Children and Parents
Children and Parents Sakal
सप्तरंग

दोष मुलांचा की पालकांचा?

संजीव लाटकर

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, या विषयावर बोललो. कार्यक्रम संपल्यानंतर प्रश्‍नोत्तरे झाली. त्यात ज्यांची मुलं परदेशात जाऊन स्थायिक झाली.

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, या विषयावर बोललो. कार्यक्रम संपल्यानंतर प्रश्‍नोत्तरे झाली. त्यात ज्यांची मुलं परदेशात जाऊन स्थायिक झाली, वेगळ्या शहरांत गेली, त्यांच्याबद्दलच्या तक्रारी ज्येष्ठांनी ऐकवल्या. हल्लीची पिढी भयंकर आत्मकेंद्री झाली, आई-वडिलांना विसरली, असाच बहुतांश सूर होता. हा दोष खरंच त्या मुलांचा आहे की पालकांचा, त्याविषयी...

हा प्रसंग अनेक वर्षांपूर्वीचा आहे; परंतु काल-परवा घडल्यासारखा. कार्यक्रम जुना असला तरी प्रश्न आजही तोच आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून मला बोलावलं होतं. त्यात मी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, या विषयावर बोललो. बोलताना स्वाभाविकच सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी या सर्वांचा आढावा घेतला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. प्रश्नोत्तरांमध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा सूर त्यांच्या मुलांबाबत नाराजीचा होता.

एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले, की त्यांची मुलगी आता परदेशात स्थायिक झाली आहे. ती तिच्या संसारात इतकी रमली आहे, की तिला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळही नाही. आम्ही शनिवार - रविवारची वाट पाहत असतो. जमलं तर बोलते, नाहीतर महिना महिना बोलतही नाही! (ही त्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा व्हिडीओ कॉल नव्हते आणि व्हाट्सॲपसुद्धा नव्हतं).

एक ज्येष्ठ आजी म्हणाल्या, ‘स्पष्ट शब्दात सांगते, आमची दोन्ही मुलं आम्हाला विचारत नाहीत. आधी मोठा अमेरिकेत गेला. मागोमाग धाकटासुद्धा गेला. त्या दोघांचं छान चाललं आहे. आम्हाला कधीतरी फोन करतात... नाही असं नाही; पण नुसतं फोनवर बोलणं कोरडेपणाचं वाटतं. आम्ही खूपच तक्रार केली, कुरबुर केली, की म्हणतात तुम्ही इकडे निघून या. तिकडे जाऊन आम्ही करणार काय? दोन-तीनदा जाऊनही पाहिलं... भूतासारखं वाटतं हो! काहीच काम नाही. उद्योग नाही. इथे कसं, आपल्या माणसात असल्यासारखं वाटतं.’

तिसरे ज्येष्ठ नागरिक म्हणाले, ‘माझा मुलगा दक्षिण भारतात नोकरीनिमित्त स्थायिक झाला आहे. त्याचं दर्शनसुद्धा दुर्लभ असतं आम्हाला. प्रवास झेपत नाही. तिथलं खाणं-पिणं आवडत नाही. त्यामुळे आम्ही इथेच थांबलो आहोत; पण आम्हाला अडकल्यासारखं वाटतं. कधी कधी असं वाटतं, की यासाठी का आपण मुलांना मोठं केलं? आपण एकत्र का राहू शकत नाही? अजून आम्ही हिंडते फिरते आहोत... उद्या अंथरुणाला खिळल्यावर आमचं कोण बघणार? आमचं कसं होणार? खरंच काही कळत नाही!’

अजून एक ज्येष्ठ नागरिक उठले आणि म्हणाले, ‘आम्ही एकत्र राहतो; पण तरीही अनेक दिवस एकमेकांशी बोलू शकत नाही. मुलगा आणि सून त्यांच्या कामात प्रचंड बिझी असतात. त्यांचं ऑफिस, त्यांच्या भेटीगाठी, मीटिंग, मुलांकडे बघणं या भानगडीत आमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ कुठे आहे?’

अजून एक ज्येष्ठ आजी उठल्या आणि थोड्या त्राग्यानेच म्हणाल्या, ‘‘हल्लीची पिढी भयंकर आत्मकेंद्री झाली आहे, तुम्हाला सांगते!’

आयुष्याचं सार्थक झालं, आपण कृतार्थ झालो अशी भावना घेऊन समाधानाने जगण्याच्या काळात समोरच्यापैकी बरेच ज्येष्ठ नागरिक हे कमालीचे अस्वस्थ दिसत होते. सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर मी बोलू लागलो.

मी म्हणालो, ‘‘क्षणभर मी तुमचं म्हणणं मान्य करतो, की हल्लीची पिढी... खरं म्हणजे हल्लीच्या पिढीला सरसकट दोष देण्यात अर्थ नाही... पण तुमची मुलं, आत्मकेंद्री झाली आहेत. तुमचा अनुभव सच्चा आहे, असं गृहीत धरून मी हे मान्य करतो, की तुमची मुलं आत्मकेंद्री झाली आहेत; पण त्यांना आत्मकेंद्री कुणी बनवलं? कधीतरी याचाही शांतपणे विचार कराल की नाही? ती जन्मली तेव्हा तर आत्मकेंद्री नव्हती! तुम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करता, म्हणजे तुम्ही आत्मकेंद्री नाही, असं मी गृहीत धरतो. आत्मकेंद्री नसणं म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्याबद्दल सहानुभूती, अनुकंपा, प्रेम बाळगणं. दुसऱ्या माणसाला आपल्या जगण्यामध्ये, आपल्या जाणिवांमध्ये, आपल्या संवेदनामध्ये सहभागी करून घेणं...’’

माझ्या म्हणण्यावर काही ज्येष्ठ नागरिक मान डोलावत होते. त्यांना माझं म्हणणं पटलेलं दिसत होतं. सर्वजण शांतपणे आणि उत्सुकतेने माझं बोलणं ऐकू लागले.

‘माणूस हा मूलतः सामाजिक प्राणी आहे, हे आपण शाळेपासून शिकलो आहोत. सामाजिक प्राणी म्हणजेच परस्परांशी संबंध ठेवणे, परस्परांचे संबंध दृढ करणे, परस्परांना आधार देणं, परस्परांची सुखदुःख वाटून घेणे, समूहाने जगणे वगैरे... म्हणजे माणसाच्या या मूळ स्वभावाला आपण विसरलो आहोत किंवा मुद्दामहून त्याचं हे वैशिष्ट्य नष्ट करायच्या मागे लागलो आहोत की काय, असं वाटावं, अशी परिस्थिती मला तुमच्या बोलण्यावरून लक्षात येते आहे!’’

‘बरोबर आहे तुमचं’, एक ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे म्हणाले!

‘म्हणजे मी असं म्हणू शकतो का, की तुमची मुलं... ज्यांच्याबद्दल तुम्ही आता तक्रार करता आहात... ती मुळात सामाजिक प्राणी होती; परंतु तुमच्या संस्कारामुळे ती आत्मकेंद्री बनली? बघा... विचार करा... मी जे बोलतो आहे ही व्यक्तिगत टीका नव्हे. मला तुमच्यावर टीका करायची नाही... मात्र या प्रश्नाकडे आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन पाहिलं तर पुढल्या पिढ्यांचं भलं होईल... मुलांना वाढवायचं कसं आणि पालक म्हणून आपलं कर्तव्य काय, याचा विचार यानिमित्ताने होईल, असं मला वाटतं...’’ माझ्या म्हणण्याचा अपेक्षित आणि सकारात्मक परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

‘आपण मुलांना लहानपणापासून फक्त त्यांचाच विचार करायला शिकवलं तर नाही? मला काही पालक माहिती आहेत, जे त्यांच्या मुलांना स्पष्टपणे सांगतात, की तू तुझं बघ! तुझ्या मित्राचा अभ्यास झाला नाही, म्हणून तू त्याला शिकवायला जातोस, हे योग्य नाही... तुला काय पडलंय त्याचं? तो त्याचं बघेल. तो उद्या मदतीला येणार आहे का तुझ्या? तुला मार्क कमी पडले, तर तो जबाबदारी घेणार आहे का? तू तुझा अभ्यास कर आणि तुझ्यापुरतं बघ...’

मुलं सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊ लागली, थोडं काम करू लागली, की पालक त्यांना परावृत्त करतात आणि ‘अभ्यासाला बस! तुझा क्लास आहे ना? तुझा गृहपाठ आहे ना?’, असं सांगू लागतात. लष्करच्या भाकऱ्या भाजू नकोस, असा आदेशही देतात. मुलांचा कल हा जन्मतःच सामाजिक असतो; परंतु पालकांच्या आत्मकेंद्री वृत्तीमुळे हा कल हळूहळू संकोच पावू लागतो.’’ माझ्या स्पष्ट बोलण्याचा अपेक्षित परिणाम झालेला मला दिसत होता.

‘पालकत्व म्हणजे शेवटी काय? आपण काय पेरतो आहोत आणि त्यातून काय उगवणार आहे, याचं सर्वसाधारणपणे भान ठेवणं. तुम्ही जेव्हा आत्मकेंद्रीपणाची बीजं मुलांमध्ये पेरत होता, तेव्हा तुम्ही मुलांना तुमच्यापासून तोडत होता.

कारण ती आता इतकी आत्मकेंद्री झाली आहेत, तुम्ही सतत शिकवल्यामुळे ती त्यांचाच विचार करू लागली आहेत, की त्यांना नातेवाईक, मित्र, गोतावळा, आजूबाजूचा समाज यांच्याशी कनेक्ट व्हायला पुरेसा वेळ मिळत नाही. मी त्यांना दोष का म्हणून द्यावा? किंबहुना मी आपल्याला अशी विनंती करेन की तुम्ही जी चूक केली, ती तुमच्या मुलांनी त्यांच्या मुलांच्याबाबत करू नये! तुमची नातवंड ही पुन्हा एकदा सामाजिक प्राणी होतील, याची काळजी आता तुम्हीच घेतली पाहिजे... आपण तक्रारी मागे सोडूया, कारण त्या करण्यात अर्थ नाही; परंतु आपल्या नातवंडांचा भविष्यकाळ उज्ज्वल करू शकलात, तर येणाऱ्या कित्येक पिढ्या तुम्हाला दुवा देतील. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, याचं स्मरण आपण पुन्हा एकदा स्वतःला देऊया आणि आपल्या पुढल्या पिढ्याही तशाच घडवूया..’

माझ्या समारोपावर टाळ्यांचा कडकडाट झाला. मी सर्व ज्येष्ठ नागरिकांपुढे मान तुकवली. त्यांना वाकून नमस्कार केला. म्हटलं, ‘‘तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. चुकूनमाकून जास्त बोललो असेल, तर क्षमा करा. पण जे बोललो ते खूप मनापासून बोललो. आवडलं तर तसं सांगा. काही चुकलं असेल तर तसंही सांगा...’

कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा बराच वेळ मी ज्येष्ठ नागरिकांच्या गराड्यात त्यांचे आशीर्वाद घेण्यात, त्यांची पाठीवरची शाब्बासकी झेलण्यात मग्न होतो. तो कार्यक्रम माझ्या दृष्टीने अविस्मरणीय होता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT