dr salil kulkarni 
सप्तरंग

मन शांत निजावे... (डॉ. सलील कुलकर्णी)

डॉ. सलील कुलकर्णी musicdirectorsaleel@gmail.com

चिडण्याचं, दमल्याचं, आनंदी असण्याचं नाटक करू शकतो माणूस; पण मन शांत असण्याचा दावा केलाच, तरी डोळे फितूर होऊन सत्य सांगतातच! बहुतेक वेळेला हे ओझं असतं, असमाधानाचं, गैरसमजांचं, कोणीतरी उगीचच गंमत म्हणून जाता जाता टोचून बोललेल्या वाक्याचं... किंवा एखाद्या अगदी विचित्र नजरेचंसुद्धा. आपण घरातला पसारा आवरतो, शांत झोप लागावी म्हणून झोपण्यापूर्वी अंघोळ करतो; पण मनातला पसारा कोण आणि कधी आवरणार?

ऐसे काही व्हावे.. मन शांत निजावे
एकांताच्या वेळी आकांत निमावे

माझं हे गाणं म्हणताना मला खरंच फार शांत वाटतं...पण क्षणभरच... अगदी क्षणभर!
सगळी धावाधाव कशासाठी? सगळा व्याप मांडायचा.. नात्यांचं जाळं विणत जायचं.. घर बांधायचं.. आधी स्वप्नांत, मग सत्यात, आधी छोटं... मग थोडं मोठं आणि रिटायर होता होता अगदी भव्य वगैरे... कशासाठी? तरीही उरे काही उणे... आहेच. जावेद अख्तर म्हणतात तसं..‘हर एक घर मे सिर्फ एक कमरा कम है’... अगदी खरंय. कितीही मोठं घर असलं तरी त्यात शांत चेहऱ्यानं झोप लागेल, याची खात्री कोण देईल?
खूप माहिती मिळवायची, साठवायची, शिकायची, मग शिकवायची.. कशासाठी? ही सगळी माहिती डोक्याशी घेऊन शांत झोप लागेल?
गडगंज पैसा, जमिनी, शेअर्स सगळं सगळं साठवलेली अती धनाढ्य माणसंसुद्धा रात्री शांत झोपेसाठी तळमळतात, तेव्हा लक्षात येतं, की शेवटी सगळी धडपड त्या काही तासांच्या शांत झोपेसाठी. आणि माणूस झोपेल हो एकवेळ; पण मनाचं काय? आठवा बरं, की मनालासुद्धा शांत निजवलं आहे तुम्ही, असं कधी झालंय ते.
ते तडफडत राहतं, रात्र रात्र तळमळतं; पण मग आपल्या मनालासुद्धा पासबुक दाखवून ‘बघ किती सुख आहे तुझ्या आयुष्यात,’ असं बिंबवत आपण झोपून जातो; पण मन काही लहान मुलांसारखं नसतं. लहान मुलं बिचारी.. आठवडाभर अजिबात वेळ न देणाऱ्या पालकांनी शनिवारी मॉलमध्ये नेऊन खर्च केला, की यांना आपली काळजी आहे, असं समजतात; पण मन मात्र आतून बघत असतं आपल्याला. त्याला फसवता येतच नाही.
कधी धावून धावून दमल्यानं किंवा कधी झोपेच्या गोळ्यांनी आणि मग आपल्याला वाटतं, की मन पण झोपलं असणार रात्री... शांत, निवांत! खरंच मन शांत झोपेल, तेव्हा काय होत असेल ती अवस्था? ती शांतता पकडायचा प्रयत्न केला होता आम्ही. संदीप खरेनं शब्दांतून आणि मी सुरावटीतून आणि स्वरातून, की... मन कधी अगदी शांत होऊन एखाद्या पिसासारखं तरंगणार? कधी मनाची दुखणी पण बरी होणार? कशी असेल ती शांत, निरामय अवस्था?

असल्या वेळी मंद गती
विरून जाती तीन मिती
पाचही प्राणांच्या ज्योती
सौम्यपणाने मिणमिणती

अस्वस्थाचे ओझे, क्षणी विसरून जावे... ऐसे काही व्हावे मन शांत निजावे..
तीन मिती विरून जाण्याची अवस्था किती सुंदर असेल. स्लो मोशनमध्ये पक्षी उडावा इतकी शांत, संयत आणि समाधानी अवस्था. प्राणांच्या ज्योती सौम्यपणानं मिणमिणतील का? सोशल मीडियाच्या या काळात सकाळी आपण नितळ मनानं उठून फक्त फोनकडे बघतो आणि एखादं असं वाक्य नजरेला पडतं, की सगळं ढवळून निघतं. सकाळी सकाळी राग, असूया, निराशा या सगळ्या गोष्टी गिळून टाकतात त्या शांततेला आणि मग दिवसभर कुठंही कितीही शांत जागी गेलं, तरी मनातला गलबला काही कमी होत नाही. अस्वस्थाचं ओझं घेऊन चालणारा माणूस एकवेळ खोट्या रुबाबात दिसू शकतो; पण शांत नाही. चिडण्याचं, दमल्याचं, आनंदी असण्याचं नाटक करू शकतो माणूस; पण मन शांत असण्याचा दावा केलाच, तरी डोळे फितूर होऊन सत्य सांगतातच! बहुतेक वेळेला हे ओझं असतं, असमाधानाचं, गैरसमजांचं, कोणीतरी उगीचच गंमत म्हणून जाता जाता टोचून बोललेल्या वाक्याचं... किंवा एखाद्या अगदी विचित्र नजरेचंसुद्धा. आपण घरातला पसारा आवरतो, शांत झोप लागावी म्हणून झोपण्यापूर्वी अंघोळ करतो; पण मनातला पसारा कोण आणि कधी आवरणार?
ग्रेस एका कवितेत ‘जेव्हा अंधारून येतो सारा अतृप्त पसारा’ असं म्हणतात. मला कायमच वाटतं, की हा पसारा आपल्याला शांत झोपू देत नाही.
हळूहळू एखाद्या ड्रॉवरमध्ये खूप सारी कागदपत्रं जमावीत तसा पसारा. दिलेला शब्द पाळला नसेल तर त्याचा पसारा, आपण शब्द पाळला आणि दुसऱ्याला त्याची जाणीव नसेल तर त्या निराशेचा पसारा, आपली आवडती व्यक्ती आपल्यावर विश्वास का ठेवत नाहीये याच्या टोचणीचा पसारा, काहीतरी विसरल्यावर येणाऱ्या अपराधीपणाचा पसारा, डोळ्यांसमोर न आवडणाऱ्या गोष्टी घडताना हतबल व्हावं लागतं तो पसारा, आपल्याविषयी इतरांच्या मनांत असलेल्या गैरसमजांचा आणि कदाचित आपल्या मनातसुद्धा जगाबद्दल आणि स्वतःबद्दलसुद्धा आलेल्या गैरसमजुतींचा पसारा.. शब्द, वाक्यं यांचा पसारा आणि नजरांचा, स्पर्शाचा, घाणेरड्या स्वरात आपल्यावर कोणी खेकसलं तर त्या अवाजाचा पसारा...!!

अगदी क्वचित.. गाणं म्हणताना किंवा मुलांना झोपावताना थोपटत थोपटत डोळे भरून येताना अंगाईच्या स्वरात क्षणभर अशी शांत अवस्था सापडते. सगळं शांत होतं. त्या एका क्षणात इतकी शांतता मिळते, की जणू एका युगाची शांतता. काही वर्षांची विश्रांती होते जणू मनाची. आपली झोप आपण बरोबर मिळवतोच; पण मनालासुद्धा शांतता हवी ना? नाहीतर रात्र रात्र फिरत बसतं ते भूतकाळातल्या अस्पष्ट आकृत्या बघत, किंवा भविष्यातल्या झाडावर वेताळ शोधत राहणाऱ्या विक्रमाच्या तळमळीनं जंगलात फिरत. जेव्हा जेव्हा अशी क्षणभराची शांतता मिळते तेव्हा जाणवतं, की
कोण आपुले, परके कोण?
परिचित कोणी.. उपरे कोण?
असते कोण.. नसते कोण?
असल्या वेळी उरते कोण?

आपण अधूनमधून शांत बसून तपासून बघायला हवं ना, की नक्की आपलं कोण आहे आणि कोणी आहे का आपलं खरंच? का नुसतीच बघ्यांची गर्दी आहे आपल्याभोवती? जेव्हा तीन मिती विरून जातील, तेव्हा कोण उरेल आपल्याबरोबर? जणू विमानातून उडी मारून पॅराशूटची प्रात्यक्षिकं दाखवताना सहज एकमेकांचे हात पकडतात, तसे पकडू आपण एकमेकांचे हात.. इतकी शांतता!
‘माझ्या मना तुला रे दुखते कुठे कळू दे?’ असं ग्रेस विचारतात. आपण आपल्या मनाला नेमकं कुठं दुखतंय याची चिंताच करू नये .ते शांत झोपत नाहीये हे आपल्याला जाणवूच नये हा पूर्णपणे स्वार्थीपणा वाटतो मला. त्याचं म्हणणं, त्याचं दुखणं, हट्ट... उसासे ऐकायलाच हवेत.
‘रुणुझुणु रुणझुणु भ्रमरा’सारखं भटकणारं मन शांत निजायलाच हवं. अगदी क्वचित ती नितळ, संपूर्ण शांतता मिळायलाच हवी. आपली सारी धडपड त्या दिशेनं व्हायला हवी.

बघ संध्येच्या वक्षी
कुणी भिरभिरता पक्षी
वाटे त्याचे गाव पुसावे
ऐसे काही व्हावे
मन शांत निजावे ...


मिळेल ना एका रात्री तरी आपल्याबरोबर आपल्या मनालासुद्धा शांत झोप? तेव्हा ते झोपेत सहज हसेल आणि आपलं मन हसेल, तेव्हा ते लहान मुलापेक्षाही निरागस दिसेल आणि त्या हसण्याचं गाणं होईल...!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT