mahesh kale
mahesh kale 
सप्तरंग

एका 'फॅक्‍टरी'ची खुमासदार कहाणी (महेश काळे)

महेश काळे

राजस्थानातलं कोटा शहर हे देशात त्याच्या शैक्षणिक वैशिष्ट्यामुळे परिचित आहे. ते वातावरण आणि विद्यार्थीदशेतले क्षण हळुवारपणे उलगडणारी "कोटा फॅक्‍टरी' ही वेब सिरीज अतिशय उल्लेखनीय आहे. मनाला थेट भिडणारे नेमके संवाद, उत्तम अभिनय, दिग्दर्शन यांमुळे ही वेब सिरीज वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सगळं चित्रण ब्लॅक अँड व्हाइट करण्याचा महत्त्वाचा प्रयोग करणाऱ्या या वेब सिरीजवर एक झोत.

भारतीय वेब सिरीजच्या इतिहासातली पहिली ब्लॅक अँड व्हाईट (कृष्ण-धवल) वेब सिरीज म्हणून "कोटा फॅक्‍टरी'चा विशेष उल्लेख करावा लागेल. आयआयटी-जेईई इच्छुक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचं दैनंदिन जीवन आणि सरतेशेवटी त्यांचं भावविश्वच ही वेब सिरीज तुम्हाला उलगडून दाखवते. ब्लॅक अँड व्हाइट थीमचा केलेला वापर इथं निश्‍चितच परिणामकारक ठरतो आणि सततच्या परीक्षा, कंटाळवाणा अभ्यास, प्रॅक्‍टिकल्स, घरापासूनचा दुरावा, आई-वडिलांच्या अपेक्षांचं ओझं या गोष्टींना अनुसरून तो इथं यथोचितही वाटतो. राजस्थानमधलं कोटा हे शहर आपल्या सर्वांना त्याच्या शैक्षणिक विशेषतेमुळे चांगलंच परिचित आहे. देशभरातून हजारो विद्यार्थी इथल्या कोचिंग क्‍लासेसमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. तिथलेच एक स्टार शिक्षक जितुभैय्या यांच्या तोंडचे संवाद "बच्चे दो साल में कोटा से निकल जाते है, कोटा बच्चोसे नहीं निकलता!' कोटाविषयीची हीच प्रमुख गोष्ट अधोरेखित करतात.

सिरीजची सुरुवात होते कोटा शहराच्या टॉप अँगलनं घेतलेल्या व्ह्यूनं- ज्यात तुम्हाला यशस्वी विद्यार्थ्यांची उंचच्या उंच अशी होर्डिंग्ज, तिथल्या कोचिंग क्‍लासेसच्या जाहिरातींचे मोठमोठे फलक, एखाद्या तुरुंगवत भासणाऱ्या मोठमोठ्या शैक्षणिक इमारती आणि क्‍लासेस दिसून येतात. सीरिजमध्ये एकूण पाच एपिसोड्‌स असून त्यांची नावंसुद्धा आगळीवेगळी आणि रंजक आहेत जी तुम्हाला कोटा शहरातल्या एकंदर सिस्टिमचा आणि वातावरणाचा परिचय करून देतात. उदाहरणार्थ, इन्व्हेंटरी, असेम्ब्ली लाईन, ऑप्टिमायझेशन, शट डाऊन आणि ओवरहॉयलिंग. इंजिनिअरिंगशी संबंधित लोक त्या नावांशी पटकन रिलेट करू शकतात. थोडक्‍यात सांगायचं झाल्यास विद्यार्थी हा या शहरात फक्त एक विद्यार्थी नसून, तो या वातावरणातलं किंवा कोटा नामक फॅक्‍टरीमधलं एक प्रॉडक्‍ट आहे. फॅक्‍टरीमध्ये जसं एखाद्या कच्च्या मालाचं फिनिश्‍ड प्रॉडक्‍टमध्ये रूपांतर होतं, तद्वत त्याला स्वतःला इथं घडवायचं आहे.

सोळा वर्षीय वैभव पांडे (मयूर मोरे) हा इटारसीहून कोटा इथं आयआयटी एंट्रन्सच्या तयारीसाठी आला आहे. त्यानं थोड्या उशिरानंच इथल्या एका नामांकित कोचिंग क्‍लासमध्ये प्रवेश घेतला आहे. अभ्यासाव्यतिरिक्तही त्याला अनेक गोष्टींचा, अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्याबाबत तो त्याच्या मित्रांपाशी म्हणजेच मीना (रंजन राज), उदय (आलम खान) आणि शिवांगी (अहसास चन्ना) यांच्याकडे मन मोकळं करायचा प्रयत्न करतोय. त्यांच्याशी बोलूनही समाधान न झाल्यास जितूभैय्या (कोटातले एक प्रसिद्ध शिक्षक- जितेंद्रकुमार) आहेतच. हे जितूभैय्या त्याला मेसचें जेवण, निद्रानाश, बद्धकोष्ठता याबाबतीतही अगदी एखाद्या मोठ्या भावाप्रमाणं सल्ले देऊन कोटामध्ये रुळण्यासाठी मदत करत आहेत. हे जितूभैय्या काही अंशी पालकांची उणीव भरून काढण्याचाही प्रयत्न करत आहेत. वैभव, मीना आणि उदय रोजच्या अभ्यासामुळे आणि दैनंदिन अडचणींमुळे येणारा ताण-तणाव घालवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि मिळणाऱ्या छोट्या ब्रेक्‍समधून आनंद मिळवायचा प्रयत्न करत आहेत. वैभव हा उदयसारखा मनमौजीही नाही किंवा मीनासारखा अति काळजी करणाऱ्यांपैकीही नाही. थोडक्‍यात तो या दोन्हींचा सुवर्णमध्य आहे. या सर्व शैक्षणिक वातावरणाला हळूहळू फुलत जाणाऱ्या, वैभव आणि वर्तिका (रेवथी पिल्लई) यांच्यातल्या प्रेमाची एक नाजूकशी किनारही आहे. त्यांच्यातले संवादही त्यांच्या कोवळ्या वयातल्या प्रेमाला साजेसे आहेत. एकत्र अभ्यास करण्याच्या किंवा नवीन सीलॅबस सुरू करण्याच्या बहाण्यानं ते एकमेकांच्या "टच'मध्ये राहायचा विचार करत आहेत. या दोघांमधली ही केमिस्ट्री खरंच बघण्याजोगी आहे. वेगवेगळ्या भावभावनांचं मिश्रण असलेली ही वेब सिरीज तुम्हाला खिळवून ठेवते.

राघव सुब्बू यांनी दिग्दर्शित केलेली "कोटा फॅक्‍टरी' ही वेब सिरीज टीव्हीएफ प्ले (द व्हायरल फिवर) आणि युट्यूब या दोन्ही माध्यमांवर उपलब्ध आहे. "टीव्हीएफ प्ले'नं याआधी देखील "पिचर्स', "ये है फॅमिली', "पर्मनंट रूममेट्‌स' यांसारख्या दर्जेदार सिरीजची मेजवानी आपल्याला दिली आहे. त्याच मालिकेतली ही वेब सिरीज आहे. नेटफ्लिक्‍स किंवा ऍमेझॉन प्राईमवरच्या वेब सिरीजइतकी भव्यदिव्यता, चकचकीतपणा कदाचित त्यांमध्ये नसेल; पण पटकथा, दिग्दर्शन, भावभावना प्रेक्षकांना आपलंसं करण्याची क्षमता याबाबतीत ती कुठंही कमी पडत नाही. अभिषेक यादव, सौरभ खन्ना आणि संदीप जैन यांची दमदार पटकथा हे या वेब सिरीजचं सर्वात मोठं बलस्थान आहे. प्रत्येक एपिसोडला अनुरूप अशा संवादांची पेरणी करून त्यांनी ती आणखीनच खुलविली आहे. उदाहरणार्थ, मीना आणि मीनलमधला "पापा ने कहा डॉक्‍टर्स इतने इमोशनल नही हो सकते, तो फिर इंजिनीअरिंग.' किंवा "पेरेन्ट्‌स के डिसीजन गलत हो सकते हैं, नियत नहीं' आणि "वैसे भी कभी कभार मिलने और साथ रहने में फर्क होता है यार, दोस्ती कोई रिवीजन थोडी है जो करनी ही है.' हे सर्व संवाद ऐकल्यावर प्रेक्षक निश्‍चितच थोडासा भावनिक आणि नॉस्टॅल्जिक होतो. विशेषतः कॉलेजच्या वातावरणात राहणाऱ्यांना त्यातले अनेक संवाद थेट रिलेट करता येतील. कथेचा प्रवास घडताना सत्यतेशी कुठंही तडजोड केलेली जाणवत नाही आणि त्यामुळेच की काय प्रत्येक एपिसोडगणिक वेब सिरीजचा आलेख आणखीनच उंचावतो. "थ्री इडियट्‌स', "दिल चाहता है' या सिनेमांचा किंचितसा प्रभावही या वेबसिरीज वर जाणवतो. कोटामधली सकारात्मक बाजू दाखवण्यावर दिग्दर्शकानं जास्त भर दिलाय. दिग्दर्शक राघव सुब्बू आणि निर्माते सौरभ खन्ना यांनी मनाच्या हळुवार अशा कोपऱ्यात घर करू पाहणारी एक अतिशय सुंदर कलाकृती सादर केली आहे. मयूर मोरेनं वैभवची भूमिका साकारताना प्रत्येक प्रसंगात बाजी मारली आहे. अभिनयातली प्रत्येक छटा त्यानं छानपणे रंगवली आहे. एक कलाकार म्हणून तो "लंबी रेस का घोडा' ठरणार यात शंका नाही. रंजन राजनं त्याला उत्तम साथ देत नेहमीप्रमाणं आपली छाप पाडली आहे. अहसास चन्ना हिनं बिनधास्त स्वभावाची शिवांगी उत्तमपणे साकारली आहे, तर रेवथी पिल्लईनं वर्तिकेची व्यक्तिरेखा साकारताना त्यातला निरागसपणा जपला आहे. आलम खाननं (उदय) पाचव्या म्हणजेच शेवटच्या एपिसोडमध्ये कमाल केली आहे.

जितेंद्रकुमारनेही जितूभैय्याच्या भूमिकेमध्ये जान ओतली आहे. "शुभ मंगल ज्यादा सावधान'मध्येही या अभिनेत्यानं त्याच्या अभिनयाचे रंग दाखवले आहेतच. अभिनयाचा वरदहस्त लाभल्यामुळे त्यातल्या प्रत्येक माध्यमात तो यशस्वी ठरतो. या वेब सिरीजमध्ये संगीताची बाजू सांभाळली आहे सिमरन होरा आणि कार्तिक राव यांनी आणि संकलन आहे गौरव गोपाल झा यांचं. जेरीन पॉल यांची सिनेमॅटोग्राफी खरंच लाजवाब आहे. ड्रोनच्या साह्यानं घेण्यात आलेले कोटा शहराचे शॉट्‌स तिथल्या वातावरणाचं अतिशय छान दर्शन घडवतात. सरतेशेवटी विद्यार्थीदशेतल्या ताणतणावांना, अडचणींना सामोरं जाताना सुरवंट होऊन राहायचं, की फुलपाखरू बनून उडायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. कारण "रहेगी जिंदगी में उलझनें, रहेगी परेशानियां, वो खूबसूरत पल, वो मिठी अंगडाईयां, याद आयेंगी वो यारीयां, याद आयेंगी वो यारियां.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT