workers
workers sakal
सप्तरंग

हवाय माणुसकीचा ओलावा

संदीप काळे saptrang@esakal.com

मला वाशीम सोडून बराच वेळ झाला होता. माझा सारथी संदेश पवार म्हणाला, 'समृद्धी महामार्गाला लागण्यापूर्वी गाडीच्या चाकांमधील हवा तपासून घेऊ.' थोडं पुढं गेल्यावर रस्त्याच्या एका कडेला हवा भरणाऱ्याचं मोठं दुकान होतं. आमची गाडी त्या दुकानासमोर येऊन थांबली. संदेशनं हवा भरणाऱ्याला आवाज दिला. तो जेवण करीत होता. वेळ लागणार आहे, हे माझ्या लक्षात आल्यावर मी गाडीतून खाली उरतलो.

फोनवर बोलत बोलत मी बराच लांब गेलो. तिथं झाडीमध्ये चार लोक खोदत बसले होते. माझी नजर त्या खोदणाऱ्या माणसांच्या बोलण्याकडं जात होती. ‘अरे बस्स झाले, अजून किती मोठा खड्डा करशील. आता हे होईल बरोबर. आकार कसा आलाय ते बघ. आतमध्ये माणसांना उतरता येतं की नाही ते बघ,’ असं त्यांचं बोलणं सुरू होतं. मी जरा पुढं जाऊन पाहिलं तर ती माणसं खड्डा खोदत होती.

एक माणूस आतमध्ये जाऊन त्या खड्ड्यामध्ये वारंवार आपल्या स्वतःच्या शरीराचं माप घेत होता. मला काही कळेना. चौघांनी दारू प्यायल्याचं माझ्या निदर्शनास आलं. ते माझ्याशी काही बोलण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हते. मी तिथून निघणार इतक्यात त्या माणसांशी बोलण्यासाठी एक दुसरा माणूस तिथं आला. त्या माणसानं त्यांच्या कामावर एक नजर टाकली. मी त्याला हटकलं, `का हो, ही माणसं इथं काय करतात?’ तो माणूस जरा तिरकसच होता.

तो म्हणाला, ``काय करतात म्हणजे काय दिसत नाही तुम्हाला, मढ्याला पुरण्यासाठी खड्डा करतात ते.’’ त्यांनी सांगितल्यावर माझ्या लक्षात आले. ही माणसं अंत्यविधीची अंतिम तयारी करत आहेत. मी माझा सारथी संदेशला पाण्याच्या चार-पाच बाटल्या घेऊन ये, असा निरोप दिला. संदेश पाण्याच्या बाटल्या घेऊन आला. त्या खोदणाऱ्या माणसांना मी त्या पाण्याच्या बाटल्या दिल्या. काही क्षणात त्या चौघांनी सर्व बाटल्या संपवल्या. पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली.

मी त्या खड्ड्यामध्ये नजर टाकली, तर आखीव-रेखीव अशी सुंदर देवळी त्या खड्ड्यामध्ये कोरली होती. त्या देवळीमध्ये अलगदपणे ६० किलोचा माणूस सहजपणे बसला असता. ती देवळी अजून आखीव-रेखीव कशी होईल यासाठी त्या माणसांची धडपड चालली होती.

मला त्या माणसांना थोडसं बोलतं करायचं होतं. मी त्यांच्याशी बोलू लागलो. सुरवातीला एक-दोन शब्दांमध्ये उत्तर देणारे चौघे जण काम सोडून माझ्या जवळ बसले होते. कोणीतरी पाणी, पैसे देते. यापेक्षा सन्मानपूर्वक कोणं बोलेल यासाठी ते चौघेही भुकेले होते.

आमच्या खूप गप्पा झाल्या आणि त्या गप्पांमधून आपल्या पृथ्वीवरची `माणूस’ नावाची एक जमात आजही केवळ माणुसकीसाठी किती भुकेली आहे त्याचं उदाहरण मला तिथं पाहायला मिळालं. मी ज्या चौघांशी बोलत होतो, त्यांची नावं धर्मा पिवळे, आत्राम गोमे, रत्नदीप जोंधळे, शाहू खानसोळे.

या चौघांना रोजमजुरीबरोबर आसपासच्या पंचक्रोशीमध्ये, जिथं कुठल्याही माणसाचं निधन झालं तिथं बोलावणं यायचं. जिथं माणूस मेल्यावर त्याला पुरण्याची प्रथा आहे तिथं या चौघांनाही हमखास काम मिळतं. दफन विधीचा खड्डा करण्यासाठी त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये मिळणं अपेक्षित होतं, पण अनेक ठिकाणी ते मिळत नाहीत, असं ते सांगत होते. त्यांना समाजात अपशकुनी, दरिद्री, मागच्या जन्मी भयंकर पापी असं समजलं जातं. त्यातून त्यांना चार माणसांत उठण्या-बसण्याचा काही अधिकार नव्हता. असे अनेक किस्से त्यांच्या बोलण्यातून पुढं येत होते.

आमचं बोलणं सुरू होतं, तितक्यात अंत्यविधीसाठी एका व्यक्तीला घेऊन नातेवाईक आले होते. चार माणसांनी डेड बॉडीला खाली ठेवलं. डेड बॉडीची पूजा केली. त्याच्या कपाळावर तीन विभूतीच्या पट्ट्या ओढल्या गेल्या आणि अलगद त्या खड्ड्यांमधल्या देवळीमध्ये त्या माणसाला बसवलं. तो धडधाकट असलेला माणूस त्या देवळीमध्ये पुरता मावत नव्हता. त्या खड्डा करणाऱ्या चौघांनाही तिथे असणाऱ्या अनेक माणसांनी शिव्या दिल्या.

ती डेड बॉडी पुन्हा बाहेर काढली, ते चौघं त्या खड्ड्यात उतरून त्या देवळीला पुन्हा कोरीव, मोठा आकार देत होते. ते काम झाल्यावर ती डेड बॉडी पुन्हा आतमध्ये बसवली. जमलेल्या सगळ्या नातेवाइकांनी त्या डेड बॉडीवर थोडी थोडी माती टाकायला सुरुवात केली. सगळ्यांनी मूठभर माती टाकल्यावर त्या चौघांनी तो खड्डा बुजवायचे काम सुरू केले.

तिथे असणारा प्रत्येक जण त्या डेड बॉडीला नमस्कार करत घरचा रस्ता धरत होता. शेवटी कोणी उरलं नाही. शेवटच्या दोन माणसांनी धर्माच्या हातावर पैसे टेकवले. धर्मा त्या पैसे देणाऱ्या माणसांना म्हणाला, ``मालक हे पैसे फार कमी होतात.’ धर्माला दोन शिव्या घालत तो माणूस म्हणाला, 'अरे, गुपचूप पैसे घे. नाहीतर हेही देणार नाही,’ असे खडसावून ती माणसे तिथून निघून गेली.

हे चौघं तिथं थांबले. तो खड्डा भरण्याचं काम ते करत होते. मी ते सगळं निरीक्षण करत तिथं थांबलो होतो. अंत्यसंस्कार करण्यासाठी सुरवातीला थांबलेले ते चौघं. त्यानंतर शेकडो माणसं आली आणि गेलीही, पण शेवटीसुद्धा ते चौघेच तिथं थांबले होते. एका माणसाला शेवटपर्यंत पोहोचविणारे हे चौघं या समाजाच्या मानसिकतेचे अपशकुनी पैलू कसं काय असू शकतात, असा प्रश्न मला पडत होता.

त्यांची वाईट आर्थिक परिस्थिती, सतत लोकांकडून मिळणारे टोमणे. त्यामध्ये कधीतरी आयुष्याला चांगला सूर सापडेल हे शोधण्यासाठी त्यांचे चाललेले आयुष्य सारे काही कमालीचे होते. मी त्या सर्वांचा निरोप घेण्यासाठी सज्ज झालो. मी माझ्या खिशामध्ये असणारे चार पैसे त्या चौघांच्या हातावर ठेवले. इतका वेळ बोलणारा कुणीतरी मोठा माणूस त्यांनी चार पैसे आपल्या हातावर ठेवले हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हतं.

त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, आपुलकीनं कुणीतरी बोलतंय. कुणीतरी, आमच्या हातांना स्पर्श करीत आमच्या खांद्यावर हात ठेवतयं. प्रेमानं चार शब्द बोलतयं, हे त्यांच्यासाठी सर्वांत समाधानाचं होतं. हे त्यांनी बोलूनही दाखवलं. त्या सगळ्यांच्या आयुष्याभोवती पडलेला गुंता, त्यांची माणुसकीची भूक, हे सारे काही मनामध्ये ठेवून मी तिथून जड पावलांनी माझ्या मार्गाला लागलो. काय माहिती, त्या बिचाऱ्यांना स्वतःचा मार्ग कधी सापडेल, बरोबर ना... ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT