्या बंधाऱ्यातील पाण्यात मनसोक्तपणे वावरणाऱ्या पक्ष्यांना आता आपल्या घराची चाहूल लागली होती. या गावातून त्या गावात न थांबता गुरुजींनी बांधलेल्या त्या पुलावरून पडणारे पाऊल जणू परिवर्तनाचे पुढचे पाऊल गुरुजींचा वसा घेऊन पुढे पडत आहे, असं त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला वाटत होते. ते सगळे काम बोलत होते. गुरुजी मात्र काहीही बोलत नव्हते. मी गुरुजींच्या जवळ गेलो. त्यांचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले आणि म्हणालो, गुरुजी आम्ही निघतो आता. गुरुजी म्हणाले, असे कसे? भूक लागली असेल ना.

मी सहज बोलून गेलो, हे काम पाहून भरले पोट माझे. गुरुजी पुन्हा म्हणाले, नाही हो, थोडा वेळ काढा. आईला मी शेंगोळे करायला सांगितले आहेत. गुरुजी, आई आणि शेंगोळे याला नाही म्हणायची माझी हिंमत नव्हती.

लोक नाव ठेवतात, विरोध करतात; पण जो कामातून वेगळे आणि चिरंतर टिकणारे निर्माण करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही. मी जेव्हा जेव्हा निवडणूक लढवली, तेव्हा तेव्हा जिथे जिथे चहापान करायला पैसा लागायचा, तो मित्राकडून, लोकांकडून जमा झाला. तुमचा पक्ष, तुमचे नाव, तुमची जात यापेक्षाही तुमचे काम बोलते, गुरुजी बोलत होते.

आईविषयी बोलताना गुरुजी म्हणाले, काही दिवसांपूर्वी बाबा गेले आणि आईच्या शरीरातून प्राण हरपून गेला असे झाले. आपल्या बाबांच्या आठवणीत डोळे पुसत गुरुजी म्हणाले, आजही आईच आपल्या घरचा कारभार पाहते. पाच भाऊ आणि मोठा परिवार आजही एकत्र आहे. गुरुजी बोलत होते आणि आम्ही विद्यार्थांच्या भूमिकेत होतो.

घरी दारासमोर गुरुजींची आई राजसबाई वाट पाहत उभ्या होत्या. किती उशीर रे सोन्या, म्हणत आईने गुरुजीच्या पाठीवरून हात फिरवला. घरात पाऊल टाकताच शेंगोळ्याच्या सुगंधाने मन तृप्त झाले. जेवताना मध्ये-मध्ये आई गुरुजींना घास भरवत होती. गुरुजी जसे घराबाहेर ऋषीतुल्य होते तसे घरात आई, पत्नी सविता, मुलगी श्वेता यांच्या प्रेमाने भारावून गेलेले स्वामीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. इथले सगळे काम, प्रेम मनात साठवून आम्ही परतीच्या वाटेने निघालो. ‘पाणीवाले चितांगराव गुरुजी’सारखी माणसे जर आणखी निर्माण झाली तर सरकारच्या नावाने आरडाओरडा करायची गरज पडणार नाही; शिवाय निर्मळ माणुसकीचा झराही सर्वत्र कायम वाहत राहील, नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT