sanjay kalamkar
sanjay kalamkar 
सप्तरंग

ती सोडत नाही... (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalamkar009@gmail.com

एक होतं जंगल. तिथं पोपट, हत्ती, वाघ आणि गाढव हे चार मित्र जिवाभावानं राहत असत. अचानक काय झालं, तर दुष्काळामुळे ओढे, नाले, नद्या, पाणवठे आटू लागले. दुष्काळाच्या झळा जंगलाला बसू लागल्यानं पशू-पक्षी भयभीत झाले. पोपट इतर तीन मित्रांना म्हणाला ः ""- मला उडता येतं. मी पाण्याचा शोध घेऊन येतो.'' पोपट शोधक नजरेनं उडत असताना त्याला पाण्याचं सरोवर दिसलं. हिरव्यागार पाण्यानं तुडुंब भरलेलं सरोवर पाहून पोपट हरखून गेला. "आधी आपण पाणी पिऊ या आणि नंतर तिन्ही मित्रांना सरोवरावर घेऊन येऊ या,' असा विचार करत पोपट ते पाणी अधाश्‍यासारखा प्यायला. मात्र, पाणी विषारी होतं. पोपट जागीच गतप्राण झाला. त्याचा शोध घेत ते तिन्ही मित्र सरोवराकाठी आले. तहानेनं व्याकुळ झाल्यानं तेही अधाश्‍यासारखं सरोवरातलं पाणी प्यायले. त्यांचीही गत पोपटासारखी झाली. ते चारही मित्र एकाच जागी मरून पडले. कालांतरानं त्यांची शरीरं कुजली. खत होऊन मातीत मिसळली गेली. काही दिवसांनी त्या मातीत एक रोप उगवलं. बहरत गेलं. त्याला पांढरीशुभ्र फुलं आली. त्यांच्या सुगंधानं पशू-पक्षी धुंदावून गेले. माणसालाही या झाडाचा शोध लागला. त्यानं या मोहाच्या फुलांपासून दारू तयार केली. गंमत अशी की, या द्रव्यात त्या चारही प्राण्यांचे गुण उतरले. पहिला ग्लास पिणारा पोपटासारखा बोलू लागला. दोन पेग घेतलेला हत्तीसारखा झुलू लागला. थोडी जास्त झाल्यावर वाघासारख्या डरकाळ्या फोडू लागला आणि अती झालेला गाढवासारखा लोळू लागला. दारू पिणाऱ्या माणसामध्ये हे चारही पक्षी-प्राणी घुसून बसले. हळूहळू या द्रव्यानं माणसाच्या जिभेला चटक लावली. इतकी की हे द्रव्य जगभर वाहू लागलं. दारूनं थोड्यांच्या तिजोऱ्या भरल्या, अनेकांच्या मोकळ्या केल्या. जगाचा कितीतरी भाग या द्रव्यानं धुंद केला. ती अनेक पुरुषांची मैत्रीण झाली. त्यापेक्षा जास्त स्त्रियांची सवत झाली. तिनं चार संसार उभे केले; पण शेकडो उद्‌ध्वस्तही केले. तिच्यात किमया आहे. ती वेड्याच्या पोटात गेली तर तो शहाण्यासारखा बोलतो. शहाण्याच्या पोटात गेल्यावर तो वेड्यासारखा बोलू लागतो. ती आधी खुदकन्‌ हसते. पोटात जाते. मैत्रीण होते. आधी माणूस तिला पितो, नंतर ती माणसाला पिते. त्याला निर्लज्ज, निबर, संवेदनाहीन, जगण्यास नालायक करून टाकते. हळूहळू घट्ट विळखा घालते. भक्ष्य गिळलेल्या अजगराप्रमाणे हाडं, बरगड्या करकचून आवळत श्वास घुसमटून टाकते. आधी ती माणसाला माणसातून उठवते, नंतर त्याला जगातून उठवल्याशिवाय तिचं कार्य तडीस जात नाही. माणूस मेला तरी ती मात्र मरत नाही. दुसऱ्या देहाचा आसरा घेते. ती यमाची पट्टशिष्या म्हणून काम करते. दारू पिणाऱ्या माणसाला हे सारं काही जाणवत नसतं असं नाही; पण तो गलितगात्र झालेला असतो. प्यायला की बरळतो, बडबडतो. त्यानं दुःख कमी होईल असं त्याला वाटतं. ते तेवढ्यापुरतं कमी झाल्यासारखं वाटतंही; पण कायमचं संपत मात्र नाही. नंतर मूळ दुःख बाजूला राहतं आणि दारू हेच मूळ दुःख होऊन बसतं.

तो सकाळी उठतो तेव्हा भानावर असतो. मग तो स्वतःशी बोलतो. स्वतःला बजावतो. ठणकावतो ः "दारूच्या आहारी गेल्यानं आपल्याला प्रतिष्ठा राहिली नाही...आपण माणसातून उठलो आहोत...समाज आपला तिरस्कार करतो... "दारुडा', "बेवडा' असं म्हणून हिणवतो...कुटुंबात आपल्याला किंमत राहिलेली नाही... आपल्यामुळे कुटुंबाला किंमत उरलेली नाही...बायको आपला द्वेष करते...आपलीच मुलं आपल्याकडं - आपण त्यांचा बाप असूनही- भुतासारखी पाहतात...हे कुठंतरी थांबलं पाहिजे...आपण सुधारलो पाहिजे...
विचार करता करता दुपार टळून जाते. त्याचं मन ओढ घेऊ लागतं. तो मनाला बजावतो ः "आज दारू प्यायची नाही. शहाणं व्हायचं.' या घालमेलीत सायंकाळ होते. पावलं निघतात. ती त्याच्या नियंत्रणात नसतात.

तो पुन्हा विचार करू लागतो ः "ही काय ओढाताण आहे? काय तमाशा आहे? यापेक्षा पिण्यात डुंबून गेलेलं बरं!' तो अधीर मनानं तिला जवळ करतो. ती त्याला कवेत घेते. मग बडबड, आरडओरडा, धिंगाणा अन्‌ कधीतरी मेल्यासारखी गाढ झोप. घरटं उद्‌ध्वस्त करून स्वतःला आत्मघातकी दहशतवाद्याप्रमाणे संपवून घेणारी अशी कितीतरी माणसं. त्यांनी शहाण्या मनाला प्रबळ करायला हवं. कुचंबून गेलेले म्हातारे आई-बाप आठवायला हवेत. घासाची वाट पाहताना कासावीस झालेले, बापाला पाहून कवेत येण्याऐवजी भेदरून गेलेले चिमुरडे आठवायला हवेत. "हा घरी आला नाही तर बरंच' अशी मनोमन प्रार्थना करणारी बायको त्यानं आठवायला हवी. या जगात आपलं "नकोसं होणं' याच्याइतकं वाईट काहीच नाही, याची त्याला जाणीव व्हायला हवी.
थंड हवेच्या देशांत माणसं सर्रास मद्यसेवन करतात. तिथं कुटुंबातही जेवणाआधी मद्य घेतलं जातं. ती तिकडच्या माणसांच्या शरीराची गरज असेलही; पण त्यातही एक संयम असतो. आरोग्याला हितकारक होईल इतकीच चांगल्या दर्जाची मर्यादित दारू तिकडची माणसं पितात. याउलट, भारतीय समाज प्रवाहपतीत आहे. भारतीय माणसाला भान राहत नाही. आवडेल त्यात इतकं रमायचं की त्यातच संपून जायचं अशी त्याची मानसिकता आहे. पिणारे पीतच राहतात. गुटखा खाणारे तो तोंडात घेऊन झोपतात! मोबाईल खेळणारे खेळतच राहतात. काही नट-नट्या सर्रास दारू पितात. त्यात त्यांना प्रतिष्ठा वाटते. अभिनय करून त्यांना खोटं जगण्याची सवय लागलेली असते. वास्तव जगण्यापेक्षा त्यांना आभासी जगणं सुरक्षित वाटत असावं कदाचित. अनेक कलावंतांनी, प्रतिभावंतांनी "मद्याशी कलेचं जवळचं नातं असतं' अशी आवई उठवून दिलेली आहे. मात्र, कितीतरी कवी, लेखक, अभिनेते दारूला शिवत नाहीत हेही खरं आहे. याचा अर्थ त्यांची प्रतिभा बोथट झालेली असते असं नव्हे. काही लोक छंद म्हणून, काही लोक दुःख विसरण्यासाठी, काही लोक आनंद साजरा करण्यासाठी, तर काही लोक विनाकारणही दारू जवळ करत असतात. काहींना रोज पिण्यात आणि वर त्या पिण्याचंही प्रदर्शन करण्यात प्रतिष्ठा वाटते, तर काही लोकांच्या घरी जसे ग्रंथ शोकेसमध्ये लावावेत तशा दारूच्या विविध बाटल्यांचं प्रदर्शन मांडलेलं दिसतं. लग्नाच्या वराती, गावोगावच्या जत्रा व छबिने, छोट्या-मोठ्या निवडणुका ही नवीन दारुडे निर्माण होण्याची "प्रसूतिस्थळं' असतात. मुलं घरातल्या मोठ्या लोकांचं पाहून अनुकरण करतात. यात त्या घरातल्या स्त्रीची अवस्था मोठी बिकट होते. ती कष्ट करून घर चालवते. आपल्या समाजात अशा कुटुंबांची संख्या काही कमी नाही. अशा स्त्रियांचे हुंदके कुणापर्यंतही पोचत नाहीत. दारूची दाहकता खोलवर पोचलेली आहे. तरी त्यावरही विनोद करणाऱ्यांची संख्या कमी नसते. उदाहरणार्थ ः दोन दारुडे रस्त्यानं चालले होते. त्यातला एक नाल्यात पडला आणि त्या अवस्थेत दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. रस्त्यावरचा म्हणाला ः "मी जगातले पोलादाचे सारे कारखाने विकत घेणार आहे', तर नाल्यातला हसत म्हणाला ः "पण मी ते विकले तर पाहिजेत ना!' एकंदर दारू काही काळ खरी परिस्थिती विसरायला लावू शकत असली तरी ती परिस्थिती काही ती बदलू शकत नसते. नशेत धुंद झालेल्या माणसाला एवढी जाणीव होण्यापुरतं का होईना भान आलं तर किती बरं होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT