लेखक : राजाराम पानगव्हाणे
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, त्याला समूहाने राहायला आवडते. एकांतवासात मनुष्य अधिक कालावधीत राहू शकत नाही. अगदी अश्व युगापासूनही मनुष्य हा समूहानेच राहत आला आहे. यामधूनच कुटुंब विस्तार संकल्पना उदयास आली.
एकापेक्षा अधिक समूहांना जोडणे यासाठी विवाहपद्धत उदयास आली आणि ती कालांतराने सर्वमान्यही झाली. पौराणिक काळापासून ते अगदी आत्तापर्यंत विवाहसंस्थेवर कितीही चर्चा झाली तरी तिचे महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अबाधित आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही.
कुटुंब ही सर्व समाजातील एक प्रमुख सामाजिक संस्था आहे, जी तिला सांस्कृतिक, सार्वत्रिक बनवते. त्याचप्रमाणे विवाहाच्या सभोवतालची मूल्ये आणि नियम जगभर प्रत्येक संस्कृतीत आढळतात. त्यामुळे विवाह आणि कुटुंब हे दोन्ही सांस्कृतिक वैश्विक आहेत.
पत्नी, पती, जोडीदार, आई, बाबा, भाऊ, बहीण इत्यादी नाती तयार झाली आणि ती सर्वमान्य होऊन स्वीकारलीही गेली. विवाह हा संस्कार सोहळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामध्ये दोन कुटुंबे जोडली जातात. दोन मने एकत्र होतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबरच इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on marriage Sanskar nashik )
गृहलक्ष्मीचे आनंददायी आगमन
या सोहळ्यात वधू-वरांची सलगी वाढण्यासाठी त्यामध्ये रचनाच अशी केली आहे. उष्टी हळद लावणे, सुवर्णाभिषेक असे अनेक विषय यात आहेत. या संस्कारामध्ये वडिलधाऱ्या मंडळींचा योग्य सन्मान केला जातो. वधू व वरपक्ष एकमेकांचे आदरसत्कार करतात. त्यानंतर ‘अंतरपाट’ हा काही वेळेसाठी आलेल्या विरहाचे प्रीतीत रूपांतर करतो.
या संस्कारामध्ये वधू व वर दोघेही देव अग्नी, पुरोहित यांच्यासमोर एकमेकांशी कायम एकनिष्ठ राहण्याचे वचन देतात. सप्तपदीवेळी दोघेही एकत्र सात पावले चालून नाते आणखी दृढ करतात. वधूचे गोड नाव ठेवले जाते. उंबरठ्याचे माप ओलांडून प्रवेश करणाऱ्या या गृहलक्ष्मीच्या आगमनाने सर्व कुटुंब आनंदी होते. या संस्कारामध्ये त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते.
विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग
लग्न का केले, या प्रश्नाला सहसा लोकांकडे खरंच उत्तर नसते. कारण लहानपणापासून हे डोक्यात बिंबलेले असते, की एक विशिष्ट वय झाले, की लग्न करायचे. आजूबाजूला ९९ टक्के हेच पाहत आपण मोठे झालेलो असतो. पण खरंच लग्नसंस्था म्हणजे काय, हे कोणी कधीच समजून घेत नाही.
एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याआधीही आपण तेथील रेकॉर्ड तपासून पाहतो. हल्ली तर मुलांना पहिलीत प्रवेश घेतानाही खूप काही पाहिले जाते. एवढेच काय तर बाजारात एखादी छोटीशी वस्तू अथवा भाजी घेतानाही आपण चिकित्सक पद्धतीने त्याची चौकशी करीत असतो. त्यामुळे विवाह आयुष्यातील फार महत्त्वाचा व आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा प्रसंग आहे.
आपल्या संस्कृतीमधील संस्कारातला एक भाग आहे. पण लग्न करायचे की नाही, यापेक्षा लग्न संस्था अस्तित्वात का आली आणि तिचे फायदे-तोटे काय, यावर आपण कधीच विचार करीत नाही आणि केला असेल, तर खरंच किती प्रामाणिकपणे आणि सचोटीने करततो, हे प्रत्येकाने तपासून पाहावे. आपण आयुष्यात खरोखर इतक्या मोठ्या निर्णयाचा किती आणि कशा पद्धतीने विचार करतो, हेही प्रत्येकाने तपासून पाहावे.
विवाह हा ‘संस्कार’, करार नाही...
हिंदू विवाह हा वेदकाळापासून चालत आला आहे. जी गोष्ट प्राचीन आहे, ती जगन्मान्य आहे. ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरुषसूक्तात केली आहे. वेदांमध्ये प्रत्येक मानवावर १६ संस्कार केले जावेत, असे म्हटले आहे. त्यातील विवाह हा १५ वा संस्कार आहे. विवाह या शब्दाची उत्पत्ती वि+वह् अशी आहे. विशिष्ट मार्गाचे जीवन, कूळ, समाज वाहून नेणे असा याचा अर्थ आहे.
सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह. विवाह हा हिंदूंचा ‘संस्कार’ आहे ‘करार’ नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधीबरोबरच एक ‘कार्य’ या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पाहतात.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही अनुभूती...
भारतीय विवाह परंपरेत‘वसुधैव कुटुम्बकम्’ची अनुभूती येते. प्रामुख्याने देव, ऋषी आणि लोक अशा प्रमुख उपस्थितीत विवाह संस्कार केला जातो. इस्लामी परंपरेत विवाह एक अनुबंध (करार) आहे. भारतीय परंपरेत समाजाच्या सामूहिक उपस्थितीचा संस्कार आहे. विवाह पवित्र बंधन आहे. विवाह समाज संघटनाचा आधार आहे. विवाहामुळे कुटुंबसंस्था निर्माण होते. कुटुंबांच्या योगाने समाज बनतो. कुटुंब ही प्रेमपूर्ण संस्था आहे.
त्यामुळे भारतीय चिंतनामध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही अनुभूती येते. भारतीय विवाहाचे कार्य लक्ष देण्यासारखे आहे. या प्रसंगाविषयी ऋग्वेदात मुलीला म्हणतात, ‘मी सौभाग्य वृद्धीसाठी तुझा हात हातात घेत आहे. त्यामुळे विवाहाला ‘पाणिग्रहण संस्कार’ असेही म्हणतात. याप्रसंगी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘हिचे पती दीर्घायु होवोत, ते १०० वर्षे जिवंत राहो, तसेच या दांपत्याला शत्रू आणि आजार यांनी पीडित करू नये’, असा आशीर्वाद देव अन् शक्ती देते असते.
‘सप्तपदी’चे विवाहातील महत्त्व
ऋग्वेदाच्या याच सूक्ताच्या सुंदर मंत्रामध्ये म्हटले आहे, की ‘हे मुली, तू सासू, सासरे, नणंद आणि दीर यांची सम्राज्ञी हो,’ हा मंत्र तत्कालीन समाजात स्त्रियांच्या स्थितीचा संकेत आहे. येथे मुलगी शासनकर्ता होण्यासाठी आशीर्वाद आहे. ‘वैदिक काळाला मागास आणि स्त्रीची कमकुवत स्थिती असणारा’ असे सांगणाऱ्या या विद्वानांसाठी हे सूक्त वाचनीय आहे. येथे नववधू सेविका नाही, तर सम्राज्ञी आहे.
खरेच एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागली, तर तिला बंधनात बांधून ठेवणे योग्य की त्या व्यक्ती बरोबर स्वातंत्र्य अनुभवणे योग्य? लग्नातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्तपदी. यातील सात वचनांचा अर्थ दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणे हाच आहे. एकमेकांच्या आयुष्यात अढळ स्थान राहो. यासाठी ध्रुवताऱ्याची साक्ष घेण्यात येते. शरीरातील सात चक्र, सात सूर, इंद्रधनुष्याचे सात रंग, सात ऋषी, सात द्वीप, सात परिक्रमा या सर्व गोष्टी सात असल्याने ‘सप्तपदी’ला महत्त्व आहे.
यामध्ये दोघांनी एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टींचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढे चालण्याची प्रार्थना असते. मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळ्यांवर एकता ठेवून एकमेकांवर कायम प्रामाणिकपणे प्रेम करत राहणे, जीवनातील प्रत्येक चढ-उतारांमध्ये एकमेकांची सुरक्षा आणि साथ देणे, सर्व काही एकत्र सहन करण्याची ताकद असणे, संतुलित आणि आनंदमयी जीवन जगण्यासाठी एकमेकांप्रति प्रेम, भक्ती, सन्मान, प्रामाणिकपणा, योग्य निर्णय क्षमता अपेक्षित आहे. कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, यासाठी एकात्मतेची शिकवण असते.
(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रुप आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.